mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाजीवनमंत्रटेक्नोलॉजीठळक बातम्यादेशबिझनेसभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारविदेशसामाजिकस्थानिक

शुक्रवार – सातच्या बातम्या

शुक्रवार

१४ ऑगस्ट २०२६

पंचायत समितीच्या मासिक सभेत ग्रामपंचायतींच्या पाणीपट्टी करवाढीस विरोध

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

ग्रामपंचायतीकडील पाणीपट्टी कर वाढवण्याबाबत शासन निर्णय झाला आहे. ही कर वाढ परवडणारी नसुन याला प्रत्येक गावातून विरोध होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरीकांचा रोष आढवून घेण्यासारखे आहे असे सांगत याला पंचायत समितीच्या सभेत सदस्यांनी विरोध दर्शवला. पाणीपट्टी कर वाढीची सक्ती करू नये अशीही मागणी केली. मासिक सभेला काही खात्यांचे प्रमुख हजर राहत नसल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यांना नोटीस पाठवण्याबाबतही सुचना करण्यात आली.

येथील पंचायत समितीच्या सभागृहात मासिक सभा झाली. उपसभापती सौ. यशोदा पोवार अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, पंचायत समिती सदस्य समीर पारदे, विकास चाथे उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीस पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता एम. व्ही. तिवले यांनी विभागाचा अहवाल मांडला. प्रति महीन्यात एका नळ जोडणीला किमान १५० रुपये तर कमाल ४०० रुपये अशी पाणीपट्टी वाढ करण्याचा शासन निर्णय झाला आहे. वर्षाला किमान १८०० तर कमाल ४८०० रुपये इतकी अधिकची वाढ सुचवली आहे. हा निर्णय तालुक्यातील ग्रामपंचायतीना कळवला आहे. योजनेचे वीज बिल, पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा पगार, किरकोळ दुरुस्ती या खर्चावर आधारीत ही वाढ आहे. यावर श्री. पारदे म्हणाले, मलिग्रे ग्रामपंचायतीमधे वार्षीक २०० रुपये पाणीपट्टी वाढवली तर ग्रामस्थ आंदोलनाला उतरले. एवढी वाढ शक्य नाही आणि अडचणीची आहे. श्री. चोथे म्हणाले, याबाबत प्रत्येक ग्रामपंचायतीचा अभिप्राय घ्यावा. श्री. देसाई म्हणाले, या निर्णयाला पंचायत समिती सदस्यांचा विरोध असल्याचे जिल्हा परिषद व शासनाला कळवावे. काही विभाग प्रमुख मासिक सभेला उपस्थित राहत नाहीत. त्यांच्या सवडीने सभा घ्यावयाच्या काय ? अशी संतप्त विचारणा श्री. देसाई यांनी केली. गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना नोटीसा पाठवणार असल्याचे सांगीतले.

पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक उपआयुक्त डा. पी. सी. मुतेफोड यांनी पशुविमा योजनेबाबत माहीती दिली. लवकरच ही योजना कार्यान्वीत होणार असल्याचे त्यांनी सांगीतले. चंदगड हलकर्णी रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप श्री. देसाई यांनी केला. याबाबत संबंधीत ठेकेदार कंपनीला सुचना कराव्यात असे सांगीतले. आजरा परिक्षेत्र वनाधिकारी सचिन सावंत यांनी घाटकरवाडी येथील हत्तीग्रामला ९० कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगीतले. या वेळी कृषी, बांधकाम, शिक्षण, वीज यासह विविध विषयावर चर्चा झाली.

हत्तींच्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाय ; आजऱ्यातील हत्तीग्रामसाठी ९० कोटी

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा व चंदगड तालुक्यात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या हत्तींच्या उपद्रवाला कायमस्वरूपी लगाम घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथे प्रस्तावित ‘हत्तीग्राम’साठी तब्बल ९० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत ही घोषणा केली.

हत्तींचा अधिवास, त्यांच्या व्यवस्थापनासह स्थानिक पातळीवर निर्माण होणारा संघर्ष कमी करण्यासाठी हत्तीग्राम उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हत्तींच्या धुडगुसामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

तालुक्यात गेली वीस वर्षे हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. काही शेतकऱ्यांनी तर जंगला शेजारील जमिनी पडीक ठेवलेल्या आहेत. नुकसानीचे पंचनामे करणे व नुकसान भरपाई प्रक्रिया राबवण्यामध्ये वनखात्याचा प्रचंड वेळ जात आहे. यासाठी हत्तीग्रामची संकल्पना पालकमंत्री आबिटकर यांनी मांडली होती. हत्तींचा उपद्रव वाढत असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. हत्तींच्या वावरामुळे शेतजमिनी व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने केवळ तात्पुरत्या उपायांऐवजी हत्तींच्या अधिवासाचे व्यवस्थापन आणि मानव-हत्ती संघर्ष कमी करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले.

बांबू, फणस अन् काजूलाही नुकसानभरपाई

हत्ती तसेच अन्य वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीची भरपाई अधिक व्यवहार्य पद्धतीने देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. बांबूला गवताऐवजी वनस्पतीच्या स्वरूपात समाविष्ट करून त्यालाही नुकसानभरपाई देण्याचे तत्त्वतः मान्य करण्यात आले आहे.

याशिवाय हत्तींच्या उपद्रवामुळे नुकसान होणाऱ्या फणस व काजू बोंडासाठीही नुकसानभरपाई मिळावी, यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर घाटकरवाडी येथील हत्तीग्रामसाठी ९० कोटींचा निधी आणि तिलारीतील हत्ती अधिवासासाठी १२ कोटींच्या प्रस्तावामुळे मानव-हत्ती संघर्ष कमी करण्याच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

पर्यटनालाही मिळणार चालना

हत्तीग्राम केवळ हत्तींच्या व्यवस्थापनापुरते मर्यादित न राहता भविष्यात पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून विकसित होऊ शकते. हत्तींचा अधिवास, वनक्षेत्र आणि निसर्ग पर्यटन यांचा योग्य समन्वय साधल्यास आजरा-चंदगड परिसरातील पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, घाटकरवाडी येथे हत्ती संगोपन केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला सुरुवातीला ग्रामस्थांकडून विरोध झाला होता. मात्र वन विभाग, तत्कालीन आमदार आणि सध्याचे पालकमंत्री प्रकाश आंबिटकर यांच्या चर्चेतून हा तिढा सोडविण्यात आला होता. आता शासनाकडून निधी मंजूर झाल्याने या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

आजरा महाविद्यालयाची निशा दोरुगडे विद्यापीठात द्वितीय

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शिवाजी विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या बी.एस्सी. पदवी परीक्षेत आजरा महाविद्यालयाची विद्यार्थिनी निशा प्रकाश दोरुगडे हिने शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक पटकावला. तिने संख्याशास्त्र विषयातून बी.एस्सी. पदवी पूर्ण केली.

शिवाजी विद्यापीठामार्फत एप्रिल २०२६ मध्ये बी.एस्सी. पदवी परीक्षा घेण्यात आली. बी.एस्सी. पदवी परीक्षेची शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. आजरा महाविद्यालयाच्या संख्याशास्त्र विभागाची विद्यार्थिनी निशा प्रकाश दोरुगडे हिने बी.एस्सी. पदवी परीक्षेत शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक पटकावला.

निधन वार्ता
जनाबाई आजगेकर

पेंढारवाडी तालुका आजरा येथील जनाबाई विष्णू आजगेकर ( वय ८८ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवार दिनांक १६ रोजी सकाळी नऊ वाजता आहे.

येथील आजरा महाविद्यालयातील प्रा.डॉ. विनायक आजगेकर यांच्या त्या आई होत.

साताप्पा दोड्डमणी

रवळनाथ कॉलनी, आजरा येथील साताप्पा शिवाप्पा दोड्डमणी ( वय ६३ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले

त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

आजचे पंचांग

दिनांक : १४ ऑगस्ट २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : द्वितीया तिथी (सायंकाळी ०६.४६ पर्यंत) त्यानंतर तृतीया तिथी
नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी नक्षत्र (१५ ऑगस्ट पहाटे ०३.४२ पर्यंत) त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र
योग : परिघ योग (सकाळी ०९.२८ पर्यंत) त्यानंतर शिवा योग
करण : बलवा करण (सकाळी ०७.३९ पर्यंत) त्यानंतर कौलव करण (सायंकाळी ०६.४६ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : सिंह राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ११.०७ ते दुपारी १२.४३ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२ .१८ ते दुपारी ०१.०९
सूर्योदय : सकाळी ०६.२०
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०६
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

प्रवाशाचे बेचाळीस हजार रुपये हातोहात लंपास…

mrityunjay mahanews

आडवी बाटली उभी होणार…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पोलिसांना मारहाण पडली महागात: तिघांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!