mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार १७ मे  २०२६

उद्याचा शक्तीपीठ विरोधी मोर्चा यशस्वी करणार…
मसोली, पेरणोली, देवर्डे येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्धार…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा उद्या सोमवारी होणारा मोर्चा मोठ्या संख्येने उपस्थित राहून यशस्वी करण्याचा निर्धार गावोगावी होत असलेल्या शेतकऱ्यांच्या बैठकांमधून करण्यात येत आहे. नुकताच आजरा एमआयडीसी येथे झालेल्या टोल मधून आजरा तालुका वगळण्याचा निर्णय झाला असून या निर्णयामुळे आजरा तालुक्यातील लढणाऱ्या जनतेला बळ मिळाले आहे. गेली तीन वर्ष आजरा तालुक्यातील जनता टोलविरोधी आंदोलन करीत आहे या आंदोलनामुळे टोल मधून तालुक्यातील घरगुती वापराच्या खाजगी वाहनांना सवलत मिळाली आहे. हा एक प्रकारे लढणाऱ्या जनतेचा विजय आहे. म्हणूनच आजरा तालुक्यातील जनता संघर्षावर विश्वास ठेवून सोमवारच्या मोर्चात मोठ्या संख्येने उतरणार आहे असे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई यांनी सांगितले गेले.

ते म्हणाले,आठवड्यापूर्वी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येत आजरा तहसील कार्यालयावर १८ तारखेला सोमवारी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. हा केवळ इशारा न होता प्रत्यक्ष मोर्चात मोठ्या संख्येने उतरून शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे हे तालुक्यातील जनता दाखवून देईल.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले, राज्यभर या विरोधात मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. आजरा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने लढ्यात उतरून हा तालुका लढणाऱ्यांचा आहे हे दाखवून देईल. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ द्यायचा नाही या निर्धाराने तालुक्यातील शेतकरी आता कामाला लागला आहे.

मसोली येथे झालेल्या बैठकीत श्री ए. के. पावले, सरपंच श्री. गुरव यांनी स्वागत आणि प्रस्तावना केली. पेरणोली येथील सभेत सुभाष देसाई, सुरेश कालेकर, विठ्ठल मस्कर, आदेश गुरव, कृष्णा सावंत, सर्जेराव देसाई, अमृत सावंत यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर देवर्डे येथील सभेत मुकुंद तानवडे, जोतिबा चाळके, निवृत्ती कांबळे, बळीराम तानवडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“माझे गाव, डेंग्यूमुक्त गाव !”  प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगीचा अभिनव उपक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

महाराष्ट्र शासनाच्या “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटंगी ता. आजरा यांच्या वतीने १६ मे राष्ट्रीय डेंग्यू दिन विविध जनजागृतीपर व प्रतिबंधात्मक उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. “एक पाऊल स्वच्छतेकडे, एक पाऊल आरोग्याकडे” हा संदेश देत गावागावांत विशेष डेंग्यू प्रतिबंध मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत कंटेनर सर्वे, घरभेटी, स्वच्छता मोहीम, डास उत्पत्ती स्थळांची तपासणी तसेच नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यात आली. आरोग्य विभागाच्या पथकांनी पाण्याच्या टाक्या, कुलर, ड्रम, फुलदाण्या, जुने टायर तसेच साचलेल्या पाण्याच्या ठिकाणांची तपासणी करून नागरिकांना डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली.

“डास हटवा – डेंग्यू रोखा”, “स्वच्छ गाव – निरोगी गाव” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. नागरिकांना डेंग्यूची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी डास नियंत्रणासाठी जैविक उपाय म्हणून गप्पी मासे सोडण्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. गप्पी मासे डासांच्या अळ्या खात असल्याने डासांची पैदास कमी होण्यास मोठी मदत होते, याबाबत ग्रामस्थांना प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. तसेच आठवड्यातून एक दिवस “ड्राय डे” पाळणे, परिसर स्वच्छ ठेवणे, पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणे, मच्छरदाणीचा वापर करणे व ताप आल्यास तात्काळ आरोग्य केंद्रात तपासणी करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले.

सदर उपक्रम तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. जी. गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. ए. शेख, आरोग्य निरीक्षक अतुल पाथरवट, आरोग्य सहाय्यक जे. एच. साबखान तसेच आरोग्य सेवक युनुस सय्यद, शिवम तरोळे, दर्शन भालेराव, दिपक हरणे, लक्ष्मण घोरपडे, प्रमोद कांबळे व रोहित शेंडे यांनी यशस्वीपणे राबविला.

उद्या तहसील कार्यालयात लोकशाही दिन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उद्या सोमवार दिनांक १८ मे रोजी प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय आजरा येथे सकाळी ११ वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली.

शासकीय, निमशासकीय विषयांकित कामाच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारीबाबत न्याय मिळण्यासाठी स्वतः उपस्थित राहून अर्ज सादर करावा लागणार आहे. तालुकावासियांनी लोकशाही दिनाला उपस्थित राहून आपल्या समस्यांचे निराकरण करून घ्यावे असे आवाहनही तहसीलदार माने यांनी केले आहे.

निधन वार्ता

गणपती जाधव

माद्याळ ता. आजरा येथील गणपती महादेव जाधव ( वय ९३ वर्षे ) यांचे काल शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सून ,जावई नातवंडे असा परिवार आहे.
ते सुरेश गणपती जाधव व श्रावण जाधव यांचे वडील होत.

रक्षाविसर्जन उद्या सोमवारी सकाळी नऊ वाजता आहे.

छाया वृत्त 

 

टोल वसुलीच्या हालचाली सुरू…
रस्त्यावर दुभाजक पट्टे मारणे, पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था करणे ही कामे सुरू करण्यात आली आहे.

विशेष बातम्या

♦ ‘नैऋत्य मान्सून अरबी समुद्राच्या आग्नेय भागात, बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य व आग्नेय भागात तसेच अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि अंदमान बेटांच्या श्री विजयपूरमसह काही भागांमध्ये दाखल झाला आहे.

♦ चैनीसाठी आपल्याच घरात घोरपडी करणाऱ्या सिद्धार्थ संजय भालकर/ रा.मंगळवार पेठ, कोल्हापूर याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून १२ तोळे सोने जप्त केले आहे.

♦ फ्लॅटवर बँकेचे कर्ज असल्याचे लपवून फायनान्स कंपनीकडून पुन्हा कर्ज घेऊन ५० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गडहिंग्लज पोलिसात रोहित विष्णू मंगूटकर बायाक्का विष्णू मंगूटकर /दोघे रा. तावरेवाड, मारुती अनिल केसरकर/ या. शेंद्री रोड, गडहिंग्लज शिवानंद दुंडाप्पा लाटकर /दुंडगे राजश्री सागर पताडे आणि सागर सदाशिव पताडे/ रा. भडगाव यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आयपीएल न्यूज 

काल शनिवारी झालेल्या कोलकाता विरुद्ध गुजरात सामन्यांमध्ये कोलकाताने गुजरातचा २९ धावांनी पराभव केला. सुनील नरेन याला सामनावीर घोषित करण्यात आले.

आजचे सामने

पंजाब विरुद्ध बंगळूरु
दुपारी ३.३० पासून

दिल्ली विरुद्ध राजस्थान
सायंकाळी ७.३० पासून

गुण तक्ता

बंगळुरू.   १६
गुजरात.    १६
हैदराबाद.. १४
पंजाब.      १३
चेन्नई         १२
राजस्थान.  १२
दिल्ली.       १०
कोलकाता  ११
मुंबई          ०८
लखनऊ.    ०८

आजचे पंचांग 

दिनांक : १७ मे २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : प्रथम (रात्री ०९.४० पर्यंत) त्यानंतर द्वितीया तिथी
नक्षत्र : कृत्तिका नक्षत्र (दुपारी ०२.३१ पर्यंत) त्यानंतर रोहिणी नक्षत्र
योग : शोभन योग (सकाळी ०६.१५ पर्यंत) त्यानंतर अतिगण्ड योग
करण : किंस्तुघना करण (सकाळी ११.३६ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : वृषभ राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०५.२८ ते सायंकाळी ०७.०५ पर्यंतशुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०९  ते दुपारी ०१.०१
सूर्योदय : सकाळी ०६.०५
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०५
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

शिंदेसेनेतही दोन गट…?

mrityunjay mahanews

रमेश राठोडला लाच घेताना रंगेहात पकडले:महसुलमध्ये खळबळ

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मासेवाडी येथे तिघाविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

तीन लाख ५५ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी

mrityunjay mahanews
error: Content is protected !!