शनिवार दि.१० जानेवारी २०२६


आजऱ्यातील तरुणाचे अपघातात गोव्यात निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सुतार गल्ली ,आजरा येथील यश दिनेश सुतार या १९ वर्षीय तरुणाचे बांबोली/ गोवा येथे दुचाकी अपघातात निधन झाले. शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सदर अपघात झाला.
भरधाव दुचाकी समोरच्या खांबाला धडकल्याने यश हा गंभीर जखमी झाला व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्याच्या पश्चात आई, मोठा भाऊ असा परिवार आहे. दोन वर्षापूर्वी त्याचे वडील दिनेश यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर यश हा कामानिमित्त गोवा येथे वास्तव्यास होता. आजरा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कृष्णा सुतार यांचा तो नातू होता.
सुतार कुटुंबीयांवर ओढवलेल्या या आपत्तीने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कहानीमे ट्विस्ट…
स्वीकृत नगरसेवक पदी डॉ .इंद्रजीत देसाई व विक्रम पटेकर निश्चित

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीच्या स्वीकृत नगर सेवक पदाच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर काल शुक्रवारी जोरदार हालचाली झाल्या. सत्तारूढ ताराराणी आघाडी कडून डॉ. इंद्रजीत नानासो देसाई यांची तर राष्ट्रीय काँग्रेस कडून विक्रम पटेकर यांची निवड निश्चित झाल्याचे वृत्त आहे.
स्वीकृत नगरसेवक निवडीच्या पार्श्वभूमीवर काल शुक्रवारी राष्ट्रीय काँग्रेसच्या नगरसेवकांसह मित्र पक्षांचे नगरसेवकांची व पदाधिकाऱ्यांची आमदार सतेज पाटील यांनी बैठक घेतली. नूतन नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले. दरम्यान ताराराणी आघाडीच्या प्रमुख मंडळींना आजरा अर्बन बँकेमध्ये आघाडी प्रमुख अशोक चराटी यांनी बोलावून घेऊन सूचना केल्या. ताराराणी आघाडी कडून पहिल्या टप्प्यात डॉ. देसाई यांना संधी देण्याबाबत एकमत झाल्याचे समजते. रशीद पठाणही या पदाकरता इच्छुक आहेत परंतु पहिल्या टप्प्यात त्यांची वर्णी लागेल असे दिसत नाही.
विरोधी आघाडी कडून अनेक जण इच्छुक होते. परंतु विक्रम पटेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे.
उपनगराध्यक्ष पदाकरीता सौ. पूजा अश्विन डोंगरे यांचे नाव यापूर्वीच निश्चित झाले आहे. या सर्व निवडी सोमवारी होणार आहेत.

दि आजरा अर्बन को-ऑप. बँकेच्या चेअरमनपदी श्री. अशोक चराटी व व्हा. चेअरमनपदी श्री. संजय चव्हाण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेच्या चेअरमनपदी श्री. अशोक काशिनाथ चराटी व व्हाईस चेअरमनपदी श्री. संजय विष्णू चव्हाण यांची एकमताने निवड झाली असून बँकेच्या संचालक मंडळाने यापुर्वीची बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखलेली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. अमोल येडगेसो (जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कोल्हापूर) यांनी काम पाहीले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. गजानन गुरवसो (निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी कोल्हापूर), श्री. प्रेम राठोडसो (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था करवीर), श्री. सुजय येजरे (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था आजरा) उपस्थित होते.
चेअरमन पदासाठी श्री. अशोक काशिनाथ चराटी यांचे नांव श्री. जयवंत यशवंत खराडे यांनी सुचविले. त्यास श्री. सुनील माधवराव देशपांडे यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमन पदासाठी श्री. संजय विष्णू चव्हाण यांचे नांव श्री. विनय भालचंद्र सबनीस यांनी सुचविले. त्यास श्री. सिद्धेश विलास नाईक यांनी अनुमोदन दिले. नुतन चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
नुतन चेअरमन श्री. अशोक काशिनाथ चराटी यांनी सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने अण्णा भाऊ व त्यांच्या संस्थापक सहकाऱ्यांनी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार पारदर्शक व्यवहार करुन बँकेचा नाव लौकीक वाढविणेसाठी सर्व संचालकांना विश्वासात घेवून काम करणार असलेचे सांगून बँकेच्या प्रगतीच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून बँकेला शेड्युल दर्जा प्राप्त करुन देण्याबद्दल प्रयत्न करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.
व्हाईस चेअरमन श्री. संजय विष्णू चव्हाण यांनी संचालकांनी सोपविलेली जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडू अशी याप्रसंगी ग्वाही दिली. तसेच बँकेच्या संचालक मंडळाने बँकेची प्रगती करणेसाठी आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी बँकेच्या नूतन संचालक श्री. किशोर भुसारी, श्री. बसवराज महाळंक, श्री. आनंदा फडके, श्रीमती शैला टोपले, श्री. विजयकुमार पाटील, श्री. जयवंत खराडे, डॉ. सुनील देशपांडे, श्री. विनय सबनीस, डॉ. सागर कुरुणकर, श्री. हृषिकेश सातोसकर, श्री. सिद्धेश नाईक, श्रीमती संध्याताई वाटवे, सौ. कुंदा डांग, श्री. किरण पाटील, श्री. अशोक पाटील, श्री. कान्होबा माळवे, उपस्थित होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गंभीर यांनी नुतन चेअरमन, व्हा. चेअरमन व सर्व नूतन संचालकांचे बँकेच्या वतीने स्वागत करून अभिनंदन केले. यावेळी प्रशासन व बोर्ड विभागाचे मुख्याधिकारी श्री. नितीन बेल्लद उपस्थित होते.
शक्तीपीठ महामार्गाच्या आरेखनात बदल…
पेरणोली येथे प्रमुख कार्यकर्त्यांची सोमवारी व्यापक बैठक…
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शक्तीपीठ महामार्गाच्या आरेखनात मोठा बदल केला असून भुदरगड तालुक्यातून हा मार्ग आता आजरा तालुक्यातील कोरिवडे, हरपवडे, पेरणोली, देवर्डे, वेळवट्टी, पेठेवाडी, मसोली, खानापूर, पोळगाव, एरंडोळ वरून पुढे चंदगड तालुक्यातून बांद्याकडे जाणार आहे. या महमार्गामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी तर होणारच पण त्याचबरोबर कोरिवडे, हरपवडे, पेरणोली, देवर्डे, वेळवट्टी या शिवारातील शेतजमीन मोठ्या प्रमाणात घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सदर मार्गाला विरोध करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून पेरणोली येथे प्रमुख कार्यकर्त्यांची सोमवारी बैठक बोलवण्यात आली आहे
सोलापूर जिल्हयातून सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दुष्काळी गावातून सांगली, कोल्हापूर असा भुदरगड तालुक्यातून हा मार्ग आजरा, चंदगड मार्गे बांदा असा नेण्याचा घाट सरकारने घातला आहे. या विभागातील कोणत्याही शेतकऱ्यांची मागणी नसताना केवळ ठेकेदारांचे हितसंबंध सांभाळण्यासाठीच हा महामार्ग बनवला जाणार आहे.
पर्यावरणाची प्रचंड हानी करणारा आणि शेतकऱ्यांना उध्वस्त करणाऱ्या या महामार्गाला आमचा तीव्र विरोध आहे.
खरंतर शक्तीपीठ महमार्गाची गरज नसताना तो शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारला जात आहे.या महामार्गामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होणार असून पुरासारख्या महाभयानक संकटाला इथल्या जनतेला वारंवार सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळं या महामार्गाला येथील शेतकऱ्यांचा आणि पर्यावरण वादी जनतेचा तीव्र विरोध आहे.यापूर्वी आजरा येथे भरपावसात झालेल्या महामोर्चाने लोकांच्या मनात असलेला राग दाखवून दिला आहे. शक्तीपीठ महामार्ग आजरा, चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी विरोध करतीलच पण महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संघर्षात आपण कायम आघाडीवर रहाणार आहोत. सरकारचा हा जनविरोधी, शेतकरी विरोधी, पर्यावरणाला बाधा आणणारा महामार्ग हाणून पाडू.
शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सोमवार दि १२ जानेवारी २०२६ रोजी ठीक ११.०० वाजता पेरणोली येथील रवळनाथ मंदिरात कार्यकर्त्यांची व्यापक बैठक बोलावली आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे. तरी या बैठकीला सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई, सुधीर देसाई, तानाजी देसाई, अमरसिंग पवार, आनंदराव कुंभार, राजू होलम, युवराज पोवार, युवराज जाधव, मारुती पाटील यांनी केले आहे.

निधन वार्ता
शंकर ढोकरे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चर्च गल्ली आजरा येथील श्री. शंकर बाबाजी ढोकरे ( वय ९० वर्षे ) यांचे काल शुक्रवार दि.९ रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुन, जावई ,नातवंडे व पत्नी असा परिवार आहे.

रक्तदान शिबिर…
आज शनिवार दिनांक १० रोजी सकाळी दहा वाजल्यापासून श्री संत गोरा कुंभार सभागृह, कुंभार गल्ली, आजरा येथील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आजचा नाट्यप्रयोग
खानदानी…
सादरकर्ते :- पुण्यशील सुमित्राराजे सांस्कृतिक ट्रस्ट, सातारा
वेळ :- सायं.७-०० वा.
स्थळ:- आजरा महाविद्यालय रंगमंच


