mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


शहराला डेंग्यूचा विळखा

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा शहर व परिसरामध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असून आजरा ग्रामीण रुग्णालय, स्थानिक व गडहिंग्लज येथील खाजगी दवाखान्यांमध्ये आजरा शहरातील डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहेत. यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

     गेल्या पंधरा दिवसांमध्ये शहरातील खाजगी दवाखान्यात डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार सुरू असतानाच आता आजरा ग्रामीण रुग्णालयामध्येही डेंग्यूचे रुग्ण दाखल होऊ लागले आहेत. शनिवार दिनांक १३ रोजी तीन रुग्ण दाखल झाले आहेत.

    डेंग्यू बाधितांमध्ये शाळकरी मुलांसह वयोवृद्ध नागरिकांचाही समावेश आहे. डेंग्यू बरोबरच विषमज्वर/टायफाईडचे रूग्णही ठिकठिकाणी आढळू लागले आहेत.

   एकंदर डेंग्यू व टायफाईडने शहरवासीय त्रस्त झाले आहेत. शहरामध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेनिमित्त केलेल्या खुदाईमुळे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पावसामुळे डबकी तयार झाली आहेत. यामुळेच डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ होत आहे तर नळ पाणीपुरवठा योजनेला ठिकठिकाणी लागलेल्या गळत्यांमुळे दूषित पाणी पुरवठा होत असल्याने टायफाईड रुग्ण आढळत असल्याचे शहरवासीयांतून बोलले जात आहे.

आरोग्य विभागाकडून सुमारे महिनाभर डेंग्यू प्रतिबंधात्मक काळजी घेतली जात असतानाही डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे.

अमृतेश्वर मंदिरातील दानपेटी फोडली… घंटाही गायब

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     निंगुडगे येथील सुप्रसिद्ध अमृतेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी पंधरा हजार रुपये रोख रकमेसह मंदिरातील छोट्या-मोठ्या घंटा गायब केल्या आहेत. वडकशिवाले येथील मंदिरातील घंटांच्या चोरीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी सदर प्रकार घडल्याने पोलिसांसमोर या चोरट्यांचा शोध लावण्याचे नवे आव्हान निर्माण झाले आहे.

     शुक्रवारी रात्री सदर प्रकार घडला असून याबाबतची फिर्याद मंदिराचे पुजारी बापू शंकर जंगम यांनी पोलिसात दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर करीत आहेत.

आजऱ्यात वीर शिवा काशीद यांची पुण्यतिथी उत्साहात


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा येथे नरवीर शिवा काशिद यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. ज्येष्ठ नेते जयवंतराव शिंपी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी व भाजपा तालुका अध्यक्ष बाळ केसरकर यांच्या हस्ते शिवा काशिद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रभाकर कोरवी, प्रकाश पाचवडेकर, गौतम भोसले, आनंदा इंगळे, कृष्णा यादव यांच्यासह मान्यवर व नाभिक समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरवासीयांना आज पाणीपुरवठा नाही

         गांधीनगर पंप हाऊस मधील मुख्य पाईपलाईनचे काम सुरू असल्याने रविवार दिनांक १४ जुलै रोजी आजरा शहरवासीयाला पाणीपुरवठा होणार नाही अशी माहिती नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

पाऊस – पाणी

     आजरा मंडल मध्ये गेल्या २४ तासात ३० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. चित्री प्रकल्प परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला असून प्रकल्पामध्ये ६३.८६ % इतका पाणीसाठा झाला आहे, तर आंबेओहोळ प्रकल्पामध्ये ८३% इतका पाणीसाठा आहे. तर उचंगी मध्यम प्रकल्पामध्ये ३६.९१ % इतका पाणीसाठा झाला आहे.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Test

Admin

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!