बुधवार दि.१९ मार्च २०२५


अखेर जीवनाचा प्रवास थांबला…
सौ.प्रतिभा यांचा चटका लावणारा शेवट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सरंबळवाडी ता. आजरा येथील सौ. प्रतिभा संदीप पाटील या ३८ वर्षीय महिला पोलिस हेड कॉन्स्टेबलचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्वकर्तृत्वाच्या जोरावर पोलीस दलात उंच भरारी घेण्याचे त्यांचे स्वप्न अखेर स्वप्नच राहीले.
याबाबत मिळालेली माहिती अशी..
सरंबळवाडी येथील सौ. पाटील या पुणे येथे पोलीस दलात कार्यरत होत्या. कर्तव्यावर असताना त्यांना काविळ आजाराची लागण झाली. दुर्दैवाने याकडे कर्तव्य बजावताना फारसे लक्ष देता आले नाही. पुढे त्यांना न्यूमोनिया झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा पुणे येथे मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पती व मुलगा असा परिवार आहे. सरंबळवाडी येथे पंचक्रोशीतील नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रचंड कष्टाने पोलीस दलात दाखल झालेल्या प्रतिभा यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मोफत सौर कुंपणासाठी प्रयत्नशील : जी. गुरूप्रसाद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पूर्वी शेतीला सौर कुंपणासाठी पन्नास टक्के सवलत होती. ती रद्द करून मोफत सौर कुंपण देण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे पिकांचे नुकसान टळेल असे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी सांगीतले.कोल्हापुर येथे आजरा तालुक्यातील शेतक-यांच्या शिष्टमंडळासोबत उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
वन्य प्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणासाठी उपाययोजना व नुकसानभरपाईची मागणीचे निवेदन त्यांना शिष्टमंडळाने दिले.
कॉ. संजय तर्डेकर म्हणाले, तालुक्यात वन्य प्राण्यांचे प्रमाण वाढले असून बिबट्या, रानडुक्कर, माकडे व अन्य वन्यप्राणी शेतांमध्ये प्रवेश करून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस वन्य प्राण्यांचा वावर वाढत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पिकांचे संरक्षण करणे कठीण झाले असून रात्रीच्या वेळी शेतात ठाण मांडून बसावे लागत आहे. हे प्राणी माणसांसाठीही धोकादायक ठरू शकतात. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी संरक्षक भिंतीकरीता पन्हाळ्याला निधी देणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आजरा व चंदगडला निधी उपलब्ध करून मिळावा. एकरी २ लाख रुपये नुकसानभरपाई तात्काळ मंजूर करावी, वन्य प्राण्यांना जंगलातच अन्न-पाण्याची सोय उपलब्ध करावी, वन्य प्राण्यांना जंगलातच रोखण्यासाठी योग्य कुंपण, सौररक्षक तारा किंवा अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाव्यात या मागण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
कॉ. संजय तर्डेकर, सुरेश शिंगटे, जितेंद्र नांदवडेकर, मारूती चव्हाण, म्हंकाळी चौगुले, गोविंद चौगुले, अमित वांद्रे, पांडुरंग धनूकटेकर, संतोष मंगूरडेकर आदी यावेळी उपस्थित होते.

शाश्वत विकासा बरोबर, ग्राहक जन जागृती आवश्यक : सी.आर.देसाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
तयार झालेले उत्पादन मध्यस्थांशिवाय ग्राहकांना मिळालेस, योग्य भाव मिळतो. देव घेवीचे व्यवहार एकमेकांना पुरक असावेत. रासायनीक शेती मालापेक्षा शाश्वत विकासा बरोबर ग्राहकांची जन जागृती आवश्यक असलेचे मत सी. आर. देसाई यांनी आजरा तहसील कार्यालयात झालेल्या जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले. अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई होते.
प्रास्ताविक पुरवठा अधिकारी संदीप चव्हाण यांनी करून मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सी. आर. देसाई यांनी शाश्वत जीवन शैली जगत असताना, निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. ग्राहक म्हणून सर्वानी सजग राहणेची व ग्राहक चळवळ अधिक व्यापक करणेची आवश्यकता असेलचे मत व्यक्त केले.
यावेळी अध्यक्ष म्हाळसाकांत देसाई यांनी ग्राहकांनी आपला अधिकार वापरून टाळाटाळ व अडवणूक करणारे यांचे विरोधात तक्रार द्यावी. तरचं संबंधितांवर कार्यवाही करता येते. ग्राहक दिवसांसाठी संबंधित विभागाना पत्र काढूही गैरहजर असणारे विभागाना नोटीसा पाठवणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच शेतकरी व विद्यार्थ्यांना दाखले तात्काळ देण्याचा प्रयत्न असून काही अडचण असली तरी हक्कासाठी प्रत्यक्ष भेटण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवाजी गुरव यांनी सर्व विभागाचा आढावा घेत असणाऱ्या अडचणीचा पाढाच वाचला, तर सुनिल डोंगरे यांनी ग्राहकांची तक्रार निवारणासाठी सबंधीत अधिकारी हजर राहत नसतील, तर ग्राहक दिनाला काय अर्थ ? असा प्रश्न करत, उपस्थित नसलेल्या विभागाचा निषेध व्यक्त केला.
यावेळी ग्राहक महिला आघाडीच्या नीलम सरदेसाई, सुमन कांबळे, ग्राहक समिती अध्यक्ष बंडोपंत चव्हाण, रामदास चव्हाण, महादेव सुतार , बहुजन मुक्ती पार्टीचे किरण के. के., डाॅ. धनाजी राणे, डाॅ. सुदाम हारेर, व्ही डी जाधव, डि के. कांबळे यांनी वेगवेगळ्या प्रश्नांची मांडणी केली.
यावेळी नायब तहसीलदार विकास कोलते, एसटी आगर प्रमुख प्रविण पाटील, विद्युत मंडळ उपकार्यकारी अभियंता दयानंद आष्टेकर, सी. डी. सरदेसाई, संभाजी इंजल, काॅ.संजय घाटगे, शिवाजी इंगळे, संजय येसादे, यशवंत दोरूगडे, गिता पोतदार, धनश्री देसाई याच्यासह महिला बचत गटाच्या सदस्या, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, ग्राहक कल्याण फाऊंडेशन व अखिल भारतीय ग्राहक पंचायत या सर्व संघटनाचे पदाधिकारी व तक्रारदार ग्राहक उपस्थित होते.
सुत्रसंचालन व आभार संतोष पाटील यांनी मानले.

महागोंड पाणी योजनेचे रखडलेले काम पूर्ण करा
ग्रामस्थांनी दिला उपोषणाचा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महागोंड (ता. आजरा) येथील जलजीवन मिशन योजनेचे काम वर्षभरापूर्वी सुरू केले होते. अद्याप गावात पाणी आलेले नाही. रखडलेल्या योजनेचे काम पूर्ण करून गावात पाणी आणावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. १५ एप्रिलपर्यंत पाणी आले नाही तर ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. सरपंच व ग्रामसेवकांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
महागोंड गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावच्या जलजीवन मिशन योजनेचे काम वर्षापूर्वी सुरू केले होते. अद्याप या योजनेचे पाणी गावात आलेले नाही. ही योजना का थांबली आहे . कोणत्या तांत्रिक अडचणी आहेत?
याबाबत माहिती घेऊन योजनेचे काम पूर्ण करून गावात पाणी आणावे व गावाचा पाणीप्रश्न निकाली काढावा, योजना का रखडली ? याचा खुलासा करावा. १५ एप्रिलपर्यंत गावात पाणी आले नाही, तर ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदनावर धीरज पाटील, सरिता पाटील, सुरेश जाधव, भैरू पाटील, प्रभाकर काकडे आदींच्या सह्या आहेत.

बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करा…डॉ.अमोल पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका कुपोषण मुक्त करून सुदृढ व निरोगी पिढी निर्माण करण्यासाठी तालुक्यातील तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित श्रेणीतील बालकांना त्यांच्या पालकांनी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथील पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये तात्काळ दाखल करावे त्यामुळे ही बालके सर्वसाधारण श्रेणीमध्ये येतील व त्यांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यास मदत होईल असे समुपदेशन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी मौजे किटवडे येथील पालकांच्या भेटीदरम्यान केले.
किटवडे सारख्या अतिदुर्गम भागातील कुपोषित बालकांच्या पालकांना त्यांच्या घरी जाऊन ग्रामीण रुग्णालय आजरा येथील पथकाने भेट दिली पालक व ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करणे विषयी योग्य समुपदेशन केले त्यानंतर सदर पालक या बालकांना पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यास तयार झाले. या पालकांप्रमाणेच आजरा तालुक्यातील तीव्र व मध्यम कुपोषित बालकांच्या पालकांनी आपापल्या पाल्यांना पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करावे व बालकांचे शारीरिक मानसिक सामाजिक भवितव्य उज्वल करावे असे आवाहनही वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील यांनी यावेळी केले.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकातील डॉ. सुरजित पांडव,डॉ. स्वाती रेडेकर, श्रीमती सारिका शिंदे, श्रीमती सुषमा साठे,श्री. विजय एरंडोलकर, अंगणवाडीसेविका,सरपंच श्री. लहू वाकर व किटवडे, लिंगवाडी येथील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

कानोलीत युवकांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून साकारले मैदान…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कानोली (ता. आजरा ) येथील सरंबळवाडी जवळील गायरान हद्दीत पडीक जमिनीवर युवकांच्या पुढाकाकाने मैदान तयार करण्याचे नियोजन झाले आणि बघता -बघता युवक आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने गेले तीन दिवस मैदान साकारण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. युवक आणि लोकांनी ठरविले तर अश्यक असे कामही लोकवर्गणीतुन होऊ शकते याचे उदाहरण म्हणून याकडे पहावे लागेल, कामाला मुहूर्त मिळाला तो लक्ष्मी -देवी यात्रेच्या निमित्ताने. कांही हौशी युवक यांनी यात्रा काळात क्रिकेट स्पर्धा भरविण्याचे नियोजन केले, नियोजन झाले. मात्र स्पर्धा भरविण्यासाठी मैदान कुठे? असा प्रश्न उभा राहिला. ग्रा. प. हद्दीत रिकामे गायरान सरंबळवाडी फाट्यावर मैदान करण्याचे ठरले.
यात्रेनिमित्त एक सोशल मीडिया ग्रुप तयार झाला, यामध्ये क्रिकेट शौकीन किरण देसाई यांनी पुढाकार घेऊन लोकवर्गणीतुन मैदान तयार करण्याची संकल्पना मांडली त्याला युवक आणि ग्रामस्थ यांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळाला आणि आणि बघता बघता दात्यांनी मदतीचा हात पुढे केला. मैदानाचे काम सुरु झाले.
गावच्या सरपंच सौ. सुषमा पाटील आणि प्रमुख यांच्या उपस्थितीत मैदान कामाचा शुभारंभ झाला. यावेळी. ग्रा. प. सदस्य सुधीरकुमार पाटील, सेवा संस्थेचे चेअरमन दिलीप पाटील, संभाजी आपगे, राजू पाटील सुभाष पाटील किरण देसाई, विनायक सावरतकर,अभिजित देसाई प्रविण पाटील, गुरूदास पाटील, दिग्विजय भोसले,प्रणव पाटील, वैभव पाटील,विरेंद्र पाटील प्रथमेश देसाई. महेश गंधवाले, आदित्य देसाई प्रथमेश पाटील, ज्योतीरादित्य पाटील, प्रतीक पाटील गिरीश भोगण,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

छायावृत्त…

श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे कॉ. संपत देसाई यांना शिवाजी विद्यापीठाच्या मराठी शिक्षक संघाचा ‘ लेखक कार्यकर्ता ‘ पुरस्कार मिळाल्याबद्दल आजरा शाखेचे सल्लागार प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाखाधिकारी श्री. दीपक शिंदे व कर्मचारी उपस्थित होते.

निधन वार्ता
ईश्वर गुरव

गजरगाव ता. आजरा येथील ईश्वर लक्ष्मण गुरव ( वय ७० वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

आज शहरात…
चैतन्य सृजन व सेवा संस्था आजरा यांच्यावतीने महिलांमध्ये कॅन्सरविषयक जागृती विकसित करण्यासाठी फक्त महिलांसाठी डॉ. मंगल मोरबाळे प्राचार्य, संत गजानन महाराज आयुर्वेदिक कॉलेज महागांव यांचे व्याख्यान…
वेळ : दुपारी ३.३० वाजता
• ठिकाण : चैतन्य सभागृह-महाजन गल्ली आजरा.


