शुक्रवार दि. १७ जानेवारी २०२५

प्रवासी महिलेची पर्स चोरून पलायन करणाऱ्या दोघींना रंगेहात पकडले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – महागाव बसमधून प्रवास करणाऱ्या हात्तिवडे येथील सुलोचना सतीश चव्हाण या महिलेची रोख रक्कम असणारीपर्स चोरून पलायन करणाऱ्या पूजा चौगुले व आरती लोंढे या निपाणी येथील दोघा महिलांना रंगेहात पकडून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसात सदर गुन्हा नोंद झाला आहे. वेळवट्टी येथील निकिता देसाई हिने प्रसंगावधान दाखवत या दोन महिलांना पोलिसांच्या ताब्यात घेण्याच्या दृष्टीने केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
याबाबत आजरा पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी…
डिलाई रोड, मुंबई येथे वास्तव्य असणाऱ्या सुलोचना चव्हाण या आजरा बसस्थानकावरून बस मधून हात्तीवडेच्या दिशेने चालल्या होत्या. दरम्यान पूजा व आरती यांनी त्यांंची पैशाची पर्स उचलण्यात यश मिळवले. परंतु हा प्रकार बस मध्ये असणाऱ्या दुसऱ्या प्रवासी निकिता देसाई यांनी पाहिल्यानंतर त्यांनी गोंधळ घातला. यानंतर दोघींनीही बस मधून उतरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. हा गोंधळ पाहून काही तरुणांनी दोघींचा पाठलाग केला दरम्यान बस लिंगायत गल्ली येथील बोगद्याजवळ आली असता पुन्हा त्या दोघी संशयित महिला जाताना निकिता हिला बसमधून दिसल्यानंतर बस थांबवून त्यांचा पाठलाग केला. स्थानिक तरुणांच्या मदतीने आजरा अर्बन बँकेजवळ त्या दोघींनाही ताब्यात घेण्यात यश आले.
सुलोचना चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पूजा व आरती यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष – उपाध्यक्षांचा राजीनामा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका खरेदी विक्री संघाचे विद्यमान अध्यक्ष विठ्ठलराव देसाई व उपाध्यक्ष गणपतराव सांगले यांनी आपल्या पदांचा राजीनामा नुकताच दिला आहे. दोघांच्याही राजीनाम्यानंतर नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
पूर्व नियोजनानुसार ठरलेल्या कालावधीनंतर देसाई व सांगले यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. नूतन अध्यक्षपदी महादेवराव पाटील – धामणेकर तर उपाध्यक्षपदी महादेव हेब्बाळकर यांची वर्णी लागण्याची शक्यता दिसत आहे.

मलिग्रे येथे आरोग्य रथाचे उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कै. केदारी रेडेकर धर्मादाय रूग्णालयामार्फत ग्रामिण भागातील गरजू रूग्णांना गडहिंग्लज येथील हाॅस्पिटल येथे ये – जा करणे करीता मोफत आरोग्य रथाची सोय केली असलेचे या उद्घाटन प्रसंगी गोकुळ दुध संघाच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी व्यक्त केले.
आरोग्य रथाचे उद्घाटन मलिग्रे सरपंच शारदा गुरव यानी केले. यावेळी श्रीमती रेडेकर यांनी आजरा पूर्व भागातील कोळिंद्रे, कागिनवाडी, मलिग्रे, कानोली, सरबंळवाडी, हारूर, गजरगाव, इंचनाळ मार्गे दर गुरूवार या भागातील रूग्णांना मोफत ने आण करण्यासाठी आरोग्य रथाची सोय केली तसेच कै.केदारी रेडेकर हाॅस्पिटल मार्फत अल्प दरात व शासकीय योजना उपलब्ध असून, गरजू रूग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी माझी सरपंच समिर पारदे, गजानन देशपांडे, दत्ता परिट, उपसरपंच चाळू केंगारे, आनंदा बुगडे, पत संस्था चेअरमन केशव बुगडे, विश्वास बुगडे, शिवाजी भगुत्रे, अक्षय कांबळे, बाळू कांबळे, विनायक पाटील यांचे सह मलिग्रे ग्रामस्थ उपस्थित होते.
आभार माजी सरपंच अशोक शिंदे यांनी मानले.

आजरा तालुक्यातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये भाजपा पक्ष वाढवणेसाठी जिल्ह्याचे भाजपा उपाध्यक्ष हे संघटनात्मक प्रयत्न करत असून अनेक खेडेगावातील तरुण भाजपामध्ये पक्ष प्रवेश करत आहेत. भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर (ग्रामीण) उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटीसो यांचे मार्गदर्शनाखाली संभाजी रामचंद्र पाटील रा.दाभिल, अशोक बचाराम करंबळी रा. मुमेवाडी, दीपक प्रकाश हेळवे रा.चंदगड, शिवराज संभाजी लोखंडे रा. वझरे, रूपेश दत्तात्रय लोखंडे रा. वझरे, सुशांत निंगाप्पा कांबळे रा. येमेकोंड, कुणाल रविंद्र ससाणे रा.आर्दाळ, मयूरेश रमेश कांबळे रा.मुरुडे, संस्कार रामचंद्र करंबळकर रा. मुरुडे यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला.
त्यावेळी आजरा तालुका भाजपा अध्यक्ष बाळ केसरकर, सरचिटणीस आतिश देसाई व उत्तूर शहर भाजपा प्रमुख राजवर्धन मांढरे रा. कर्पेवाडी हे उपस्थित होते.

उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्न प्रकरणी गुरुवारी बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उचंगी प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर उर्वरित कामे अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर या आंदोलनाची तातडीने दखल घेत उपविभागीय अधिकारी यांनी प्रकल्पग्रस्त व संबंधित अधिकाऱ्यांची तहसीलदार कार्यालय, आजरा येथे गुरुवार दिनांक २३ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता आढावा बैठक आयोजित केली आहे.
चार दिवसांपूर्वी प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्प स्थळी आंदोलन करत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती.


आनंदराव नादवडेकर प्राथमिक शिक्षक सह. पतसंस्था अध्यक्षपदी सदाशिव दिवेकर उपाध्यक्षपदी शुभांगी पेडणेकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आनंदराव नादवडेकर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सदाशिव दिवेकर यांची तर उपाध्यक्षपदी शुभांगी पेडणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आनंदराव नादवडेकर प्राथ. शिक्षक पतसंस्था अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची संचालक मंडळाची सभा सहाय्यक निबंधक आजरा मुख्य लिपीक प्रमोद फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. निवडणूक अधिकारी यांनी सदाशिव दिवेकर यांची अध्यक्षपदी व शुभांगी पेडणेकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी मावळते अध्यक्ष तुकाराम तरडेकर उपाध्यक्ष अनिल गोवेकर व नुतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार निवडणूक अधिकारी प्रमोद फडणीस यांचे हस्ते करणेत आला. यावेळी शिक्षक समितीचे नेते सुनिल शिंदे, शिक्षक बैंक संचालक शिवाजी बोलके, माजी उपाध्यक्ष आण्णासो विभूते व सर्व संचालक, कर्मचारी उपस्थित होते.


आजरा महाविद्यालयात जल व पर्यावरण रक्षक कार्यकर्ता कार्यशाळा संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालय, आजरा येथे भूगोल व पर्यावरणशास्त्र विभाग, पृथ्वी ग्रीन क्लब, विज्ञान आणि पर्यावरण मंडळ, भारतीय जल संस्कृती मंडळ, किर्लोस्कर वसुंधरा इको रेंजर्स आणि लक्ष्मी फाउंडेशन गर्जन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक भूगोल दिनानिमित्त ‘जल व पर्यावरण रक्षक कार्यकर्ता ‘ कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
भारतीय जलसंस्कृती मंडळ कोल्हापूरचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिलराज जगदाळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये जल आणि पर्यावरण जागृती करण्याच्या दृष्टिकोनातून हसत खेळत पर्यावरण या उपक्रमांद्वारे खेळाच्या माध्यमातून पर्यावरांतील अन्न शृंखला, जीवन जाळे, जलसंधारण, पाण्याचा अपव्यय टाळणे, जल संकलन, जल संरक्षण, जलसंवर्धन व जल व्यवस्थापन कसे करावे यासाठी खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. डॉ. जगदाळे यांनी पीपीटी च्या माध्यमातून जलसंसाधन व्यवस्थापन, जल पर्यावरण,रेन वॉटर हार्वेस्टिंग, जल पर्यावरण चळवळीची माहिती दिली तसेच जल पर्यावरण चळवळी संबंधी माझी भूमिका, स्थानिक जल समस्या दूर करण्याचे उपाय असे सहभागींची गटचर्चाही घेण्यात आली. या माध्यमातून
तुम्ही उत्तम जलदूत व्हा पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवा व जलसंवर्धनाचा प्रचार व प्रसार करा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ अशोक सादळे यांनी जल व पर्यावरण रक्षक कार्यकर्ता कार्यशाळा चे आयोजन हे महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी प्रशिक्षण घेऊन सहकार्य, संघटन व नेतृत्व कौशल्याद्वारे आपले पर्यावरण आणि जलस्रोत जलसाठे सुरक्षित व संवर्धित व्हावेत यासाठी जल व पर्यावरण रक्षक कार्यकर्ता बनवून राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केले पाहिजे असे स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभागप्रमुख डॉ. रणजीत पवार यांनी केले तर स्वागत पर्यावरण व ग्रीन क्लब विभाग प्रमुख प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांनी केले तर आभार प्रा.रत्नदीप पवार यांनी मानले.


आज शहरात…
♦ दुपारी १२ वाजता संकेश्वर बांदा महामार्गावरील टोल संदर्भात हॉटेल मॉर्निंग स्टार येथे टोल विरोधी संघर्ष समितीची बैठक
……………………….
राज्यस्तरीय नाट्यमहोत्सव
आजचा प्रयोग…
♦ अबोल प्रीतीची अजब कहाणी
लेखक : महेश नाईक
सादरकर्ते : वैभव क्रिएशन, डिचोली
वेळ : सायंकाळी ७.०० वाजता


