
बैलाच्या हल्ल्यात पारपोलीत शेतकऱ्याचा मृत्यू
पारपोली गावठाण (ता. आजरा) येथे बैलाने केलेल्या हल्ल्यात रखमाजी मारूती कांबळे (वय ६०) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सदर घडला घडली.
कांबळे यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, दोन मुले, जावई, पत्नी असा परिवार आहे.
तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत शिंपी – चराटी गटाचा कस लागणार…

ज्योतीप्रसाद सावंत
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत धक्कादायकरीत्या पराभवास सामोरे जावे लागलेल्या अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या गटाचा पुन्हा एक वेळ तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत कस लागणार आहे.
राष्ट्रवादीतील अंतर्गत कुरबूरीमुळे स्थानिक राष्ट्रवादी पासून दुरावलेल्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी पारंपारिक व कट्टर विरोधक अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांच्याशी हातमिळवणी केली. दोन पारंपारिक विरोधक एकत्र आल्याने जिल्हा बँकेची निवडणूक एकतर्फी होईल अशी चर्चा असतानाच निवडणुकीची सूत्रे माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हातात घेऊन धक्कादायकरीत्या तत्कालीन विद्यमान संचालक अशोकअण्णा चराटी यांना पराभूत केले.यामध्ये अनपेक्षितरित्या तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष सुधीर देसाई हे जिल्हा बँकेचे संचालक झाले.
जिल्हा बँकेतील हा पराभव अण्णाभाऊ गटासह जयवंतराव शिंपी यांच्या गटाच्या जिव्हारी लागला आहे. जिल्हा बँकेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून पुन्हा एकवेळ संधी चालून आली आहे. तालुक्यातील एक महत्त्वाची सहकारी संस्था म्हणून खरेदी विक्री संघाकडे पाहिले जाते. गेली कित्येक वर्षे तालुका संघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कै. राजारामबापू देसाई यांच्या समर्थक मंडळींची सत्ता आहे.वारंवार प्रयत्न करूनही विरोधकांच्या हाती फारसे काही लागलेले नाही. कै. राजारामबापू देसाई यांच्या विरोधातही वेळोवेळी ताकतीने प्रयत्न करून सत्तांतर घडवण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले.
सध्या तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्हा बँक निवडणुकीनंतर संस्थांच्या ठरावधारकांना महत्त्व येऊ लागले आहे. महिनाभरापूर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंपी व चराटी गटासह राष्ट्रवादीला संमिश्र यश मिळाले आहे. सत्ताधाऱ्यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून मोर्चेबांधणी सुरू आहे. शिंपी – चराटी गट कोणत्या पद्धतीने व्यूहरचना करणार यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आम. प्रकाश आबीटकर यांची ताकद शिंपी – चराटी गटाच्या पाठीशी तर आम. हसन मुश्रीफ यांची ताकद सत्तारूढ आघाडीच्या पाठीशी असणार आहे.
तूर्तास आजरा तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत सुरू झालेल्या आरोप – प्रत्यारोपामुळे शिंपी – चराटी गट विरुद्ध सत्ताधारी अशी कडवी झुंज पहावयास मिळणार असे दिसू लागले आहे.
………
अनेक निवडणुकांची रंगीत तालीम
तालुका संघापाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समितीसह आजरा साखर कारखाना व नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे भविष्यातील अनेक निवडणुकांची रंगीत तालीमच म्हणावी लागणार.
………..
आमदार राजेश पाटील यांची भूमिका महत्वाची
तालुका संघाच्या निवडणुकीसह अन्य निवडणुकांमध्ये आमदार राजेश पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.जयवंतराव शिंपी हे आम. राजेश पाटील यांचे निकटवर्तिय समजले जातात.परंतु शिंपी व स्थानिक राष्ट्रवादीमध्ये मतभेद आहेत तर स्थानिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वेळोवेळी आम. राजेश पाटील यांच्या सल्ल्याने राजकीय हालचाली करताना दिसतात.यामुळे आमदार पाटील हे तालुका संघासह जनता बँक,आजरा साखर कारखाना व जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकांमध्ये कोणती भूमिका घेणार यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
……..

रात्री १२ वाजता आजरा शहर हादरले…
भूकंप समजून अनेकजण घराबाहेर

रात्री १२ च्या सुमारास आजरा शहरात धडकी भरवणारा आवाज झाला.आजूबाजूच्या झाडावर विसावलेल्या कावळ्यांनी एकच गलका केला.नुकतेच घरात विसावलेले शहरवासीय भूकंप झाल्याचा समज करून घराबाहेर धावू लागले.प्रत्यक्षात मात्र एका चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकचे टायर फुटून संभाजी चौकात सदर ट्रक पलटी झाल्याचे आढळले.
याबाबत अधिक माहिती अशी… बुधवारी रात्री १२ वाजता चि-याने भरलेला एक ट्रक गडहिंग्लजच्या दिशेने वेगाने जात असताना संभाजी चौकातील वळणावर ट्रकचे दोन टायर वजनाने फुटले व तो ट्रक पलटी झाला. एकाच वेळी दोन टायर फुटल्याने प्रचंड मोठा आवाज झाला या आवाजाने शहरवासीय हादरून गेले.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी ट्रकमध्ये अडकलेल्या चालक व एका व्यक्तीस ट्रकच्या काचा फोडून बाहेर काढले सुदैवाने त्यांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेची प्रजासत्ताक दिनी जोरदार चर्चा होती.
शहरवासीयांचे दैव बलवत्तर
नेहमी गजबजलेल्या संभाजी चौकात सदर घटना रात्री बारा वाजता घडली. दिवसभरात हा प्रकार घडला असता तर जीवितहानी बरोबरच वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाली असती. केवळ शहरवासीयांचे दैव बलवत्तर असेच म्हणावे लागेल.

विज्ञान प्रदर्शनात राजवर्धन पाटील याचे यश

पंचायत समिती शिक्षण विभाग आजरा, राजाभाऊ केसरकर हायस्कूल व श्री. बापूसाहेब सरदेसाई जुनियर कॉलेज निंगुडगे यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या पन्नासाव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनांमध्ये रोझरी इंग्लिश हायस्कूल आजरामधील कू.राजवर्धन संदीप पाटील याने प्राथमिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला.
कु. राजवर्धन याने ‘प्लास्टोस्कोप’ या उपकरणाचे सादरीकरण केले होते. त्याला रोझरी हायस्कूलचे प्राचार्य फादर फेलीक्स लोबो, स्टीफन फर्नांडिस तसेच सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनीत चंद्रमणी यांच्या हस्ते त्याला पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

पाच वर्षाचे मानधन देणार शाळांच्या मदतीसाठी…
सोहाळेच्या सरपंच सौ.डेळेकर यांचा निर्णय

सोहाळे (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती कृष्णा डेळेकर यांनी प्रजासत्ताकदिनी आपले पाच वर्षांचे मानधन ग्रुप ग्रामपंचायतीतील शाळांना शैक्षणिक मदतीसाठी देण्याचे जाहीर केले आहे. पाच वर्षाचे मानधन सामाजिक उपक्रमाकरिता देणाऱ्या सौ. भारती डेळेकर या जिल्ह्यातील पहिल्या सरपंच ठरल्या असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत डेळेकर या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत.
विशेषतः शाळेतील शिक्षणाचा दर्जा हा उत्तम असावा यासाठी विशेष लक्ष ठेवणे गरजेचे असून मानधनमधूनही मदत कमी पडत असेल तर स्वतःकडून आर्थिक हातभार लावून शाळेतील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्याकरिता आपण प्रयत्न करणार असल्याचे सरपंच डेळेकर यांनी सांगितले.
व्यंकटराव हायस्कूल व ज्युनि.काॕलेजमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

व्यंकटराव हायस्कूल आजरा येथे प्रजासत्ताक दिन साजरा करणेत आला.आजरा महाल शिक्षण मंडळाचे चेअरमन जयवंतराव शिपी यांचे हस्ते ध्वजारोहण करणेत आले.
यावेळी आदर्श विद्यार्थी म्हणून सन २०२३ इयत्ता १०वी संचिता नाईक,निदा इंचनाळकर,अभिजित देसाई, युवराज केसरकर व वैष्णवी पाटील या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, शिल्ड व रोख रक्कम देऊन गौरविणेत आले.
तालूकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थी प्रेरणा नावलकर,निदा इंचनाळकर,कादंबरी खवरे(मोठा गट प्रश्नमंजूषा प्रथम क्रमांक) दिव्या होरटे, वैष्णवी पोवार, प्रणव पाटील (लहान गट) कोमल लाड,गौरी सावंत (विज्ञान साहित्य मांडणी मोठा गट)(संस्कार पापरकर,ओम मिरजे विज्ञान साहित्य मांडणी (लहान गट) व मार्गदर्शक शिक्षक यांचे सत्कार करणेत आले.
यावेळी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले.प्राचार्य सुरेशराव खोराटे व पर्यवेक्षक संजयकुमार पाटील यांनी कार्यक्रम नियोजन व अतिथींचे स्वागत केले.ध्वजारोहणासाठी आण्णासो पाटील, सचिव एस.पी. कांबळे केशव पाटील,पांडूरंग जाधव, माजी प्राचार्य व संचालक सुनिल देसाई,सचिन शिंपी,सुनिल पाटील, नगरसेवक व संचालक अभिषेक शिंपी, सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
सुत्रसंचलन पी.व्ही.पाटील,आर.पी.होरटे,ए बी पुंडपळ यांनी केले.सजावट सुशोभिकरण कला शिक्षक कृष्णा दावणे व क्रीडा शिक्षक एस. एम.पाटील यांनी केले.
आभार पी.व्ही. पाटील यांनी मानले.






