बुधवार दि.२९ आक्टोंबर २०२५



नियोजित शक्तीपीठ मार्ग आजरा तालुक्यातून जावा
सुळेरान ,घाटकरवाडी ग्रामस्थांची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नियोजीत शक्तीपीठ महामार्ग शासनाच्यावतीने ठरवण्यात आलेल्या आरेखनानुसार आजरा तालुक्यातूनच जावा. अशी मागणी तालुक्यातील सुळेरान, घाटकरवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नियोजीत शक्तीपीठ महामार्ग आजरा तालुक्यातील सुळेरान, घाटकरवाडी गावातून जाण्याचे नियोजन आहे. या नियोजनावर गेले अनेक महीने चर्चा होवून स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी व संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी सविस्तर संवाद साधला होता. या कालावधीत स्थानिक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्यामुळे या मार्गाला स्थानिक शेतकऱ्यांनी सहमती दर्शवली होती. मात्र अलिकडच्या काळात नियोजीत शक्तीपीठ चंदगड तालुक्यातून नेण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. या अचनाक घेतलेल्या निर्णयाने शेतकऱ्यांच्या विश्वासाला धक्का बसला आहे. तसेच विकास कामात अडथळा होत आहे. त्यामुळे नियोजीत शक्तीपीठ महामार्ग मुळ आरेखनाप्रमाणे आजरा तालुक्यातून जावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर जयसिंग पाटील, भास्कर पाटील, संजय अडकुरकर, सहदेव कांबळे, यशवंत पाटील, अशोक डेळेकर, चंद्रकांत जाधव, प्रशांत शेटगे, रामचंद्र पाटील, गोविंद पाटील, शरद डेळेकर, तुकाराम ठिकार, चंद्रकांत कविटकर, विश्वास तांबेकर यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.


वारंवार होणाऱ्या नुकसानीसाठी संपूर्ण शेती क्षेत्र धरून नुकसान भरपाई द्यावी :
वन विभागाला पालकमंत्री आबिटकर यांच्या सूचना

कोल्हापूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
एका भागात वारंवार हत्ती किंवा इतर वन्यप्राणी येऊन त्याच शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्यास त्या संपूर्ण शेती क्षेत्राचा विचार करून भरपाई निश्चित करावी. जिल्ह्यात वन्यप्राण्यांमुळे होत असलेल्या सततच्या शेतीच्या नुकसानीबाबत पंचनामे वेळेत पूर्ण करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
आजरा तालुक्यातील आणि आसपासच्या गावांमध्ये हत्तींसह इतर वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी पालकमंत्री आबिटकर यांना निवेदन देत भरपाई मिळावी आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, संबंधित आरएफओ तसेच प्रभावित गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी विशेष बाब म्हणून याबाबत पंचनामे करुन संबंधित शेतकऱ्यांना योग्य प्रकारे भरपाई देण्याबाबत कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.
बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्या ऐकून घेताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, शासनाने याबाबत स्प्ष्ट शासन निर्णयाद्वारे मदत देण्यासाठी नियम केले आहेत. त्यानुसार योग्य पद्धतीने करावेत. पंचनामे केवळ एकदाच न करता वास्तविक नुकसानाचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन व्हावे. तसेच, वन्यप्राणी दिसल्यानंतर त्वरित संरक्षण दल घटनास्थळी पोहोचेल, यासाठी यंत्रणा तत्पर ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. एकाच भागात वारंवार प्राणींची हालचाल होत असल्यास त्यांना अन्य भागात हलविण्याचे प्रयत्न करावेत, अशीही सूचना वन विभागाला करण्यात आली. याशिवाय, वन्यप्राण्यांमुळे वाहनांचे झालेले नुकसानही मदतीच्या कक्षेत आणावे, असे निर्देशही पालकमंत्री आबिटकर यांनी यावेळी दिले.
वन विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या गैस कनेक्शन आणि सुरक्षा जाळी योजनेच्या अनुषंगाने ही कार्यवाही करण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या.

अमेरिकेतही दिपावली निमित्त छ.शिवाजी महाराजाचा किल्ला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दिवाळी आली की बाल गोपालांची किल्ला बनवण्याची धडपड सुरू होते
तशीच धडपड करणाऱ्या अमेरिकेत राहणाऱ्या आजरा गावचे राजवर्धन धनंजय देसाई यांनी किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे
राजा छत्रपती शिवराय यांच्या विचारांची प्रेरणा असलेल्या राजवर्धन यांनी व्हिडिओ सिरिज बनवली राजवर्धन यांच्या विडिओ ना लाखोंच्या पटीत व्ह्युव्हज् मिळाले आहेत.
खुप लोकांनी त्यांचा प्रवास अनुभवला. प्रत्येक विडिओ मध्ये नवनवीन गोष्टी बघायला मिळतात.मी महाराष्ट्रात जन्माला आलोय याचा अभिमान वाटतो असे ते सांगतात. शिवरायांचे अमेरिकेतले मावळे पावसासारख्या अडचणीमध्येही थांबले नाहीत
त्यांनी किल्ला पुर्ण केला. किल्ला बनवताना माती कशी मिळवली, कश्या-कशाचा वापर करता येईल, चिखल करण्यापासून छोट्या दगडाचे महत्त्व कसे आहे असे अनेक किस्से यामध्ये बघायला मिळतात. त्यांनी शिवरांयाच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगत किल्ला बनवला, त्यांच्या सगळ्या मित्रांनीही किल्ला बनवत आपलं बालपणाचे आनंद व्यक्त केला. अमेरिकेतील राजांच्या किल्ल्याची प्रतिकृती तयार करून दिवाळी साजरी झाली.

‘त्या’ २७०० सभासदांना मतदार यादीत समाविष्ट करा…
शिवसेना उबाठाची मागणी

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा साखर कारखाना इकडे एकूण २७०० सभासद तात्कालीन संचालक मंडळाने मंजूर केलेले होते सदर सभासदांनी सन २०१६ च्या निवडणुकीत मतदान केले आहे.परंतु कांही संचालकांनी त्यावर तक्रार केली होती. त्यामुळे त्यांना मतदार यादी मध्ये समाविष्ट न करता त्यांनी भरलेली रक्कम कारखान्याने अनामत म्हणून ठेवून घेतली आहे. या सर्व सभासदांना कारखान्याने सभासदत्व रद्दबाबतची कोणतीही नोटीस आजपर्यंत बजावली नाही नाही. त्याचबरोबर यामध्ये काही सभासद मागासवर्गीय आहेत. त्यांची सभासद रक्कम शासनाने कारखान्याकडून सभासद प्रमाणपत्र घेऊनच जमा केलेली आहे.पण त्या सभासदांना सुद्धा मतदार यादीत समाविष्ट केलेले नाही.. या सर्व सभासदांवर अन्याय झालेला आहे या २७०० सभासदांनी भरलेली रक्कम ही कोटीत आहे. गेली अनेक वर्षे हे पैसे कारखान्याने वापरले पण या सभासदांना मतदार यादीत समाविष्ट करून घेतलेले नाही. त्यांना आजपर्यंत कारखान्याकडून कोणताही लाभ मिळालेला नाही. त्यामुळे येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये कारखाना अध्यक्ष व संचालक मंडळाने या सर्व सभासदांना मतदार यादीत समाविष्ट करावे अन्यथा सभासदांचे पैसे व्याजासहित परत करावे असे न झाल्यास कारखान्यावर मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेना उबाठा घ्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबतचे लेखी निवेदन कार्यकारी संचालक संभाजी सावंत यांना देण्यात आले आहे.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख युवराज पोवार, संजूभाई सावंत, दिनेश कांबळे, अमित गुरव, बिल्लाल लतीफ, शिवाजी आढाव, सखोबा केसरकर उपस्थित होते.

बाजार समितीने चुकीच्या पद्धतीने काजू उद्योजकांना परवाने काढण्यास भाग पडू नये ; काजू उद्योजकांची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजारसमितीकडून काजू उद्योगांसाठी चुकीच्या पध्दतीने परवाने काढण्यासाठी तगादा लावला जात आहे. हा प्रकार तातडीने बंद करावा अशी मागणी आजरा तालुक्यातील काजू उद्योजकांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दिली आहे. यापार्श्वभूमीवर आजरा तहसीलदार कार्यालयामध्ये काजू उद्योजक व बाजारसमितीचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. तहसीलदार समीर माने अध्यक्षस्थानी होते.
परवाना बंधनकारक नसतांना काजू असोसिएशनकडून एक हजार रुपये व त्यांच्या मार्फत न गेल्यास तीन हजार रुपये वसुल केले जात आहेत. याला उद्योजकांनी जोरदार आक्षेप घेत परवानाच बंधनकारक नाही तर ही वसुली कशासाठी ? असा सवाल उपस्थित केला. आयात काजू बीयांच्या गाड्या अडवून बाजारसमितीकडून पैसे वसुल केले जात आहेत. त्याचबरोबर महावितरणकडून सोमवारी वीज खंडीत केली जाते. वास्तविक बहुतांशी काजू उद्योग हे शुक्रवारी बंद असल्याने शुक्रवारी वीज पुरवठा खंडीत ठेवावा. अशी मागणीही या वेळी करण्यात आली. बाजर समितीचे सचिव बाळासाहेब चव्हाण यांनी उद्योजकांना परवाने बंधनकारक असून ही कायदेशीर प्रक्रिया आहे. हे काही चुकीचे नसल्याचे सांगीतले. या वेळी सभापती बाळकू गुरव, संचालक अशोक चराटी, माजी सभापती रामदास पाटील इंद्रजीत देसाई, पांडुरंग जोशीलकर, दशरथ बोलके, महादेव पोवार, युवराज सावंत, युवराज पाटील, संजय माने यांच्यासह काजू उद्योजक उपस्थित होते.
बाजारसमितीची परवाना प्रक्रिया संधीग्ध आहे. काही गटामार्फत गेल्यानंतर बाजारसमीतीच्या परवान्यासाठी एक हजार रुपये घेतले जातात. त्यांच्याशी संबंधीत नसलेल्यांच्याकडून तीन हजार रुपयांची आकारणी केली जाते. अशी आकारणी करून देखील पावती हाच परवाना असे सांगीतले जाते. हे चुकीचे असून सर्वांना समान न्याय देवून विशिष्ठ परवाना दिला पाहीजेत. आयात मालावर करवसुली केली जाते याबाबतही कायदेशीर धोरण स्पष्ट करावे.
…….इंद्रजीत देसाई (देसाई कॅश्यू इंडस्ट्री, वेळवट्टी).

रवळनाथ पतसंस्थेच्या एकाच शाखेतून ५१ लाखांवर ठेवी जमा : अध्यक्ष अभिषेक शिंपी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री रवळनाथ पतसंस्थेकडे दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एकाच शाखेतून एका दिवसात ५१ लाख रूपयांच्या ठेवी जमा झाल्या असल्याची माहिती अध्यक्ष अभिषेक शिंपी यांनी दिली. ग्रामीण भागातील या पतसंस्थेवर आजही सभासद, ठेवीदार व हितचिंतकाच्या दृढ विश्वासामुळे ग्राहक पतसंस्थेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवत असून सध्या बँकेकडे २५ कोटींवर ठेवी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पतसंस्थेकडून सभासद, ठेवीदार व महिलांसह हितचिंतकांकरिता विविध ठेव व कर्ज योजना राबविल्या जात आहेत. याशिवाय सामाजिक कार्यही या संस्थेच्या माध्यमातून केले जात असून एक सामाजिक बांधिलकी जपली जात आहे. संस्थेकडून कर्जदारांना सोने तारण, स्थावर तारण, ठेव तारण, वाहन तारण, मशिनरी तारण व जामिन कर्ज आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याशिवाय रवळनाथ लखपती ठेव, रवळनाथ रिकरिंग ठेव योजनाही असून या ठेव योजनांही उत्स्फुर्त प्रतिसादही मिळत आहे. हळदी-कुंकू सारख्या कार्यक्रमातून महिलांना ठेव योजना राबवून बचतीची सवय निर्माण केली आहे. तसेच लॉकर सुविधाही असून ग्राहकांची मागणी लक्षात घेवून सध्या लॉकरमध्येही वाढ केली आहे. कर्जदारांकरिता विमा योजना उपलब्ध करून दिली असून यातून कर्जदाराचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना आर्थिक मदत होणार आहे. यातून सभासद व वारसांचे आर्थिक हित जोपासले असल्याचेही चेअरमन अभिषेक शिंपी यांनी स्पष्ट केले. यावेळी व्हा. चेअरमन समीर गुंजाटी, सर्व संचालक, सभासद व ठेवीदार, मॅनेजर विश्वास हरेर उपस्थित होते.

निधन वार्ता
मारुती पावले

आरदाळ ता. आजरा येथील मारुती (बंडा) रामचंद्र पावले ( वय ८३ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले,सूना, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक ३० रोजी आहे.


