गुरूवार दि. १६ जानेवारी २०२५

पुन्हा चोरी…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील एकता कॉलनी मधील अनंत दत्तात्रय पाटील यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजांचे कडी कोयंडे उचकटून घरातील सोने लंपास केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे . रात्री उशिरा पाटील कुटुंबीय परतल्याने याबाबत जादाची माहिती मिळू शकली नाही.
पाटील कुटुंबीय हे ११ जानेवारी रोजी पुण्याला गेले होते. गावाहून परत आल्यानंतर सदर प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले.
शहरामध्ये चोऱ्यांची प्रकरणे सुरूच आहेत.
घरे बंद करून बाहेरगावी जाताना संबंधितांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

तालुका खरेदी विक्री संघाच्या स्वीकृत संचालक पदी जोतिबा चाळके व संजय उत्तूरकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका खरेदी विक्री संघाच्या स्वीकृत संचालकपदी देवर्डे येथील जोतिबा चाळके व उत्तुर येथील संजय उत्तूरकर यांची निवड करण्यात आली आहे.नुकत्याच तालुका संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदर निवड करण्यात आली आहे.

हाळोली-मेढेवाडी- दर्डेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नानासो पाटील यांची बिनविरोध निवड

आजरा ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हाळोली-मेढेवाडी- दर्डेवाडी (ता. आजरा) ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नानासो दिनकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुषमा केसरकर होत्या. उपसरपंच पदासाठी नानासो पाटील यांचे नाव लहू पाटील यांनी सुचविले. उपसरपंच पदासाठी नानासो पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

महावितरण आणि राज्य सरकारच्या मदतीने पारपोली धरणग्रस्त वसाहत सोलर व्हिलेज करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शेळप येथे नव्याने वसवलेली पारपोली धरणग्रस्त वसाहत सोलर व्हिलेज करण्याचा निर्णय आज पारपोली येथे झालेल्या ग्रामस्थ आणि महावितरणचे अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉ संपत देसाई होते.
यावेळी बोलताना गडहिंग्लज विभागाचे कार्यकारी अभियंता श्री आडके साहेब म्हणाले की पारपोली हे संघटित गाव असून नव्याने वसलेल्या या धरणग्रस्त वसाहतीने सहकार्याची भूमिका घेतल्यास हे गाव सोलर व्हिलेज म्हणून राज्यात नावारूपाला येईल. आरोग्यमंत्री ना प्रकाश आबिटकर यांनी याकामी सर्व प्रकारची मदत करण्याची हमी दिली असून सोलर व्हिलेज बनणारी राज्यातील ही पहिलीच वसाहत ठरेल.
यावेळी बोलताना कॉम्रेड संपत देसाई म्हणाले, विजेची मागणी दिवसागणिक वाढणार असून वीज सर्व सामान्य माणसांच्या कुवतीपालिकडे जाणार आहे. त्यामुळे सहज आणि स्वस्तात मिळणारी सौर ऊर्जा घरगुती वापरासाठी आवश्यक बनणार आहे. महावितरण, राज्य सरकारच्या आणि विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून ही वसाहत सोलर व्हिलेज करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. राज्यात एक वेगळा आदर्श निर्माण करून दाखवू.
यावेळी महावितरण आजरा शाखेचे उपकार्यकारी अभियंता दयानंद अष्टेकर, सहा अभियंता शरद पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवी भाटले यांनीही मनोगते व्यक्त केली. यावेळी महादेव पाटील, मारुती ढोकरे, हरिबा जाधव, ज्ञानेश्वर गुंजाळ यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. अशोक मालव यांनी स्वागत केले तर प्रकाश शेटगे यांनी आभार मानले.

शहरवासीय पाण्याच्या प्रतीक्षेत
रस्त्यावर मात्र पाण्याचे लोंढे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
एकीकडे आजरा शहरांमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेकडून पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असून मुळातच एक दिवसाआड येणारे पाणी आता दोन-तीन दिवसात येऊ लागले आहे. तर दुसरीकडे ठीक ठिकाणी लागलेल्या पाण्याच्या गळत्यांमुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. या प्रकाराबाबत शहरवासीयांतून तीव्र संताप व्यक्त होताना दिसतो.
संकेश्वर – बांदा राष्ट्रीय महामार्गाचे काल सुरू झाल्यापासून शहरामध्ये पाणीपुरवठा योजनेकडून पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. याचे खापर राष्ट्रीय महामार्ग विभागावर फोडल्यानंतर या विभागाकडून शहरवासीयांना खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता.सध्या रस्त्याचे काम पूर्ण झाले असल्याने महामार्ग विभागाची जबाबदारी संपली आहे. महामार्ग विभागाचे काम पूर्ण झाले असले तरी शहरांमध्ये गल्ली बोळामध्ये पाण्याच्या गळत्या दिसत आहेत. पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे तर प्रसंगी पाणी खाजगी टँकरद्वारे विकत घ्यावे लागत असल्याची स्थिती असताना रस्त्यावर मात्र हजारो लिटर पाणी वाहून जाताना दिसत आहे.

उत्तूर येथे रविवारी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संयुक्त हिंदवी स्वराज्य उत्तूर यांच्यावतीने छ. संभाजी महाराजांच्या ३४४ व्या राज्याभिषेक सोहळा व रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणा वर्षपूर्तीनिमित रविवार दि. १९ जानेवारी रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा लहान व मोठ्या गटामध्ये पार पडणार आहे. येथील मुकुंदराव दादा आपटे फौडेशन हॉलमध्ये या स्पर्धा पार पडणार असून सकाळी १० वाजता या स्पर्धेला सुरवात होणार आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश विनामुल्य असून लहान गटासाठी विजेत्यांना अनुक्रमे ७०१, ५०१, ३०१, १०१ रोख रूपये व सन्मानचिन्हे देण्यात येणार आहे तर मोठ्या गटासाठी अनुक्रमे १००१, ७०१, ५०१, ३०१ रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. लहान गटासाठी छ. संभाजी महाराज शौर्याचे प्रतिक, शिवकालीन गडकिल्ले-आपले वैभव, सावित्रीबाई फुले शिक्षणाची आध क्रांती, छ. शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राजमाता जिजाऊ स्वराज्याचे आधारस्तंभ हे विषय राहणार आहेत तर मोठ्या गटासाठी स्वराज्याचा धगधगता यज्ञकुंड छ संभाजी महाराज, माझा आदर्श छ. संभाजी महाराज, युगप्रवर्तक छ. संभाजी महाराज, प्रसारमाध्यमे की प्रचार माध्यमे हे विषय राहणार आहेत.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संग्राम घोडके, वैभव सावंत, विजय बांद्रे, प्रथमेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


खेडे येथील शिवलिंग विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी कृष्णा भाईंगडे
व्हा. चेअरमनपदी बाळासाहेब सावरतकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खेडे येथील शिवलिंग विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी कृष्णा भाईगडे यांची तर व्हा. चेअरमनपदी बाळासाहेब सावरतकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी जे. एन. बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत या निवडी करण्यात आल्या.
चेअरमनपदासाठी भाईगडे यांचे नाव डॉ. संदीप देशपांडे यांनी सुचविले. त्यास रामचंद्र शिंदे यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमन पदासाठी सावरतकर यांचे नाव तानाजी सावरतकर यांनी सुचविले त्यास सरीता देशपांडे यांनी अनुमोदन दिले. यानंतर नूतन चेअरमन, व्हा. चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक प्रकाश सावरतकर, रूपाली आर्दाळकर, रामदास चव्हाण क्लार्क सुभाष आर्दाळकर आदि उपस्थित होते. सचिव सुभाष पाटील यांनी आभार मानले.

निधन वार्ता
रखमाबाई सांगले

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका सहकारी शेतकरी संघाचे व्हाईस चेअरमन श्री. गणपतराव विष्णु सांगले यांच्या मातोश्री व उत्तूरच्या माजी ग्रा.प.सदस्या श्रीमती रखमाबाई विष्णु सांगले ( वय ९२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, मुलगी, सून,जावई, नातवंडे असा परिवार आहे.


