गुरुवार दिनांक १५ मे २०२५

बसमधील आरक्षित जागांचा वापर कुणासाठी…? वादावादीसह हाणामारी…
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा बसस्थानकावर बसमध्ये विशिष्ट मंडळींसाठी आरक्षित आसनावर जागा उपलब्ध करून न दिल्याने प्रवासी व कंडक्टर यांच्यात वादावादी होऊन हाणामारी झाली.
सायंकाळी पावणेसहा वाजता आजरा-देवकांडगाव बसला गर्दी झाली होती. या गर्दीत दिव्यांगांकरिता आरक्षित जागेवर एक प्रवासी बसला होता. सदर आरक्षित जागा देण्यासाठी संबंधित दिव्यांग प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाकडे आग्रह धरला. प्रवाशाने जागा न दिल्याने दिव्यांगाने थेट कंडक्टरकडे तक्रार केली.यामध्ये कंडक्टरने फारसा हस्तक्षेप न केल्याच्या रागातून यामध्ये दोघांमध्ये वादावादी व हाणामारी झाली.
अन्य प्रवासी व चालकांनी मध्यस्थी केल्याने तणाव निवळला व त्यानंतर बस मार्गस्थ झाली.
साखर कारखान्यासमोर अपघात… दोघे जखमी
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यासमोर प्रवेशद्वारावरच दुचाकीला चार चाकी धडकल्याने झालेल्या अपघातात यरंडोळ ता. आजरा येथील महादेव रामू सुपल (वय ५० वर्षे) व प्रकाश विष्णू पाटील ( वय ७० वर्षे ) हे दोघे दुचाकी स्वार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर अपघात काल बुधवारी दुपारी बारा वाजता झाला असून अपघातात चार चाकीसह दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.

सिद्धिविनायक कॉलनी येथील अंतर्गत रस्त्यांचा शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सार्वजनिक आरोग्य मंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्या निधीतून सिद्धिविनायक कॉलनी येथील अंतर्गत रस्त्यांचा शुभारंभ त
अशोकआण्णा चराटी यांच्या हस्ते व नगरसेवक अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी कॉलनी मधील जेष्ठ नागरिक गणपतराव ढेकळे , मधुकर भारती ,महादेव पावले, कृष्णा शिंत्रे, शंकर कोरगावकर, जावेद हवालदार, आब्बास पठाण, दाऊद लमतुरे, श्रीनिवास सापळे,अमित पाडेकर, विश्वास पवार, अकबर नसरदी, राजू चंदनवाले, शामराव सुतार , शरद सुतार, संतोष सुतार, शंकर तिबिले नागरिक उपस्थित होते.

आजरा साखर कारखाना व्यवस्थापन व शेतकरी यांची कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे क्षेत्र भेट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघामार्फत आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे ऊस उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता A I चा वापर करून ऊस शेती किफायतशीर कशी केली जाते याबाबत प्रदर्शन व तज्ञांचे मार्गदर्शन असे शिबिर आयोजित केले होते. सदर शिबिरात वसंतराव देसाई आजरा कारखाना व्यवस्थापन व पांच गटातील प्रगतशील शेतकरी व अधिकारी कर्मचारी उपस्थित राहीले.
यावेळी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री संजय खताळ व कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे तज्ञ यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने भरघोस ऊस उत्पादन कसे घेता येते याबाबत विशेष मार्गदर्शन केले.
या शिबिरासाठी अध्यक्ष श्री मुकुंद उर्फ उदयसिंह देसाई, उपाध्यक्ष श्री. सुभाष देसाई, संचालक श्री. उदयसिंह पोवार, श्री. मधुकर देसाई, श्री. रणजीत देसाई, श्री. गोविंद पाटील, श्री. संभाजी रा.पाटील, श्री. शिवाजी नांदवडेकर, श्री. काशिनाथ तेली, श्री. हरीभाऊ कांबळे, श्री. नामदेव नार्वेकर, श्री.दिगंबर देसाई, सामाजिक कार्यकर्ते राजाराम होलम, कार्यकारी संचालक श्री. संभाजी सावंत, मुख्य शेती अधिकारी श्री.विक्रम देसाई, शेतकरी श्री. संजयभाऊ सावंत, श्री. महादेव हेब्बाळकर, श्री. किरण देशपांडे, श्री. दशरथ धुरे, श्री. परशराम केसरकर व शेती विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आजऱ्यात छ. संभाजी महाराज यांची जयंती साजरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील छत्रपती श्री. संभाजी राजे नगरमध्ये छ. संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी. छ. संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. शिवप्रेमी शंकर पाटील यांनी छ. संभाजी महाराज यांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंग सांगीतले.
यावेळी दीपक कोरवी, देवदास पाटील, संजय माने, दत्तप्रसाद सलामवाडे, स्नेहीत चव्हाण, सुहास मुळीक, दयानंद कुंभार, आनंदा येसादे यासह नागरीक उपस्थित होते.

पोळगाव येथे खुल्या संगीत भजन स्पर्धा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री साईनाथ मित्र मंडळ पोळगांव, ता. आजरा यांचे सौजन्याने साई भंडारा निमित्त गुरुवार दि. २२/५/२०२५ रोजी सायं. ५.०० वा. पोळगांव ता. आजरा येथे भव्य खुल्या संगीत भजन स्पर्धा आयोजित केली आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
सदर स्पर्धांकरीता प्रवेश विनामूल्य असून स्पर्धेतील विजेत्यांना पुढीलप्रमाणे बक्षीसे देण्यात येणार आहेत…
प्रथम क्रमांक ५००१/- चषक व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांक – ४००१/- चषक व. प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांक ३००१/- चषक व प्रशस्तीपत्र,चतुर्थ क्रमांक – २००१/- चषक व प्रशस्तीपत्र, पाचवा क्रमांक १००१/- चषक व प्रशस्तीपत्र यासह इतर अनेक वैयक्तिक बक्षीस दिली असून १८ मिनिटांचा कालावधी स्पर्धकांना देण्यात येणार आहे.



