mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या -मंगळवार

मंगळवार 

२८ जुलै २०२६

तुमची चौकशी लावू…
मासिक सभेत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर…‌
कारभाराबाबत प्रचंड नाराजी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायतीच्या मासिक सभेत नगरसेवक अभिषेक शिंपी, परेश पोतदार यांच्यासह प्रमुख मंडळींनी पदाधिकाऱ्यांच्या एकंदर कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत मुख्याधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. तुमच्या वागण्यात सुधारणा होत नसेल तर निश्चितच तुमची चौकशी लावू व निलंबित करु अशी थेट तंबीच देण्यात आली. नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा पाहून भंबेरी उडालेल्या अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखवण्यापलीकडे काही केले नाही.

आजरा नगरपंचायतीची मासिक सभा नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अनेक विषयावर यावेळी जोरदार चर्चा झाली. नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी लाखो रुपये खर्चून उभारलेल्या सोलर प्रकल्पाकडे होत असणाऱ्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त करत एकीकडे सोलर प्रकल्प वापरात नाही तर दुसरीकडे लाखो रुपयांचे वीज बिल नगरपंचायतीला भरावे लागत असल्याबाबत अधिकाऱ्यांना चांगले सुनावले. अधिकाऱ्यांची सभागृहातील वागणूक व सभा संपल्यानंतर असणारी वागणूक यामध्ये तफावत असल्याचा आरोप त्यांनी केला. तुम्ही हलक्यात घेत असाल तर तुमच्या चौकशीसह निलंबनासाठी आपण प्रयत्न करू असे थेट मुख्याधिकाऱ्यांनाच सुनावले. शिंपी यांच्या पाठोपाठ परेश पोतदार यांनीही आक्रमक भूमिका घेतली. विविध विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी करत आम्ही नगरपंचायतीत आलोच का ? असा प्रश्न आम्हाला आता पडू लागला आहे. नगरसेवक पद म्हणजे केवळ नागरिकांचे शिव्या खाणे एवढेच बनले आहे. कालच होत नसतील तर नगरसेवक पद पाहिजे तरी कशाला? असा उद्दीग्न सवाल त्यांनी उपस्थित केला. नगराध्यक्ष अशोकअण्णा चरटी यांनी अधिकाऱ्यांना जबाबदारीने वागण्याच्या सूचना केल्या.

पावसाळा संपत आला कर्मचाऱ्यांना गणवेश रेनकोट व इतर पावसाळी साहित्य देणार तरी कधी ? असा सवाल निसार लाडजी यांनी केला. नगरसेविका पुनम लिचम यांनी घनकचरा वर्गीकरणाच्या उपाययोजना बाबत माहिती मागितली. मासिक खर्चाची टिपणी सभेसमोर ठेवावी अशी सूचना विक्रम पाटेकर यांनी केली.

शंभर वेळा विनंती करूनही नवीन पाणीपुरवठा योजनेच्या टाकीतील पाणी ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणात खाली येत असल्याने खालच्या जमिनीच्या भराव वाहून जात आहे त्यामुळे ही टाकी कोसळणार असल्याने वेळीच उपाययोजना करावी अशी सूचना परशुराम बामणे यांनी केली.

यावेळी झालेल्या चर्चेत असीफ पटेल, अनिकेत चराटी, डॉ. इंद्रजीत देसाई यांच्यासह नगरसेवकांनी भाग घेतला.

सभेत मुख्याधिकारी सुरज सुर्वे, निहाल नायकवडी, अमर कांबळे, मानसी कदम यांच्यासह उपनगराध्यक्षा सौ. पूजा डोंगरे व सर्व नगरसेवक उपस्थित होते.

मूळ कागदपत्रे गायब…

नगरपंचायतीच्या दफ्तरातून अनेक मूळ कागदपत्रे गायब होत असल्याचा धक्कादायक आरोप सभेत करण्यात आला. वैशिष्ठ म्हणजे हा आरोप अधिकाऱ्यांनी फेटाळला नाही.

झक मारली आणि नगरसेवक झालो

नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांचे वर्तन, शहरवासियांचे अनेक प्रश्न, व प्रश्नांची सोडवणूक करण्यास येणाऱ्या मर्यादा पाहिल्या तर झक मारली आणि नगरसेवक झालो… असे वाटू लागले आहे अशी खंत नगरसेवक परेश पोतदार यांनी व्यक्त केली.

हरपवडे येथे सुंदर बैल सजावट स्पर्धा

 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

श्री शिव शंभू स्पोर्ट्स,हरपवडे यांच्या वतीने बेंदूर सणानिमित्त हरपवडे येथे गाव मर्यादित सुंदर सजावट बैल जोडी स्पर्धा आयोजित केली होती.सहा आकर्षक बक्षिसे व ढाली बक्षिस स्वरूपात बैल मालकांना व शेतकरी बंधूंना देण्यात आल्या.

पारंपारिक पद्धतिने हलगीच्या निनादात मिरवणूक पार पडली.गावातून मिरवणूक झाल्यायावर श्री रासाई मंदिर येथे बक्षिस वित्तरण सोहळा पार पडला. शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले.

या वेळी उपस्थित शुभम पाटिल, प्रथमेश पोवार,अजय कांबळे, जीवन कांबळे, मयुरेश केळूस्कर, प्रणव कांबळे, अर्थव कांबळे, श्रेयस पोवार व गावकरी, वारकरी,धारकरी,कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो क्लिक…

बेंदराची धूम दारी दारी,
चिमुकले खेळती बैलांसंग भारी.
लाल दोरी हाती, आनंद चेहऱ्यावरी,
गावची संस्कृती जपली लहानग्यांनी खरी.

स्थळ : मुरुडे

जिल्हा जनगणना पुस्तिका तयार करण्यासाठी आजऱ्यात मार्गदर्शन शिबिर संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जिल्हा जनगणना पुस्तिका २०२६ तयार करण्यासंदर्भात एक दिवसीय सूचना शिबिर आजरा तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडले.

शिबिरास जिल्हा समन्वयक जनगणना अधिकारी तुषार पाटील, तहसीलदार समीर माने आणि निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा जनगणना पुस्तिकेचे महत्त्व अधोरेखित करताना लोकसंख्या, घरे, शेती, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा यांची गावनिहाय अचूक माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सर्व माहिती ऑनलाइन पोर्टलवर वेळेत अपडेट करण्याबरोबरच कागदी आणि डिजिटल नोंदी ठेवण्यावर भर देण्यात आला. तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी माहितीची खातरजमा करूनच पुस्तिकेत समावेश करावा, असेही सांगण्यात आले.

सर्व तालुक्यांनी १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत प्राथमिक मसुदा आणि ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत अंतिम पुस्तिका सादर करण्याचे वेळापत्रकही यावेळी जाहीर करण्यात आले.

या शिबिराला १९ ग्राम महसुली अधिकारी, ४९ ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जिल्हा सांख्यिकी अधिकाऱ्यांनी पुस्तिकेचे स्वरूप, नवे बदल आणि डेटा एंट्री प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये पारितोषिक वितरण कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील  गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण आणि अकरावी कला ,वाणिज्य, विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या नवागतांचे स्वागत असा संयुक्त सोहळा संपन्न झाला .

एच .एस .सी फेब्रुवारी २०२६ मध्ये बारावी कला ,वाणिज्य ,विज्ञान या शाखेतील केंद्रात आणि कॉलेजमध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार आणि सर्व संचालकामार्फत सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे आणि असेच यश कायमस्वरूपी मिळवून संकुलाचे नाव उज्वल करावे असे उदगार या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आजरा महाल शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री के .जी पटेकर यांनी व्यक्त केले.

व्यंकटराव ज्युनिअर कॉलेजचे व्यवस्थापक श्री. एम .ए .पाटील सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून शिक्षकांच्या मार्गदर्शनातून जिद्द आणि कष्टातून विद्यार्थ्यांना कसे यश मिळवता येते हे सांगितले.
ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री एस. एन. पाटील  यांनी आपल्या कॉलेजच्या निकालाची परंपरा कायम टिकून ठेवण्याचे आव्हान आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी आजरा महाल शिक्षण मंडळाचे खजिनदार श्री सुनील पाटील व संचालक श्री सचिन शिंपी ,श्री सुधीर जाधव ,श्री विलास पाटील ,श्री अशोक पवार, विद्यार्थी पालक आणि हायस्कूलच्या पर्यवेक्षिका शेलार  उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पारळे  तर निकाल वाचन श्री मस्कर  व आभार सौ. कुपेकर  यांनी मानले.

आजरा महाविद्यालयाच्या NCC व NSS विभागाच्या वतीने आवंडी वसाहत येथे वृक्षारोपण 


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा महाविद्यालय, आजरा येथील राष्ट्रीय छात्र सेना (NCC) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागांच्या संयुक्त विद्यमाने  आवंडी वसाहत येथील भावेश्वारी मंदिर परिसर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पर्यावरण संवर्धन आणि हरित वसुंधरेचा संदेश देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. किरण पोतदार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. पोतदार यांनी, “वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी केवळ वृक्षारोपण करून थांब चालणार नाही, तर लावलेल्या प्रत्येक रोपाचे संगोपन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमास NCC प्रमुख डॉ. संजय चव्हाण, NSS प्रमुख डॉ. अविनाश वर्धन, कार्यालयीन अधिक्षक श्री. योगेश पाटील, प्रशासकीय कर्मचारी श्री. देवदास गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. 

चार गावांवर वन्यप्राण्याची दहशत …

वन विभागाची हालचाल संथ

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर परिसरातील बेलेवाडी, झुलपेवाडी, हणबरवाडी आणि बहिरेवाडी या चार गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून वन्यप्राण्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या कालावधीत अनेक पाळीव कुत्र्यांचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून शेतकरी, शेतमजूर आणि शाळकरी मुलेही दहशतीच्या छायेत वावरत आहेत.
घटनास्थळी वन्यप्राण्याचे ठसे आढळून आले असून ते वन विभागाने ताब्यात घेतले आहेत. मात्र संबंधित प्राणी बिबट्या आहे की तरस, याबाबत अद्याप स्पष्टता करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरात संभ्रम कायम आहे.

वनपाल आणि वनरक्षकांनी पंचनामे करून कॅमेरा ट्रॅप बसविले असले, तरी त्यानंतरची कार्यवाही ठप्प असल्याचे चित्र आहे. कॅमेऱ्यातील नोंदींचा आढावा, नियमित गस्त आणि नागरिकांना माहिती देण्याबाबत कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही. विशेष म्हणजे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी अद्याप घटनास्थळी भेट दिलेली नसल्याने अधिकारी वर्ग हा निष्क्रिय वाटत आहे.
परिसरातील भीतीचे वातावरण लक्षात घेता वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना राबवून नियमित गस्त, जनजागृती आणि वन्यप्राण्याचा शोध घेण्याची मोहीम वेगाने राबविणे आवश्यक आहे.

       आजचे पंचांग 

दिनांक : २८ जुलै २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : चतुर्दशी तिथी (सायंकाळी ०६.१८ पर्यंत) त्यानंतर पौर्णिमा तिथी
नक्षत्र : पूर्वाषाढा नक्षत्र (दुपारी ०१.१० पर्यंत) त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र
योग : विष्कुम्भ योग (रात्री ११.३२ पर्यंत) त्यानंतर प्रीति योग
करण : वाणीजा करण (सायंकाळी ०६.१८ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : धनु राशी (रात्री ०७.४८ पर्यंत) त्यानंतर मकर राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.५९ ते सायंकाळी ०५.३७ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१९ ते दुपारी ०१.११
सूर्योदय : सकाळी ०६.१५
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१५
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पंधरा दिवसाच्या आत उर्वरित प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आराखडा बनवण्याचे निर्देश- श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, कॉ. संपत देसाई यांच्यासह श्रमुदच्या प्रतिनिधींसोबत सातारा येथे आज मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, सातारा, सांगली, कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता, सर्व प्रकल्पांचे कार्यकारी अभियंता यांच्यासोबत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत बैठक झाली.

mrityunjay mahanews

रविवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

शहाजी देसाई यांचे निधन… पंधराव्या वित्त आयोगाची बिले तातडीने अदा करा…. पंचायत समिती सभेत सूचना… किटवडे येथे ३ टीएमसी चा पाणी प्रकल्प उभारण्याच्या हालचाली

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!