mrityunjaymahanews
अन्य

सोमवार – सातच्या बातम्या

सोमवार 

२७ जुलै २०२६

जात पडताळणी समितीचा दणका…
एक नगरसेविका अपात्रतेच्या उंबरठ्यावर…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सहा महिन्यापूर्वी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या आजरा नगरपंचायतीच्या एका नगरसेविकेला जात पडताळणी विभागाने मोठा दणका दिला आहे. सादर केलेला जात दाखला अवैध ठरवल्याचे वृत्त  असून त्यांचे नगरसेवक पद धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून त्या नगरसेवक पदाकरीता अपात्र ठरणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याबतचा लेखी आदेशही निघाल्याचे समजते. आज किंवा उद्या मंगळवारपर्यंत याबाबत अधिकृत माहिती मिळू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीदरम्यान राखीव जागेसाठी निवडून आलेल्या सदर नगरसेविकेने सादर केलेल्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार  जात पडताळणी समितीकडे करण्यात आली होती. समितीने कागदपत्रांची सखोल छाननी केल्यानंतर दाखला अवैध असल्याचा निष्कर्ष काढला असल्याचे समजते.

जात पडताळणी विभागाने दाखला अवैध ठरवताच नगरसेविकेचे पद आपोआप रद्द होणार आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून नगरपंचायतीच्या कामकाजात सहभागी असलेल्या ‘त्या’ नगरसेविकेला आता अपात्रतेच्या निर्णयावर कायदेशीर सामना करावा लागणार आहे.

या निर्णयाची कुणकुण लागल्यामुळे आजरा नगरपंचायतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अद्याप नगरपंचायतीला याबाबत कोणताही अधिकृत आदेश / लेखी पत्र प्राप्त झालेले नाही.  लेखी आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पंचायत समितीची पुनरावृत्ती….

पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री गाडे यांचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर त्या पाठोपाठ आता आजरा नगरपंचायतीमध्येही याची पुनरावृत्ती होत असून पंचायत समिती प्रमाणेच नगरपंचायतीच्या सदस्य पदाकरिता कायदेशीर लढाई सुरू होण्याची शक्यता आहे.

नेत्यांकडून सूचना…

नगरपंचायतीच्या मुख्य कारभाऱ्यांनी याबाबत जात पडताळणी विभागाकडून खातरजमा करून घेतली असून काल रविवारी झालेल्या नगरसेवकांच्या खाजगी बैठकीत याबाबत नेत्यांनी  नगरसेवकांना माहिती दिल्याचेही समजते.

आषाढी एकादशीनिमित्त नव कृष्णा व्हॅली स्कूलची वारकरी दिंडी

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

आषाढी एकादशीनिमित्त उत्तूर येथील नव कृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांची  वारकरी दिंडी उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आली. लक्ष्मी मंदिर ते विठ्ठल मंदिर या मार्गावर निघालेल्या दिंडीत विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व तसेच पायी चालण्याचे महत्त्व समजावे, या उद्देशाने दिंडीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य रामकृष्ण मगदूम यांनी दिली. दिंडीचे नियोजन प्रतिभा सुतार, प्रियंका राजाराम, प्रणाली थोरवत, प्राची येजरे, गीता पाटील आणि विद्या शिवणे यांनी केले. 

स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि बाजारदिनाचे औचित्य साधत येथील शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन माजी चेअरमन वसंतराव धुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी जि.प. सदस्य शिरीष देसाई, पं.स. सदस्य विकास चोथे, अधिष्ठाता डॉ. भाग्यश्री खोत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात ४१ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले, तर २१५ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. रुग्णांना गरजेनुसार ॲक्युप्रेशर, फिजिओथेरपी व योगोपचाराचा लाभ देण्यात आला. तसेच योग, नैसर्गिक उपचारपद्धती आणि निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

अधिष्ठाता डॉ. भाग्यश्री खोत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आदर्श देसाई, डॉ. योगेश पोतदार, डॉ. जीवन हनवते यांच्यासह डॉक्टर व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

निधन वार्ता

डॉ. सेबेस्टीन फर्नांडिस

चर्च गल्ली, आजरा येथील डॉ. सेबेस्टीन जुआंव फर्नांडिस (वय ८५ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

धोंडूबाई भाईंगडे


मडीलगे तालुका आजरा येथील धोंडूबाई हणमंत भाईंगडे (वय ८५ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे.

येथील रमेश भाईंगडे यांच्या त्या आई होत.

संडे का फंडा…

रामतिर्थ हाऊसफुल्ल…

काल रविवार सुट्टीचा दिवस असल्याने भाविकांनी व पर्यटकांनी रामतिर्थ परिसरात मोठी गर्दी केली होती.

पावसाचा पुन्हा जोर वाढला...

रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा एक वेळ वाढला असून तालुक्यात मुसळधार पाऊस होत आहे.

       आजचे पंचांग 

दिनांक : २७ जुलै २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : त्रयोदशी तिथी (दुपारी ०४.१४ पर्यंत) त्यानंतर चतुर्दशी तिथी
नक्षत्र : मूळ नक्षत्र (सकाळी 1१०.२८ पर्यंत) त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र
योग : वैधृति योग (रात्री १०.५४ पर्यंत) त्यानंतर विष्कुम्भ योग
करण : तैतुला करण (दुपारी ०४.१४ पर्यंत) त्यानंतर गराजा करण
चंद्र राशी : धनु राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.५२ ते सकाळी ०९.३० पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१९ ते दुपारी ०१.११
सूर्योदय : सकाळी ०६.१५
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१५
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये चराटी-शिंपी यांचे महाविकासआघाडी समोर कडवे आव्हान राहणार….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!