

कारखाना संचालक करतोय गवंडी काम…

आजरा:प्रतिनिधी
महिनाभरापूर्वी झालेल्या आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी निवडून आलेले हरिबा कांबळे आजही चक्क गवंड्याच्या हाताखाली कामाला जाऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. कारखाना अथवा इतर छोट्या मोठ्या बँका, सहकारी संस्था यांचे संचालक म्हटले की चार चाकी गाड्या, कडक इस्त्रीचे कपडे असा वेगळाच रुबाब बाळगणाऱ्या मंडळींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम हरिभाऊंनी केले आहे.
मुळातच लढवय्या स्वभावाचे असणारे हरिभाऊ महिनाभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आले व संचालकही झाले. कारखाना आर्थिक अडचणीत आहे याचे भान असल्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता हरिभाऊंनी आपल्या उदरनिर्वाहासाठी दैनंदिन वेळापत्रकात कोणताही बदल केलेला नाही.
आजही ते रोजी रोटीकरीता गवंडी काम व शेती कामे करताना दिसतात. रस्त्यावरचा कार्यकर्ता अशी ओळख असणा-या हरिभाऊंचे पाय आजही जमिनीवर आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
कारखाना बंद… कामगार सेंट्रींग कामावर
कारखाना चालू… संचालक गवंडी कामावर
आजरा साखर कारखान्यावर आर्थिक आरिष्ट आल्यानंतर कारखाना दोन वर्षे बंद ठेवण्यात आल्याने कांही कामगार चक्क सेंट्रींग कामासह विविध कामावर जाऊन आपला उदरनिर्वाह करीत होते. मी काही वेगळा नाही. कारखाना कामगारांवर जर ही परिस्थिती येत असेल तर मला गवंडी कामावर जाऊन दोन वेळची भाकरी मिळवण्यात लाज कसली ? ही हरिभाऊंची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी अशी आहे.



पेन्शनरांचा भुदरगड प्रांतवर निदर्शने करण्याचा आज-यातील बैठकित निर्णय

आजरा : प्रतिनिधी
पेन्शनवाढ व विविध मागण्यांसंदर्भात केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे ८ फेब्रुवारी रोजी भुदरगड प्रांत कार्यालय गारगोटी येथे निदर्शने करण्याचा निर्णय आजरा,भुदरगड व राधानगरी तालूक्यातील पेन्शनरांच्या आजरा येथील बैठकित घेण्यात आला.अध्यक्षस्थानी काँ. शांताराम पाटील होते.
पाटील म्हणाले,२०१४ पासून केंद्र शासनाने पेन्शनर विरोधी भूमिका घेतली आहे.पेन्शन वाढवणे शक्य आसतानाही वाढवली नाही.फंडावर शंभर टक्के रक्कम वाटली असती तर ५८०० रूपये पेन्शन झाली असती.यावेळी ९ हजार पेन्शन,महागाई भत्ता,प्रवासात सवलत,आरोग्य सवलत आदी मागण्या करण्यात आल्या.
याप्रसंगी कृष्णा चौगुले (राधानगरी),बबन शिंदे (भुदरगड),लक्ष्मण कामते,विजय पाटील,नारायण भडांगे,नारायण राणे,शांताराम हरेर (आजरा)उपस्थित होते.



खेळ आठवणीतले
पारंपरिक खेळांचा उत्सव

उत्तूर : प्रतिनिधी
सध्याच्या मोबाईलच्या काळात सर्वच गोष्टी झपाट्याने बदलत आहेत..या बदलत्या काळात अनेक नवनवीन गोष्टी उदयास येत आहेत. त्याच बरोबर अनेक जुन्या पारंपरिक गोष्टी ही काळाच्या ओघात नाहीशा होत चालल्या आहेत.
मागील वीस-तीस वर्षांपूर्वी च्या काळात खेळले जाणारे असे अनेक पारंपरिक खेळ आहेत जे आजच्या पिढीला माहित नाहीत. उपलब्ध साधनांचा वापर करून, विना खर्चिक, कुणाला ही सहज खेळता येणारे, कुठेही सहज खेळता येणारे, गणितीय क्षमता तसेच शारीरिक क्षमता आणि. बौद्धिक क्षमता विकसित होणारे असे बरेच खेळ आज काळाच्या ओघात नष्ट होत आहेत..
आपल्या पूर्वजांनी जे काही एकेक खेळ तयार केले आहेत त्या खेळांचा जर सखोल अभ्यास केला तर नवलच वाटते.
याच पारंपारिक खेळांना उजाळा देण्यासाठी उत्तुर विद्यालय उत्तुर व ज्युनिअर कॉलेज उत्तूर ने या पारंपरिक खेळांचा उत्सव आयोजित केला . “खेळ आठवणीतले ” या शीर्षकाखाली हे सर्व पारंपारिक खेळ उत्तूर विद्यालय, उत्तूरच्या मैदानात खेळले गेले.
या खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, पालकांनी आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विटी दांडू ,गलोरी, लगोरी,वष्टर, टायर फिरवणे, दोरी उड्या, घुंफट, आंधळी कोशिंबीर ,भातुकली, काचा कवड्या, गोफन उडी, जून फिरवणे यासारखे अनेक पारंपरिक खेळ खेळले आणि या खेळांचा आनंद लुटला..
कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य शैलेंद्र आमणगी, अभिजीत देसाई,रविंद्र महापुरे, बाजीराव एकशिंगे इंद्रजीत बंदसोडे , उमाराणी जाधव यांच्या उपस्थितीत झाले.
कार्यक्रमात हलगी आणि ढोल च्या तालावर विद्यार्थ्यांनी , शिक्षकांनी व पालकांनी या खेळांची मजा लुटली जवळपास दोन तास चाललेल्या या पारंपरिक खेळांच्या उत्सवामध्ये विद्यार्थी रममाण झाले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अशोक जाधव ,संदीप बादरे तानाजी कांबळे, बाबासाहेब पाटील, कविता व्हनबट्टे , लता तरवडेकर, अलका शिंदे, संभाजी तिबिले या शिक्षकांबरोबरच नंदकुमार कांबळे, राजाराम केसरकर , शरद जाखले , संतोष व्हनबट्टे , महादेव गुरव ,इमरानखान जमादार, सदानंद चव्हाण ,चिदंबर पोतदार या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक इंद्रजीत बंदसोडे यांनी केले.



तीन हजार विद्यार्थ्यांनी दिली शिव शिष्यवृती परीक्षा !

उत्तूर : प्रतिनिधी
उत्तूर, ता. आजरा येथील छत्रपती युवा ग्रुपच्या वतीने आयोजित शिव शिष्यवृती परीक्षा तीन हजार विद्यार्थ्यांनी दिली. उत्तूर परिसरातील चौथी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.या परीक्षेचे चांगले नियोजन छ. युवा ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी केले होते. उत्तूर परिसरातील ३० शाळांचा सहभाग होता .
केंद्र शाळा, उत्तुर कन्या शाळा, उत्तूर,उत्तूर विद्यालय, उत्तूर पार्वती शंकर विद्यालय, उत्तुर, नवकृष्णा व्हॅली, उत्तूर,वसंतरावदादा पाटील विद्यालय, उत्तूर,नवजीवन विद्यालय, उत्तूर ,प्राथमिक विद्यामंदिर, धामणे प्राथमिक विद्यामंदिर बेलेवाडी .प्राथमिक विद्यामंदिर , प्राथमिक विद्यामंदिर, आरदाळ .प्राथमिक विद्यामंदिर मासेवाडी ,अभिनव विद्यालय आरळगुंडी , शिवाजी विद्यालय, होन्याळी ,आदी विद्यालयात परीक्षा घेणेत आली .
परीक्षा यशस्वीतेसाठी योगेश भाईगडे सुरज रक्ताडे. अनिकेत आमणगी . आकाश पोरलेकर .रोहन केसरकर .आनंदा जावळे’ विद्याधर ढोणुक्षे निलेश गुरव . समर्थ . अभी सावंत .विनायक कातोरे प्रशांत हत्तरगी प्रणय खवरे. स्वरूप अस्वले .साईराज कातवरे . शुभम निलेश घोरपडे .दिलावर लाटवाले , यश येसादे .आदींनी परिश्रम घेतले .


निधन वार्ता
लक्ष्मण मोहिते

आजरा येथील लक्ष्मण बाबू मोहिते (वय ९०)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन विवाहित मुली, सून ,जावई, नातवंडे असा परिवार आहे. बेकरी व्यावसायिक आनंदा मोहिते यांचे ते वडील होत.
रक्षाविसर्जन बुधवार दिनांक ७ रोजी आजरा येथे आहे.



