mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरराजकीयरोजगारविदेशसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

शाश्वत आणि कल्पक शहर विकासासाठी परिवर्तन विकास आघाडी ला संधी द्या : अभिषेक शिंपी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायत निवडणूक रिंगणात अनेक मंडळी केवळ मतांच्या राजकारणासाठी पक्षीय चिन्ह व लेबल बाजूला ठेवून मतदारांची दिशाभूल करत आघाडीद्वारे निवडणुकीला सामोरी जात आहेत. गेल्या पाच वर्षातील त्यांचा कारभार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज राहिली नाही. शहरातील गल्लीबोळातून फेरफटका मारला की शहरवासीयांना शहराची झालेली बकाल अवस्था दिसून येते. शहराची ही दुर्दशा पाहून काहींनी तर गडहिंग्लज सारख्या शहरांमध्ये स्थायिक होण्याचा निर्णयही घेतला आहे. एकीकडे करोडोंच्या निधी आणून शहराचा विकास केला असे म्हणणाऱ्यांनी आपल्या संस्था व आपल्याशी संबंधित किती कुटुंबे बाहेरगावी स्थलांतरित झाली ? याची आकडेवारी पहावी म्हणजे खरोखरच हा विकास आहे की केवळ भूलभुलैया हे लक्षात येईल. आता शहराच्या विकासासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उबाठा यांची आजरा शहर परिवर्तन विकास आघाडी सत्तेवर आणण्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन आघाडीचे अभिषेक शिंपी यांनी केले. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

परिवर्तन विकास आघाडी काय करणार….

– पर्यावरण पुरक शहर विकासाचा आराखडा तयार करणार
– ⁠राज्यातले पहिले स्वतंत्र कृषी धोरण असेलेली नगरपंचायत आजरा असणार
– ⁠जास्तीत जास्त अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करणार
– ⁠ड्रेनेज चे पाणी थेट नदी मध्ये जावू देणार नाही (STP) प्रकल्पासाठी नव्याने प्लानिंग करणार
– ⁠वाढीव व नविन कॅालणी मध्ये स्ट्रिट लाईट, रस्ते, ड्रेनेज व पाणीपुरवठा सुरळीत करणार
– ⁠पथ विक्रेते व भाजी विक्रेते यांना जागा भाडे किंवा दंड माफ करणार
– ⁠कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करणार
– ⁠आवंडीला बायपास रस्त्यावरून कचरा वाहतूक करणार
– ⁠गांधीनगरसह शहरातील सर्व प्रोपर्टी कार्ड चे प्रश्न मार्गी लावणार
– ⁠घरकूल निर्माण योजना प्रभावीपणे राबवून नगरपंचायत कडून जादा ची मदत देणार
– ⁠महिलांसाठी नियमित आरोग्य तपासणी कॅम्प आयोजित करुन त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणार
– ⁠खेळाडूंसाठी विशेष बजेट करुन त्यांना नियमित मदत देणार
– ⁠छोटी घरे असणाऱ्या गरीब लोकांना नगरपंचायत करातून सूट देणार
– ⁠ट्राफिक चे सुयोग्य नियोजन करणार
– ⁠नियमित डांसांवरचे औषध फवारणी करणार
– ⁠स्वच्छ सर्वेक्षण आणि सुंदर शहरांच्या यादीत आजरा नाव अव्वल करणार…

या व अशा अनेक कामांना न्याय देण्यासाठी शहरांतील सर्व मतदारांनी आमच्या परिवर्तन विकास आघाडीतील सर्वच्या सर्व उमेदवारांना मतदान करुन सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहनही शिंपी यांनी केले आहे.

आजरा शहराच्या विकासासाठी अशोक चराटी यांच्याशिवाय पर्याय नाही : आरोग्यमंत्री ना.प्रकाश आबिटकर


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

केंद्रात व राज्यात भाजप प्रणित आघाडीचे सरकार आहे. आजरा शहराच्या विकासासाठी केंद्रात व राज्यात सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या आघाडीला विजयी करणे गरजेचे आहे. ताराराणी आघाडी व अशोक चराटी हे केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी आघाडीशी जोडलेले आहेत. त्यामुळे शहराच्या विकासासाठी केवळ चराटी हेच निधी खेचून आणू शकतात.आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.त्यामुळेच आजरा शहराच्या विकासासाठी अशोक चराटी व ताराराणी आघाडी यांच्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतील ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजी मंडई येथील आयोजित सभेत ते बोलत होते. खास.धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

जाहीर सभेपूर्वी ताराराणी आघाडीच्या वतीने खासदार धनंजय महाडिक व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आजरा शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. स्वागत व प्रास्ताविक करताना विलास नाईक म्हणाले, अशोकअण्णा चराटी यांना आजऱ्याच्या राजकारणात घेरण्याचे प्रयत्न नेहमी होतात मात्र नेहमीच ते अयशस्वी होतात. अशोक चराटी यांना हुकूमशहा बोलणारे गत सभागृहात चराटी यांच्या सोबतच होते. अशोक चराटी यांनी आजरा शहरासाठी ८० कोटीहून अधिकचा निधी आणला. मंत्री हसन मुश्रीफ हेही आमच्या पाठीशी नेहमीच असतात सर्व समाजांचा आम्हाला पाठिंबा आहे. शहरवासीयांच्या भविष्यकालीन स्वप्नांसाठी अशोकअण्णा चराटी यांना साथ द्यावी. अशोक चराटी यांच्या धडपडीमुळेच आजरा नगरपंचायत झाली आहे. त्यामुळे शहराला विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. आगामी काळातही आजरा शहराच्या विकास कामासाठी निधी देण्यासाठी वचनबद्ध आहे. शहरात सुसज्ज असे नाट्यगृह उभारले जाणार आहे. मुस्लिम समाजाला दोन कोटीचे सामाजिक भवन उभारून देणार आहे. रामतीर्थ पर्यटनदृष्ट्या विकसित केले जाणार आहे. शहराच्या विकासासाठी सातत्याने धडपड करणारे अशोक चराटी व त्यांची ताराराणी आघाडी यांची आजरा शहराला सातत्याने गरज आहे. शहरातील सर्व समाज आमच्याबरोबर आहेत. या सर्व समाजांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. निवडणुकीतील दिलेले सर्व शब्द पुरे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवून शहराच्या विकासाचे स्वप्न बाळगणाऱ्या अशोक चराटी यांना सर्वांनी साथ द्यावी असे आवाहनही पालकमंत्री आबिटकर यांनी केले.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ताराराणी आघाडीला सर्व पक्षांचा पाठिंबा आहे. काँग्रेसला या निवडणुकीत मत मागायचा अधिकार नाही. आजरा शहराचा झालेला कायापालट अशोकअण्णा चराटी यांच्यामुळे झालेला आहे. देशात, राज्यात आमची सत्ता आहे त्यामुळे ताराराणी आघाडीने दिलेला जाहीरनामा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. आजरा शहरातील वाहतुकीचा प्रश्न जटिल झाला आहे त्यामुळे एक वर्षाच्या कालावधीत शहरासाठी रिंग रोड मंजूर करणार आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, सांडपाणी व्यवस्था यासाठी आगामी काळात काम करायचे आहे. केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आपण तळागाळात पोचवले आहेत. या योजनांचा लाभ देताना मुस्लिम समाजाबाबत कोणताही दुजाभाव बाळगला नाही, मग भाजप मुस्लिम विरोधी कसा? असा सवाल करत खासदार महाडिक पुढे म्हणाले, विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळत असल्याने जनतेचा आर्थिक स्तर वाढला आहे. आजरा शहराच्या विकासासाठी जे जे करायला पाहिजे ते ते करण्याची केंद्र व राज्य शासनाची तयारी आहे. देशात, राज्यात, जिल्ह्यात जसा विकास सुरू आहे, तसाच विकास आजरा शहरात होण्यासाठी शहरवासीयांनी अशोक अण्णा चराठी यांच्या पाठीशी राहावे असेही आवाहन खासदार महाडिक यांनी केले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, ताराराणी आघाडीची पदयात्रा बघितल्यानंतर जनता आघाडीच्या बाजूने असल्याची खात्री झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार हे आजरा शहराला विकास निधी देण्यामध्ये कोठेही कमी पडणार नाहीत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक अण्णा चराटी म्हणाले, आजरा शहरातील लाडक्या बहिणींमुळे ताराराणी आघाडीची नगरपंचायतीवर सत्ता येणार आहे. आम्ही केलेला विकास सर्वसामान्य जनतेला माहित आहे, त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची माझी भूमिका आहे त्यामुळे मुस्लिम समाज देखील ५०% पाठीशी आहे. राज्याचे मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्री विकास निधीबाबत माझ्या पाठीशी आहेत. खासदार महाडिक व पालकमंत्री अबिटकर यांच्या माध्यमातून शहराला मोठा विकास निधी मिळणार आहे. यावेळी अबूताहेर तकीलदार, निशाद चाँद यांची भाषणे झाली.

यावेळी डॉ. दीपक सातोसकर, विजय पाटील, सुरेश डांग, रमेश कुरुणकर, जनार्दन टोपले, ज्योस्ना चराटी, अनिकेत चराटी, परवेझ गैबान, डॉ. आनंद गुरव, संजय चव्हाण, अश्विन डोंगरे यांच्यासह ताराराणी आघाडीचे सर्व उमेदवार, अण्णाभाऊ संस्था समूहाचे पदाधिकारी, आजरा शहरातील नागरिक उपस्थित होते. डॉ. अशोक बाचूळकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनिल देशपांडे यांनी आभार मानले.

जनता सुज्ञ आहे…
धक्कादायक निकाल लागणार

अन्याय निवारण समिती व समविचारी आघाडीची पत्रकार बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

निवडून दिल्यानंतर काम करण्यापेक्षा आम्ही जनतेची कामे करून निवडणुकीला सामोरे जात आहोत. एकीकडे सत्तारूढ मंडळी अन्याय निवारण समितीच्या कामाचे कौतुक करतात तर दुसरीकडे टीकाही करतात अशी दुटप्पी भूमिका घेणाऱ्या मंडळींना यावेळी शहरवासीय मतदार निश्चितच धडा शिकवणार असून येणारे निकाल हे धक्कादायक असतील असा दावा अन्याय निवारण समितीच्या पत्रकार बैठकीत करण्यात आला.

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. श्रदानंद ठाकूर, परशुराम बामणे,प्रा. डॉ. सुधीर मुंज अरुण देसाई यांनी निवडणूक पार्श्वभूमीवर सदर बैठक बोलावली होती. सत्तारूढ मंडळींवर यावेळी त्यांनी जोरदार टीका केली.

सत्तारूढ मंडळी ही सत्तेसाठी आपापलेली आहेत.सत्तापिसासू असल्याने बाहेरचे मतदान शहरातील विविध प्रभागांमध्ये घुसडले आहेत. नगरपंचायतीला नियोजनबद्ध पद्धतीने लुटण्यासाठी ही मंडळी प्रयत्नशील आहेत.
मागील पाच वर्षाच्या कारभारातील आपले पितळ उघडे पडणार नाही याची दक्षता घेतली आहे. विरोधक म्हणून गेलेलेही सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून आपला स्वार्थ साधला आहे.
जनतेला मुर्ख बनवण्याचे हे धंदे बंद करा.तुमचे कांहीच लपलेले नाही.न झालेल्या विकास कामांचा ढोल वाजवणे बंद करा.नियोजनशून्य कारभाराने आजऱ्याची वाट लावली तेवढी पुरे झाली.आता बस झाले,जनता तुमचे ऐकणार नाही.

जनतेने निस्वार्थीपणे काम करणाऱ्यांना निवडून देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे विजय आमचाच असेल.आम्हाला समाजकारण करायचे आहे.चांगली शिस्त लावण्यासाठी आम्ही सभागृहात जात आहोत, ज्या दिवशी आम्हाला समजेल सर्व व्यवस्थित झाले त्यावेळी डॉ. श्रद्धानंद ठाकूर व परशूराम बामणे बाहेर पडतील कारण आम्हाला जनतेची प्रगती करायची आहे.सुव्यवस्था आणायची आहे.शहरात दर्जेदार कामे करायची आहेत.विकासाचे मेकअप करुन शहराला सुंदर दाखवायचे नाही तर खरा विकास घडवायचा आहे.समितीने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम केलेले नाही अन्यथा यापूर्वीच नियोजन केले असते.

दिशाभूल करणारी पत्रके काढून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे
नगरपंचायतीला निधी येतोच.त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करु नका.आलेल्या निधीचा विनियोग तुम्हाला करता आला नाही.स्वार्थ ठेवून काम केलात, कोणताही मुलभूत सुविधा न देता करवाढीचा निर्णय घेतला. शिल्लकी अंदाजपत्रक होते मग जी.आर. चा आधार घेऊन लादायचा प्रयत्न केलात.समितीने हे हाणून पाडले.अभ्यास न करता निर्णय घेतलात म्हणून तुम्ही या करवाढीला सूचक म्हणून सही करणारे जबाबदार आघाडी प्रमुखच आहेत म्हणूनच तुम्ही जबाबदार आहात. पाणी योजनेचा बट्ट्याबोळ लावला. नियोजन नव्हते. पाईपलाईन,टेस्टींग करण्या ऐवजी घाईगडबडीत रस्ते करण्याचा प्रयत्न केला.लाखो रुपये खर्च करुन नविन केलेला गांधीनगर रस्ता उकरला गेला.शासनाने ठरवून दिलेले साहित्य वापरला का?कांही ठिकाणी गटारी व्हायच्या आधीच रस्ता केला गेला,हे नियोजन योग्य आहे का? राखीव खुले भूखंड नियमाप्रमाणे किती घेतला? त्याचा उपयोग झाला का? ज्यांनी दिले नाही त्यांच्यावर काय कारवाई केली असा सवाल ही उपस्थित केला.

सत्तेवर नसताना समिती दर्जेदार कामे व्हावीत म्हणून भांडत होती.तुमचेही कर्तव्य होते. त्यावेळी तुम्ही साथ द्यायच्या ऐवजी हात बांधून बघत बसला होता. म्हणूनच तुम्ही जबाबदार आहात असेही त्यांनी सांगितले.

यावेळी हर्षद परुळेकर, ॲड. विपुल मुंज यांच्यासह उमेदवार उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

‘अंजुमन इत्तेहादुल’ वर शासकीय रिसिवर म्हणून डी.डी. कोळी यांची नेमणूक

mrityunjay mahanews

निपाणी येथील अपघातात लाकुडवाडीचा तरुण ठार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पवित्र क्षेत्र श्री रामतीर्थ आजरा येथे धबधब्याशेजारी लघुशंका , अश्लील चाळे

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

प्रकाशदादा गेले…. ‘अर्बन ‘ परिवारात शोककळा..

mrityunjay mahanews
error: Content is protected !!