
साळगाव येथील विवाहितेचा अपघातात मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
साळगाव तालुका आजरा येथील सौ. सुनिता राजेंद्र दोरुगडे( वय ४७ वर्षे )यांचे कोल्हापूर -रत्नागिरी. मार्गावर मलकापूर नजीक झालेल्या चार चाकीच्या अपघातात मृत्यू झाला.सध्या पुणे येथे वास्तव्य असणारे राजेंद्र दोरुगडे व पत्नी सौ.सुनिता राजेंद्र दोरुगडे हे दोघे पर्यटनासाठी रत्नागिरी येथे गेले होते.
शनिवारी पर्यटन करून परतताना रस्त्या शेजारी असणाऱ्या चरीमध्ये भरधाव गाडी उतरल्याने पलटी झाली व त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान काल मंगळवारी सकाळी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात सौ.सुनिता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पती राजेंद्र गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मडिलगे येथून लाखभराचे काजूगर लंपास

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मडीलगे तालुका आजरा येथील सुरंजन संजय पाटील यांच्या मालकीच्या काजू प्रक्रिया उद्योगामधून मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे लाखभर रुपयांचे काजूगर लंपास केले.१८ मार्च रोजी दुपारी १ ते रात्री ८.४५ वा. चे सुमारास दरम्यान सदर घटना घडली.
यामध्ये ९६०००/- रूपये किंमतीच्या २४० किलो काजूगरांचा समावेश आहे.सुरंजन पाटील यांनी आजरा पोलीसांत फिर्याद दिली असून पुढील तपास स.पो.नि. नागेश यमगर हे करीत आहेत.

दर्डेवाडी येथील वणव्यात सात लाखांचे नुकसान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मेढेवाडी (ता. आजरा) येथे लागलेल्या वणव्यात गिरीश बाबासाहेब देसाई रा. सुलगाव (ता. आजरा) यांची काजूची सुमारे सातशे झाडे जळून गेली आहेत. त्याचबरोबर ठिबक सिंचनची सुमारे दोन हजार मीटरची पाईपही वणव्यात जळून गेली आहे. श्री. देसाई यांचे सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बारा एकरचा परिसर जळून गेला.
मेढेवाडी जंगलाला लागून श्री. देसाई यांची शेती आहे. या शेतीमध्ये त्यांनी पाच वर्षांपूर्वी काजूची झाडे लावलेली आहेत. यासाठी ठिबक सिंचन केले आहे. जंगलातून चणवा पसरत श्री. देसाई यांच्या शेतात आला. वाळलेली पाने व गवतामुळे आग सर्वत्र पसरली. यामध्ये काजूची झाडे व ठिबक सिंचनची पाईप जळून गेली. जंगल परिसरही जळाला आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आग विझवली त्यामुळे अन्य शेतकऱ्यांच्या काजूच्या बागा वाचवण्यात यश आले.

श्री पार्वती -शंकर विद्यामंदिर व विद्यालयाचे यश

उत्तूर: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्यावतीने आयोजित श्री रामानुजन गणित प्रज्ञा व डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत श्री पार्वती- शंकर विद्यामंदिर व विद्यालयाच्या ९ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर उत्तुंग यश संपादन केले.
गणित प्रज्ञाशोध परीक्षेत इ. ८ वी मधील कु.अनुष्का सुनील पोटे ही विद्यार्थिनी कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम येऊन शिष्यवृत्तीस पात्र ठरली. ओम दत्तात्रय सुतार, कु.श्रेया संदीप खोराटे, कु.गौरी संजय भिऊंगडे,अथर्व पांडुरंग भाटले , कु.आर्या अनिल घोरपडे, कु.आर्या संदीप खोराटे हे विद्यार्थी जिल्हास्तरावर प्रज्ञापात्र ठरले. तालुकास्तरावर १९ पैकी १७ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड झाली होती. या विद्यार्थ्यांना गणित अध्यापिका सौ. वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तालुकास्तरीय परीक्षेत पाचवी मधील ३० पैकी १६ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड झाली होती.
विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत इ. ६ वी मधील कु. रसिका सुनील चव्हाण या विद्यार्थिनीने जिल्हास्तरावर ९४ गुण घेऊन ती शिल्डधारक झाली. या परीक्षेत ६ वी मधून १३ व ९ वी मधून १२ विद्यार्थ्यांची जिल्हास्तर परीक्षेसाठी निवड झाली होती. इ. ६ वी साठी वर्गशिक्षिका सौ. भारती शिवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

निधन वार्ता… कोंडीबा पाटील

कोरीवडे ता.आजरा येथील कोंडीबा तातोबा पाटील (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, मुलगी असा परिवार आहे.



