mrityunjaymahanews
अन्यकोल्हापूरक्रीडागुन्हाजीवनमंत्रटेक्नोलॉजीठळक बातम्यादेशबिझनेसभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

शुक्रवार २० जून २०२५       

चित्री नदीपात्रात मृतदेह आढळला

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा – महागाव मार्गावर संताजी पुलाखालील चित्री नदीच्या पात्रामध्ये बुरुडे- मुरुडे येथून येणाऱ्या ओढ्यातून वाहून आलेला अंदाजे ४० वर्षीय अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.

       गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सदर वृत्त शहरात पसरताच शहरवासीयांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. सदर मृत्यूची नोंद आजरा पोलिसात झाली आहे. बुधवारी सदर व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर व्यक्ती कोणाच्या ओळखीची असल्यास आजरा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

होन्याळी येथील महिलेचा विनयभंग व पतीला मारहाण प्रकरणी तिघांना शिक्षा

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      होन्याळी ता. आजरा येथील भावकीच्या वादातून १५ ऑक्टोबर २०२१ रोजी महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीला संगनमत करून मारहाण व जखमी केल्याप्रकरणी आजरा येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आर.पी.थोरे यांनी धनंजय काकासाॊ पाटील, जयसिंग काकासाॊ पाटील व काकासाॊ विष्णू पाटील या तिघांना भा.दं.वि.स. ३२३ प्रमाणे तीन महिने तर भा.दं.वि.स. कलम ५०४ प्रमाणे सहा महिन्यांची शिक्षा व एक हजार रुपये दंड सुनावला आहे.

       तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे व सध्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर तपास करण्यात आला होता. तपासी अंमलदार म्हणून जी. व्ही.कांबळे यांनी काम पाहिले तर फिर्यादीच्या वतीने ॲड. संज्योती म्हामुलकर यांनी काम पाहिले.

आजरा तालुक्याला गोवा राज्यात समाविष्ट करावे…
विविध संघटनाची मागणी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष उलटली तालुक्याचा विकास झाला नाही. तालुक्याच्या वाट्याला राजकीय उपेक्षाच आली आहे. याची आम्हांला उबग आली आहे. त्यामुळे आजरा तालुक्याचा गोवा राज्यात समाविष्ट करावा याबाबतचे निवेदन आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले.

       जिल्हा परिषदेचा एक मतदार व दोन पंचायत गण कमी होण्याच्या पार्श्वभूमीवर आज येथे विविध पक्ष संघटनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत अनेकांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष तानाजी देसाई म्हणाले, तालुक्याचा विकास दर चांगला राहीला नाही. तालुक्याची राजकीय मोडतोड व हानी झाली आहे. राजकीय उपेक्षाच वाट्याला आली आहे. ही दूर करावयाची असले तर आम्हाला गोवा राज्यात समाविष्ट करावे. भौगोलिक दृष्ट्या आम्ही गोवा राज्याशी सलग्न आहोत.

      तालुक्यातील तरुणांना गोव्यात रोजगाराची संधी मिळाली आहे. येथील पोल्ट्री, काजू व्यवसायाला व शेतीमालाला गोव्याची बाजारपेठ उपलब्ध आहे. तालुक्याला कोल्हापुर, मुंबईपेक्षा गोवा जवळचा आहे. एकंदरीत सर्व विचार राजकीय उपेक्षा दूर होण्याबरोबर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने गोवा राज्यात समाविष्ट होणे महत्वाचे आहे. आजरा तालुका काजू प्रक्रिया संघटनेचे प्रकाश कोंडुसकर, महाराष्ट्र धरणग्रस्त संघटनेचे प्रमुख कॉ. शिवाजी गुरव, श्रमिक मुक्ती दल (लोकशाहीवादी) कॉ. संजय तर्डेकर, आजरा तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेचे राजू होलम, सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष जी. एम. पाटील यांनी भावना व्यक्त केल्या.

      यावेळी माजी सभापती निवृत्ती कांबळे, कृष्णा पाटील, जयवंत पाटील, सखाराम केसरकर, युवराज देसाई यासह संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

लाजिरवाणे…

       ही मागणी राज्य शासनाच्या दृष्टीने लाजिरवाणी आहे. आजरा तालुक्यावर होणारा राजकीय व विकासात्मक अन्याय यामुळे हा उद्रेक होत असून आता शासनाला या मागणीकडे गांभीर्याने पाहावे लागेल.

जि. प. मतदार संघ पुनर्रचनेतील आजरा तालुक्यावरील अन्याय दूर करा…
राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      शासन आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील नमूद जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीतील सदस्य संख्या व प्रभाग रचना करणेबाबत शासन आदेश दि.१२ जूनला निर्गमित झाले. सदर आदेश हा आपला जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यातील इतर ३१ जिल्हयांना लागू झाला. परंतू सदर शासन आदेश निर्गमित करीत असताना शासनाने आमच्या तालुक्याचे ३ जिल्हा परिषद सदस्य संख्या कमी करुन २ जिल्हा परिषद सदस्य केले आहेत. सदर संख्या कमी करत असताना शासनाने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना अथवा नोटीस निर्गमित केली नाही. तसंच कोणत्याही प्रकारच्या हरकती मागवल्या नाहीत.

      मुळात सदर जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ही सन २०११ च्या जनगणनेनुसारच ३ सदस्य आजतागायत होते व सन २०१७ च्या निवडणुकीतही ते तेवढेच ठेवले होते. केंद्र शासनाकडून दर १० वर्षांनी जनगणना करणे अपेक्षित असते. परंतु ते सन २०२१ ला न झालेमुळे आजही आपण सन २०११ च्या जनगणनेनुसारच लोकसंख्या गृहीत धरुन आजरा तालुक्याला ३ जिल्हा परिषद सदस्य निश्चित केलेले होते.

      शासनामार्फत जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा १९६१ च्या कलम १२ चे उल्लंघन झाले आहे, आणि त्यामुळे आजरा तालुक्यातील मतदार व उमेदवारावर अन्याय झालेला आहे. कारण निवडून गेलेले प्रतिनिधीच मतदारांचा आवाज असतील आणि कमी केलेल्या सदस्य संख्येमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती सभागृहात आमच्या तालुक्यातील मतदारांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आहे. असा संदेश जनमाणसात जात आहे. आणि त्यामुळे तालुक्यातील मतदारांच्या मनात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

      वस्तुतः आजरा तालुका हा कोल्हापूर जिल्हयातील अत्यंत दुर्गम व डोंगराळ आणि सिंधुदुर्ग जिल्हयाला लागून आहे. हा तालुका अतिपर्जन्यामुळे झोन क्रमवारीत डी झोन म्हणून नोंद आहे. त्यामुळे सदर तालुक्याच्या सदस्य संख्या निश्चित करताना सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यातील तालुक्यांप्रमाणेच सदस्य संख्या निश्चित करणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ६८ वरून ७५ सदस्य संख्या करता येत असतानासुध्दा आजरा तालुक्याचा एक जिल्हा परिषद मतदार संघ व पंचायत समितीचे दोन मतदार संघ कमी करून आजरा तालुक्यातील जनतेवर शासनाने जाणीवपूर्वक अन्याय केला आहे. यामुळे जिल्हा परिषद रचनेबाबत पुनर्विचार करावा असेही म्हटले आहे.

      याबाबतच्या निवेदनावर श्री. सुधीर देसाई, संचालक, के.डी.सी.सी. बैंक, श्री. वसंतराव धुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य, श्री. अल्बर्ट नातवेद डिसोझा माजी पंचायत समिती सभापती, श्री. मधुकर देसाई,संचालक, आजरा सह साखर कारखाना, श्री. सुभाष देसाई व्हा. चेअरमन, आजरा सह. साखर कारखाना श्री. काशिनाथ तेली माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या सह्या आहेत.

विभागीय आयुक्तांकडे दाद..‌.

      याच मुद्द्यावरून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक दशरथ अमृते व चंद्रकांत राजाराम देसाई यांनी आयुक्तांकडे दाद मागितली आहे.

मागासवर्गीय आयोगाकडे अहवाल सादर करावा
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      जिल्हाधिकारी यांनी मराठा समाजाच्या हितासाठी मागासवर्गीय आयोग पुणे यांना अहवाल सादर करावा अशी विनंती शिवसेना शिंदे गटातर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले.

       निवेदनात म्हंटले आहे, पूर्वी नागरीकांच्या जन्म नोंदी समोर मोडी लिपीत कुलवाडी / कुळवाडी अशी जात नमूद केली आहे. मराठा समाजाच्या नेत्यांनी शासनाकडे या नोंदीची कुणबी जाती मध्ये हे शब्द प्रयोग समाविष्ठ करावा म्हणून पाठपुरवठा केला आहे. मागसवर्गीय आयोग पुणे यांच्याकडे प्रत्येक तालुक्यातील माहिती यापूर्वी समाज कल्याण विभागामार्फत देण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाने सदर जातीचा शब्द प्रयोग कुणबी जातीमध्ये करावा असा अभिप्रायही दिलेला आहे. परंतु मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीत सदरचा अभिप्राय पुराव्यासह जिल्हाधिकारी यांनी सादर करावा असे सुचित केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सदरचा अहवाल मागासर्गीय आयोगाकडे सादर करून मराठा समाजाला न्याय द्यावा. अशी विनंती केली आहे.

      तालुका प्रमुख संजय पाटील, उपजिल्हा प्रमुख राजेद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. शहर प्रमुख विजय थोरवत, दयानंद निंऊगरे, विजय कोंड्सकर, काकासो देसाई आदी उपस्थित होते.

आजऱ्यात आदर्श, रवळनाथ बालक मंदिर इमारतींचे आज उद्घाटन

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       येथील आदर्श बालक मंदिर व रवळनाथ बालक मंदिर या दोन शाळा इमारतींचा उ‌द्घाटन सोहळा आज शुक्रवार (ता. २०) होत आहे. आजरा हायस्कूल आजरा येथे सकाळी ११ वाजता कार्यक्रम होईल. पालकमंत्री ना .प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उ‌द्घाटन होईल. जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रहाणार आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष विलास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे, सचिव रमेश कुरुणकर, संचालक दीपक सातोसकर, सुरेश डांग, विजयकुमार पाटील, दिनेश कुरुणकर, के. व्ही. येसणे, आदर्श बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका साधना संभाजी नारे, रवळनाथ बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका जयश्री बसवराज डांग या वेळी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

       आजरा जिल्हा परिषद कार्यकर्त्यांची आढावा बैठक कार्यक्रमानंतर होईल अशी माहिती संचालक मंडळांने दिली आहे.

आजऱ्यात शिवसेनेचा

वर्धापन दिन साजरा

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      येथे शिवसेनेचा ५९ वर्धापन दिन साजरा झाला. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम झाले. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष व युवासेनेच्यावतीने आयोजन केले होते.

      येथील छ. शिवरायांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते झाले. आजरा बसस्थानकात प्रतिमा पुजन व जिलेबी वाटप करण्यात आले. त्यानंतर आजरा संपर्क कार्यालय येथे शिवसैनिकांना फळझाडांची रोपे देऊन सन्मान करण्यात आला.

      यावेळी तालुकाप्रमुख युवराज पोवार, शहर प्रमुख ओमकार मा‌द्याळकर, युवा सेना जिल्हाप्रमुख महेश पाटील, दयानंद भोपळे, अमित गुरव, चंद्रकांत वरकटे, दिनेश कांबळे, सुयश पाटील, रोहन गिरी, शिवाजी आढाव, संजय येसादे, महादेव सुतार, शंकर संकपाळ, आनंदा कोरगावकर, भीमा गुरव, विष्णू रेडेकर, तानाजी डोंगरे, महादेव गुरव,इमाम चांद, बापू दळवी, मारुती मलगुतकर, मधुकर पाटील, रवी सावंत, प्रदीप पाचवडेकर, महिला तालुका संघटिका गीता देसाई, सागर नाईक, पदाधिकारी, एस.टी. आगाराचे अधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

निधन वार्ता
विठ्ठल डोणकर

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        आजरा येथील प्रतिष्ठित कापड व्यापारी विठ्ठल कृष्णा डोणकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

        त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, विवाहित मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

उत्तूरला चोरट्यांचा हवेत गोळीबार ; सराफाला लुटण्याचा प्रयत्न फसला

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!