
पेद्रेवाडीत हत्ती…
स्कूल बससह झाडांचे नुकसान

आजरा तालुक्यातील पेद्रेवाडी येथील कै.केदारी रेडेकर हायस्कूलच्या प्रांगणात शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेपर्यंत टस्कराने हजेरी लावत शाळेच्या स्कूल बससह परिसरातील झाडे यांचे मोठे नुकसान केले आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा हत्तीने गावाच्या वेशीनजिक असणाऱ्या या शाळेच्या परिसरात प्रवेश केला.आवारात उभी असलेली स्कूल बस सुमारे १६ फुट फरफटत नेली. गाडीच्या सगळ्या काचा फोडत नुकसान केले आहे.शाळेच्या फलकाची मोडतोड करत शाळेजवळील नारळ व इतर झाडेही पाडली आहेत.कांही महिन्यापूर्वीही हत्ती शाळेजवळ येवून नुकसान करुन गेला होता हत्तीने पुन्हा एकवेळ दहशत माजवली आहे.

पेद्रेवाडी हाजगोळी परिसरात हत्तीचा वावर आहे. परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन हत्तीच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवले आहे. सध्या हत्ती हाजगोळी येथील जंगल परिसरात असून नागरिकांनी व शेतकरी वर्गाने सावध रहावे असा इशाराही वन विभागाने दिला आहे.




