रविवार दि. १० ऑगस्ट २०२५

तिरंगा झळकतो आमच्या शेतात, शक्तिपीठ नको आमच्या वावरात… शक्तीपीठ महामार्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शक्तिपीठ महामार्गाने बाधित १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीला खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार अमित देशमुख, आ. अरूण लाड, आ. कैलास पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार वैभव नाईक, कॉम्रेड संपत देसाई, विजयराव देवणे, डॉ. नंदाताई बाभुळकर विद्याधर गुरबे उदयराज पवार रविंद्र भाटले यांच्यासह मान्यवर सहभागी झाले.
या ऑनलाईन बैठकीमध्ये येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला शक्तिपीठ महामार्गाने बाधित गावांतील ग्रामपंचायतीमध्ये शक्तिपीठ महामार्ग विरोधाचा ठराव करावा.
तसेच स्वातंत्र्यदिना दिवशीच प्रत्येकाने शेतात जाऊन या शक्तिपीठपासून स्वातंत्र्य मिळावे यासाठी झेंडावंदन करून आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला.आजरा येथील १८ तारखेच्या मोर्चाला सर्व नेते सक्रिय होणार आहे असे मिटिंगमध्ये ठरले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान; सरपंचांसाठी गावांच्या विकासाची संधी : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राज्यात १६ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कालावधीत गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची सरपंचांना संधी असून सरपंचांनी या अभियानातून महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
सरपंच परिषदेच्या विविध मागण्यांबाबत ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
सरपंचांनी आपल्या विविध अडचणी व समस्या मांडल्या, बैठकीसाठी राजाराम पोतनीस प्रदेश सरचिटणीस, आनंद जाधव प्रदेश कोशाध्यक्ष,किसन जाधव राज्य विश्वस्त,आबासाहेब सोनवणे ( राज्य कोअर कमिटी अध्यक्ष ) ,जिजाभाऊ टेमगिरे (राज्य कोअर कमिटी उपाध्यक्ष) शत्रुघ्न धनवडे (सातारा जिल्हा सचिव),इंजि. जी. एम. पाटील (कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष),प्रियांका जाधव (आजरा तालुका अध्यक्षा),मनोहर पोखरकर, आंबादास गुजर, तान्हाजी गायकर, समाधान बोडखे, राजमल भागवत, शेखर रानवडे, महेंद्र बोरसे, प्रमोद चौधरी, स्वरा पाटील, सुषमा देसले, संदीप पाटील, कुंडलिक कोहिणकर, वैशाली रोमन, आश्विनीताई थोरात, निकिता रानवडे उपस्थित होते.
यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी मंत्री महोदय व ग्रामविकासाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर काही मागण्या केल्या .

आजरा आगाराच्या ताफ्यात पाच नवीन गाड्या…
अन्याय निवारण समितीच्या प्रयत्नांना यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
२४ एप्रिल २०२५ रोजी आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने पालकमंत्री प्रकाश आबीटकर व आजरा डेपो मॅनेजर यांना नवीन गाड्या मागवण्यासाठी निवेदन देऊन विनंती केली होती, या विनंतीनुसार आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा आबीटकर यांच्या प्रयत्नातून यापूर्वी पाच गाड्या नवीन आलेल्या आहेत . काल रक्षाबंधनच्या शुभमुहूर्तावर आणखी पाच नवीन गाड्या आजरा डेपो मध्ये सामील झाल्या. त्यांच्या पूजन प्रसंगी आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, डेपो मॅनेजर प्रवीण पाटील, उपाध्यक्ष गौरव देशपांडे, विजय थोरवत, संजय पाटील, बापू कुंभार, दिनकर जाधव, संदीप खवरे, वाय बी चव्हाण, जोतिबा आजगेकर, जावेद पठाण, संतोष भाटले, इंद्रजीत देसाई व इत्यादी कार्यकर्ते हजर होते.

आजरा हायस्कूल मध्ये सामाजिक बांधिलकी जपत वृक्षांना राख्या बांधून रक्षाबंधन समारंभ
आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रक्षाबंधन हा सण पावित्र्य व रक्षणाची अनमोल भावना जपणारा मानला जातो या निमित्य आजरा हायस्कूलमध्ये संपूर्ण मानवजातीच्या संरक्षणासाठी कटिबध्द असणाऱ्या वृक्षांना राख्या बांधून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. आजरा हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका सौ. एच. एस्. कामत व सण- सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. व्ही. पी. हरेर, सर्व महिला शिक्षिका यांनी झाडांना राख्या बांधला.
कु. निमिषा नितेश यादव या विद्यार्थीनीने रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा यांचे भारतीय संस्कृतीतील महत्व सांगितले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ए. एल. तोडकर, पर्यवेक्षक श्री. ए.आर व्हसकोटी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन सौ. व्ही.डी. पाटील तर आभार सौ. व्ही.पी हरेर यांनी मानले.

सरपंच आणि उपसरपंचांकरीता आज रक्षाबंधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील सर्व सरपंच व उपसरपंच यांच्यासाठी रविवार दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता ब्रह्माकुमारीज् आजरा येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

निधन वार्ता
प्रकाश खोत

आजरा येथील अण्णाभाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणीचे सेवानिवृत्त सचिव प्रकाश शंकर खोत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ६० वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, जावई, मुलगा असा परिवार आहे.

व्यंकटराव शिक्षण संकुलात रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील व्यंकटराव प्राथमिक, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरामध्ये “रक्षाबंधन” सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षक- शिक्षिका यांचे समवेत समारंभ पूर्वक उत्साहात संपन्न झाला.
बहिण- भावा मधील अतूट प्रेमाच्या नात्याचा हा सण साजरा करताना विद्यार्थिनींनी व प्रशालेतील सर्व शिक्षिका यांनी संस्थेचे अध्यक्ष श्री जयवंतराव शिंपी , प्राचार्य श्री.एम एम नागुर्डेकर तसेच सर्व शिक्षक बंधू व इयत्ता पहिली ते दहावी सर्व विद्यार्थ्यांना राख्या बांधून साखरपेढे भरवून तोंड गोड केले.
प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे.शेलार यांनी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना भाऊ बहिणीच्या गोड नात्याबद्दल तसेच आजच्या या विज्ञान युगात आपली संस्कृती जतन करून ठेवत असताना जुन्या चालीरीती ,रूढी, परंपरा, सणसमारंभ सुरू करण्यामागे आपल्या पूर्वजांचा असणारा वैज्ञानिक दृष्टिकोनासह उद्देश आपल्या मनोगतातून सविस्तर कथन केला.प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानावर मोठ्या रांगोळीची प्रतिकृती तयार करताना स्वतः सर्व विद्यार्थी या आकारात उभे राहून मोठ्या राखीच्या कलाकृतीची निर्मिती केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. एस. डी. इलगे यांनी केले, सूत्रसंचालन सौ. पाटील ए.डी. व आभार प्रदर्शन श्रीम एन. ए. मोरे यांनी केले.


