शनिवार १५ नोव्हेंबर २०२५



आजरा नगरपंचायत निवडणूकी करता एकूण ३३ अर्ज दाखल

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
काल शुक्रवार अखेर आजरा नगरपंचायत निवडणुकी करता एकूण ३३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यापैकी नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवारांनी सहा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काल झालेल्या घडामोडी पाहता नगराध्यक्ष पदासाठी विरोधी आघाडी कडून मोठी चुरस निर्माण झाल्याची दिसत आहे.
नगराध्यक्ष पदासाठी मंजूर मुजावर (२), अंजीरेआलय अबूताहेर तकीलदार, अमानुल्ला आगलावे ,संजय सावंत,संभाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
प्रभाग निहाय स्थिती पुढील प्रमाणे…
प्रभाग १ -निरक
प्रभाग २
१) संभाजी पाटील,
२) संजय इंगळे
प्रभाग ३
१) सुमैय्या खेडेकर (२)
प्रभाग ४
१) जावेद पठाण
प्रभाग ५
१) निशाद चाँद
प्रभाग ६
१) साधना मुरुकटे
२) शाहीन तकीलदार,
३) नूरजहां तकीलदार
प्रभाग ७
१) कलाबाई कांबळे (२)
प्रभाग ८
१) असिफ सोनेखान
प्रभाग ९
१) रेशमा बुड्डेखान (२)
२) रहिताझबी बुड्डेखान
प्रभाग १०
१) सनाऊला चाँद (२)
२) निसार लाडजी (२)
प्रभाग ११- निरंक
प्रभाग १२
१) समीर गुंजाटी
२) दिलशाद पटेल
३) दत्तराज देशपांडे
प्रभाग १३
१) पांडुरंग सुतार
२) रवींद्र पारपोलकर
प्रभाग १४
१) सूर्यकांत नार्वेकर
प्रभाग १५
१) परशराम बामणे
प्रभाग १६
१) रेशमा खलिफ
प्रभाग १७- निरंक
सोमवार दिनांक १७ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

उमरा यात्रेसाठी गेलेल्या नबीसाब माणगावकर यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मदरसा कॉलनी, आजरा येथील उमरा यात्रेसाठी पंधरा दिवसापूर्वी गेलेले नबीसाब अब्दुल माणगावकर (वय ७६ वर्षे) यांचे मक्का येथे निधन झाले.
माणगावकर हे यात्रेकरीता सपत्नीक गेले होते. दोन दिवसात ते परतणार होते. दरम्यान अचानक त्यांचा मका येथे ते आजारी पडले व तब्येत खालावली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर मक्का येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.फैय्याज माणगावकर यांचे ते वडील होत.

भाजपा समविचारी आघाडीचे अशोकअण्णा हेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार : खास.धनंजय महाडिक
अशोकअण्णांवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख व धडाडीचे नेते अशोक चराटी यांनी आजरा शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला आहे. ते नेहमीच सर्वसामान्यांच्या विकासाचे प्रश्न घेऊन आमच्याकडे येत असतात. त्यांनी सर्व क्षेत्रात भरीव असे योगदान दिलेले आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या आजरा नगरपंचायत निवडणुकीत भाजपा आणि समविचारी आघाडीचे अशोक चराटी हेच उमेदवार असतील, अशी घोषणा खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांनी केली. ते आजरा येथे अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक अण्णा चराटी यांच्या वाढदिवस कार्यक्रमात बोलत होते. कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी अशोकअण्णा चराटी यांना आमदार शिवाजीराव पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. वाढदिवस गौरव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन व केक कापून अशोक अण्णा चराटी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
आजरा सूतगिरणीचे उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जनता शिक्षण संस्थेचे संचालक विजयकुमार पाटील हे प्रास्ताविक करताना म्हणाले, अशोकअण्णांनी शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला. मात्र गेल्या दोन वर्षात नगरपंचायतीवर प्रशासक आहे. त्यामुळे शहरात रखडलेल्या विकास कामाला प्रशासन जबाबदार आहे. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, स्व. काशिनाथ चराटी व स्व. माधवराव देशपांडे यांच्या पश्चात अशोकअण्णा चराटी यांनी संस्था समूहाचा डोलारा समर्थपणे पेलला. आजरा शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी भाजप व समविचारी मंडळी नेहमीच प्रयत्नशील आहेत. आजरा शहराच्या बाह्य रस्त्यासाठी (बायपास) प्रयत्न सुरू आहेत. सर्व क्षेत्रात भरीव योगदान देत आजरा शहर सुंदर बनवण्याचा मानस आहे. येणाऱ्या निवडणुकीत अशोकअण्णा चराटी आपल्या जाहीरनाम्यात जी काही आश्वासने देतील ती पूर्ण करण्याची जबाबदारी आपली व पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची राहील. आजरा शहराच्या विकासाचे काम व्हावे अशी सदिच्छा शेवटी त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर म्हणाले, सक्षम लोकप्रतिनिधी व तीव्र इच्छाशक्ती याचे उदाहरण म्हणजे अशोकअण्णा चराटी हे आहेत. नगरपंचायत झाल्यामुळे आजरा शहराला कोट्यावधींचा निधी प्राप्त होत आहे, ही अशोकअण्णा यांची दूरदृष्टी आहे. त्यांची सर्वच समाजासाठी नेहमीच तळमळ असते. त्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधींशी त्यांचे प्रेमाचे भांडण असते. आगामी नगरपंचायत निवडणुकीतही चराटी यांच्या पाठीशी ठामपणे राहू.

अशोक अण्णा चराटी म्हणाले, आजरा नगरपंचायत निर्मितीसाठी मंत्री प्रकाश आबिटकर यांचेही मोलाचे योगदान आहे. भाजप व समविचारी आघाडीचे सर्वच उमेदवार लवकरच जाहीर करू तसेच आगामी नगरपंचायत निवडणुकीत ते सर्व मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. नगरपंचायतीतील कामावरून मला टार्गेट केले जाते, पण सध्या नगरपंचायतीवर प्रशासक आहे त्यामुळे त्या सर्व कामांची जबाबदारी त्यांची आहे. मंत्री प्रकाश आबिटकर व अर्जुन आबिटकर यांनी शहरातील रस्त्यांसाठी २२ कोटीचा निधी दिला आहे. आगामी काळात शहरात नाट्यगृह व नगरपंचायत इमारत यासाठी प्रयत्न केले जातील. येथून पुढील काळात मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पाठीशी ठामपणे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी अण्णाभाऊ आजरा सूतगिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णा चराटी, आजरा अर्बन बँकेचे उपाध्यक्ष संजय चव्हाण, संचालक सुरेश डांग, डॉ. दीपक सातोस्कर, रमेश कुरुणकर, दशरथ अमृते, ज्योत्स्ना चराटी, भाजपा तालुकाध्यक्ष अनिकेत चराटी, राजेंद्र सावंत, रणजीत सरदेसाई, संयोगिता बापट, जयवंत सुतार, अनिरुद्ध केसरकर, संभाजी सरदेसाई, समीर चांद, अतिशकुमार देसाई, आनंदराव कुलकर्णी, आजरा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांच्यासह आजरा अर्बन बँक, अण्णाभाऊ आजरा सूतगिरण, जनता शिक्षण संस्था या संस्थांचे पदाधिकारी व संचालक तसेच नागरिक उपस्थित होते.
डॉ. आनंद बल्लाळ यांनी सूत्रसंचालन केले. आजरा बँक संचालक विलास नाईक यांनी आभार मानले. 
वाहतुकीचा गोंधळ आजरा बाजारपेठेत नागरिकांचे प्रचंड हाल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
काल शुक्रवारी ऐन आठवडा बाजारादिवशी वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाल्याने तालुकावासीयांचे शहरात वावरताना प्रचंड हाल झाले.
विशेषत: आजरा- महागाव मार्गावरील वाहतूक वारंवार ठप्प होत असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांचे हाल तर झालेच परंतु वाहतुकीच्या खोळंबा परत परत होत राहिल्याने वयोवृद्ध नागरिक, महिला वर्गाचे चांगलेच हाल झाले.
या वाहतुकीला शिस्त लागणार तरी कधी? असा संतप्त सवाल शहरवासीय करत आहेत.

आजरा नगरपंचायत निवडणूक नामनिर्देशनात दिरंगाई ; अन्याय निवारण समितीची तहसीलदारांकडे उपाय योजनेची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायत निवडणूक सन २०२५–२०२९ साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना प्रणालीतील तांत्रिक अडथळ्यांमुळे उमेदवारांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची तक्रार पुढे येत आहे.
याबाबत आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने तहसीलदारांना पत्र देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
समितीने दिलेल्या पत्रानुसार, नामनिर्देशन प्रक्रिया ऑनलाइन सुरू असताना अधिकृत संकेतस्थळाचा सर्व्हर मंदावणे, डाऊनलोडचा वेग कमी असणे आणि एकाच नामनिर्देशनासाठी अधिक वेळ लागणे अशा समस्या उमेदवारांना भेडसावत आहेत. परिणामी दिवसभरात केवळ ३ ते ४ नामनिर्देशन पत्रेच स्वीकारली जात असल्याचे समितीने नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रक्रियेत गती आणण्यासाठी समितीने उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रातील सर्व तपशील ऑनलाइन भरावा, मात्र कागदपत्रे अपलोड न करता त्याचा प्रिंटआऊट (नामनिर्देशन पत्र व शपथपत्र) आवश्यक कागदपत्रांसह संचाच्या स्वरूपात थेट कार्यालयात जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे म्हटले आहे
या निवेदनावर समितीचे अध्यक्ष श्री. परशुराम बामणे डॉ. श्रदानंद ठाकूर प्रा. सुधीर मुंज सर गौरव देशपांडे, पांडुरंग सावरतकर, जावेद पठाण, जोतिबा आजगेकर, दिनकर जाधव, सुधीर कुंभार, मिनीन डिसोझा, मदन तानवडे, व बंडोपंत चव्हाण यांच्या सह्य़ा आहेत.

अतिशकुमार देसाई यांची बीएसएनएलच्या तांत्रिक सल्लागार पदी निवड

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर ता. आजरा येथील भाजपा तालुका सरचिटणीस अतिशकुमार देसाई यांची बीएसएनएलच्या तांत्रिक सल्लागार पदी निवड झाली. केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाकरता तांत्रिक सल्लागार समिती नियुक्त करण्यात आली. या समितीमध्ये खासदार छत्रपती शाहू महाराज, धैर्यशील माने व धनंजय महाडिक यांच्यासह अन्य १५ तज्ञांचा समावेश आहे. आगामी काळामध्ये बीएसएनएलच्या सेवा प्रत्येक गाव, ग्रामपंचायत, दवाखाना, बँक, पोलीस स्टेशन, आधार केंद्रे व शाळा या ठिकाणी अल्प दरात सुरू करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



