mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार दिनांक २ एप्रिल २०२५

दुचाकी व चार चाकी अपघातात एक ठार

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा – गडहिंग्लज मार्गावर साळगाव फाट्यासमोर दुचाकी व चारचाकीची समोरासमोर धडक होऊन यामध्ये दुचाकीस्वार रजाक बापू शेख ( वय ५५ वर्षे,रा.साळगाव) यांचा मृत्यू झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी…

      मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आजऱ्याच्या दिशेने साळगाव येथून जाणारे दुचाकीस्वार शेख व गडहिंग्लजच्या दिशेने जाणारी चार चाकी साळगाव फाट्यासमोर  समोरासमोर धडकून सदर अपघात झाला .डोक्याला गंभीर दुखापत होऊन जखमी झालेल्या रजाक यांना प्रथम आजरा ग्रामीण रुग्णालयात त्यानंतर गडहिंग्लज येथे व तिथून पुढे बेळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ते वन विभागात वनसेवक म्हणून काम करीत होते.

      पाचच दिवसांपूर्वी शुक्रवारी याच ठिकाणी अपघातात एक जण मृत्यू पावला होता. आठवडा होण्यापूर्वीच हा दुसरा अपघात झाला आहे.

      रजाक यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, जावई, मुलगा असा परिवार आहे.

     अपघाताची वर्दी वसीम इलाही शेख यांनी आजरा पोलिसांत दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पाऊस कमी…
नुकसान जास्त

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहर व परिसरामध्ये काल पावसाच्या सरी कोसळल्या. पाऊस जरी कमी प्रमाणात झाला असला तरीही या पावसाने आजरा नगरपंचायतीच्या स्वच्छतेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. ठिकठिकाणी तुंबलेल्या गटर्सचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत होता. काही ठिकाणी तर हे पाणी घरामध्येही घुसले. विशेषतः सोमवार पेठ तालुक्यातील हा प्रकार घडला.

       दिगंबर सुतार, विठ्ठल सुतार यांच्या सुतार शाळेत पाणी शिरले तर इनास गॉडद यांच्या घरामध्ये पाणी शिरले. यामध्ये सुतार कामाच्या साहित्यासह इतर साहित्याचे नुकसान झाले.

        शहरभर सर्वत्र गटर्सचे पाणी बाहेर आल्याचे चित्र दिसत होते. कमी वेळेत पाऊस कमी पण नुकसान जास्त असा प्रकार पावसाने आजरेकर अनुभवत होते.

जनता बँक आजराला ७ कोटी ९५ लाख रुपयांचा ढोबळ नफा, ४०० कोटी रुपये ठेवीचा टप्पा पूर्ण

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      जनता सहकारी बँक आजरा या बँकेला सन २०२४-२०२५ साली ७ कोटी ९५ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला असून ३ कोटी २६ लाख ७४ हजार रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे. बँकेने ४०० कोटी रुपयांचा ठेवीचा टप्पा पूर्ण करत बँकेच्या मार्च २०२५ अखेर एकूण ठेवी ४०९ कोटी ९१ लाख रुपये, कर्ज २५९ कोटी ३६ लाख रुपये व गुंतवणुक १७५ कोटी ८० लाख रुपये इतक्या आहेत. बँकेने या वर्षात ४०० कोटी रुपये ठेवीचा टप्पा पूर्ण करणेचा संकल्प केला होता. त्याला उदंड प्रतिसाद देत सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांनी बँकेबद्दल असलेला विश्वास व आत्मीयता सार्थ ठरविली आहे.

बँकेचा एनपीए शुन्य टक्के, सीआरएआर १४.४१ टक्के व बँकेचा एकूण व्यवसाय ६६९ कोटी २८ लाख रुपये असून बँकेचे कार्यक्षेत्र कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, ठाणे, मुंबई व उपनगरे या जिल्हयात असून बँकेच्या एकूण २० शाखा कार्यरत आहेत. बँकेने सर्व प्रकारची अद्ययावत टेक्नॉलोजी अमलात आणुन सर्व अद्यावत डिजीटल सेवा ग्राहकांना देणेत यशस्वी ठरली आहे. स्वच्छ व पारदर्शी कारभारामुळे बँकेने वेगवेगळ्या यशाचे टप्पे पूर्ण करत बँकेची घोडदौड सतत उंचावत ठेवली आहे. आजऱ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये इंटरनेट व लिज लाईनच्या खंडीत सेवेमुळे बँकेने बँकेचे डाटा सेंटर नव्याने कोल्हापूर येथे उभा केलेले आहे.

      हे सर्व करत असताना बँकेने सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक व कर्मचारी यांना सर्व सुविधा देणेत समतोल राखला असून कर्मचाऱ्यांना यावर्षी १५ टक्के बोनस व रजेच्या पगाराची तरतुद केली आहे. नुकतेच रिझर्व बँकेने कल्याण व गारगोटी शाखेला मंजुरी दिली असून येणाऱ्या आर्थिक वर्षात अल्पावधीतच नवीन शाखा सुरु करुन ग्राहकांच्या सेवेत हजर होत असलेबाबतचे बँकेचे चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी व्यक्त केले. तसेच येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये ५०० कोटी रुपये ठेवीचा टप्पा पूर्ण करणेचा मानस बँकेचे चेअरमन मुकुंददादा देसाई व सीईओ एम. बी. पाटील यांनी व्यक्त केले.

      यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन अमित सामंत यांच्यासह सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते.

जनता गृहतारण संस्थेने केला शंभर कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या जनता सहकारी गृहतारण संस्थेने शंभर कोटी ठेवींचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. संस्थेच्या वाटचालीतील हा एक महत्त्वाचा क्षण आहे. याकरिता संस्थेचे सन्मानीय सभासद, ठेवीदार आणि हितचिंतकांनी केलेल्या सहकार्याबददल संस्था सदैव ऋणी आहे. अशा भावना चेअरमन मारुती मोरे यांनी व्यक्त केल्या. वर्ष समाप्तीपूर्वीच संस्थेने शंभर कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केल्याने भविष्यात सभासद व कर्जदारांसाठी आणखी चांगल्या योजना आखता येतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

       मुख्य कार्यालयासह सात शाखांचा विस्तार असलेली ही संस्था माणसं जोडणारी संस्था म्हणून ओळखली जाते. संपूर्ण राज्य कार्यक्षेत्र आणि आयएसओ मानांकन देखील संस्थेला मिळाले आहे. काटकसर आणि पारदर्शक कारभारामुळे संस्थेची विश्वासार्हता दिवसेंदिवस वाढत आहे. अत्यंत कमी कालावधीत जनता सहकारी गृहतारण संस्थेनं घेतलेली गरूड भरारी ही संचालक मंडळाच्या चोख कारभाराची पोहोचपावती आहे. असे त्यानी सांगितले.

       यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. गणपतराव अरळगुंडकर, प्राचार्य डॉ. अशोक सादळे, प्रो. डॉ. अशोक बाचुळकर, डॉ. तानाजी कावळे, प्रा. श्री. विनायक चव्हाण, प्रा. श्री मनोज देसाई, श्री. ॲड सुभाष डोंगरे, प्रा. श्री. बळवंत कडवाले, प्रा. सौ. लता शेटे, सौ. डॉ. अंजनी देशपांडे, प्रा. सौ. नेहा पेडणेकर, मॅनेजर मधुकर खवरे, प्रशासन अधिकारी मारुती कुंभार आदि उपस्थित होते.

पोलीस बंदोबस्तात हटविले देवर्डे येथील अतिक्रमण

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      देवर्डे ग्रामपंचायतीच्या ५१/१ मिळकतीमध्ये एका ग्रामस्थाने कोरोना काळात अतिक्रमण केले होते. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायतीने पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण मंगळवारी हटविले.

      ग्रामपंचायतीच्या या मिळकतीमधून असलेल्या रस्त्यावर संबंधित ग्रामस्थाने चिरे टाकून लोखंडी गेट उभारले होते. याबाबत मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. त्यावेळी ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र संबंधिताने अतिक्रमण हटवू दिले नव्हते. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी याची तक्रार आजरा पंचायत समितीकडे तक्रार केली होती. मात्र त्याठिकाणी कोणताही प्रतिसाद न मिळाल्त्याने थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाद मागण्यात आली.

        या तक्रारीनंतर अतिक्रमण प्रश्नाबाबत चारवेळा सुनावणी झाली होती. या सुनावण्यानंतर मुख्य कार्यकारी अधिका-यांनी ४ नोव्हेंबर २०२४ रोजी ग्रामपंचायतीला अतिक्रमण हटविण्याचा आदेश दिला होता. या आदेशाच्या आधारे ग्रामपंचायतीने संबंधित ग्रामस्थाला अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटीस दिली होती. मात्र अतिक्रमण न काढल्यामुळे ग्रामपंचायतीने मंगळवार दि. १ एप्रिल रोजी पोलीस बंदोबस्तात जेसीबी च्या सहाय्याने हे अतिक्रमण हटवून सदर मिळकत खुली केली.

      यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक नागेश यमगर सहाय्यक उपनिरिक्षक तानाजी पाटील यांच्यासह उपसरपंच मारुती बुरूड, ग्रामपंचायत सदस्या शिला गुरव, संगीता चाळके, यशोदा कांबळे, पोलीस पाटील रुपाली कांबळे यांच्यासह ग्रामसवेक एस. के. येळणे, अशोक सानप उपस्थित होते.

आजरा शहर व उपनगरातील तुंबलेल्या गटारी स्वच्छ व पाणीपुरवठा सुरळीत करावा..

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा शहर व उपनगरातील तुंबलेल्या गटारी स्वच्छ व पाणीपुरवठा सुरळीत करावा याबाबत अन्याय निवारण समितीने व नागरिकांनी आजरा नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
सध्या वळीव पाऊस चालू झाला असून शहरातील व उपनगरातील बरीच नवीन व जुनी गटर्स साफ नसलेले गटर्स तुंबून राहील्या आहेत. सदर पाणी सांडपाणीमिश्रीत असलेने दुर्घधी येत असून त्या मध्ये डासांची उत्पत्ती वाढून रोगराई पसरलेली आहे. त्याचप्रमाणे शहरातील नवीन बांधकामे चालू असून त्यांचे बांधकाम साहित्यामुळे शेजारच्या गटर्स भरलेल्या असलेने सांडपाणी व पावसाचे रस्त्यावरून वाहते अगर साचून रहाते तेंव्हा सदर बांधकाम धारकास नोटीस काढून ८ दिवसांत गटर्स रिकाम्या करून देण्यासाठी सूचना देण्यात याव्यात.  नगरपंचायत मार्फत सर्वेक्षण करावे व सांडपाण्याचा योग्य निचरा होणे विषयी कार्यवाही करावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

      यावेळी अध्यक्ष परशुराम बामणे, बंडोपंत चव्हाण, अतुल पाटील,जावेद पठाण, पांडुरंग सावरतकर, जोतिबा  आजगेकर,गौरव देशपांडे उपस्थित होते.

निधन वार्ता
आनंदराव पाटील

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कोरीवडे गावामधील पहीले अभियंता श्री.आनंदराव सुभाना पाटील ( उपअभियंता जि.प ठाणे येथुन सेवा निवृत्त) यांचे निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ८० वर्षे होते.

       त्यांच्या पश्चात २ मुले, सुना एक मुलगी व नातवंडे असा परिवार असून तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष दौलती(डी.ए.) पाटील यांचे ते चुलत बंधू होत.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा कारखान्याची ऊस बिले व तोडणी वाहतूक बिले जमा अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांची माहिती

mrityunjay mahanews

उमेश आपटे यांचा राष्ट्रीय काँग्रेसला रामराम

mrityunjay mahanews
error: Content is protected !!