बुधवार दि. १५ जानेवारी २०२५


वेताळ नगर परिसरात हत्तीचा धुमाकूळ…
हत्ती हाकारा टीमची दमछाक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
काल मंगळवारी सायंकाळी सव्वा सात वाजण्याचा सुमारास होनेवाडी येथील वेताळ नगर परिसरात टस्करने धुमाकूळ घालत येथील विकास फळणेकर यांच्या काजू फॅक्टरी जवळील साहित्याचे मोठे नुकसान केले आहे. वन विभागाने प्रसंगावधान राखत तातडीने आपली हत्ती हाकारा टीम पाचारण करून हत्तीला जंगलाच्या दिशेने हाकलण्यासाठी प्रयत्न केले. रात्री उशिरा यामध्ये यश आले.
हाजगोळी येथून आलेल्या हत्तीने वेताळ नगर येथील फळणेकर यांच्या मालकीच्या काजू फॅक्टरीचे कंपाऊंड व सिमेंटचे खांब तोडून परिसरात प्रवेश केला. सुमारे अर्धा तास येथे अक्षरशः धिंगाणा घातला. पाण्याच्या टाक्या फोडून त्यांचे खेळणे बनवले. आजूबाजूला ठेवलेले प्लंबिंगचे पाईप्स, मोटर, टायर्स विस्कटून घातले. हत्तीचे रौद्ररूप पाहून या मार्गावरील वाहन चालकांनी येथून पळ काढला.
दरम्यान वन विभागाला तातडीने याची कल्पना दिल्यानंतर वनरक्षक कवळीकट्टी, दूंडगे, वनसेवक संभाजी पोवार, शिवाजी मटकर व हत्ती हाकारा टीम घटनास्थळी पोहोचली. या टीमने मोठे प्रयत्न करून हत्तीला जंगलाच्या दिशेने हाकलले.

सरंबळवाडी उपसरपंचावरील अविश्वास मंजूर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सरंबळवाडी ता.आजरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाजीराव आनंदा देवरकर यांच्या विरोध अविश्वास ठराव सहा विरूद्ध एक मतांनी मंजूर झाला आहे. दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामपंचायतीमध्ये विशेष सभा झाली. तहसीलदार समीर माने अध्यक्षस्थानी होते.
आजरा तहसीलदार यांच्याकडे गुरुवार (ता.९) सरपंच सुनिता मारुती कांबळे यांच्यासह पाच सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. आज याबाबत विशेष सभा झाली. सरपंच सुनिता मारुती कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष सदाशिव रावण, मारुती शंकर संरबळे, प्रमिला बसवराज उतुरे, संगीता विश्वास किल्लेदार, उज्वला उतम कांबळे यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. ग्रामपंचायत सदस्य सीमल प्रविण होडगे या तटस्थ राहील्या.

उचंगीची कामे प्रकल्पग्रस्तांकडून बंद पाडण्याचा प्रयत्न
वरिष्ठांसोबत बैठकीची मागणी कामे बंद असल्याचा प्रशासनाचा निर्वाळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प्रलंबित मागण्याच्या पुर्ततेसाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी व प्रांताधिकारी यांच्यासोबत बैठक घ्यावी अशी मागणी करत आज उचंगी प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पाची अनुषंगीक कामे बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पण दरम्यान मशीनरीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने काम बंद असल्याचा निर्वाळा प्रशासनाकडून देण्यात आला. तहसीलदार समीर माने यांनी प्रकल्पग्रस्त प्रतिनिधींच्या बरोबर दुरध्वनीवरून चर्चा केली. वरिष्ठाबरोबर चर्चा करून बैठक घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले. बैठक होत नाही तोपर्यंत धरणाची अनुषंगीक कामे करू देणार नाही अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली
मागण्यांच्या पुर्ततेसाठी बैठक घ्यावी अन्यथा अनुषंगीक कामे बंद पाडू अशा इशाऱ्याचे निवेदन धरणग्रस्तांनी प्रांताधिकारी यांना दिले होते. यासाठी (त१४) डेड लाईन दिली होती. त्या पार्श्वभूमीवर आज धरणस्थळावर जात प्रकल्पाची कामे बंद पाडण्याचा प्रयत्न केला. निर्वाह क्षेत्राबाबत २९ प्रकल्पग्रस्तांचे सर्व्हेक्षण व फेर अहवाल करणे. गायरान जमिनींचा आकार लावून मिळावा. धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनींचे स्वतंत्र नकाशे द्यावेत. जमीन वाटपाचे आदेश झालेल्या धरणग्रस्तांना जमीन मोजून त्यांचा कब्जा मिळावा. अंशतः बुडीत झालेल्या गट नंबरांची फेर मोजणी करून मिळावी. यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. वरील सर्व प्रश्न समजावून घेऊन त्यांची सोडवणूक करण्याच्या अनुषंगाने बैठक लावावी असा आग्रह प्रकल्पग्रस्त प्रतिनिधींनी केला आहे.
यावेळी कॉ. संजय तर्डेकर, चाफवडेचे सरपंच धनाजी दळवी, निवृत्ती बापट, सुरेश पाटील, शिवाजी बापट, मारुती चव्हाण, दशरथ घुरे, कृष्णा गुड्ळकर, पांडुरंग धनुकटेकर यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

राधानगरी, गारगोटी व आजरा आगारासाठी नवीन बसेसची ना. आबिटकर यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राधानगरी, गारगोटी व आजरा आगारासाठी नवीन बसेसची ना. आबिटकर यांनी परिवहन मंत्र्यांकडे मागणी केली आहे.
राधानगरी विधानसभा मतदारसंघातील राधानगरी, गारगोटी आणि आजरा हे कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागात वसलेले तालुके आहेत. या तालुक्यातील वाड्या- वस्त्यांपर्यंत एसटी महामंडळाच्या बसेस सेवा बजावत आहेत. परंतु त्या बसेस अत्यंत अपुऱ्या व जुन्या असल्यामुळे या भागातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य जनतेला प्रवासी वाहतुकीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. गाड्यांच्या कमतरतेमुळे गाड्या वेळेवर न सुटणे, नादुरुस्त होणे, गाड्या रद्द होणे अशा प्रकारामुळे सर्वसामान्य जनता प्रचंड त्रासली आहे.
महामंडळाकडे येणाऱ्या लेलँड कंपनीच्या स्वमालकीच्या नव्या बसेस पैकी राधानगरी गारगोटी व आजरा आगारासाठी प्रत्येकी २० बसेस तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून भविष्यात या तालुक्यातील जनतेला चांगली प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध करून देता येईल ,असेही सार्वजनिक आरोग्य मंत्री ना.प्रकाश आबिटकर यांनी परिवहन मंत्र्यांना लेखी पत्राद्वारे म्हटले आहे.

आजरा महाविद्यालयात रविवारी पारितोषिक वितरण समारंभ
हास्यसम्राट प्रा. अजिकुमार कोष्टी य उपस्थित राहणार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालयात रविवार दि. १९ जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे. या समारंभासाठी हास्य सम्राट व विनोदी वक्ते प्रा. अजिकुमार कोष्टी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता एज्युकेशन सोसायटी आजराचे अध्यक्ष अशोक चराटी राहणार आहेत. सकाळी १०. ३० वाजता कार्यक्रमाला सुरवात होणार आहे.
रविवार दि. १९ रोजी सकाळी रवळनाथ पूजन, ध्वजवंदन, रांगोळी हस्तकला प – दर्शन उद्घाटन, भित्तिपत्रिका उद्घाटन, फोटोसेशन कार्यक्रम होणार आहेत तर सकाळी ९ वाजता शेलापागोटे उद्घाटन पार पडणार आहे. यानंतर १०.३० वाजता पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे. सोमवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता स्टॉल उद्घाटन, फनीगेम्स, फॅन्सी ड्रेस स्पर्धा उद्घाटन पार पडणार आहे. सायंकाळी ४ वाजता विविध गुणदर्शन कार्यक्रम पार पडणार आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, कार्यालयीन अधिक्षक वाय. आय. पाटील, उपप्राचार्य डी. पी. संकपाळ यांनी केले आहे.


टोल प्रश्नी शुक्रवारी आजऱ्यात बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संकेश्वर – बांदा महामार्ग टोल विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे आजरा शहरानजीक उभा राहत असलेल्या टोल नाक्याचे काम थांबले होते. ते काम पुन्हा वेगाने सुरू झाले आहे. याबाबत विचारविनिमय करून पुढील दिशा ठरवण्यासाठी शुक्रवार दि १७ जानेवारी २०२५ रोजी ठीक १२.०० वाजता हॉटेल मॉर्निंग स्टार येथे व्यापक बैठक आयोजित केली आहे. सर्वांनी बैठकीला वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन टोलविरोधी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थी हिताचे : डॉ.किरण पोतदार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थी हिताचे असून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास या धोरणातून अपेक्षित आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. किरण पोतदार यांनी केले. आजरा महाविद्यालयात आयोजित स्कूल कनेक्ट २.० अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठ व आजरा महाविद्यालयाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे होते.
प्रास्ताविक प्रा. भरतभूषण गावडे यांनी केले. डॉ. पोतदार म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जून २०२३ पासून विद्यापीठ व स्वायत्त महाविद्यालयात लागू करण्यात आले. जून २०२४ पासून सर्व महाविद्यालयात हे धोरण लागू करण्यात आले आहे. या धोरणामध्ये विद्यार्थ्यांला विविध विषय निवडीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करावीत यासाठी अभ्यासक्रमामध्ये आमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थी रोजगारक्षम व्हावा यासाठी प्रकल्पासह विशेष प्रशिक्षणाची सुविधा देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना भारतातील परंपरेने आलेल्या ज्ञानाचाही अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तीन व चार वर्षांची पदवी मिळवता येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रम व सुविधांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
प्राचार्य डॉ. सादळे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व वरिष्ठ महाविद्यालयात विविध अभ्यासक्रम तपासूनच प -वेश घ्यावा असे आवाहन केले. यावेळी प्रा. एस. एस. कुलकर्णी, प्रा. श्रुती ओतारी, प्रा. अविनाश संकेश्वरी यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. एस. एस. कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले तर उपप्राचार्य दिलीप संकपाळ यांनी आभार


