रवीवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२४




सायबाचा विषय लय हार्ड हाय…

ज्योतिप्रसाद सावंत….
लोकसभा निवडणुकीनंतर कोल्हापूरच्या बंटी सायबांनी विधानसभा निवडणुकही चांगलीच गांभीर्याने घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत एकत्र आलेल्या मंडळींची पुन्हा एक वेळ मोट बांधण्यासाठी साहेबांची फोना-फोनी सुरू आहे. बाकी सगळे हेवे-दावे सोडा आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी रहा.. प्रचार यंत्रणेत सक्रिय रहा… काही कमी पडत असेल तर स्पष्ट सांगा… अशा संदर्भाचे फोन कार्यकर्त्यांना येऊ लागल्याने आजरा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सायबाचे हे आदेश गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली आहे.
दादा असो किंवा भाऊ असो आता नेटाने कामाला लागलण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. साहेब तुम्ही ठरवाल ते धोरण म्हणत अनेक जण कामालाही लागले आहेत.
शेवटी
‘सायबाचा विषय लय हार्ड हाय…
नगरपंचायतीसह जिल्हा परिषदेत
कार्यकर्त्यांच्या एंन्ट्रीच
त्याच्याकड कार्ड हाय…’


आज विष्णुपंतांचा मेळावा…
नंदाताई व के.पीं.ना मदतीची शक्यता

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अनेक नेत्यांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या आहे आज रविवारी आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व पंचायत समितीचे माजी सभापती विष्णुपंत केसरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला असून या मेळाव्यामध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या (शरद पवार) उमेदवार नंदाताई बाभुळकर व राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना (उ.बा.ठा.) चे माजी आमदार के. पी. पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील कोळींद्रे जिल्हा परिषद मतदार संघामध्ये केसरकर यांना मानणारा गट मोठा आहे. साखर कारखान्यासह पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्त्यांशीही चांगला संपर्क ठेवला आहे. यामुळे केसरकर यांची भूमिका काय राहणार ? याकडे तालुक्याचे लक्ष आहे.



स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या एकाच दिवसात २ कोटी ८२ लाखांच्या ठेवी जमा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेकडे दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर दोन कोटी ८२ लाख ६६ हजार रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत.
संस्थेचे सभासद ठेवीदार व हितचिंतक यांनी दिलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दयानंद भुसारी सर व्यवस्थापक अर्जुन कुंभार व संचालक मंडळाने सर्वांचे आभार मानले.


दिवाळी, सुगी, निवडणूक आणि पावसामुळे शेतकरीवर्गाची धांदल…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नोव्हेंबर महिना सुरू झाला तरीही पाऊस सुरू असल्याने यावर्षी शेतकरी पावसानं वैतागला असून पेरणीपासून सुरू झालेला पाऊस, सातत्याने सुरू असून ओढा नाल्यांसह शिवारं पाण्यानं भरली आहेत. परतीच्या पावसाने दसरा दिवाळीची सांगड घातल्याने परिपक्व झालेल्या पिकांची कापणी मळणी करताना नाकीनऊ होत आहे.
त्यातच महाराष्ट्रातील ग्रामीण भागात निवडणूक रणधुमाळी सुरू झालीअसून अपक्ष उमेदवारांसह महायुती व महाघाडीच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी शेतकरी बंधू आणि ‘लाडक्या बहिणींना’हजेरी लावावी लागत आहे.
पावसाने तर आपली हजेरी कायम ठेवल्याने भात, भुईमूग व नाचना या पक्व झालेल्या पिकांची कापणी मळणी करताना शेतकरीवर्गाची धांदल उडाली आहे.
दिवाळीचे नियोजन करताना शेतकरीवर्गाची व लाडक्या बहिणीची दमछाक होत असून दिवाळी करायची, सुगी आवरायची की निवडणूकीच्या कार्यक्रमात हजेरी लावायची या विवंचनेत ग्रामिण भागातील शेतकरी मतदार बंधू भगिनी सापडल्या आहेत.


पाडव्याच्या मुहुर्तावर जनता बँकेकडे १५ कोटींच्या विक्रमी ठेवी जमा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जनता सहकारी बँक लि., आजरा या बँकेकडे दिपावली पाडव्याच्या मुहुर्तावर रु. १५ कोटी ०४ लाखाच्या ठेवी जमा झाल्या असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी दिली.
बँकेकडे रु. ३८८ कोटीच्या ठेवी. रु. २६० कोटीची कर्जे व रु. १६० कोटीची गुंतवणूक असून बँकेने सलग शुन्य टक्के नेट एन पी ए ठेवण्यामध्ये सातत्य राखले आहे. बँकेच्या एकूण २० शाखा कार्यरत असून बँकेचे कार्यक्षेत्र कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, ठाणे. मुंबई व उपनगरे आहे . ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक तसेच बँकेचे कर्मचारी व त्यांनी पुरविलेल्या सेवेमुळेच बँकेची प्रगती सुरू आहे असे बँकेचे सीईओ एम बी पाटील यांनी सांगितले.
बँकेकडे अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त डी सी व डी आर सेंटर असून बँकेच्या २० शाखांपैकी १३ शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये कार्यरत आहेत.
बँकेच्या विविध योजनांचा फायदा सभासद, ग्राहक व उद्योजकांनी घ्यावा असे आवाहन बँकेचे चेअरमन श्री. मुकुंददादा देसाई, व्हा. चेअरमन बापू टोपले सी ई ओ एम. बी. पाटील व सर्व संचालक यांनी केले.


संवेदना फाऊंडेशनच्या वतीने आज रक्तदान शिबिर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संवेदना फाऊंडेशन च्या वतीने आजरा येथे पंडित दीनदयाळ हायस्कूलच्या प्रांगणात आज रविवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली आहे.
रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही संयोजकांनी केले आहे.


लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा


🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969




