शुक्रवार दि. १२ डिसेंबर २०२५


पारा घसरला…
तालुकावासिय गारठले…
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेल्या चार-पाच दिवसांत आजरा तालुक्यात तापमानात लक्षणीय घट झाली असून गुरूवारी रात्री १० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. आजरा शहरात थंडीने पुन्हा एकदा जोर दाखवला आहे. थंड वार्यांमुळे शहरासह परिसरात थंडीचा कडाका जाणवत आहे. दररोज होत असलेल्या या घसरणीमुळे शहरात थंडीचा कडाका वाढला
ऊस तोडी करता आलेल्या कामगार वर्गासह इतर बाहेरगावाहून आलेली मंडळी थंडीचा अनुभव घेत आहेत. रात्रीच्या थंडीत शेकोटया पेटू लागल्या आहेत.
थंडीच्या गारठ्यामुळे सर्वांना उबदार कपड्यांची मागणी वाढत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानातील घसरण सुरूच राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.एकंदर पारा घसरल्याने आजरेकर गारठले आहेत हे निश्चित.
एमएसईबीची धडक तपास मोहीम ; पूर्वसूचना नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर परिसरात कोल्हापूर जिल्हा एमएसईबीच्या विशेष पथकाकडून अचानक वीज तपास मोहीम राबविण्यात येत असून या संदर्भात उत्तूर विभागाला कोणतीही पूर्वसूचना दिली गेली नसल्याचे समजते. यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.अलीकडे पंचक्रोशीतील काही भागांमध्ये वीज चोरीच्या घटना उघड झाल्यानंतर पुन्हा अशा प्रकारची चोरी होऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
तपासादरम्यान अधिकारी घरोघरी जाऊन सर्व्हिस वायर, मीटर, जोडणी आदींची तपासणी करत आहेत.ही टीम कोल्हापूर जिल्ह्यातून थेट उत्तूरमध्ये दाखल झाल्याने स्थानिक वीज विभागालाही याबाबत आगाऊ माहिती नव्हती. तरीदेखील ही मोहीम केवळ प्रतिबंधात्मक असून ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वीज विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर परिसरातही अधिकाऱ्यांनी घरोघरी भेट देत तपासणी केली. याचवेळी ग्रामपंचायत सदस्य संदेश रायकर यांच्या घरीही तपास करण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांची ओळख आणि खात्री झाल्यानंतर रायकर यांनी तपास प्रक्रियेस पूर्ण सहकार्य केले.वीज चोरी रोखणे, अनधिकृत जोडणी आटोक्यात आणणे आणि विद्युत प्रणाली सुव्यवस्थित ठेवणे या उद्देशाने ही धडक मोहीम राबविण्यात आल्याचे एमएसईबीने स्पष्ट केले आहे.

आजरा साखर कारखाना व प्राथमिक आरोग्य केंद्राचे
वतीने आरोग्य तपासणी शिबीर
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गुरूवार दि.११ इ.रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटंगी येथे आजरा साखर कारखान्याकडे पर जिल्हयातून आलेल्या तोडणी मजूरांची आरोग्य तपासणी करणेकामी कारखान्याचे पुढाकारांने आरोग्य शिबीर आयोजित करणेंत आले. या शिबीरामध्ये वाटंगी, सिरसंगी व परिसरातील तोडणी मजूरांची आरोग्य तपासणी करणेत आली. यामध्ये सामान्य आरोग्य तपासणी बरोबरच रक्तगट, हिमोग्लोबीन, सर्दी, खोकला व हंगामी आजारांची तपासणी करून त्यावर आवश्यक ते औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. सुभाष देसाई, संचालक श्री. शिवाजी नांदवडेकर, श्री. दिगंबर देसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.जी. गुरव, वैद्यकिय अधिकारी डॉ. शेख, आरोग्य निरीक्षक श्री.अतुल पाथरवट, वाटंगी प्राथमिक ऑरोग्य केंद्राचे कर्मचारी त्याचबरोबर कारखान्याचे शेती विभागाचे मुख्य लिपीक श्री. संदिप कांबळे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मजूरांचे सुरक्षेसाठी आयोजित उपक्रमाचे कौतुक केले.
शिबीरात ऊसतोड मजूरांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून उर्वरित हंगाम कालावधीत अशा उपक्रमांचे प्रमाण वाढविण्याची मजूरांनी अपेक्षा व्यक्त केली.

बुधवार दिनांक १७ रोजी आजरा आगारात ” प्रवासी राजा दिन “
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बुधवार दिनांक १७ डिसेंबर रोजी आजरा आगारात ” प्रवासी राजा दिन व ” कामगार पालक दिन साजरा करणेत येणार आहे. प्रवासी व कामगारांच्या समस्यांचा स्थानिक पातळीवर निपटारा करणेसाठी सदर उपक्रम राबवणेत येणार आहे.
आजरा आगारात दिनांक १७ रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत प्रवाशांच्या लेखी तकारी स्विकारल्या जातील व त्यावरील उपाययोजनांबाबत मा.विभाग नियंत्रकसो आदेश देतील.
दुपारच्या सत्रात दुपारी ३ ते ५ या वेळेत आगारातील एस.टी कर्मचा-यांच्या व्यक्तीगत अथवा संघटनात्मक समस्या ऐकुन घेवून त्यावर तातडीने योग्य ती कार्यवाही केली जाईल. प्रवाशी व कर्मचा-यांनी आपल्या तकारी अथवा समस्या लेखी स्वरुपात नेमून दिलेल्या वेळेत आगारात देणेत याव्यात असे आवाहन करणेत आले आहे.
पं. दीनदयाळ विद्यालय मध्ये हसत खेळत विज्ञानाची कार्यशाळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पंडित दीनदयाळ विद्यालय आजरामध्ये’ हसत खेळत विज्ञानाची कार्यशाळा’ पार पडली. संजय चराटी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. डॉ.संजय पुजारी व ॲड.मोहन सूर्यवंशी यांनी मुलांना हसत खेळत कृतीतून विज्ञानाचे प्रयोग करून दाखवले .सोप्या सोप्या संकल्पनांमधून गुरुत्वाकर्षण ,हवेचा दाब ,आघात याबद्दल मुलांना मनोरंजनातून माहिती सांगितली. सत्यावर विश्वास ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. एडिसन न्यूटन, आईन्स्टाईन या शास्त्रज्ञांच्या वेशभूषा द्वारे विज्ञानातील प्रयोग त्यांनी सादर केले. जादूचे प्रयोग,पेपेट शो, गाण्यावर नृत्य यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मनोरंजन झाले. सहज आणि सोपे प्रयोग दाखवून मुलांना विज्ञान किती सोपे आहे हे त्यांनी सांगितले. सूर्य ,पृथ्वी ,चंद्र, अवकाश याबद्दलही त्यांनी मनोरंजनातून व कृतीतून माहिती सांगितली.या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी , शिक्षक यांनी आनंदाने सहभागी महोऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला.
त्यांच्या वेगवेगळ्या हप्रश्नांना विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन भरत बुरुड यांनी केले.कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी मानले.
सांस्कृतिक स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिरचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सन २०२५-२६ मध्ये तालुकास्तरीय स्पर्धेत समूहगीत कनिष्ठ गट स्पर्धेत सलग ३ वर्ष स्वामी विवेकानंद विद्यामंदिरने तालुक्यात प्रथम येण्याची हॅटट्रीक केली. आणि या शाळेला जिल्हा स्तरासाठी नेतृत्व करण्याची संधी याही वर्षी मिळाली. त्याचबरोबर नाट्यीकरण स्पर्धेतही तालुक्यात प्रथम क्रमांक आला. संघाला जिल्ह्याला जाण्याची संधी मिळाली.
यासाठी सौ. सुतार, श्रीम. कोबळे , सौ. कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. पेडणेकर यांचे मोलाचे प्रोत्साहन मिळाले.
बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल, गवसेचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिरसंगी येथील विज्ञान प्रदर्शनांतर्गत झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल, गवसे येथील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत विद्यार्थिनीनी विज्ञान विषयातील सखोल ज्ञान, वेगवान उत्तर देण्याची क्षमता आणि संघ भावना यांचे उत्तम प्रदर्शन केले.
स्पर्धेत कुमारी रिया संजय पाटील ,कुमारी स्नेहल नामदेव पाटील, कुमारी श्रेया रमेश पाटील या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
या विजयी विद्यार्थ्यांना श्री. भालेकर आर. बी. यांनी केले.

