
सोमवार दि. ३० डिसेंबर २०२४

घातवार…
आजरा शहर हादरले

काल रविवारी दुपारी तीन वाजता आजर्यापासून जवळच असणाऱ्या परोली बंधाऱ्यांमध्ये पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त शहरभर वाऱ्यासारखे पसरले.याचा संपूर्ण शहराला धक्का बसून शहरवासीय सुन्न झाले. कालचा रविवार हा केवळ कुतिन्हो कुटुंबीयच नव्हे तर संपूर्ण ख्रिश्चन बांधवांच्या दृष्टीने घातवार ठरला.
दरवर्षीप्रमाणे ख्रिसमस सण साजरा करण्यासाठी गावी एकत्र आलेल्या कुतीन्हो बंधूंचा अचानकपणे बुडून मृत्यू होणे ही विश्वास बसण्यापलीकडची बाब आहे. ख्रिसमस साजरा केल्यानंतर मावळत्या वर्षाला निरोप देऊनच परत आपापल्या कामावर रुजू व्हायचे असा निर्धार करून आलेल्या या तीनही भावंडांचा दुर्दैवी अंत झाला आणि त्यांनी सरत्या वर्षाबरोबरच जगाचाही निरोप घेतला.
मृत ॲड. रोझारिओ कुतिन्हो व फिलिप कुतिन्हो हे सख्खे भाऊ तर लाॅईड कुतिन्हो हा चुलत भाऊ. तोही मर्चंट नेव्ही सारख्या प्रतीथयश कंपनीमध्ये कामाला. तिघेही मुलेबाळे, पत्नी, आई वडील सांभाळून आपापल्या कामाची जबाबदारी पेलणारे ३५ ते ४५ वयोगटातील.
सहज म्हणून मौज मजा करण्यासाठी परोली बंधाऱ्यावर गेले आणि कुटुंबीयांच्या समोरच त्यांचा बुडून दुर्दैवी अंत झाला. पट्टीचे पोहणारे असूनही त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले.ॲड.रोझारीओ व फिलीप यांच्या आई-वडीलांनी फळांचा व्यवसाय सांभाळत संसाराचा गाडा नेटका हाकला होता. दोघा तरुण मुलांचा मृत्यू पाहण्याचे दुर्दैव त्यांच्या नशिबी आले.
काल दिवसभर आजरा शहरात या विचित्र मृत्यूंची चर्चा सुरू तर होतीच परंतु सर्वसामान्यांमधून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होताना दिसत होती.
बुडण्यापासून एकमेकांना वाचवण्याच्या नादात तिघांनाही मृत्यूला सामोरे जावे लागले.


१२ जानेवारीपासून आज-यात कै. रमेश टोपले स्मृति राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नवनाट्य कलामंच संस्था, आजरा आयोजित कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्य महोत्सव – २०२५ ला रविवार दिनांक १२ जानेवारी पासून सुरुवात होत असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
एकूण आठ नाट्यप्रयोग या कालावधीत होणार आहेत. रविवार दिनांक १२ जानेवारी रोजी अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती सांगलीच्या देहभान (लेखक अभिराम भडकमकर) सोमवार दिनांक १३ जानेवारी रोजी मनोरंजन मंडळ, इचलकरंजी निर्मित तिचे संदर्भ नसलेली गोष्ट (लेखक राजन खान) मंगळवार दिनांक १४ जानेवारी रोजी जागृती कला मंच, कुसवडे, सातारा यांचे गुपित आमच्या तुमच्या जिव्हाळ्याचे (लेखक विक्रम बल्लाळ) बुधवार दिनांक १५ जानेवारी रोजी दुर्वांकुर सादरकर्ते -कला केंद्र हरमल यांचे इथे ओशाळला मृत्यू (लेखक प्रा. वसंत कानेटकर) गुरुवार दिनांक १६ जानेवारी रोजी सितारों से आगे या लोक रंगभूमी, सांगली या संस्थेच्या इरफान मुजावर लिखित नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी वैभवी क्रिएशन, डिचोली यांच्या अबोल प्रीतीची अजब कहाणी या महेश नाईक लिखित नाट्य प्रयोगाचे तर शनिवार दिनांक १८ जानेवारी रोजी दाडोबा क्रिएशन, मोरजी येथील कधीतरी कोठेतरी या प्रा. वसंत कानेटकर लिखित संगीत नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे.
स्थानिक नित्य श्रद्धा फाउंडेशनच्या वॉक इन या डॉ. श्रद्धानंद ठाकूर लिखित नाट्यप्रयोगाचे रविवार दिनांक १९ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर बक्षीस वितरण समारंभ बुधवार दिनांक २२ जानेवारी रोजी सावरकर विचार दर्शन या सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानासह होणार आहे .


सरस्वती मानेचे सी.ए. परीक्षेत यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गवसे ता. आजरा येथील सरस्वती माने सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाली. शुक्रवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या या परीक्षेला कोल्हापूरमधून २८२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सरस्वती हिचे शिक्षण केंद्रीय मराठी शाळा व आदर्श हायस्कूल गवसे येथे झाले, तर आजरा महाविद्यालय येथे पुढील शिक्षण झाले आहे.
तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

मडिलगे येथे गुणवंतांचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मडिलगे ता. आजरा येथील दुषाली आनंदा येसणे हिची पोलीस पदासाठी निवड झाल्याबद्दल मडिलगे ग्रामस्थांच्या हस्ते तिच्यासह विविध गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
ज्ञानेश्वरी सुतार (मुरुकटे )हिची आरोग्य सेविका, अंकुश आयवाळे (परिवहन मंडळ, चालक )व शामल देसाई, देशसेवेत रुजू झालेबद्दलही यावेळी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सभापती भिकाजी गुरव, माजी उपसभापती दीपक देसाई, माजी सरपंच शिवाजी गुरव, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य , ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य सुशांत गुरव यांनी आभार मानले.

निधन वार्ता
रंगुबाई निकम

पारेवाडी- पेठेवाडी- वेळवट्टी ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व पारेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक गोविंद कृष्णा निकम यांच्या पत्नी रंगुबाई गोविंद निकम (वय ७८ वर्षं ) यांचे आकस्मिक निधन झाले.
त्यांच्या पश्चात पाच विवाहित मुली, जावई, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
जनता सहकारी बँकेच्या संचालिका सौ. नंदा निवृत्ती केसरकर यांच्या त्या आई होत.रक्षा विसर्जन उद्या मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता होणार आहे.
कृष्णाबाई नाईक

एरंडोळ ता. आजरा येथील कृष्णाबाई विठोबा नाईक ( वय ८६ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले,एक मुलगी, जावई,सूना, नातवंडे असा परिवार आहे.
आजरा साखर कारखान्याचे कर्मचारी निवृत्ती नाईक यांच्या त्या आई होत. रक्षा विसर्जन उद्या मंगळवारी सकाळी आहे.


आज शहरात…
♦ आजरा आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा करणेत येणार आहे.
♦ परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना प्रकरणी आजरा येथे आज तहसील कार्यालयावर संविधान प्रेमी, आंबेडकरवादी आणि शिव- फुले- शाहू प्रेमींच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.




