mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

गुरूवार  दि.२० फेब्रुवारी २०२५

तालुक्यात छत्रपती शिवरायांना उत्साहाने अभिवादन…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

      आजरा येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई,विकास कोलते, मराठा महासंघाचे मारुती मोरे, बंडोपंत चव्हाण यांच्यासह स्थानिक शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंती निमित्त लेझीम स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.

       येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये आजरा महाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक कृष्णा पटेकर, सचिन शिंपी, पांडुरंग जाधव, सुधीर जाधव, विलास पाटील, प्राचार्य आर. जी. कुंभार पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे. शेलार यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

       पंडित दीनदयाळ विद्यालय येथे मुख्याध्यापक संजीव देसाई यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले यावेळी जय भवानी… जय शिवाजी या घोषणेने शालेय परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

      देवर्डे विद्या मंदिर, श्री रवळनाथ हायस्कूलमध्ये विद्या मंदिरचे मुख्याध्यापक विनायक आमणगी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये मुलींचे लेझीम पथक, मुलांचे झांज पथक सहभागी झाले होते.

      आजऱ्यातील डॉ. झाकीर हुसेन ॲंग्लो ऊर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी झाली. विद्यार्थांनी महाराष्ट्र गीत सादर केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

      पेरणोली (ता. आजरा) येथील उत्कर्ष तरुण मंडळाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.जाधव यांनी केलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली. ग्रामपंचायत सदस्या सुनिता कालेकर यांच्या हस्ते प्रतिमा पुजन झाले. या वेळी अवि कालेकर, सिध्देश कालेकर, गोविंद दारुडकर, मयुर नावलकर, हर्षद लोंढे, सुरज कालेकर, भाऊ ढोकरे, अथर्व कालेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

रात्री आग…
दिवसा वृक्ष गायब…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

    आजरा – नेसरी मार्गावर रस्त्याशेजारील वृक्षांच्या बुंध्यांमध्ये रात्रीच्या वेळी आग घालून ते पेटवून सदर वृक्ष कोसळून लावणारी पद्धतशीर यंत्रणा कार्यरत असल्याचे बोलले जाते.

       रात्रभर सदर वृक्ष आगीच्या भक्षस्थानी पडून सकाळी ते कोसळतात. वृक्ष कोसळलेले समजताच तातडीने कोसळलेल्या वृक्षांची विल्हेवाट लावणारी यंत्रणा सक्रीय असल्याची सध्या चर्चा आहे.

      वनविभागाने या प्रकारांकडे गांभीर्याने पाहून राजरोसपणे चाललेले हे प्रकार थांबवावेत अशी मागणी निसर्गप्रेमी नागरिकांकडून केली जात आहे. दरवर्षी या मार्गावर असे प्रकार केले जातात.

अंतर मोजूनच तिकीट आकारणी करा...
आजरा – गडहिंग्लज मार्गावरील प्रवासी वर्गाची मागणी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      संकेश्वर – बांदा महामार्गाची काम पूर्ण झाल्यानंतर आजरा- गडहिंग्लज हे अंतर कमी झाले असल्याने प्रवाशांना नाहक जादाच्या स्टेजचा तिकीट भुर्दंड बसत असून पुन्हा एक वेळ या मार्गाचे मान्यवरांच्या उपस्थितीत अंतर मोजून तिकीट आकारणी करावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.

      संकेश्वर – बांदा महामार्गाची उभारणी करताना आजरा- गडहिंग्लज मार्गावरील बरीच वळणे काढण्यात आली आहेत. वळणे काढल्यामुळे अंतरही कमी झाले आहे. तरी देखील पूर्वीप्रमाणेच अंतर धरून तिकीट दर आकारणी होत आहे. नवीन अंतरामध्ये एक स्टेज कमी होण्याची शक्यता आहे. एस.टी. महामंडळाने पुन्हा एक वेळ हे अंतर मोजून ते निश्चित करून कमी झालेल्या अंतराचे तिकीट दर कमी करावेत अशी मागणी होत आहे.

आजरा तालुका डिजिटल मीडिया रिपोर्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी ज्योतिप्रसाद सावंत

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा तालुका डिजिटल मीडिया रिपोर्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी ‘ मृत्युंजय महान्यूज’ चे मुख्य संपादक ज्योतिप्रसाद सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

       आजरा येथे झालेल्या असोसिएशनच्या बैठकीत सदर निवड झाली. संघटनेच्या कार्याध्यक्षपदी बशीर मुल्ला, उपाध्यक्षपदी राजाराम कांबळे, सचिवपदी सुभाष पाटील तर खजिनदारपदी अमित गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

      या बैठकीस हसन तकिलदार, विकास सुतार, संभाजी जाधव, पुंडलिक सुतार, प्रा. रमेश चव्हाण, गोपाळ गडकरी यांच्यासह डिजिटल मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पेरणोली येथे गोकुळची संपर्क सभा

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      गोकुळचे दूध दर्जेदार आहे. त्यामु‌ळे गोकुळच्या म्हैशीच्या दु‌धाला पूणे, मुंबई परिसरात मार्केट आहे. याची मागणी लक्षात घेता शेतकऱ्यांनी म्हैशीच्या दु‌धामध्ये वाढ करावी. असे आवाहन गोकु‌ळचे संचालक किसन चौगुले यांनी केले.पेरणोली पंचक्रोशीतील दूध संस्थांच्या भेटी व संपर्क दाऱ्यात पेरणोली येथील रवळनाथ मंदिरात आयोजीत संस्था प्रतिनिधी, शेतक-यांच्या मेळाव्यात संचालक चागले यांनी मार्गदर्शन केले. संचालक युवराज पाटील, नावेद मुश्रीफ, रणजित पाटील, गोकुळचे असिस्टंट मॅनेजर के डी. आमटे, दूध संकलन अधिकारी बापू देसाई, पश्वैद‌यकिय अधिकारी डा. अविनाश जोशी प्रमुख उपस्थित होते

      श्री. चौगले म्हणाले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांनी दुधवाढीसाठी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ याच्या माध्यमातून जिल्हा बँकेतून पाचशे कोटींचे कर्ज म्हैश दूधवाढीसाठी दिले आहे. याचा उपयोग दूध उत्पादकांनी घेण्याची गरज आहे गोकुळने वासरु संगोपनासह विविध योजनांच्या माध्यमातून शेतकन्याना दिलासा दिला आहे. याचा फायदा घ्यावा.

     यावेळी संचालक श्री. पाटील, श्री. मुश्रीफ यांनी शेतकयांच्या प्रश्नाना उतरे दिली. शेतकरी टी. एस. देसाई म्हणाले, पशुवैद्‌यकिय सेवा गोकु‌ळने बंद केली असून मागणीनु‌सार ती दिली आत आहे. त्यानी बार्षिक बोनस, दूध भेसळी बाबत‌ही लक्ष वेधले. दत्ता पाईम, सचिन देसाई यांनी प्रश्न मांडले. या वेळी संकेत सावंत बापू दळवी सुरेश कालेकर, शिवाजी सोले, तानाजी कालेकर, तानाजी कांबळे या गुरव, सविता सुतार यासह संस्था प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

निधन वार्ता
विष्णू देसाई

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     निगुडगे ता आजरा येथील विष्णू भाऊ देसाई (वय ९८ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

      त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

      निंगुडगे येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष रवींद्र देसाई यांचे वडील होत.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९  

आज शहरात…

      हजरत दावल मलिकसो यांचा भर उरुस
व गलेफ मिरवणूक…

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!