mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

गुरुवार  दि.२७ मार्च २०२५   

तालुक्याची क्षयरोगमुक्तीच्या दिशेने वाटचाल

तालुक्यातील ३४ ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त

 आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा तालुक्यातील ७३ ग्रामपंचायती पैकी ३४ ग्रामपंचायत क्षयमुक्त झाल्या असून तालुक्याची क्षयरोगमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. सदर ग्रामपंचायतींपैकी ५ ग्रामपंचायतींना अमोल येडगे, जिल्हाधिकारी कोल्हापूर, यांचे हस्ते गौरविण्यात आले. तसेच उर्वरीत २९ ग्रामपंचायतींना समीर माने, तहसीलदार आजरा व एस. के. ढमाळ, गट विकास अधिकारी पंचायत समिती आजरा यांचे हस्ते गौरविण्यात आले.

       यावेळी ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

उत्तूर आरोग्य केंद्राचा जिल्हयात दुसरा क्रमांक

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या जागतिक क्षयरोग दिना निमित्त १०० दिवस क्षयरोग शोध मोहीम कार्यक्रमामध्ये उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हयात दुसरा क्रमांक मिळाला. कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात २४ मार्च २०२५रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते उत्तूर प्राथमिक ओराग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. रविकांत शर्मा यांनी हा पुरस्कार स्विकारला.

आरदाळ व चिमणे ग्रामपंचायतही टी. बी. मुक्त

     उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या वझरे, चिमणे व आरदाळ ग्रामपंचायत टी. बी. मुक्त ग्रामपंचायत म्हणून घोषित करण्यात आले. याबद्दल तेथील ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व ग्रामस्थांचे अभिनंदन करण्यात आले.

कावीळ, विषमज्वरच्या प्रादु‌र्भावाबाबत बैठक घ्या…

शिवसेना उबाठाचे  तहसीलदारांना निवेदन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहरात कावीळ व विषमज्वर (टाईफाईड) च्या वाढत्या प्रादु‌र्भावाबाबत बैठक लावावी, अशी मागणी शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे. तहसीलदारांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

      निवेदनात म्हंटले आहे, गेले अनेक दिवस आजरा शहरात कावीळ व विषमज्वर (टाईफाईड) या रोगाने थैमान घातले आहे. त्यामु‌ळे ग्रामिण रुग्णालय तसेच खासगी दवाखान्यात सुद्धा रुग्णांना उपचारासाठी रुग्णसेवा उपलब्ध होत नाहीत. त्यामु‌ळे रुग्णांचे हाल होत आहेत. कावीळची तपासणीसाठी खाजगी लॅबला केलेला खर्च सर्वसामान्य नागरीकांना परवडणार नाही, आजरा शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. त्याचबरोबर पिण्याचे पाण्याचे वितरण व्यवस्थेतील गळतीमुळे काविळ व विषमज्वर होत आहे. शहरातील उकरलेल्या रस्त्यांमु‌ळे धुळीचे साम्राज्य पसरल्याने अनेकजण आजारी पडत आहेत.

      भुदरगडचे उपविभागीय अधिकारी यांच्यासोबत आजरा नगरपंचायत अधिकारी, तालु‌का आरोग्य अधिकारी, ग्रामिण रुग्णालयातील वैदयकीय अधिकारी यांची बैठक लावावी अशी मागणी केली आहे.

      निवेदनावर उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, तालु‌का प्रमुख युवराज पोवार, रवि सावंत, महादेव गुरव, चंद्रकांत व्हरकटे, बिलाल लतीफ, शरद कोरगावकर, विश्वास किल्लेदार यांच्या सहया आहेत.

नाती जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया : राणी पाटील

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

      दूरदर्शन मालिकातील पात्रांमुळे मानसिकता बदलत चालली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी नाती जपण्याचा प्रयत्न करुया. आधुनिकिकरणामुळे महिलांचे कष्ट कमी झाले पण विविध आजार वाढले आहेत. मोबाईलमुळे तर प्रत्यक्ष भेटी कमी झाल्या आणि औपचारिकता वाढली . महिलांच्या बचतगटात पैशांची देवघेव बरोबर वैचारिक व चांगल्या मतांची देवघेव व्हावी असे मत राज्यस्तरीय व्याख्यात्या राणी( यशदा) पाटील यांनी व्यक्त केले . त्या उत्तूर ग्रामपंचायत मार्फत महिला दिनानिमित्य आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच सौ. वैशाली आपटे होत्या.

      प्रास्तविक सरपंच किरण आमणगी यांनी तर स्वागत व पाहुण्यांचा परिचय उपसरपंच सौ.समीक्षा देसाई यांनी करून दिला.

      यावेळी बोलताना राणी पाटील यांनी महिलानो स्त्रीभ्रुणहत्येस विरोध करा, मुलांना आदर करण्याची, सत्याची व इतर चांगल्या गोष्टीं घरातून शिकवा . मुलींना नोकरी, शहर, बंगला यांचे आकर्षण असते त्या ग्रामीण जीवनाला नाकारतात .त्यांना योग्य वयात शिकवण देण्याची गरज आहे असे सांगितले .

      याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा नाईक, सरिता कुरुणकर, सुनिता हत्तरगी, सुनिता केसरकर, आशा पाटील, लता गुरव, सविता सावंत व अनिता घोडके यांच्यासाह महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. आभार व सूत्रसंचालन संध्याराणी मोरबाळे यांनी केले.

आजऱ्यात पावसाची हजेरी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहरासह तालुक्यात ठीक ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी वळीव पावसाने हजेरी लावली. सायंकाळी पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. उत्तूरसह ठीक ठिकाणी पाऊस झाल्याचे वृत्त आहे

      पावसामुळे वारंवार विज पुरवठा खंडित होत होता . अचानक पणे झालेल्या पावसामुळे परगावाहून दुचाकी घेऊन तालुक्याच्या ठिकाणी  येणाऱ्या वाहनधारकांची घरी परतताना मात्र चांगलीच भंबेरी उडाली.

अविराज पाटील जवाहर नवोदय परीक्षेत तालुक्यात प्रथम

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     देवर्डे ता.आजरा येथील मराठी वि.म. देवर्डे शाळेचा विद्यार्थी अविराज आनंदा पाटील याने जानेवारी मध्ये घेण्यात आलेल्या नवोदय परीक्षेत आजरा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.

      यासाठी मार्गदर्शक शिक्षक श्री. महादेव बाळकू तेजम, मुख्याध्यापक, श्री. विनायक आमणगी, केंद्रप्रमुख, श्री.रावसाहेब देसाई यांनी मार्गदर्शन केले.

 

संबंधित पोस्ट

भावेवाडी येथे अपघातात जेऊर येथील एक जण ठार

mrityunjay mahanews

विजय गवंडळकर यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!