सोमवार
१० ऑगस्ट २०२६


ट्रॅव्हल्सची कारला जोरदार धडक…
दीड लाखांचे नुकसान

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गडहिंग्लज-उत्तूर मार्गावरील बेलेवाडी घाटात शनिवारी सायंकाळी भरधाव ट्रॅव्हल्सने कारला जोरदार धडक दिल्याने कारचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. या अपघातात कारमधील संतोष पांडुरंग शिंत्रे (रा. बेलेवाडी) यांच्या डोक्याला दुखापत झाली.तन्मय चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मारुती सुझुकी कार (एमएच ०९ जीयू ५५०१) बेलेवाडीकडून उत्तूरच्या दिशेने जात होती. म्हसोबा देवालयापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स (एनएल ०१ बी ९००५) ने कारच्या चालकाच्या बाजूच्या पुढील भागाला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले.
ट्रॅव्हल्स चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी उत्तूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस हवालदार सुदर्शन कांबळे पुढील तपास करीत आहेत.

चारचाकी समोरच बिबट्या
बाप – लेकींनी अनुभवला थरार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चार चाकी मधून तीन शाळकरी मुलींसह घरी परतत असताना रस्त्यावर गाडी समोर थेट बिबट्या आल्याने धड पुढे जाता येत नाही व धड मागेही येता येत नाही अशा विचित्र परिस्थितीत अडकलेल्या आजरा – साळगाव मार्गावरील बबलू राजाराम देसाई यांनी चांगलाच थरार अनुभवला. सुमारे दहा मिनिटानंतर बिबट्या बाजूच्या झुडपातून गायब झाला.

देसाई कुटुंबियांची येथे शेती आहे. शेतातच घर बांधून रहावयास आहेत. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्रा. मनोज देसाई हे शेतावरून आजऱ्याच्या दिशेने परतत असताना शेतामध्ये मोरांचा गोंगाट त्यांना ऐकू आला. मोरांच्या पाठोपाठ बिबट्याही त्यांना दिसला. त्यांनी तातडीने घर गाठले.
अल्पावधीतच साडेसहा वाजण्याच्या सुमारास बबलू देसाई हे आजऱ्याहून आपल्या मुलींसह चारचाकीतून घरी जात असताना अरुंद वाटेत गाडीच्या समोर बिबट्याने ठाण मांडल्याने गाडीतील सर्वांचीच भीतीने गाळण उडाली. सुमारे आठ ते दहा मिनिटानंतर बिबट्याने तिथून काढता पाय घेतला. दरम्यानच्या कालावधीत त्याला मोबाईल कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात देसाई यांना यश आले.

तातडीने वनविभागाची टीम तेथे दाखल झाली. सलग दुसऱ्या दिवशी या भागात बिबट्याने खुलेआम दर्शन दिल्याने वनविभागाकडून नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

चारचाकीला दुचाकीची धडक…
दोघे जखमी
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – आंबोली मार्गावर गवसे गावच्या हद्दीमध्ये भरधाव दुचाकीने चारचाकी गाडीला धडक दिल्याने उजेर शब्बीर करजगी व मोहम्मद उमेद उस्मान उंकली दोघे रा. जमखंडी/ कर्नाटक हे गंभीर जखमी झाले आहेत.
रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अपघातातील जखमी हे वेगाने दुचाकी घेऊन येत असताना वळणावर चारचाकीला त्यांनी जोरात धडक दिली. यामध्ये दोघेही जखमी झाले. अभिजीत श्रीकांत पांडव रा. इचलकरंजी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी चालक हुजेर करजगी याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

व्यसनाला नकार, निरोगी जीवनाचा स्विकार…उत्तूरच्या वसंतरावदादा पाटील विद्यालयात नशामुक्तीची शपथ.

उत्तुर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतरावदादा पाटील विद्यालय, उत्तूर येथे दि. ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय नशामुक्ती जनजागृती अभियान व राज्यव्यापी प्रतिज्ञा मोहिमेअंतर्गत नशामुक्ती जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. विद्यालय व प्रजापिता ब्रह्मकुमारी शाखा, उत्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम व त्यापासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन करून नशामुक्तीची प्रतिज्ञा देण्यात आली. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही प्रतिज्ञा घेतली.
यावेळी डॉ. पन्हाळे व निवृत्त मुख्याध्यापक श्री. पाटकर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक एस. एस. कांबळे यांनी स्वागत केले. श्री. किरण आमणगी सर यांनी प्रास्ताविक, श्री. आर. बी. राठोड सर यांनी सूत्रसंचालन, तर सौ. ए. व्ही. गुरव यांनी आभार मानले. यावेळी श्री. एच. एस. हळवणकर व श्री. ध्रुववत मोहिते उपस्थित होते.

स्तनपान सप्ताहातून माता-बालक आरोग्याला प्राधान्य…
दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन करणाऱ्या दाम्पत्यांचा सत्कार

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
माता व बालकांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन तसेच कुटुंब नियोजनाचा संदेश देण्यासाठी ग्रामपंचायत उत्तूर येथे स्तनपान सप्ताहानिमित्त आरोग्यविषयक कार्यक्रम घेण्यात आला.प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात गरोदर व स्तनदा मातांना स्तनपानाचे महत्त्व, आरोग्य व स्वच्छतेबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कुटुंब नियोजनाबाबतही माहिती देण्यात आली. दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतलेल्या दाम्पत्यांचा सत्कार करून त्यांचा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच किरण आमणगी यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच सुनिता हत्तरगी, ग्रामपंचायत सदस्या अनिता घोडके, समितीच्या सदस्या चित्रा कामत, वंदना देवरू, सुनिता नाईक यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे नियोजन आशा सेविका रेश्मा कुंभार,अजूँम मकानदार, सना बागवान, मनिषा सांवत, रूपाली भाईगडे, अरुणा जाधव, आक्काताई पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी विशेष योगदान आरोग्य सेविका सौ. छाया वसगावकर व रेश्मा कांबळे यांनी दिले. या कार्यक्रमा साठी उत्तूर ग्रामपंचायत माजी सरपंच सौ. वैशालीताई आपटे व गरोदर माता, स्तनदा माता आणि महिलां मोठया संख्येने उपस्थित होत्या.

दूध उत्पादकांचा आज आजऱ्यात मेळावा…
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत दूध उत्पादकांना मताचा थेट अधिकार मिळावा यासह प्रमुख मागण्या घेऊन ‘गोकुळ’ च्या सभासद व दूध उत्पादक सभासदांचा जाहीर मिळावा ‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत सभागृह येथे आज सोमवार दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता बोलवण्यात आला आहे.
भोवताल…
आंबोली येथे सुप्रसिद्ध धबधबा स्थळी सर्पदंशाने हम्पी येथील गंगाधर मरप्पा या पर्यटकाचा मृत्यू झाला. प्रचंड गर्दीमुळे त्याला उपचारासाठी हलवण्यात येणारे वाहन वेळेत बाहेर न निघाल्याने उपचार न होऊ शकल्याने मरप्पा यांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.

आजचे पंचांग
दिनांक : १० ऑगस्ट २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : द्वादशी तिथी (सकाळी ०८.०० पर्यंत) त्यानंतर त्रयोदशी तिथी
नक्षत्र : आर्द्रा नक्षत्र (दुपारी १२.२६ पर्यंत) त्यानंतर पुनर्वसू नक्षत्र
योग : वज्र योग (रात्री १०.२६ पर्यंत) त्यानंतर सिद्धि योग
करण : तैतुला करण (सकाळी ०८.०० पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : मिथुन राशी (११ ऑगस्ट पहाटे ०४.४२ पर्यंत) त्यानंतर कर्क राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.५५ ते सकाळी ०९.३१ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१८ ते दुपारी ०१.०९
सूर्योदय : सकाळी ०६.१९
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

निधन वार्ता
सौ.पल्लवी देसाई

उचंगी तालुका आजरा येथील सौ. पल्लवी संदेश देसाई (वय ४२ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, मुलगी, सासू-सासरे असा परिवार आहे.
लक्ष्मीबाई बुरुड

रामदेव गल्ली, आजरा येथील लक्ष्मीबाई तुकाराम बुरुड (वय ९० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे.
वृत्तपत्र विक्रेते सुभाष बुरुड यांच्या त्या आई होत.
विष्णू पुंडपळ

आरदाळ ता.आजरा येथील विष्णू राघू पुंडपळ (वय ७२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने उपचारादरम्यान सीपीआर रुग्णालय कोल्हापूर येथे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, सून नातवंडे असा परिवार आहे.


