mrityunjaymahanews
अन्य

शनिवार – सातच्या बातम्या

शनिवार दि.१२ सप्टेंबर २०२६

राष्ट्रीय वन हुतात्मादिनी आजरा येथे शहीद वनरक्षक प्रकाश पाटील यांच्या स्मारकास भावपूर्ण अभिवादन

आजरा : प्रतिनिधी

आजरा पंचायत समितीच्या प्रभारी प्रभारी सभापती यशोदा पोवार व शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार यांच्यासह वन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतीत राष्ट्रीय वन हुतात्मादिनी आजरा येथे शहीद वनरक्षक प्रकाश पाटील यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले.

आजरा वन विभाग कार्यालयाच्या आवारातील शहीद वनरक्षक कै. प्रकाश पाटील यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

जंगलांचे संवर्धन, वणव्यांपासून संरक्षण आणि वन्यजीवांचे रक्षण करताना वन विभागाचे कर्मचारी अहोरात्र खडतर परिस्थितीत कर्तव्य बजावत असतात. जंगलाच्या रक्षणासाठी वीरमरण पत्करणारे कै. प्रकाश पाटील यांचे बलिदान सदैव प्रेरणादायी राहील, अशा शब्दांत मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या प्रसंगी आजरा वन कार्यालयाचे लिपिक संग्रामसिंह खापरे, महिला वनरक्षक संगीता राठोड, वनसेवक संजय पिसे, वनसेवक तानाजी पेडणेकर यांच्यासह शिवाजी मटकर, लक्ष्मण माडभगत, धाकू कविटकर आदी कर्मचारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते.

आजऱ्यात दिव्यांग भवनासाठी शासकीय भूखंड द्या…अपंग पुनर्वसन संस्थेचे तहसीलदारांना निवेदन


आजरा : प्रतिनिधी 

आजरा तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र दिव्यांग भवन उभारण्यासाठी शासकीय भूखंड उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अपंग पुनर्वसन संस्था, आजरा यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संस्थेने आजरा तहसीलदारांना निवेदन सादर केले.

तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी हक्काची व स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने विविध उपक्रम, बैठका तसेच दिव्यांगांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देताना मोठी गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.त्यामुळे आजरा शहरातील गट क्रमांक ४७०/अ मधील ०.५ आर जागा दिव्यांग भवनासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी संस्थेने केली आहे. या जागेवर दिव्यांग भवन उभारून तालुक्यातील दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजना, मार्गदर्शन, प्रशिक्षण व सामाजिक उपक्रमांसाठी एक कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध होऊ शकते, असे संस्थेचे म्हणणे आहे.

संस्थेचे अध्यक्ष मुकुंद गणपती नार्वेकर व उपाध्यक्ष सर्जेराव जयराम जाधव यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी कार्यालय, गारगोटी-भुदरगड-आजरा, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर, गटविकास अधिकारी पंचायत समिती आजरा तसेच संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांना देण्यात आल्या आहेत.

वाटंगीच्या गोकुळ दूध संस्थेला १४ लाखांचा  नफा ;

वार्षिक सभेत संस्थापक अल्बर्ट डिसोजा यांची माहिती 

वाटंगी : प्रतिनिधी

वाटंगी येथील गोकुळ दूध संस्थेला यंदा १४ लाख रुपयांचा वार्षिक नफा झाला असल्याची माहिती संस्थापक अल्बर्ट डिसोझा यांनी दिली. संस्थेच्या वार्षिक सभेत ते बोलत होते स्वागत चेअरमन राजाराम घेवडे यांनी केले. सचिव श्री. एकनाथ कसलकर यांनी अहवालाचे वाचन केले, तर सूत्रसंचालन विश्वास कांबळे यांनी केले. गणेश चतुर्थीनिमित्त म्हैस दुधासाठी १३ टक्के, तर गाय दुधासाठी १० टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा अल्बर्ट डिसोझा यांनी केली. तसेच संस्थेतील शेअर्सधारक सभासदांना १५ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. संस्थेला वेळोवेळी सहकार्य करणारे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. लोखंडे, जिल्हा परिषदेचे डॉ. चौगले व डॉ. कोंडीबा कोकरे यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. वासरू संगोपन लाभार्थीना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले.

चेअरमन कार्यकाळात संस्थेची उत्तमप्रकारे प्रगती केल्याबद्दल प्रभाकर सोनार यांचाही करण्यात आला तसेच संस्थेतील ६५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सभासदांचाही सत्कार करण्यात आला. संस्थेला जास्तीत जास्त दूध पुरवठा करणारे उत्पादक सौ शीतल मलगोंडे, बाबुराव चौगले, वसंत मलगोंडे, अर्जुन कसलकर, लुईस डिसोझा, जोसेफ डिसोझा, दयानंद मलगोंडे, गणपती कानडे, उत्तम चौगले यांचा बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. सभेत सभासदांनी उत्स्फूर्तपणे प्रतिलिटर एक रुपये कपात करून ते दिवाळी सणासाठी देण्यात यावेत असा ठराव मांडला धन्यवाद

यावेळी बाबुराव गिलबिले, बाळू तेजम, बाबुराव चौगले, बाळू कानडे, सुरेश नाईक, अक्काताई कुंभार, इंदुबाई घोरपडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार परशराम गिलबिले यांनी मानले.

वृक्ष नव्हे जाहिरात फलक उत्तूरमधील विदारक चित्र.

वृक्षसंवर्धनाला हरताळ, कारवाईची मागणी

उत्तूर : मंदार हाळवणकर

उत्तूर व परिसरात रस्त्यालगतच्या झाडांवर खिळे ठोकून जाहिरात फलक लावण्याचे प्रकार वाढत असून, यामुळे वृक्षसंवर्धनाला धोका निर्माण होत आहे. पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. जोमकाई मंदिर रस्ता, मुख्य बाजारपेठ तसेच आजरा मार्गावरील अनेक झाडांच्या खोडांवर खिळे मारून बॅनर लावण्यात आले आहेत. खिळ्यांमुळे झाडांच्या सालीला जखम होते, त्यातून पाणी व रोगकारक जंतू आत शिरून झाडे कमकुवत होण्याचा धोका वाढतो. बॅनर काढल्यानंतरही खिळे झाडातच राहिल्याने दीर्घकालीन नुकसान होते.

शासन वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धनासाठी विशेष अभियान राबवत असताना जाहिरातींसाठी झाडांचा वापर टाळून स्वतंत्र फलक व्यवस्था उभारावी, अशी मागणी वृक्षप्रेमींच्याकडून होत आहे. वृक्ष हेच जीवन ही भावना जपत वृक्षसंवर्धन मोहीम राबवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.(संग्रहित छायाचित्र)

आझाद मैदानावरील आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी होणार…
आजरा येथील बैठकीत निर्धार.

आजरा : प्रतिनिधी

आझाद मैदान मुंबई येथे होणारे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार आज आजरा येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षांनी शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार होते.
शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंचच्या नेतृत्वाखाली ५ ऑक्टोबर २०२६ पासून राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन होत आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी आज आजरा येथे बैठक बोलावण्यात आली होती.

यावेळी शाळा वाचवा शिक्षण वाचवा शिक्षण वाचवा मंचचे राज्य निमंत्रक कॉ. संपत देसाई यांनी या आंदोलनामागील भूमिका मांडली. ते म्हणाले राज्य आणि केंद्र सरकार नवीन शैक्षणिक धोरणाच्या आडून राज्यातील वाडीवस्तीवरील शाळा बंद करू पाहत आहे. १५ मार्च २०२४ ला शासन निर्णय करून माध्यमिक शाळांची मधील शिक्षक पटसंख्येचे कारण सांगून कमी केले जात आहेत. तालुका निमशहरी भागातील महाविद्यालय पटसंख्येची अट घालून कमी करण्याचा डाव चालू आहे. या विरोधात काही महत्त्वाच्या आणि मूलभूत मागणी घेऊन आझाद मैदान मुंबई येथे हे आंदोलन बेमुदत पद्धतीने सुरू होत आहे. या आंदोलनाच्या मुख्य पाच मागणी आहेत. पहिली मागणी गाव वाडी वस्ती तांडा तिथे शाळा असली पाहिजे. प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक व माध्यमिक शाळांना स्वतंत्र विषयाला स्वतंत्र शिक्षक मिळाला पाहिजे. याबरोबरच ज्या महाविद्यालयांना मान्यता आहे ती महाविद्यालये बंद होता कामा नयेत. केजी टू पीजी शिक्षण सर्वांना गुणवत्तापूर्ण मोफत आणि समान मिळाले पाहिजे. शिक्षणावरील खर्च राष्ट्रीय उत्पनाच्या किमान दहा टक्के केला पाहिजे. अशा मूलभूत मागण्या घेऊन हे आंदोलन उभा राहत आहे. या आंदोलनात राज्यातील वीसहून अधिक विद्यार्थी संघटना सहभागी होणार आहेत. त्याच्या तयारीसाठी आजरा येथेही बैठक आयोजित केली आहे.

कॉ. संजय तरडेकर म्हणाले आपण गावोगावी बैठका घेऊन आंदोलन लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करूया. मुंबईला आंदोलन सुरू झाले की इकडेही मोर्चे सभा निदर्शने सुरू करूया. एकाच वेळी मुंबई आणि राज्यभर हे आंदोलन सुरू राहील

समारोप करताना युवराज पोवार यांनी या आंदोलनात राज्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत आजरा तालुका सर्वाधिक भागीदारी करेल. असा विश्वास व्यक्त केला.यावेळी रवींद्र भाटले, संजय घाटगे, प्रकाश मोरस्कर, नामदेव फगरे, काशिनाथ मोरे, नारायण भडांगे, युवराज जाधव, प्रकाश पाटील, रंगा माडभगत, आंतोन बारदेसकर, हिंदुराव कांबळे, निवृत्ती राणे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजरा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सिरसंगी हायस्कूलचे कबड्डी मध्ये वर्चस्व


सिरसंगी : प्रतिनिधी

आजरा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आदर्श हायस्कूल शिरसंगीच्या १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक व १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला व जिल्हास्तरीय निवड झाली त्याचबरोबर मुलांमध्ये १४ वर्षे गटामध्ये तृतीय क्रमांक व १७ वर्षीय वयोगटांमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त झाला . या कबड्डी स्पर्धेमध्ये आदर्श हायस्कूलने दोन्ही गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या सर्व खेळाडूंना मार्गदर्शक श्री आनंदा प्रभू मुख्याध्यापक मदन देसाई, चौगुले , संतोष कालेकर, जाधव , त्याचबरोबर संस्थेचे चेअरमन जयवंतराव शिंपी सर्व संचालक यांचे प्रोत्साहन मिळाले.

निधन वार्ता

सचिन पाटील 

उत्तूर : प्रतिनिधी 

सचिन धोंडीबा पाटील (कोनवडे) रा. कडगाव.(वय ४८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
ते कृष्णा व्हॅली कृषी व्यवसाय संस्था, उत्तूर अंतर्गत मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. आपल्या मनमिळावू स्वभाव व स्नेहपूर्ण संबंधांमुळे त्यांनी उत्तूर व कडगाव परिसरात व्यापक जनसंपर्क निर्माण केला होता.

त्यांच्या अकाली निधनामुळे उत्तूर व कडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ व मुले असा परिवार आहे.

आजचे पंचांग

दिनांक : १२ सप्टेंबर २०१६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : भाद्रपद
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : प्रथम तिथी (सकाळी ०७.४६ पर्यंत) त्यानंतर द्वितीया तिथी
नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी नक्षत्र (दुपारी १२.५४ पर्यंत) त्यानंतर हस्त नक्षत्र
योग : शुभ योग (दुपारी ०३.०८ पर्यंत) त्यानंतर शुक्ल योग
करण : भाव करण (सकाळी ०७.४६ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : कन्या राशी
सूर्य राशी : सिंह राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.३१ ते सकाळी ११.०३ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१० ते दुपारी १२.५९
सूर्योदय : सकाळी ०६.२७
सूर्यास्त : सायंकाळी ०६.४३
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८

आजची वार्षिक सर्वसाधारण सभा…

आजरा तालुका खरेदी विक्री संघ 

वेळ : दुपारी एक वाजता 

स्थळ : शिवतीर्थ येथील संस्थेच्या मुख्य कार्यालय इमारतीच्या खालील बाजूस

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा मार्गे वर्षा पर्यटकांची संख्या रोडावली…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!