मंगळवार १४ एप्रिल २०२६


ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची मांदियाळी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात पेरणोली, हरपवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी पोटनिवडणुक लागली आहे. तर हरपवडे, मडिलगे, बहिरेवाडी, देऊळवाडी, धामणे येथे सदस्यपदासाठी पोट निवडणूक लागली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी तब्बल २९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
पेरणोली येथे सरपंच पदाकरिता दहा अर्ज दाखल झाले असून अर्ज दाखल केलेले इच्छुक उमेदवार पुढीलप्रमाणे…
राजश्री उदयराज पवार, संध्या संतोष कालेकर, संजीवनी मारुती नवलकर, राजश्री दीपक देसाई, दिपाली सचिन देसाई, शितल लक्ष्मण हळवणकर, आशा उदय कोडक, जिजाबाई तुकाराम सासुलकर, स्वाती राजेंद्र कालेकर, वनश्री रवींद्र देसाई
कोरीवडे सरपंच पदाकरिता दाखल झालेले चार अर्ज पुढील प्रमाणे…
विवेक दिगंबर पाटील, संदीप आनंदराव रायकर,दामाजी दत्तात्रय पाटील, शिवाजी गणपती पाटील
मडिलगे येथे सर्वसाधारण स्त्री प्रवर्गाकरिता कविता मारुती येसणे, वैशाली बाळू पोवार,सुनिता निवृत्ती येसणे हे तीन अर्ज तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आनंदा महादेव मुरकुटे, शिवाजी भीमा केसरकर, मारुती जानबा येसणे, दत्तात्रय जोतिबा कुरळे, संदेश लक्ष्मण पाटील हे अर्ज दाखल झाले आहेत.
बहिरेवाडी अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गाकरिता प्रीती सचिन कांबळे व मंगल कल्लाप्पा आयवाळे यांनी तर हरपवडे येथे अनुसूचित जाती प्रवर्गातून सुचिता शिवाजी कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे.
धामणे येथे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता बाबुराव विठ्ठल लोकरे, शंकर दादू लोकरे, विजय केशव लोकरे, पांडुरंग दत्तात्रय मगदूम, रूपाली पांडुरंग मगदूम असे पाच अर्ज दाखल झाले आहेत.
देऊळवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गातील एक पद पुन्हा एक वेळ अर्ज दाखल न झाल्याने हे सदस्य पदा रिक्त राहिले आहे.
शुक्रवार हा अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे.

अपघातातील जखमीचा मृत्यू

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मडिलगे येथे आजरा – गडहिंग्लज मार्गावर चारचाकी व दुचाकीची रविवारी धडक होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकल वरील
मनोज दत्तात्रय बोरकर (वय ४० वर्षे) पत्नी पुनम (वय. ३२ वर्षे) ,व मुलगी वैष्णवी( वय ८ वर्षेसर्व रा. नेर्ली तामगांव ता. करवीर जि. कोल्हापूर ) हे जखमी झाले होते
यापैकी मनोज बोरकर यांची प्रकृती अतिशय गंभीर होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे आजरा पोलिसांनी सांगितले
चारचाकी चालक पुथ्वीराज राजेंद्र चव्हाण( वय ३२ वर्षे रा. कसबे डिग्रज ता. मिरज जि. सांगली) यांना सदर अपघात प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रस्त्यावर साहित्य..
नगरपंचायत आक्रमक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वारंवार सूचना करूनही अनेक व्यापारी दुकानासमोरील गटर्सच्या बाहेर रस्त्यावर साहित्य मांडत असल्याने काल सोमवारी नगरपंचायत प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत सदर साहित्य ताब्यात घेतले.
यानंतर साहित्य नगरपंचायतीत आणल्यानंतर संबंधित व्यापारी व विक्रेते एकत्र येऊन नगरपंचायत प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत निहाल अत्तार, प्रदीप नाईक, परेश पोतदार, परशुराम बामणे, किरण कांबळे आदींनी भाग घेतला. अखेर पुन्हा सदर साहित्य रस्त्यावर न लावण्याच्या अटीवर संबंधितांना परत करण्यात आले.
गटर्सच्या बाहेर दुकानातील अथवा आपल्या व्यवसायाशी संबंधित साहित्य ठेवून वाहतुकीस अडथळा करू नये असे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

आजरा हायस्कूलची कुमारी वेदिका विजय पोतदार हिची इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
युवक वैज्ञानिक कार्यक्रम (युविका) अंतर्गत इस्त्रोमार्फत घेण्यात आलेल्या देशपातळीवरील निवड चाचणी मध्ये आजरा हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी वेदिका विजय पोतदार हिची एयर स्पेस सेंटर महेंद्रगिरी तामिळनाडू येथे अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली.
यातील यावर्षी इस्त्रोच्या विविध स्थळांना भेट देण्यासाठी ४५६ विद्यार्थ्यांची देशभरातून निवड झाली. यामध्ये आजरा हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी वेदिका विजय पोतदार हिची तामिळनाडू येथील महेंद्रगिरी एरोस्पेस सेंटर मध्ये अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली. दिनांक १० मे ते २२ मे या कालावधीत तिला तेथील रॉकेट इंजिन माहिती तसेच तेथील शास्त्रज्ञांशी संवाद साधने यासह संशोधनात्मक अभ्यास करता येणार आहे.
या स्पर्धेसाठी शालेय अभ्यासासह इतर सर्व सहशालेय उपक्रमात विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवणे आवश्यक असते. तसेच युविकामार्फत ऑनलाईन निवड चाचणी देखील घेण्यात येते हे सर्व टप्पे पार करून तिने हे उल्लेखनिय यश मिळविले आहे. तिला शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले .

‘गर्जना’च्या पाठपुराव्याला यश; उत्तूर-आरदाळ पाणंद रस्त्याची मोजणी पूर्ण

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर ते आरदाळ या पाणंद रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले असून संबंधित रस्त्याची मोजणी प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे. ग्रामस्थ, शेतकरी आणि ‘गर्जना’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.
या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून तो सर्वांसाठी खुला करण्याची मागणी प्रथम ९ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आली होती. त्यानंतरही प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही न झाल्याने ‘गर्जना’च्या माध्यमातून पुन्हा पाठपुरावा करण्यात आला. या माध्यमातून वारंवार अर्ज, निवेदने आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम करण्यात आले.
दरम्यान, डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ मध्ये मोजणीसाठी तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या; मात्र कर्मचाऱ्यांचा संप तसेच इतर कारणांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली गेली. त्यामुळे हा प्रश्न अधिकच लांबला होता.अखेर नव्याने प्रयत्न करत ७ एप्रिल २०२६ रोजी मोजणी पार पडली. सुमारे ४० एकर क्षेत्राची मोजणी संबंधित अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत, पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. यामुळे रस्त्याचा मूळ मार्ग स्पष्ट झाला असून अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया वेगाने होणार आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, १४ एप्रिल २०२६ रोजी प्रत्यक्ष रस्ता दाखवण्यात येणार असून जेसीबीच्या साहाय्याने दोन्ही बाजूंनी गटार खोदून रस्ता खुला केला जाणार आहे. सुमारे पाऊण किलोमीटर लांबीचा हा रस्ता परिसरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर ‘गर्जना’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सकारात्मक हालचाल झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

धामणे येथे आज महिलांच्या खुल्या पारंपारिक लेझीम स्पर्धा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त धामणे तालुका आजरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरुण मंडळाच्या वतीने महिलांच्या लेझिम स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ७००१ /-, ५००१/-, ३००१/-, व १५०१/- रू.रोख बक्षीस व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.
सदर स्पर्धा आज मंगळवारी दुपारी दोन वाजता धामणे येथील पंचशील बुद्ध विहार समोर होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
आजचे पंचांग
दिनांक : १४ एप्रिल २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : द्वादशी (१५ एप्रिल रात्री १२. १२ पर्यंत) त्यानंतर६ त्रयोदशी तिथी
नक्षत्र : शततारका नक्षत्र (दुपारी ०४.०५ पर्यंत) त्यानंतर पूर्वाभाद्रपदा नक्षत्र
योग : शुक्ल योग (दुपारी ०३.३९ पर्यंत) त्यानंतर ब्रह्म योग
करण : कौलव करण (दुपारी १२ .१६ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : कुंभ राशी
सूर्य राशी : मीन राशी (सकाळी ०९.३१ पर्यंत) त्यानंतर मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.४७ ते संध्याकाळी
०५.२१ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१४ ते दुपारी ०१.०४
सूर्योदय : सकाळी ०६.२३
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५४
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
आजचे पंचांग

आयपीएल न्यूज
राजस्थान हैदराबाद कडून ४७ धावांनी पराभूत झाले .चार षटकात ३४ धावांचा मोबदल्यात चार बळी घेणारा प्रफुल्ल हिंगे ठरला सामनावीर . चालू सत्रातील राजस्थानचा हा पहिला पराभव ठरला आहे.
आजचा सामना
चेन्नई विरुद्ध कोलकता
स्थळ : चेन्नई
वेळ : सायंकाळी ७.३० पासून



