गुरुवार दि.२० मार्च २०२५


वास्तु शांत झाली …
तोही शांत झाला…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर ता. आजरा येथील इंदिरानगर भागात राहणाऱ्या व उत्कृष्ट ट्रॅक्टर ड्रायव्हर अशी ख्याती असणाऱ्या आमित रामचंद्र कुराडे (वय ४२ वर्षे ) यांचे काल बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मंगळवारी नवीन घरामध्ये गृहप्रवेश करण्याच्या उद्देशाने गणेश पूजन व इतर धार्मिक विधी पार पडले. याला २४ तासांचा कालावधी होतो न होतो तोच बुधवारी अचानकपणे प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यानच त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले. गृहप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर जमा झालेल्या नातेवाईकांना रामचंद्र यांच्या मृत्यूने धक्का बसला आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ, बहिण असा परीवार आहे. वास्तुशांतीची लगबग संपण्याआधीच अमित यांचा मृत्यू झाल्याने उत्तूर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
रक्षा विसर्जन शुक्रवार दिनांक २१ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता उत्तूर येथे आहे.

रंगांची उधळण आणि संगीताचा ठेका…
तालुक्याच्या ग्रामीण भागात रंगपंचमी दणक्यात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात ग्रामिण भागामधील विविध गावात आज रंगपंचमी उत्साहात साजरी झाली. अबालवृध्दांसह महीलांनी उत्साहाने सहभाग घेतला. गावोगावच्या रस्ते विविध रंगांनी रंगून गेले होते. रस्त्यावर रंगाच्या रांगोळीचा सडा पडला होता. हिंदी, मराठी चित्रपटाच्या गीतावर तरुणाई थिरकत असल्याचे चित्र होते.
सकाळपासून बालचमु रंगाच्या पिचकाऱ्या घेवून गावात फिरत होते. विविध प्रकारचे रंगाची उधळण करीत रंगपंचमीचा आनंद लुटत होते. दुपारच्या टप्प्यात रंगाची जोरात उधळण सुरु झाली. तरुणाई रस्त्यावर उतरली. रंगाच्या काहीलीमध्ये युवक एकमेकांना बुडवत होते. दुचाकीवरून गावात फेरी मारत युवक रंग खेळत होते.
रंगपंचमीनिमित्त होळीच्या ठिकाणी धार्मिक विधी पार पडला. सायंकाळच्या टप्प्यात महीलाही रंगपंचमी खेळात सहभागी झाल्या. त्यांनीही रंगपंचमीचा आनंद लुटला. पेरणोली, साळगाव, हरपवडे, कोरीवडे यासह विविध गावात रंगपंचमी उत्साहात साजरी झाली.
पोलीस ठाणेही रंगून गेले…

आजरा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनीही रंगपंचमीचा आनंद लुटला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांनी एकमेकावर रंगांची उधळण करत शुभेच्छा दिल्या.
शहरातील रंगपंचमी २९ तारखेला..
प्रथेप्रमाणे आजारा शहराची रंगपंचमी २९ मार्च रोजी होणार आहे.

पारंपारिक धार्मिक उत्सवांना मज्जाव नको…
पोस्ताच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकरी आक्रमक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जंगलात आमच्या दैवतेची ठाणी आहेत. तेथे धार्मिक उत्सव, जत्रा करण्यास मज्जाव करू नये. त्याचबरोबर शिमगा हा आमच्या परिसरातील बहुजनांचा महत्वाचा धार्मिक उत्सव असून पोस्त ही आमची परंपरा आहे. या परंपरेला बंदी घालू नये. यासह विविध मागण्याबाबत आजऱ्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाली. याबाबत शुक्रवार (ता. २१) आजरा परिक्षेत्र वनाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
पोस्ताची परंपरा खंडित होऊ नये यासाठी शिमग्याच्या काळात पोस्त करण्याची परवानगी मिळाली पाहिजे. म्हसोबा, चाळोबा ही आमची दैवते आहेत, त्या दैवतांची ठाणी ही जंगल हद्दीत आहे, या ठिकाणी पूजा अर्चा करण्यास वा जत्रा यात्रा करण्यास मज्जाव केला जात आहे. ही आमची सांस्कृतिक दडपणुक असून त्याला परवानगी मिळाली पाहिजे. याबरोबर हत्ती, गवे, रानडुक्कर, माकड, ससे यासारख्या जंगली प्राण्यापासून शेती पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी ताबडतोबीने उपाय योजना केली पाहिजे. पिकांची नुकसानभरपाई शंभर टक्के गृहीत धरून मिळावी. जंगली जनावरांच्या हल्ल्यात जखमी किंवा मयत झालेल्या शेतकऱ्याला मिळणारी मदत तुटपुंजी असून ती वाढवून मिळाली पाहिजे.
जंगला लगतच्या शेतकऱ्याला शंभर टक्के अनुदानावर सौर ऊर्जेचे कुंपण मिळाले पाहिजे. शेती सरंक्षणासाठी मागेल त्याला तातडीने बंदूक परवाना दिला पाहिजे यासह अनेक मागण्यांची या वेळी चर्चा झाली. याबाबत शुक्रवारी परिक्षेत्र वनाधिकारी आजरा यांना निवेदन देण्यात येणार आहे. कॉ.संपत देसाई, संजय सावंत, कॉ. शांताराम पाटील, रवींद्र भाटले, संजय घाटगे, संजय तरडेकर, राजू होलम, बयाजी येडगे, नामदेव गुरव, मारुती पाटील, भीमराव माधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


आजरा महाविद्यालयात अर्थशास्त्रातील रोजगारातील संधी या विषयावर व्याख्यान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालय, आजरा, अर्थशास्त्र विभाग आणि कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने आज ” फॅकल्टी एक्स्चेंज प्रोग्राम“ अंतर्गत अर्थशास्त्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर प्रा. डॉ. काशिनाथ तनंगे (अर्थशास्त्र विभाग प्रमुख) व प्रा. डॉ. डी.जी. चिघळीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यामध्ये अर्थशास्त्राची व्याप्ती किती मोठी आहे. बँका, व्यापार, कृषी , शेअर मार्केट अशा अनेक क्षेत्रांमध्ये अर्थशास्त्राला अमूल्य महत्व प्राप्त झाले आहे. हे उदाहरणासहित विद्यार्थ्यांना सांगितले.
सध्याची शिक्षण व्यवस्था, मोबाईलचे व्यसन, यावर भाष्य करताना वाचन संस्कृती कशी कमी होत आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अर्थशास्त्र विभागांतर्गत करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. ए. एन. सादळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय चव्हाण यांनी केले. आभार प्रा. दिपाली कांबळे यांनी मांडले, तर सूत्रसंचालन डॉ. महेंद्र जाधव यांनी केले.

लाकूडवाडी येथे रस्ता कामाचा शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लाकुडवाडी ता. आजरा येथे माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून लाकूडवाडी फाटा ते गावापर्यंत रस्त्याला २० लाखाची निधी मंजूर करून दिला होता .त्या कामाचा शुभारंभ माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजरा तालुका अध्यक्ष अनिल फडके,आजरा साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई,संचालक शिवाजी नांदवडेकर,संचालक राजेश मुरकुटे,चंद्रकांत धोंडीबा खदाळे,ग्रामपंचायत सदस्या सौ वनीता सागर मांगले,ग्रा. पं. सदस्या सौ.शोभा चंद्रकांत खदाळे,ग्रा. पं. सदस्या लाकूडवाडी गावातील सरपंच जयश्री गिलबिले,माजी सरपंच शंकर कुराडे,सागर मांगले,आप्पासो आरदाळकर, रमेश गिलबिले व गावातील ज्येष्ठ नागरिक,महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




