शनिवार
२२ ऑगस्ट २०२६

स्मार्ट मीटर प्रश्नी शिवसेना आक्रमक…
महावितरण च्या कार्यालयावर तिरडी मोर्चा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महावितरण कडून वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटरची केली जाणारी सक्ती, मीटर बसवल्यानंतर येणारी भरमसाठ बिले या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने (उ.बा.ठा.) महावितरणच्या आजरा कार्यालयावर स्मार्ट मीटरचा तिरडी मोर्चा काढण्यात आला. संभाजी चौकामध्ये शिवसैनिक एकत्र येऊन तिथून ते महावितरणच्या कार्यालयासमोर आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, प्रकाश पाटील, शांताराम पाटील आणि डॉ .उल्हास त्रिरत्ने यांनी आपल्या भाषणामध्ये वीज वितरणच्या कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी संदीप पाटील व उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.स्मार्ट मीटरची सक्ती बंद करावी जुने मित्र पूर्ववत करावे शेती पंप बिल माफीतील घोटाळा थांबवावा विविध मागण्यांचा समावेश आहे.
आंदोलनात समीर चांद, दिनेश कांबळे, अशोक जांभळे, चंदर व्हरकटे, अमित गुरव, अमानुल्ला आगलावे, संजय कांबळे, सागर नाईक,महेश पाटील, संतोष पुजारी, रोहन गिरी, अल्ताफ नसरदी, जुबेर सोने खान,असिफ सोनेखान, कयुम माणगावकर, हुरेल माणगावकर, गौस माणगावकर, दयानंद भोपळे, शिवाजी आढाव, रवींद्र सावंत, गीता देसाई, डॉ. रोहन जाधव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बसस्थानक बांधकामासाठी धरणे आंदोलन सुरू ‘टाळे ठोको ’ आंदोलन स्थगित.

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर येथील रखडलेल्या एसटी बसस्थानकाच्या बांधकामासाठी कॉ. शिवाजी गुरव यांनी सुरू केलेले धरणे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू आहे. आंदोलनाची दखल न घेतल्याने शनिवारी एसटीच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता.या पार्श्वभूमीवर स.पो.नि. बाबासाहेब सरवदे, सरपंच किरण आमणगी, आगारप्रमुख पृथ्वीराज चौहान आणि कॉ. शिवाजी गुरव यांच्यात बैठक झाली.
या बैठकीत सोमवारी तहसीलदार व एसटी विभागीय नियंत्रक यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे ठरले. तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असून उद्या करण्यात येणारे ‘टाळे ठोको’ आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती कॉ. शिवाजी गुरव यांनी दिली. बैठकीस महेश करंबळी, राजू येसादे यांच्यासह संबंधित उपस्थित होते.
अवैध देशी दारू विक्री ; एकावर गुन्हा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हरपवडे पैकी चव्हाणवस्ती (ता. आजरा) येथे अवैधपणे देशी दारूची विक्री करणाऱ्यावर आजरा पोलिसांनी कारवाई केली आहे.
दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कुमार बाबूराव चव्हाण (वय ३८, रा. हरपवडे) याच्या घराच्या पाठीमागे उघड्यावर तो बेकायदा देशी दारू विकत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून पहिली धार संत्रा कंपनीच्या दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी पो.कॉ. सुभाष पाटील यांनी फिर्याद दिली असून आजरा पोलीस ठाण्यात दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.हे.कॉ. पांडुरंग येलकर करीत आहेत.

१७ वर्षे रेंगाळलेला आजरा नगरपंचायतीचा डी.पी. प्लॅन मार्गी ; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नांना यश
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायत स्थापन होऊन १७ वर्षे उलटली तरी डी.पी. (विकास आराखडा) प्लॅन रेंगाळला होता. अखेर दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी हा प्लॅन मंजूर झाला असून यासाठी आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे मोठे योगदान लाभले आहे.
डी.पी. प्लॅन मा.उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने आणि मंत्री आबिटकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला.यासाठी सुरेश होडगे, नेताजी कातकर यांनीही शासन दरबारी वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा केला होता.
डी.पी. प्लॅन मंजूर झाल्यामुळे आजऱ्यातील उद्योग, व्यापार व बांधकाम व्यावसायिकांना सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
बोलकेवाडी येथील गायरान क्षेत्रात रणरागिणी शेतकरी गटाने केली देशी वाणांच्या २०० वृक्षांची लागवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कृषी विस्तार अधिकारी दिनेश शेटे, सरपंच परिषद मुंबई जिल्हाध्यक्ष इंजि. जी. एम. पाटील, प्रदेश सरचिटणीस राजू पोतनीस, कृषी सहाय्यक तृप्ती पाटील व योगेश जगताप यांच्या हस्ते बोलकेवाडी येथे गायरान क्षेत्रात रणरागिणी शेतकरी गटाकडून २०० वृक्षांची लागवड करण्यात आली.
महिला निमंत्रक सौ. नीता वसंत बोलके यांनी स्वागत केले. किशोर उत्तम कातकर यांनी सामुदायिक शेतीची संकल्पना मांडली. इंजि. पाटील यांनी वृक्षतोड, तापमानवाढ व परागीभवनावर परिणाम याबत मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी वैभव गुरव, उत्तम कातकर, देवेंद्र बोलके, शिवाजी कोलेकर, ज्ञानदेव बोलके, शिवाजी कातकर, कविता बोलके तसेच गटाच्या सौ. अश्विनी विवेक कोळेकर, सौ. गीता आण्णासो बोलके, सौ. मंगल संजय बोलके, सौ. पुष्या शिवाजी बोलके, सौ. रुपाली संदीप कोळेकर, सौ. सारिका परशराम बोलके, सौ. सरिता सुरेश बोलके, सौ. शालन पांडुरंग डोंगरे, सौ. सुनिता शिवाजी कोलेकर, सौ. सुवर्णा संतोष भादवणकर उपस्थित होत्या. आभार वैभव गुरव यांनी मानले.

उत्तूर ग्रामपंचायतीकडून गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व अग्निवीरांचा गौरव

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उतूर ग्रामपंचायतीच्या वतीने चौथी, सातवी, आठवी शिष्यवृत्तीधारक, एनएमएमएस शिष्यवृत्तीधारक, दहावीतील यशवंत विद्यार्थी तसेच अग्निवीर भरती झालेल्या युवकांचा सत्कार समारंभ मुकुंदरावदादा आपटे सांस्कृतिक सभागृहात उत्साहात पार पडला.
समारंभात कन्या विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. यावेळी १०४ विद्यार्थी, १३ मार्गदर्शक शिक्षक, ३ अग्निवीर युवक तसेच श्री पार्वती शंकर विद्यालय, वसंतरावदादा पाटील विद्यालय, उतूर विद्यालय, कन्या व कुमार विद्यामंदिर आणि नवकृष्णा व्हॅली स्कूलमधील गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार समीर माने होते. स्वागत व सूत्रसंचालन महेश करंबळी, तर प्रास्ताविक सरपंच किरण आमणगी यांनी केले. तहसीलदार माने यांनी विद्यार्थ्यांना स्वप्नांचा पाठलाग करून आवडीच्या क्षेत्रात भविष्य घडविण्याचे आवाहन करत उतूर हे बुद्धिमत्तेची खाण असलेले गाव आहे असे कौतुक केले. अजित उतूरकर व टी. ए. कांबळे यांनीही मनोगते व्यक्त केली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजू खोराटे, भैरू कुंभार, संदेश रायकर, सनी आमणगी, अनिता घोडके, आशा पाटील, सुनिता केसरकर, ग्रामपंचायत अधिकारी सचिन येसादे, ग्राममहसूल अधिकारी एकनाथ मिसाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप खोराटे, गुरुनाथ जाधव, उपाध्यक्ष सतीश खरंदाळे, सत्कारमूर्ती शिक्षक, पालक व कर्मचारी उपस्थित होते. आभार संभाजी कुराडे यांनी मानले.
निधन वार्ता…
सौ. तुळसाबाई कुंभार

वाटंगी तालुका आजरा येथील तुळसाबाई सुभाष कुंभार (वय ६५ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे मारुती कुंभार व सुनील कुंभार यांच्या त्या आई होत.
आजचे पंचांग
दिनांक : २२ ऑगस्ट २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : दशमी तिथी (२३ ऑगस्ट रात्री ०२.०० पर्यंत) त्यानंतर एकादशी तिथी
नक्षत्र : ज्येष्ठा नक्षत्र (दुपारी ०२.४८ पर्यंत) त्यानंतर मूळ नक्षत्र
योग : विष्कुम्भ योग (२३ ऑगस्ट सकाळी ०६.१३ पर्यंत) त्यानंतर प्रीति योग
करण : तैतुला करण (दुपारी १२.४८ पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी (दुपारी ०२.४८ पर्यंत) त्यानंतर धनु राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.३२ ते सकाळी ११.०७ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१६ ते दुपारी ०१.०७
सूर्योदय : सकाळी ०६.२२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.००
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत


