रविवार दि.११ जानेवारी २०२६


जेऊर येथे चोरी…
रोख रकमेसह ३ लाख ५६ हजार रुपये दागिने लंपास

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जेऊर ता. आजरा येथील विठोबा जानू पोवार यांच्या रहात्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून शनिवार दिनांक १० रोजी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम रुपये तीस हजार असा एकूण ३ लाख ५६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
पोवार हे कामानिमित्त बाहेर गेले असता बंद घराच्या समोरील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून सोन्याची बोरमाळ, कुड्या, लॉकेट,चांदीचे पैंजण, जोडवी यासह तीस हजार रुपये रोख घेऊन पोबारा केला. याबाबतची फिर्याद विठोबा पोवार यांनी पोलीसांत दिली असून पोलीस निरीक्षक संजय पाटील पुढील तपास करीत आहेत.

साळगाव बंधारा वाहतुकीकरता धोकादायक
पाटबंधारे विभागाकडून तहसीलदारांकडे वाहतूक थांबवण्याची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधाऱ्याचा आजऱ्याकडील बाजूचा एक पिलर खचला आहे. यामुळे पिलर आणि बंधाऱ्याचा वरील भाग एकमेकापासून सुटला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यासाठी या बंधाऱ्यावरून होणारी चार चाकी व अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याची मागणी पाटबंधारे विभागाने आजारात तहसीलदारांकडे केली आहे.
हिरण्यकेशी नदीवर सिंचनासाठी साळगाव येथे १९६७ मध्ये बंधारा उभारण्यात आला. या बंधार्याला साठ वर्षाहून अधिक काळ झाला आहे. त्यामुळे या बंधार्याच्या पिलरचे दगड निखळून पडण्याची प्रकार कायम घडत असतात. त्यातच पेरणोली देवकांडगाव मार्गे गारगोटीला होणारी वाहतूक देखील याच बंधाऱ्यावरून होते. सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने अवजड वाहनांची वाहतूक देखील वाढली आहे. त्यामुळे बंधाऱ्यास धोका निर्माण झाला आहे.
कांही वर्षांपूर्वी या बंधाऱ्याचा निकामी झालेला पिलर दुरुस्त करण्यात आला होता. आता पुन्हा आणखी एक पिलर निकामी झाला आहे. यातून अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे. आजरा-गारगोटी नवीन मार्गाचे काम सुरू आहे. रस्ते कामाची अवजड वाहतूक तसेच ऊस वाहतूक या बंधाऱ्यावरून सुरू आहे. बंधाऱ्याचे आयुष्य जास्त झाल्यामुळे बांधकाम कमकुवत होत आहे. त्यामुळे आता योग्य ती डागडूजी करून बंधारा सेवेत कायम ठेवणे गरजेचे आहे.
याबाबतचे लेखी पत्र पाटबंधारे विभागाने (सर्फनाला, आंबेओहोळ) यांनी आजरा तहसीलदारांना दिले आहे.

आजरा महाविद्यालयाच्या ‘राष्ट्रीय सेवा योजने’च्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे सोहाळे येथे उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जनता एज्युकेशन सोसायटी संचलित आजरा महाविद्यालय, आजरा येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने मौजे सोहाळे (ता. आजरा) येथे सात दिवसीय ‘विशेष श्रमसंस्कार शिबिराचे’ उत्साहात उद्घाटन जनता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विलास नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. ‘जलसंधारण व शास्वत विकासामध्ये युवकांचा सहभाग’ हा मंत्र घेऊन दि. ८ ते १४ जानेवारी २०२६ या कालावधीत हे शिबिर पार पडणार आहे.
यावेळी नाईक म्हणाले, ग्रामीण विकासात युवकांचे योगदान महत्त्वाचे असून श्रमसंस्कारातूनच उद्याचा जबाबदार नागरिक घडतो, असे प्रतिपादन केले. युवा शक्तीचा वापर विधायक कामांसाठी केल्यास समाजामध्ये शाश्वत विकास घडून येईल.
या सात दिवशीय शिबिरामध्ये पशुचिकित्सा व आरोग्य तपासणी शिबिर, पाणवठा स्वच्छता, ग्रामस्वच्छता याबरोबरच काजू पिक लागवड तंत्रज्ञान, जल जंगल आणि जमीन, अंधश्रद्धेकडून विवेकवादाकडे या विषयांवर व्याख्यान तसेच महिला आरोग्य आणि सबलीकरण, मताधिकार जनजागृती अभियान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी रुजवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले. सोहाळे गावच्या सरपंच मा. सौ. भारती डेळेकर यांनी शिबिरासाठी ग्रामपंचायतीचे पूर्ण सहकार्य राहील अशी ग्वाही दिली.
यावेळी संस्थचे संचालक डॉ. दिपक सातोसकर, श्री. के. व्ही. येसणे तसेच उपसरपंच वसंत कोंडुसकर, पोलीस पाटील माया कोंडूसकर (सोहाळे), मधुकर डेळेकर (बाची), ग्रामपंचायत सदस्य सौ. रेखा कांबळे, रमा कांबळे, श्री. महादेव पाटील, श्री. संदीप देसाई उपप्राचार्य प्रा. डी. पी. संकपाळ आणि कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएस प्रकल्पाधिकारी डॉ. अविनाश वर्धन यांनी केले. सूत्रसंचालन ज्युनिअर विभागाचे प्रकल्पाधिकारी प्रा. रत्नदीप पवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्रीमती वैशाली देसाई यांनी मानले.

पार्वती-शंकरची ‘सायबर सुरक्षितता’ विज्ञानदिंडीद्वारे उत्तूरमध्ये जनजागृती

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल व चॅरिटेबल ट्रस्ट व पार्वती-शंकर शैक्षणिक संस्थेच्या वतीने आयोजित २२ व्या बालवैज्ञानिक संमेलनाचा शुभारंभ “धोका सायबर गुन्ह्यांचा : इशारा सावधानतेचा” या विषयावरील विज्ञानदिंडीने झाला.
या विज्ञानदिंडीचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य मान. श्री महेश करंबळी व उत्तूरचे सरपंच मान. श्री किरण आमणगी यांच्या शुभहस्ते झाले. दिंडीत इयत्ता ६ वी ते १० वीचे सुमारे २८० विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. पालखीमध्ये शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांची प्रतिमा, सायबर सेल इंडियाचा लोगो व लॅपटॉपचे पूजन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी श्री.किरण आमणगी यांनी २२ वर्षांपासून सुरू असलेल्या बालवैज्ञानिक संमेलनाचे कौतुक करत ही विज्ञानदिंडी समाजप्रबोधनासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. अध्यक्षीय मनोगतात श्री. महेश करंबळी यांनी दिंडीच्या विषय व सादरीकरणाचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्य व घोषणांद्वारे सायबर गुन्हे व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली. पथनाट्य लेखन-दिग्दर्शन सौ. वैशाली पाटील, तर पालखी व घोषणांची संकल्पना सौ. भारती शिवणे व सौ. गौरी चाळके यांनी केली.
या उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. बसवराजआण्णा करंबळी, उपाध्यक्ष श्री. विश्वनाथआण्णा करंबळी, सेक्रेटरी श्री. सुरेश मुरगुडे, संचालक डॉ. व्ही. एम. पाकले, डॉ. दिनकर घेवडे व श्री. विनायक करंबळी यांचे मार्गदर्शन लाभले.
यरंडोळ येथे ग्राहक संरक्षण कायदा २०१९ या विषयावर व्याख्यान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येरंडोळ ता आजरा येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत आजरा तालुक्याच्या वतीने आयोजित ‘ग्राहक जागरण मास अंतर्गत ग्राहक संरक्षण कायदा २०१९’ या विषयी व्याख्यान आयोजित केले होते.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे सदस्य श्री संदिपजी जंगम यांनी ग्राहक संरक्षण कायदा २०१९ या विषयी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, श्री. शिंदे यांनी स्वागत केले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष श्री. जग्गनाथ जोशी, तालुका अध्यक्ष श्री. गुंडू परीट,तालुका सचिव श्री मंगेश पोतनीस, येरंडोल सरपंच सौ. सरिता पाटील,उपसरपंच श्री. भीमराव माधव, ग्रामसेविका सौ. गुरव ,श्री संतोष ढोणूक्षे व मराठी शाळा मुख्याध्यापक नेवरेकर , कवठणकर ,ग्रामपंचायत कर्मचारी. गावचे नागरिक उपस्थित होते.

श्री.रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिर व आदर्श बालक मंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील ‘श्री.रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिर’ व ‘आदर्श बालक मंदिर’ आजरा. या शाळांचा संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ येथील ‘आजरा महाविद्यालयाच्या रंगमंचावर’ उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष व आजरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी हे अध्यक्षस्थानी होते. स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी जनता एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विलास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अनिल देशपांडे, सचिव रमेशअण्णा कुरुणकर, सुरेश डांग, डॉ.दिपक सातोसकर, विजयकुमार पाटील, दिनेश कुरुणकर, कृष्णा येसणे यांचेसह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते कै.काशिनाथ अण्णा चराटी व कै.माधवराव देशपांडे, यांच्या प्रतिमेचे पूजन व नटरंगाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत श्री.रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला देसाई, आदर्श बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका साधना नारे , स्नेहसंमेलन प्रमुख- निलांबरी कामत व जयश्री डांग यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
वार्षिक स्नेहसंमेलनात शाळांमधील मुलांनी वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य सादर केली. वेगवेगळ्या प्रकारची बालगीते, मराठी, हिंदी, पारंपारिक, दाक्षिणात्य गीतांवर चिमुकल्यांनी अतिशय सुंदर नृत्य सादर केली. तसेच लावणी, ऐतिहासिक नृत्य, शेतकरी गीत, ज्वलंत प्रश्नावर आधारित छोटे नाटकही यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी उपस्थित प्रेक्षक व पालकांनीही दाद देत कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल गुरव यांनी केले. मुख्याध्यापिका उज्वला देसाई यांनी उपस्थितांचे आभार मानले.

छाया वृत्त

गडहिंग्लज तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटना यांच्या वतीने देण्यात येणारा या वर्षाचा ‘स्वच्छ सुंदर आदर्श शाळा’ पुरस्काराचा बहुमान मडिलगे हायस्कूल मडिलगे या शाळेला प्राप्त झाला असून तो समारंभ पूर्वक वितरीत करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. रमेश व्हसकोटी, प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था कोल्हापूर व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष श्री.के.बी. पवार तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि संचालक मंडळ उपस्थित होते..

आजचा नाट्यप्रयोग
संगीत कट्यार काळजात घुसली…
सादरकर्ते :- अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर सांगली
वेळ :- सायं.७-०० वा.
स्थळ:- आजरा महाविद्यालय रंगमंच


