रविवार दि. २८ डिसेंबर २०२५


बापरे…
नऊ दुकाने सात चार चाकी जळून खाक…
दोन कोटींचे नुकसान
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शनिवारची पहाट आजरेकरांना हादरवणारी ठरली. भल्या पहाटे लागलेल्या आगीत तब्बल नऊ विविध प्रकारची दुकाने व सात चार चाकी जळून खाक झाल्या. अनेक संघर्ष करणाऱ्या तरुणांचा आर्थिक कणा यामुळे मोडून गेला आहे. आगीमध्ये अंदाजे १ कोटी ८१ लाख ३५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. काल शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास आग लागली असावी असा अंदाज असून मोटारी, बॅटरी, अन्य ज्वालाग्रही वस्तूंच्यामुळे आग भडकत गेली. आजरा नगरपंचायत व गडहिंग्लज अग्नीशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. सुमारे चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परंतु तोपर्यंत सर्व दुकान गाळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. आजरा तालुक्यात एवढ्या मोठ्या स्वरुपात आग लागण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.
आगीचे नेमके कारण समजले नसले तरी शार्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.आजरा शहरातून संकेश्वर – बांदा महामार्ग जातो. या महामार्गावर आंबोलीकडे जातांना आजरा पोलीस ठाण्यासमोर भाई भाई चित्रमंदिर परिसरात रफिक दीडबाग यांच्या मालकीचे नऊ दुकान गाळे आहेत. या गाळ्यामध्ये प्लंबिंग साहित्य विक्रीचे आरकाम ट्रेडर्स हे दुकान, आईल मशिनरी टुल्सचे शाबाज ॲटो, रेड ड्रॅगन चायनीज सेंटर, मनाली एग्ज सेंटर, मलतशा टायर्स, दळवी इलेक्ट्रीकल्स, पंचतारा हॉटेल हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले तर तळघरात असलेल्या अमित करवळ यांच्या मालकीच्या कारझोन या चारचाकी दुरुस्ती गॅरेज मधील सुमारे ९ चारचाकी गाड्या जळून गेल्या आहेत. अंदाजे नुकसान १ कोटी ८१ लाख ३५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पहाटे पाच – सव्वापाच वाजण्याच्या सुमारास जोराचा आवाज झाल्याने आजबाजूच्या परिसरातील नागरीकांसह मार्निंग वॉकसाठी गेल्या नागरीक घाबरून गेले. त्यांना भाई भाई चित्रमंदिरासमोर हवेत धुराचे लोट व आगीच्या ज्वाला दिसून आल्या. त्यामुळे अनेक जण घटनास्थळी धावून गेले. दरम्यान आजरा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणारे हवालदार बाजीराव कांबळे, पोलीस नाईक मणीहोळ यांनी खिडकीतून समोर आग लागल्याचे पाहीले. त्यांनी धाव घेत परिस्थितीचा अंदाज घेतला व अग्नीशमन दलाशी संपर्क साधला. आजऱ्यातील अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचली. त्यांनी पाण्याचे फवारे मारण्यास सुरवात केली. पाठोपाठ गडहिंग्लज अग्नीशमन दलाची गाडी पोहचली. अखेर तब्बल चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले परंतु तोपर्यंत सर्व आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.

एसटीत चढताना महिलेची मोहनमाळ लंपास

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तुर येथून स्वारगेट – आजरा बस मध्ये चढत असताना भावेवाडी येथील शारदा भीमराव सुपल या ६५ वर्षीय वृद्धेची दीड तोळ्याची सोन्याची व अंदाजे एक लाख ८० हजार रुपये किमतीची मोहन माळ अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केली. शनिवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास उत्तुर येथील एस टी बस थांब्यावर सदर प्रकार घडला याबाबतची फिर्याद शारदा सुपल यांनी आजरा पोलिसात दिली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पंडित दीनदयाळ विद्यालयात करिअर मार्गदर्शन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आनंददायी शनिवार निमित्त पंडित दीनदयाळ विद्यालय मध्ये करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. मार्गदर्शक कृष्णा पाटील आणि दयानंद येसणे यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी केले.
मार्गदर्शक कृष्णा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न जाणून घेऊन आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात केली. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्व सांगितले. कोणत्याही क्षेत्रात जाण्यासाठी अभ्यासक्रमाची तयारी केली पाहिजे. अभ्यास परिपूर्ण करून परीक्षेस सामोरे गेले पाहिजे. मुलांनी स्वतःचे ध्येय ठरवताना आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. स्वतःचे बलस्थान ओळखून ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आयुष्यात गुरूला महत्त्व द्या. फक्त जगू नका तर आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. शिकण्याची वृत्ती नेहमी असायला हवी .शिक्षण घेत असताना संगत महत्त्वाची आहे .ज्या गोष्टीत आवड आहे ती गोष्ट आवडीने करायला शिका. शिक्षणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. जीवनात आधुनिक तंत्रज्ञानामध्ये संगणकाला विशेष महत्त्वाचे स्थान द्या. जे क्षेत्र निवडाल त्यामध्ये शंभर टक्के ज्ञान मिळवून यशस्वी होण्याचा प्रयत्न करा. जे क्षेत्र निवडाल त्यामध्ये अत्युच्च शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करा. व्यसनांपासून दूर राहून स्वतःच्या पायावर उभे रहा. अभिमानाने जगायला शिका. आपल्या मार्गदर्शनातून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
मार्गदर्शक दयानंद येसणे यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडून कृती कार्यक्रम करण्यासाठी डायरी तयार करा , स्वतःला कशामध्ये आवड आहे , आपल्याला कोणता छंद आहे हे जाणून घेऊन पालकांचे , शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या. करिअरची निवड केल्यानंतर ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाणार आहात त्या क्षेत्रातील पाच व्यक्ती निवडून त्यांच्याशी संपर्क साधा आणि अधिक माहिती अशा व्यक्तींकडून मिळवा. मी ज्यामध्ये करिअर करणार आहे, ज्या क्षेत्रामध्ये मला जायचं आहे त्या क्षेत्राची अधिक अधिक माहिती मिळवा आणि स्वतःचा कृती कार्यक्रम तयार करा. याबद्दल विशेष मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी संगणक शिक्षक अरुण घाटगे , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी तसेच इ.आठवी,नववी व दहावीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भरत बुरुड यांनी मानले.
मित्रपक्षांना सोबत घेऊन सर्व सहमतीचा उमेदवार द्यावा…
महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या बैठकीत निर्णय…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येऊ घातलेली जि.प. व पं.स.ची निवडणूक लोकसभा आणि विधानसभे प्रमाणे एकसंघपणे लढण्याचा निर्णय काल जनता बँक आजरा येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या व्यापक बैठकीत झाला.
सुरुवातीला आजरा नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या नूतन सदस्यांचा सत्कार मुकुंददादा देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.
महाविकास आघाडीचे समन्वयक कॉ. संपत देसाई प्रास्ताविक करताना म्हणाले की आपण लोकसभा, विधानसभा एकसंघपणे लढवल्या, आजरा नगरपंचायत निवडणूक थोडा गैरमेळ झाला. आघाडीची रचना नीट झाली असती तर आज आजरा नगरपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात आली असते. त्यामुळं जि.प. आणि पं.स. निवडणूक व्यवस्थित नियोजन करून आपण चांगला उमेदवार देऊन लढवावी. यश हमखास मिळेल.
मुकुंददादा देसाई म्हणाले, आजरा नगरपंचायत निवडणुकीच्या दरम्यान आजारी पडल्याने मला म्हणावा तसा सहभाग देता आला नाही पण यावेळी आमचा पक्ष पूर्ण ताकदीने जि.प. निवडणुकीसाठी उतरेल. मागील चुका दुरुस्त करून आपण सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊया.
अभिषेक शिंपी म्हणाले, आजरा नगरपंचायत निवडणुकीत आपल्या आघाडीचे सात नगरसेवक निवडून आले, थोडे अजून नीट नियोजन केले असते तर सत्ता ताब्यात आली असती. जि.प.च्या निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीच्या प्रामाणिकपणे सोबत राहणार आहोत.
अशोक तर्डेकर म्हणाले, आघाडी म्हणून जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल. आघाडीने उमेदवारी दिल्यास आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत.राजू होलम म्हणाले, यापूर्वी पंचायत समिती, आजरा संघ, साखर कारखाना या माध्यमातून आम्ही जनतेच्या संपर्कात आहोत. आघाडीकडून निवडणूक लढवण्यास आमची तयार आहे.
संजय तर्डेकर यांनी आपण स्वतः वाटंगी मतदारसंघातून पंचायत समिती लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. कॉ. शांताराम पाटील यांनीही डाव्या चळवळीतील कार्यकर्त्याना यावेळी उमेदवारी द्यावी अशी मागणी केली.
यावेळी काशिनाथ मोरे, आसिफ पटेल यांनीही मनोगते व्यक्त केली.
बैठकीला संजयभाऊ सावंत, उदय पवार, विलास पाटील, विश्वास जाधव, प्रकाश मोरुस्कर, धनाजी दळवी, दशरथ घुरे, रवींद्र भाटले, सुरेश कालेकर, विक्रम देसाई, नौशाद बुडडेखान, निसार लाडजी यांच्यासह पेरणोली जिल्हापरिषद मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रकाश मोरुस्कर यांनी मांडले.

पंचायत राज्य सुसंस्कृत प्रभावी प्रशासन लोककल्याणकारी…
प्रा मल्लिकार्जून शिंत्रे..

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथे Welead अंतर्गत,कोकण विकास सोसायटी, पणजी व सामाजिक संवेदना संस्था,आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने,आजरा तालुक्यातील विविध गावातील ग्रामपंचायतीचे पुरुष, महिला सदस्य त्यांचे पती, गावातील सामाजिक कार्यकर्ते व प्रतिनिधी यांच्यासाठी “पंचायतराज”,Good Governance या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.कार्यक्रमास सामाजिक संवेदना संस्थेचे, अध्यक्ष कॉ.संपत देसाई, कार्यक्रमाचे मुख्य वक्ते प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे, कोकण विकास सोसायटी, पणजीचे समन्वय राजेंद्र कांबळे, सामाजिक संवेदना संस्थेचे, कार्याध्यक्ष प्रकाश मोरुस्कर होते.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे म्हणाले ,भारतातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याचे उद्देशाने सन १९९२-९३ मध्ये ७३ वी घटनादुरुस्ती करण्यात आली ७३ व्या घटना दुरुस्ती नंतर भारतातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना संविधानिक दर्जा देण्यात आला त्यामुळे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थां समजून घेताना ७३ व्या घटना दुरुस्तीची दखल घेणे अपरिहार्य आहे.
२६ नोव्हेंबर १९४९ ला घटना स्वीकृत होऊन २६ जानेवारी १९५० रोजी घटनेची अंमलबजावणी सुरू झाली. सुरुवातीला ग्रामपंचायतींना घटनेमध्ये स्थान देण्यात आले, घटनेच्या भाग चार मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कलम ४० अंतर्गत राज्याची ग्राम पंचायतची स्थापना करावी,यासंबंधी तरतूद करण्यात आली. कायद्याच्या आधारे वैधानिक दर्जा प्राप्त झाला त्या आधारे राज्य सरकारांना अधिकारही प्राप्त झाले.ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. ७३ वी घटना दुरुस्ती कायद्यात मुख्य उद्देश पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त करून देणे त्यामुळे स्थानिक जनतेचा आर्थिक व सर्वांगीण विकास करणे आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करणे तसेच लोकशाही व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करून स्थानिक प्रशासनात स्थानिक जनतेचा सहभाग वाढविणे आणि सर्व देशभरात पंचायत राज व्यवस्थेत एक सूत्रता आणणे हा मुख्य उद्देश होता.
सरपंच,उपसरपंच यांचे कार्यकर्तव्य आणि जबाबदाऱ्या विविध उदाहरणातून स्पष्ट करून सांगितले. ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांचे जबाबदारी ही विश्लेषणात्मक स्वरूपामध्ये स्पष्ट करून सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजक आणि पुरस्कर्ते बोस्को, ग्रामीण विकास केंद्र अहमदनगर व संवेदना फाउंडेशन या संस्थेच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांचा लोकशाही प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग व अधिकाऱ्यांची जाणीव जागृती व गावच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची भूमिका समजावून देऊन गावातील प्रत्येक मुलीने गाव माझा निर्णय माझा हा एक आत्मविश्वास अंगीकारावा त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे यासाठी महिला सबलीकरण व सक्षमीकरणाचा उपक्रम हाती घेतलेला आहे तो कौतुकास्पद आहे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संयोजन कोकण विकास सोसायटी,पणजी व सामाजिक संवेदना संस्था यांच्यावतीने “Welead” योजनेअंतर्गत आजरा तालुक्यातील विविध गावातील ग्रामपंचायतीचे पुरुष व महिला सदस्य त्यांचे पती ग्रामसेवक सामाजिक कार्यकर्ते व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक,कोकण विकास सोसायटी, पणजीचे राजेंद्र कांबळे यांनी केले.तर,स्वागत व सूत्र संचालन सामाजिक संवेदना संस्था आजराचे प्रकाश मोरुस्कर यांनी केले..

आजरा हायस्कूलचे गणित प्राविण्य परीक्षेत यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्रीनिवास रामानुज गणित प्राविण्य परीक्षेत घवघवीत यश संपादन केले इयत्ता पाचवी चे १७ तर आठवीचे १६ विद्यार्थी प्राविण्य प्राप्त ठरले.
यामध्ये आराध्या शिंदे, कर्णजीत ढोकरे, गौरेश पोतणीस, प्रांजली बोलके, प्रिया बागुल, रुद्र केसरकर, रेहान खेडेकर, शांभवी पंडित, श्रावणी तेजम, श्रेया चाळके, सरिता पाटील, सिमरन हरेर, स्वराज्य पेंडसे, स्वराली कवळेकर, क्षितिजा उपासे, अथर्व तेंडुलकर, राजवीर पोतणीस या पाचवीच्या तर अर्जुन नार्वेकर, आयुष पाटील, अनिशा देसाई, साक्षी ओतारी, प्रांजली मोरे, शिफा खेडेकर, सहर्षा बुरुड, तन्मय गाडे, सोनल मिटके, अनुप पाटील ,अन्वी करडे, देवश्री देसाई,मीहीका केसरकर, सिया देसाई, शादाब भडगावकर या आठवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना ए. एस. नाईक,आर.पी. केसरकर, ए.आर. व्हसकोटी यांचे मार्गदर्शन लाभले.

श्री कुरकुंदेश्वर देव यात्रा आज महाप्रसाद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आजरा तालुक्यातील पेरणोली गावचे जागृत देवस्थान श्री कुरकुंदेश्वर देवाची यात्रेनिमीत्त आज रविवार दिनांक २८ रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम होत आहे.
गुरुवार दिनांक २५ पासून ब्राह्मण समाराधनि उत्सवाने यात्रेस सुरुवात झाली देवाची थळयात्रा करून रुद्राभिषेक पूजा, सतुबाई, चाळोबा व गणेश पूजन करण्यात आले आहे, शनिवारी रात्री देवाला घराणे घालून नवसाचे नारळ व बळीचा मान दिला गेला.
आज रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत महाप्रसाद केला जाणार आहे. सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन श्री कुरकुंदेश्वर यात्रा समितीमार्फत करण्यात आले आहे.

विशेष सूचना...
मृत्युंजय महान्यूजच्या बातम्या बऱ्याच वेळा link ओपन होत नसल्याने पहावयास मिळत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. याकरिता कृपया आपल्याकडे 96 37 59 88 66 हा नंबर “मृत्युंजय महान्यूज’ या नावाने save असणे गरजेचे आहे. सदर नंबर आपल्याकडे save नसल्यास आपणाला बातम्या ओपन करताना अडचण येईल. नंबर save करूनही ज्यांना बातम्या मिळणार नाहीत त्यांच्याकरता या नंबरच्या व्हाट्सअप स्टेटस वर बातम्यांची लिंक टाकण्याची व्यवस्था केली आहे. याचबरोबर jyotiprasad savant या Facebook account वरही बातम्या link द्वारे पहावयास मिळतील. बरेच मोबाईल नंबर मृत्युंजय महान्यूजकडे सेव आहेत परंतु संबंधितांकडे मृत्युंजय महान्यूज चा नंबर save नसल्याने अशा वाचकांना लिंक पाठवल्यास व्हाट्सअप अकाउंट बंद होत आहे. असा व्हाट्सअप ने नवीन नियम केला आहे.
यापुढे हळूहळू ग्रुप वर बातम्या लिंक पाठवणे बंद/कमी केले जाणार आहे. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी.
…मुख्य संपादक




