

तर विरोधकांचे डोळे पांढरे होतील… पालकमंत्री हसन मुश्रीफ
बहिरेवाडी येथे पाणी योजनेचा लोकार्पण सोहळा
आजरा : प्रतिनिधी
मतदार संघातील केलेल्या विकास कामांची आपण लवकरच पुस्तिका प्रकाशित करणार असून ही पुस्तिका पाहिल्यानंतर आपण केलेली विकास कामे पाहून विरोधकांचे डोळे निश्चितच पांढरे होतील. मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणून रस्ते, पाण्यासह, आरोग्य, शिक्षण, शेती याकरिता विविध योजना ताकतीने राबवल्या आहेत .यावेळी गट -तट, जात-धर्म याचा विचार न करता जे शक्य आहे ते आपण केले आहे. बहिरेवाडीकरांना पिण्यासाठी हिरण्यकेशीचे पाणी दिल्याशिवाय गावात कोणताही सत्कार स्वीकारणार नाही अशी प्रतिज्ञा आपण केली होती आणि आज ती प्रतिज्ञा पाणी पूजन योजनेच्या उद्घाटनाने पूर्णत्वास जात आहे असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. बहिरेवाडी येथील पाच कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे होते.
उपस्थितांचे स्वागत डॉ. उल्का गोरुले यांनी केले. प्रास्ताविकपर भाषणात सुरेश खोत यांनी मंत्री मुश्रीफ यांनी गेल्या पंधरा वर्षात बहिरेवाडी गावाकरिता केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. बहिरेवाडीकरांची तहान भागवण्याची काम त्यांनी केले असल्याचे सांगून आगामी निवडणुकीत त्यांना जनता भरभरून दान देईल असेही आश्वासन दिले.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, पाणीपुरवठा योजनेच्या बीज बिलाचा प्रश्न येथून पुढे उद्भवणार आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून सोलर पॅनल आपल्याकडून दिले जाईल. जेणेकरून वीज बिलाचा बोजा ग्रामपंचायतीवर पडणार नाही. पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी आंबेओहोळ प्रकल्पातून शेतीपर्यंत पाणी कसे येईल याकरता यापुढे आपला प्रयत्न राहणार आहे.
अध्यक्षीय भाषणात वसंतराव धुरे म्हणाले, उत्तर विभागातील पाण्याबाबत सर्वात मागे राहिलेले बहिरेवाडी आता पाणी उपलब्ध झाल्याने समाधानी झाले आहे. कोट्यावधी रुपयांची विकास कामे मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून बहिरेवाडी मध्ये झाली आहे आता या सर्व कामांच्या पार्श्वभूमीवर कृतज्ञता म्हणून बहिरेवाडी करांनी मंत्री मुश्रीफ यांच्या पाठीशी ताकदीने रहावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना पंचायत समितीचे माजी उपसभापती शिरीष देसाई म्हणाले, पालकमंत्री मुश्रीफ हे संघर्षातून उभा झालेले नेतृत्व आहे ते भाड्याने अथवा उसने आणलेले नेतृत्व नाही. उत्तूर विभागाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.
कार्यक्रम प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, आजरा कारखाना संचालक मारुती घोरपडे, दीपक देसाई,तालुका संघाचे उपाध्यक्ष गणपतराव सांगले, महादेव पाटील-धामणेकर, विकास चोथे, वैजनाथ कराड, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, सतीश केदार, सदानंद पाटील, जम्बो गोरुले, संजय शेणगावे, संभाजी तांबेकर , बबन पाटील,बापू नेउंगरे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सरपंच सौ.सावंत यांनी आभार मानले.
आजारी पडू नका… आणि पडलाच तर काळजी करू नका…
प्रत्येकाने स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी. शक्यतो आजारी पडणार नाही दक्षता घ्या. आणि पडलाच तर काळजी करू नका, माझ्याकडे या. मंत्री मुश्रीफ तुमच्यावर उपचार करून आणण्यास बांधील आहे असेही त्यांनी सांगितले.

संविधानाचे अधिकार सत्ताधाऱ्याकडून पायदळी
इंडिया आघाडीचा आरोप, आजऱ्यात संविधान बचाव दिंडी

आजरा : प्रतिनिधी
सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारकडून संविधानाचे अधिकार पायदळी तुडविले जात आहेत. सर्वसामान्य जनतेच्या विरोधात या सरकारची भूमिका आहे.आगामी लोकसभा निवडणूकीत या सरकारला हद्दपार करा व संविधान वाचवा असा नारा आजरा येथे इंडिया आघाडीकडून देण्यात आला.
आजरा तालुक्यातील पूर्व भाग ব आजरा शहरातून संविधान बचाव रॅली काढण्यात आली.येथील गंगामाई वाचन मंदिरात सभेत भाजप सरकारकडून संविधानाचे अधिकार पायदळी तुडविले जात असल्याचे आरोप पदाधिका-यांनी केला, सरोळी येथून संविधान बचाव दिडीला सुरवात करण्यात आली. निगुडगे, कोवाडे, मलिग्रे, पेद्रेवाडी, हाजगोळी येथून दिंडी आजरा शहरात आली. यावेळी छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून दिंडीचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी बोलताना कॉ. संपत देसाई यांनी भाजपा सरकार संविधानाचे अधिकार पायदळी तुडवित असून जगण्याचे मुलभूत अधिकार नाकारले जात असल्याचे त्यांनी सांगितले. उमेश आपटे यांनी जनजागृती करण्यासाठी हि संविधान दिंडी काढण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये सातत्याने बहुमताचा वापर करून संविधान बदलण्यासाठी प्रयत्न केले, लोकांना संविधान समजावून सागण्यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले शिवसेना (उबाठाचे) जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी संविधान मोडीत काढण्याचे काम भाजपा सरकार करीत आहे धर्मा-धर्मात तेढ निर्माण करून सत्तेची पोळी आपल्या पदरात पाडण्यात भाजप जग्रेसर असल्याचे सांगितले
यानंतर संजय तर्डेकर, अमर चव्हाण, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, जयवंतराव शिंपी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्याधर गुरबे, संभाजी पाटील, राजू होलम, अभिषेक शिंपी, संजय सावंत, युवराज पोवार, राजेंद्र सावंत, रणजित देसाई, रवी भाटले, हरिबा काबले, रशिद पठाण, डॉ.नवनाथ शिंदे, विक्रम देसाई, नौशाद बुड्डेखान,रवी भाटले यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गांधीनगर मार्गावरील अतिक्रमित गटर्स हटवा…
अन्याय निवारण समितीची मागणी

आजरा : प्रतिनिधी
आजरा येथून गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आयडीएल कॉलनी व गांधीनगर ओढ्यापर्यंत नगरपंचायतीने बांधलेली आर.सी.सी. गटर्स ही पुर्णपणे रस्त्याच्या मधोमध बांधलेली असून ही अतिक्रमित गटर्स हटवण्याच्या मागणीचे अन्याय निवारण समितीच्यावतीने मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की ज्या ठेकेदारांनी सदरची गटर्स बांधकाम केले आहे व ज्या नगरपंचायत अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली सदरची गटर्स बांधकाम केली आहे. त्यांच्यावर कारवाई करुन संबंधीत गटर्स काढून संबंधीत गटर्स रस्त्याच्या हद्दीप्रमाणे बांधणेत यावी.
अन्यथा बुधवार दि. १३ रोजी सकाळी ठिक ११.०० वा. आयडीएल कॉलनी येथे आजरा गांधीनगर मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीत संबंधीत ठेकेदार व नरगंचायत संबंधीत अधिकारी यांचेवर कारवाई न झालेस गुरुवार दि. १४ पासून नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर अध्यक्ष परशुराम बामणे,उपाध्यक्ष सुधीर कुंभार,सचिव विजय थोरवत,पांडूरंग सावरतकर,गौतम देशपांडे,राजू विभूते,नौशाद बुड्डेखान,दिनकर जाधव, सचिन इंदलकर आदींच्या सह्या आहेत.

पोश्रातवाडीचा नावलौकिक जयराम संकपाळ यांनी वाढविला:आमदार राजेश पाटील

आजरा : प्रतिनिधी
पोश्रातवाडी ता.आजरा येथील जयराम संकपाळ हे एक निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या कामाची पद्धत पाहून त्यांची तालुका संघाने तज्ञ संचालक पदी निवड केली यामुळे त्यांच्या माध्यमातून गावच्या नावलौकिकात भर पडली असल्याचे मत आमदार राजेश पाटील यांनी जयराम संकपाळ यांच्या सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले.अध्यक्षस्थानी बाबासाहेब पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी हे होते.
जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई म्हणाले, संकपाळ यांच्यातील सामाजिक कार्याची तळमळ पाहून तसेच एखादया लहान गावाला सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी त्यांची निवड केल्याचे यावेळी सांगितले.
ग्रामस्थांच्या वतीने तज्ञ संचालक जयराम संकपाळ यांचा सत्कार करण्यात आला.तसेच यावेळी तालुका संघाचे व आजरा कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते.प्रास्ताविक तानाजी राजाराम यांनी केले.आभार दिनकर देसाई यांनी मानले.
यावेळी आजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष एम. के. देसाई, संचालक विष्णुपंत केसरकर, सन्मित्र संस्था समूहाचे अल्बर्ट डिसोजा यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

छायावृत्त…

नगरपंचायत की महामार्ग विभाग…? कामाला कुणी द्यायची चाल…? शहरवासीयांचे मात्र पाण्यावाचून हाल… भाई भाई चित्रमंदिर समोरील परिस्थिती



