mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनीवार  दि.२२ फेब्रुवारी २०२५

सुळे येथून मोटरसायकलची चोरी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      सुळे ता. आजरा येथून शंकर कृष्णा गडकरी यांच्या मालकीची घराशेजारी उभी केलेली मोटरसायकल ( हिरो स्प्लेंडर प्लस MH-09 CY-0526 ) अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.

       याबाबतची फिर्याद शंकर कृष्णा गडकरी यांनी आजरा पोलिसांत दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आण्णा वॉरियर्स व आण्णा स्पोर्ट्स आयोजित अर्पिता चषक करीता आजपासून धुमशान

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आण्णा वॉरियर्स व आण्णा स्पोर्ट्स आयोजित अर्पिता चषक २०२५ च्या क्रिकेट सामन्यांना आजपासून सुरुवात होत आहे.

      आज शनिवार दि. २२ ते बुधवार दि. २६ फेब्रुवारी अखेर चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये आजरा, चंदगड,गडहिंग्लज, भुदरगड तालुक्यातील संघ सहभागी झाले आहेत.

स्पर्धेतील विजेत्यांना पुढील प्रमाणे बक्षीस ठेवण्यात आले आहेत.

      प्रथम क्रमांक ५१०००/रु.(अश्विन डोंगरे इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिअल इस्टेट डेव्हलपर यांचेकडून)

       द्वितीय क्रमांक २८२८०/- रु.( सागर पाटील साहिल एटरप्रायजेस, मुरुडे/ गोवा) यांचेकडून

        तृतीय क्रमांक १५००० रु.(आकाश पाटील,आकांक्षा पेट्स,आजरा यांचेकडून)

       चतुर्थ क्रमांक -१००००/- रु.( अमित खेडेकर यांचेकडून)

       सर्व विजयी संघांना सायमन रुजाय डिसोजा यांचे स्मरणार्थ लॉरेन्स रुजाय डिसोझा (पेरणोली) यांचेकडून चषक देण्यात येणार आहेत.

       स्पर्धेचे इतर सर्व वैयक्तिक चषके रोहित उर्फ सूर्यकांत नामदेवराव नार्वेकर (नार्वेकर पेट्रोलियम आजरा) यांचेकडून देण्यात येणार आहेत.

       मॅन ऑफ द मॅच १००१/-,मॅन ऑफ द सिरीज – १००१/-,उत्कृष्ठ गोलंदाज-५०१/- ,उत्कृष्ठ फलंदाज ५०१/- अशी बक्षीसेही आहेत.छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल आजरा गांधीनगर येथे या स्पर्धा होणार आहेत.

शेतकरी महिलेला समाज माध्यमावर अश्लाध्य मजकूर देणाऱ्यांवर कारवाई करा

आजरा तहसीलसमोर आंदोलन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुक्यातील वडकशिवाले येथील देवस्थान जमिनीची इसवी सन १८०० सालापासूनची मालकी हक्कातील नावे कमी करून इतर हक्कात घातली गेली आणि याबाबत चुकीचा आणि खोटा अर्ज सादर करून वडकशिवाले येथील एकाने अधिकाऱ्यांची दिशाभूल करून व संबंधित अधिकाऱ्यांनीही याचा गैर अर्थ काढून कार्यवाही केली आहे.

      याबाबत आक्रमक झालेल्या संबंधित महिलेची मुजोरी चालणार नाही यासह जाहीरपणे महिलेविरोधात समाज माध्यमातून संदेश देऊन महिलेचा अवमान केला आहे संबंधित इसमावर गुन्हा नोंद करून कारवाई झाली पाहिजे यासाठी आजरा तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील देवस्थान जमीनधारक शेतकरी संघर्ष समितीचे धरणे आंदोलन सुरू झाले आहे.

      तसेच वडकशीवाले येथील गट नंबर ५५५ या जमिनीवर पूर्वीप्रमाणे मालकी हक्कात नाव नोंदणी झाली पाहिजे अशी मागणीही करण्यात आली आहे.

        काँ. शिवाजी गुरव यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन सुरू असून कॉ.संजय तर्डेकर, भादवणचे उपसरपंच संजय पाटील, किरण तानवडे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचा गळीत हंगामाची सांगता

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       कारखान्याचा २०२४-२५ या गळीत हंगामाची सांगता होवून दि.२२ रोजी सत्यनारायण पुजा कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. सुभाष गणपतराव देसाई व त्याच्या सुविद्य पत्नि सौ. विजयालक्ष्मी सुभाष देसाई यांचे शुभहस्ते संपन्न झाली. तसेच चेअरमन श्री. वसतराव धुरे व संचालक मंडळाचे शुभहस्ते साखर पोती पुजन संपन्न झाले. या हंगामात कारखान्याने ९३ दिवसात २७८३५७ मे. टनाचे गाळप करून ३,३१,२५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले सरासरी उतारा ११.९० इतका मिळाला आहे.

       कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्रा बाहेरील गडहिंग्लज व चंदगड, आंबोली भागातील कारखान्यास ऊस पुरवठा करणा-या ऊस उत्पादकांच्या सहकार्याने सदर हंगाम संचालक मंडळाच्या प्रयत्नाने पार पाडला आहे. आमच्यावर विश्वास ठेवून ऊस उत्पादकांनी आपला ऊस गाळपास पाठविला तसेच तोडणी वाहतुकदारांनी सुध्दा आमच्यावर विश्वास ठेवून कारखान्यास जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणेस मदत केली. तसेच मालपुरवठादारांनी कारखान्यास माल पुरवठा करून सहकार्य केले. कारखाना कामगारांनी कारखाना पुर्ण क्षमतेने चालावा यासाठी चांगल्या प्रकारे काम केले. तसेच मान्यवरांच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेने कारखान्यास आवश्यकतो निधी उपलब्ध करून दिला असे चेअरमन धुरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

       यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. सुभाष देसाई जिल्हा बँकेचे संचालक तथा बैंक प्रतिनिधी श्री.सुधीर देसाई यांच्यासह सर्व संचालक, प्र. कार्यकारी संचालक श्री.व्ही. के. ज्योती व अधिकारी उपस्थित होते.

आजरा सूतगिरणीच्या १०५ कर्मचा-यांची आरोग्य तपासणी…

राज्य कर्मचारी वीमा महामंडळाचा उपक्रम

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      खेडे ता आजरा येथील अण्णा-भाऊ आजरा तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणीत १०५ रूग्णांची मोफत तपासणी, औषध वाटप आणि मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी २९ नव्या कामगारांची योजनेत नोंद करण्यात आली.

      महा-कामगार विमा सोसायटी सेवा दवाखाना कोल्हापूर व कागल यांच्या संयुक्त विद्यमाने ही तपासणी मोहिम पार पडली. राज्य कर्मचारी वीमा महामंडळातर्फे विविध क्षेत्रात व कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येते. सध्या शासनाने या योजनेचा लाभ घेणाºया कामगारांसाठी आणि योजनेची माहिती नसणा-या कामगारांसाठी १०० दिवसांचे मोफत तपासणी व जनजागृती मोहिम सुरू केली आहे. राज्यातील विविध कंपन्यांमध्ये जावून आरोग्तय पासणीबरोबर जनजागृती करण्यात येत आहे.

      कागलचे वैद्यकिय अधिकारी डॉ. हर्षल कांबळे यांनी ‘ईएसआय’ अंतर्गत कामगारांना मिळणा-या विविध वैद्यकिय सेवा-सुविधा, आवश्यक कागदपत्रे, नवीन नोंदणी, ई-पहचना कार्ड, पात्र-अपात्र प्रमाणपत्र, त्रुटींची पूर्तता कशी करावी, सेवांचा कालावधी, तपासणीला जाण्यापूर्वी अ‍ॅपवरून नंबर कसे लावणे याविषयी कामगारांना मार्गदर्शन केले.

      शिबीरात वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. मिलींद चौधरी, डॉ. जयश्री जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाºयांचा रक्तदाब, सीबीसी, किडनी, शुगर, कोलेस्ट्रॉल, हाडातील कॅल्शिअम, कर्करोग, डोळ्यांची तपासाणी करण्यात आली.

       याकामी डॉ. रविकांत जांभळे, आकाश पाटील, दिग्विजय निकम, अमृता शिंदे, विनय चौगुले, पल्लवी तानवडे, सारिका भानसे यांनी परिश्रम घेतले.

निधन वार्ता
शकील दरवाजकर

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मदरसा कॉलनी आजरा येथील शकीलभाई दरवाजकर (वय ६१ वर्षे) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.

      त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. आजरा येथे रिक्षा चालक म्हणून ते काम करत होते.

जीवूबाई शिंदे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मलिग्रे तालुका आजरा येथील जीवूबाई मारूती शिंदे यांचे शुक्रवार दिनांक २१ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

      मलिग्रे गावचे माजी सरपंच अशोक शिंदे व माजी सैनिक सुहास शिंदे यांच्या आई असून त्यांना दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

      रक्षा विसर्जन रविवार दि.२३ रोजी आहे.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९  

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजऱ्यातील एकाला जनावरांचे मांस वहातूक करताना रंगेहात पकडले …एकजण फरारी…

mrityunjay mahanews

आज आजरा तालुक्यात….

mrityunjay mahanews

मडिलगे येथे हत्तीचा धिंगाणा…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अवकाळीने झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी: आज-यात जि. प. उपाध्यक्ष शिंपी यांची मागणी

mrityunjay mahanews
error: Content is protected !!