mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार   दि. १८ जानेवारी २०२५  

        पेंढारवाडीत आग… अडीच लाखाचे नुकसान

             उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       पेंढारवाडी ( ता.आजरा) येथे शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीत अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीत उभे गवत, गवत गंजी,२ एकर क्षेत्रातील ऊस,अर्धा एकर क्षेत्रातील तुर, आंब्याची २० झाडे जळून खाक झाली. रमेश लोखंडे, प्रभाकर आजगेकर, धोंडीबा लोखंडे, मारुती लोखंडे आदिंचे यामध्ये नुकसान झाले. तलाठी अजीत बेळवेकर, पोलीस पाटील सुभाष आजगेकर, कोतवाल शिवाजी चव्हाण यांनी जळीताचा पंचनामा केला. आग लागलेली समजताच संपूर्ण पेंढारवाडी ग्रामस्थ मदतीला धावले. नागरिकांनी झाडाच्या फांद्याच्या मदतीने आग आटोक्यात आणली.

        अज्ञाताने सदर आग लावली असावी अथवा ऊस गेल्यानंतर पेटवलेल्या फडाद्वारे ही आग पसरली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

संकेश्वर-बांदा महामार्ग टोलप्रश्नी मंत्र्यांना निवेदन देण्याचा निर्णय

टोलमुक्ती संघर्ष समितीची आजऱ्यात बैठक

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       संकेश्वर-बांदा महामार्गावर आजरा शहरापासून जवळच एमआयडीसी जवळ टोल उभारण्यात आला आहे. हा टोल हटविण्यासाठी  अनेकवेळा आंदोलने झाली आहेत. आता टोलप्रश्नी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार शिवाजी पाटील यांना निवेदन देण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या टोलमुक्ती संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कॉ. संपत देसाई, परशराम बामणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.

        संकेश्वर-बांदा महामार्ग टोलमुक्त करावा या मागणीसाठी टोलमुक्ती संघर्ष समिती गेल्या वर्षभराहून अधिक काळ संघर्ष करीत आहे. अनेकवेळा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच तालुका प्रशासनालाही निवेदने देऊन मागणी केली आहे. आजरा तालुक्यातून विराट मोर्चा काढून टोलचे काम बंद पाडण्यात आले होते. त्या आंदोलनात तत्कालीन आमदार व विद्यमान मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील सहभागी झाले होते. तर तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून टोलमुक्ती बाबत आपण आंदोलनकर्त्यांसोबत असल्याचे सांगितले होते असे कॉ. देसाई यांनी या बैठकीवेळी सांगितले.

       टोलविरोधी आंदोलनात आपल्यासोबत असणारे मंत्री मुश्रीफ व मंत्री आबिटकर आता राज्याच्या मंत्रीमंडळात महत्वाच्या खात्यांचा पदभार सांभाळत आहेत. आता आम्हाला सातत्याने टोलविरोधी आंदोलन करावी लागू नयेत यासाठी मंत्र्यांनीच या प्रश्नात गांभिर्याने लक्ष घालून टोलमुक्ती करावी अशी मागणीही या बैठकीवेळी करण्यात आली. लवकरच मंत्री मुश्रीफ, आबिटकर तसेच आमदार पाटील यांची भेट घेऊन टोलमुक्तीबाबत निवेदन देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

       या बैठकीला जनता बँकेचे संचालक रणजित देसाई, विक्रमसिंह देसाई तसेच रवींद्र भाटले, उबाठा गटाचे तालुका प्रमुख युवराज पोवार, डॉ. धनाजी राणे, प्रभाकर कोरवी, दिनेश कांबळे,रणजीत देसाई, विक्रम देसाई, दिनेश कांबळे, सुरेश होडगे,सुरेश औरगोळे, निवृत्ती फगरे,सर्जेराव जाधव , विष्णू कुंभार यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरिवडे सरपंच, उपसरपंच विरोधात अविश्वास ठराव दाखल

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कोरीवडे (ता. आजरा) ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी पाटील व उपसरपंच धनाजी पाटील यांच्या विरोधात ग्रामपंचायतच्या सहा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. एकाच वेळी दोघांवर अविश्वास ठराव दाखल झाल्याने कोरीवडे परिसरात हा चर्चेचा विषय झाला आहे.

       सात सदस्यीय या ग्रामपंचायतीमध्ये दोन वर्षापासून शिवाजी पाटील हे लोकनियुक्त सरपंच पदावर तर धनाजी पाटील हे उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत. मात्र ग्रामपंचायत कारभारामध्ये सदस्यांना विश्वासात न घेता सरपंच व उपसरपंच मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याचा ठपका सहा सदस्यांनी दाखल केलेल्या ठरावात म्हटलेले आहे. अविश्वास ठराव सुरेश बोरवडकर, अरुणा पाटील, ललिता पाटील, अस्मिता कांबळे, रेश्मा पाटील, परसू चौगुले या सहा सदस्यांनी दाखल केला आहे.

आजरा कारखान्याचे उपाध्यक्ष एम.के. देसाई यांचा राजीनामा

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      स्वर्गीय वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष एम. के. देसाई यांनी आपल्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा अध्यक्षांकडे सुपूर्त केला आहे.

       वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकी नंतर अध्यक्षपदाची संधी वसंतराव धुरे यांना तर उपाध्यक्ष पदाची संधी एम. के. देसाई यांना देण्यात आली आहे.

       वर्षभराकरीता असणाऱ्या उपाध्यक्षपदाच्या देसाई यांच्या निवडीला वर्ष पूर्ण होताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नूतन उपाध्यक्ष पदाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अनिल फडके व सुभाष देसाई हे या पदाचे प्रबळ दावेदार आहेत.

धाडसी निकितावर कौतुकाचा वर्षाव

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       गुरुवारी आजरा बस स्थानकात प्रवासी महिलेची पर्स चोरून पलायन करणाऱ्या दोघा महिलांना प्रसंगावधान राखत धाडसाने पाठलाग करून स्थानिक तरुणांच्या मदतीने पकडून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्याप्रकरणी वेळवट्टी ता. आजरा येथील निकिता देसाई या तरुणीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

       शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, राजेंद्रसिंह सावंत, विजय थोरवत, दयानंद नेऊंगरे, इंद्रजीत देसाई यांच्या तर्फे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या कार्यालयात निकिता हिचा विशेष सत्कार करण्यात आला.

मुरूडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनिल पाटील यांची निवड

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मुरुडे ता.आजरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अनिल पाटील यांची निवड करण्यात आली.

       ग्रामपंचायत निवडणूकीवेळी ठरल्याप्रमाणे आपला कार्यकाल संपताच प्रतिक पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या पदावर अनिल पाटील यांची निवड करण्यात आली. मंडल अधिकारी एस. एस. जाधव पांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदस्यांच्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली.

      सन २००५ मध्ये पाटील ग्रामपंचायतीमध्ये प्रथम सदस्य म्हणून निवडून आले होते, त्यावेळी त्यांना सरपंचपदी संधी मिळाली होती. २००५ पासून आजवर सलग चारवेळा पाटील ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी निवडून आले आहेत. तर या निवडीमुळे त्यांना दुसऱ्यांदा सरपंचपदाची संधी मिळाली. या निवडीवेळी उपसरपंच सुनिता पोवार, सदस्य प्रतिक पाटील, अमर पाटील, सदस्या सुनिता मादवणकर तलाठी महादेव देसाई, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भिकाजी बोलके, विठ्ठलदेव दूध संस्थेचे चेअरमन निवृत्ती घेवडे, बजरंग विकास सेवा संस्थेचे चेअरमन सुभाष दोरुगडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

राज्यस्तरीय नाट्यमहोत्सव आजचा प्रयोग...

संगीत कधीतरी कोठेतरी

लेखक : प्रा. वसंत कानेटकर

सादरकर्ते : दाडोबा क्रिएशन,मोरजी

वेळ : सायंकाळी ७-०० वाजता

 

संबंधित पोस्ट

सोहाळे येथे एकाची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

राजकीय घडामोडी

mrityunjay mahanews
error: Content is protected !!