



आता लक्ष छाननीकडे...

◼️आजरा : प्रतिनिधी ◼️
आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता २१ संचालक पदांच्या जागेसाठी तब्बल १७८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आलेले अर्ज दाखल करून घेण्याचे काम प्रशासनाच्या मंडळींनी केले आहे. परंतु छाननीत अनेकांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष लागून आहे.गुरुवार दि.१६ नोव्हेंबर रोजी छाननी होणार आहे.
कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सभासदांकडून व कर्मचारी वर्गांकडून अपेक्षा केली जात असताना विक्रमी संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बहुतांशी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये भाग भांडवलाची पूर्तता नसणे, जातीचे दाखले अद्ययावत नसणे, कारखान्याला ऊस पुरवठा न करणे असा ठपका ठेवून त्यांनी अर्ज बाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अर्ज दाखल करताना कोणालाही अडवलेले नाही परंतु छाननीत मात्र अशा मंडळींना रींगणाबाहेर जावे लागण्याची शक्यता अधोरेखित होऊ लागली आहे. यामुळेच छाननीकडे लक्ष लागून राहिले आहे.
अशी आहे छाननीपूर्व गटनिहाय दाखल अर्जांची परिस्थिती….
उत्तुर – मडीलगे गट (१४ अर्ज ),आजरा – शृंगारवाडी गट ( २४ अर्ज ), पेरणोली – गवसे गट ३० अर्ज), गजरगाव – भादवण गट ( २५ अर्ज ), हात्तीवडे – मलिग्रे गट ( २० अर्ज), इतर मागास प्रवर्ग (१७ अर्ज), महिला राखीव गट ( १७ अर्ज), अनुसूचित जाती गट ( १२ अर्ज ), ब वर्ग सभासद गट ( १२ अर्ज), भटक्या विमुक्त जाती जमाती गट ( ७ अर्ज )





बेलेवाडीच्या उपसरपंचपदी नारायण देसाई बिनविरोध

◼️आजरा: प्रतिनिधी◼️
बेलेवाडी हूlI ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नारायण देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानिमित्त बोलवण्यात आलेल्या विशेष बैठकीच्या
अध्यक्षस्थानी सरपंच पांडुरंग कांबळे होते.यावेळी ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव शिंदे, सदस्या मेघा तोरस्कर ,मनीषा केसरकर ,अनिता गायकवाड ,वर्षाराणी चव्हाण उपस्थित होते.
उपसरपंच पदासाठी नारायण देसाई यांचे नाव सर्जेराव शिंदे यांनी सुचवले त्यास मनीषा केसरकर यांनी अनुमोदन दिले.आभार सर्जेराव शिंदे यांनी मानले.




दिवाळीच्या पूर्वसंध्येला आजरा बाजारपेठ गजबजली

◼️आजरा:प्रतिनिधी◼️
दिवाळीच्या पूर्वसंध्येला आजरा बाजारपेठेत शहरवासीयांनी मोठी गर्दी केल्याने आजरा बाजारपेठ गजबजून गेली.ठीक – ठिकाणी केलेली विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी आकाशदिवे, विविध वस्तू खरेदीसाठी शहरवासीयांनी आज सायंकाळी बाजार पेठेत मोठ्या संख्येने हजेरी लावली.
रविवारी लक्ष्मीपूजन असल्याने फुलांसह रांगोळ्या, फटाके, वह्या, आकाश कंदील व सजावटीचे साहित्य खरेदी करता शहरवासीय प्राधान्य देताना दिसत होते.
बालगोपाळांसह महिला वर्गाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावल्याने बाजारपेठ गजबजुन गेली होती. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ सुरू होती.




सूरज परीट यांचे निधन…

◼️आजरा:प्रतिनिधी ◼️
कोळींद्रे तालुका आजरा येथील माजी सरपंच लक्ष्मण परीट यांचे चिरंजीव सुरज परीट यांचे अल्पश: आजाराने निधन झाले ऐन दिवाळीच्या तोंडावर परीट कुटुंबीयांवर कोसळलेल्या या प्रसंगाने कोळींद्रे पंचक्रोशी सह आजरा-गडहिंग्लज तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
२८ वर्षीय स्थापत्य अभियंता सूरज हा पुणे येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास होता. गेले काही दिवस तो किडनीच्या विकाराने त्रस्त होता. शुक्रवारी सायंकाळी त्याचे निधन झाले.त्याच्या पश्चात वडील लक्ष्मण परीट,आई व पत्नी असा परिवार आहे.




दिवाळीनिमित्त ‘आजरा ‘च्या अध्यक्षांना दिली खर्डा भाकर

◼️आजरा:प्रतिनिधी◼️
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांना फराळाऐवजी खर्डाभाकर देऊ केली. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्याच्या उद्देशाने सदर अनोख्या पद्धतीचे आंदोलन करण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यानवर, तानाजी देसाई, सखाराम केसरकर, कृष्णा पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.






