शनिवार १६ मे २०२६

वादळी पावसाचा तडाखा…
तालुक्यात नुकसानसत्र सुरूच

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गुरुवारी रात्री पेंद्रेवाडी, कोवाडे पंचक्रोशीसह तालुक्यात वादळी व अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून जोरदार वाऱ्यामुळे जनावरांची गोठे, पोल्ट्री फार्म, घरांची पडझड, घरांची कौले, घरांचे पत्रे उडून जाण्या बरोबरच अनेक झाडे उन्मळून पडली आहेत.
गुरुवारी रात्री आठच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.
वारे व जोरदार पावसामुळे घरांचे दरवाजे व खिडक्या यामधून पाण्याच्या ओघ घरामध्ये चालू झाला लोकांची एकच तारांबळ उडाली.
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे तालुका वासीयांचे प्रचंड हाल झाले. यातच लग्नसराई असल्यामुळे मंडपाचे पडदे, लाईट, स्पीकर बॉक्स याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काजू, फणसाची, केळी, आंब्याची झाडे पडल्यामुळे शेतकरी राजा हवालदिन झाला आहे. झाडाखाली लावलेल्या दुचाकी व चार चाकी गाड्यावर झाडांच्या फांद्या पडल्यामुळे त्यांचेही नुकसान झाले आहे. पेरणोली येथे तानाजी देसाई यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोवाडे येथील श्रीकांत दशरथ हुंदळेकर यांच्या पोल्ट्री फार्म वर काजूचे झाड पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर संभाजी देसाई यांच्या घराचे पत्रे निघून गेली आहेत. महेश घोळसे यांच्या गाडीवर झाडाच्या फांद्या पडून गाडीचे नुकसान झाले आहे. रंजना बागडी यांच्या जनावरांचा गोठ्यावरील पत्रे उडून गोठा पूर्णपणे पडला आहे.
अवकाळीच्या या वारंवार होणाऱ्या जोरदार आगमनामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र धास्तावले आहेत.

तालुक्यातील घरगुती वापरातील चार चाकी गाड्यांची टोल मधून सुटका

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
तालुक्यातील घरगुती वापराच्या चारचाकी गाड्यांना टोल माफ केला जाईल. तर व्यावसायिक वाहनांना पन्नास टक्के मासिक अथवा वार्षिक सवलतीचा पास दिली जाईल. संबंधीतानी आपल्या गाडीचे आरसी बुक, आधारकार्ड आवश्यक कागदपत्रे जमा करणे गरजेच आहे. एकंदरीत तालुक्यातील वाहनांना टोल मधून वगळण्याचा निर्णय झाला. त्यामुळे टोल वसुलीबाबतचा मार्ग मोकळा झाला आहे.
येथील तहसीलदार कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचे अधिकारी व टोलमुक्ती संघर्ष समितीचे पदाधिकारी यांची बैठक झाली. तहसीलदार समीर माने पमुख उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपव्यवस्थापक प्रसन्न कत्ते, शाखा अभियंता अनिल पाटील, पथकर नाका तंत्रज्ञ देवन आपटे उपस्थित होते.
रस्त्याची अर्धवट असलेली कामे पूर्ण करण्याची सूचनाही टोल मुक्ती संघर्ष समीतीच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी केली.
कॉ, संपत देसाई म्हणाले, आजरेकरांचा लढा हा टोल हद्दपार करावा असा आहे. टोल बसवला तर तालुक्यातील वाहनांना टोल माफ केला पाहीजेत. त्याशिवाय लढा थांबणार नाही. त्याचबरोबर रस्त्याची जी कामे अर्धवट राहीली आहेत. ती पूर्ण केल्यानंतर टोलबाबत चर्चा करावी. प्रभाकर कोरवी म्हणाले, लेंड ओहळवरील पूल नव्याने बांधावा, येथे वहातूक कोंडी होत आहे. त्याचबरोबर संकेश्वर- बांदा महामार्गावर मसोबा येथे पडलले खड्डे मुजवावेत. सूतगिरणीपासून एमआयडीसी पर्यंत दोनही बाजूला पथ दिवे बसवावेत. प्रकाश मोरुस्कर म्हणाले, रस्त्याच्या दोन्ही बाजूना गटर्स झालेली नाहीत. त्यामुळे घाटकरवाडी, धनगरमोळा येथे घरात पाणी घुसत आहे. ग्रामस्थांना त्रास होत आहे. रस्त्यासाठी जमिन गेलेल्या काही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही, त्याची रक्कम त्वरीत द्यावी.
आंबोली मार्ग व शिवाजीनगरमधून शहरातील रस्त्यावर येणारे पाणी लेंडआवेहळमधे निचरा करावा. धनगरमोळा, सुळेरान, घाटकरवाडी येथे गटारे बांधावीत. बस थांबे यासह अन्य कामांची पूर्तता करावी. यासाठी कालबध्द कार्यक्रम हाती घ्यावा असे कॉ. देसाई यांनी सांगीतले.
मुकुंदराव देसाई, राजू होलम, परशराम बामणे, गोविंद पाटील, रविंद्र भाटले, युवराज पोवार, युवराज जाधव, काशिनाथ मोरे, संजय घाटगे यांनी चर्चेत भाग घेतला.
१ जूनच्या बैठकीनंतर टोलवसुलीबाबत अंतीम निर्णय…
टोलबाबत १ जूनला बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत रस्त्याची अर्धवट राहीलेल्या कामाचा आढावा घेतला जाईल. ही कामे पूर्ण झाल्यानंतर टोल वसुलीला सुरुवात करावी अशी सूचना या वेळी करण्यात आली. त्यामुळे १ जूनच्या बैठकीवर अंतीम निर्णय होणार आहे.

प्रवासी बस रस्त्यात बंद पडल्याने खोळंबली वहातुक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गोव्याहून देवदर्शनासाठी प्रवासी घेवून जाणारी प्रवासी बस अचानक बंद पडल्याने सुमारे तासभर वहातुक खोळंबली. संकेश्वर – बांदा महामार्गावर काल आठवडा बाजार दिवशी भर दुपारी एक वाजता संभाजी चौकात हा प्रकार घडला. वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. प्रवाशी व वाहनधारकांचे चांगलेच हाल झाले.
गोव्याहून प्रवाशांना घेवून एक खासगी बस कोल्हापूरकडे निघाली होती. संभाजी चौक ओलांडल्यावर जून्या पोस्टगल्लीकडे जाणाऱ्या मार्गा लगत बस अचानक रस्त्यात बंद पडली. शुक्रवार असल्याने आजऱ्याचा आठवडी बाजार होता. त्यामुळे रस्ते गजबजले होते. पर्यटकांच्या गाड्या गोव्याकडे निघाल्या होत्या. त्यामुळे वाहनांची रस्त्यावर दुतर्फा रांग लागली होती. कडक उन्ह, त्यात वाहनात अडकल्याने वाहनधारक व प्रवाशांचे हाल झाले.
पोलीस व स्थानिक नागरीकांच्या मदतीने बस रस्त्याच्या बाजूला लावण्यात आल्यावर वाहतूक पूर्ववत झाली.

निधन वार्ता
शिवाजी साळोखे

मलिग्रे ता. आजरा येथील माजी सैनिक शिवाजी दत्तू साळोखे ( वय वर्षे ६२ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी कँनरा बँकेत सेवा केली असून त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे व एक मुलगी आहे.
रक्षा विसर्जन रविवारी आहे.
बाबुराव सरदेसाई

कासारकांडगाव गावचे इनामदार बाबुराव उर्फ भिकाजीराव नारायणराव सरदेसाई ( वय ८७ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व विवाहित सहा मुली आहेत.
ओंकार सरदेसाई यांचे ते आजोबा होत.
रक्षाविसर्जन सोमवार दिनांक १७ मे रोजी सकाळी नऊ वाजता आहे.

धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त मॅरेथॉनमध्ये पृथ्वीराज कांबळे प्रथम तर पवन जोंधळे अव्वल.

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हिंदवी स्वराज्य, उत्तूर यांच्या वतीने धर्मवीर छ. संभाजी महाराज जयंतीनिमित्त आज मॅरेथॉन स्पर्धा तसेच हातात कासरा धरून बैल पळविणे स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन उमेश आपटे, सरपंच किरण आमगणी व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
मॅरेथॉन स्पर्धेतील लहान गट मुलांमध्ये सोहम आजगेकर (संकेश्वर) प्रथम, हर्ष तोडकर (शेंद्री) द्वितीय तर अमोल नौकुडकर (कुदनूर, चंदगड) तृतीय आला. लहान गट मुलींमध्ये प्रांजली आजगेकर (संकेश्वर) प्रथम, देविका धामणे (हडलगा) द्वितीय तर स्वरा नौकूडकर (उत्तूर) तृतीय आली.खुल्या गट मुलांमध्ये पृथ्वीराज कांबळे (महागाव) प्रथम, विक्रांत गुरव (गडहिंग्लज) द्वितीय तर सोहम हसूरे (हसूरचंपू) तृतीय आला. खुल्या गट मुलींमध्ये ममता पाटील (गडहिंग्लज) प्रथम, प्रिया पाटील (संकेश्वर) द्वितीय तर वैष्णवी मनगुतकर (गडहिंग्लज) तृतीय आली.
हातात कासरा धरून बैल पळविणे स्पर्धेमध्ये पवन जोंधळे (महागाव) प्रथम, प्रकाश पाटील (महागाव) द्वितीय तर श्रीधर गुरव (पिंपळगाव) तृतीय आले.
मॅरेथॉन स्पर्धेत ७० स्पर्धकांनी सहभाग घेतला, तर हातात कासरा धरून बैल पळविणे स्पर्धेत १० स्पर्धक सहभागी झाले होते. प्रा. सुरेश धुरे यांनी पंच म्हणून काम पाहिले, तर डॉ. भरत मोहिते यांनी वैद्यकीय सेवा पुरविली.
कार्यक्रमासाठी विजय वांद्रे, वैभव सावंत, संग्राम घोडके, प्रमोद कांबळे, सत्यजित देसाई यांनी परिश्रम घेतले.
विशेष बातम्या…
♦ ‘नीट’ ची पुन्हा परीक्षा २१ जून पासून…
♦ कोल्हापूर परीक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षक पदी रंजन शर्मा यांची नियुक्ती….
♦ पेट्रोल व डिझेलचे भाव सरासरी तीन रुपयांनी वाढले…
♦ रुपयाची घसरण सुरूच.. नीचांकी पातळी गाठली. देशासमोर महागाईचे संकट…
♦ यावर्षी २६ मे रोजी मान्सून केरळात धडकण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

छाया वृत्त

सरंबळवाडी तालुका आजरा येथे जयवंत सुतार यांच्या विशेष प्रयत्नाने रुपये ३६ लाख मंजूर असलेल्या पाणंद रस्त्याचे उदघाटन जयवंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच सौ. सुनीता कांबळे, मारुती कांबळे, बाळासाहेब किल्लेदार,भाऊसाहेब किल्लेदार, संभाजीराव किल्लेदार, विश्वास किल्लेदार, रणजीत किल्लेदार,ग्रामसेवक शिवाजी दूंडगेकर,तुकाराम बामणे गुरुजी, अमोल सुतार,अजित सरंबळे, दयानंद बुगडे आदी उपस्थित होते.
फोटो क्लिक...

आठवडा बाजारात दिवशी आलेल्या आंबे विक्रेत्यांनी सडलेले आंबे रस्त्यावरच टाकल्याने दुचाकी वाहने घसरण्याबरोबरच सर्वत्र कचरा झाला आहे.

आयपीएल न्यूज
काल झालेल्या सामन्यामध्ये मीचल मार्शने ३८ चेंडूत ९० धावा करत लखनौला विजयापर्यंत नेले.या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला आहे.
आजचा सामना
कोलकाता विरुद्ध गुजरात
गुण तक्ता
बंगळुरू. १६
गुजरात. १६
हैदराबाद.. १४
पंजाब. १३
चेन्नई १२
राजस्थान. १२
दिल्ली. १०
कोलकाता ०९
मुंबई ०८
लखनऊ. ०८
आजचे पंचांग
दिनांक : १६ मे २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : अमावस्या (१७ मे रात्री ०१.३० पर्यंत) त्यानंतर प्रथम तिथी
नक्षत्र : भरणी नक्षत्र (सायंकाळी ०५.२९ पर्यंत) त्यानंतर कृत्तिका नक्षत्र
योग : सौभाग्य योग (सकाळी १०.२५ पर्यंत) त्यानंतर शोभन योग
करण : चतुष्पाद करण (दुपारी ०३.२२ पर्यंत) त्यानंतर नागवा करण
चंद्र राशी : मेष राशी (रात्री १०.४६ पर्यंत) त्यानंतर वृषभ राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.२० ते सकाळी १०.५७ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०९ ते दुपारी ०१.०१
सूर्योदय : सकाळी ०६.०५
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०५
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८


