शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५


विकास कामांचा धुरळा…
गल्लीबोळात खुदाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील प्रमुख वस्त्यांसह उपनगरांमध्ये रस्ते गटर्ससह पाणीपुरवठा योजनेच्या कनेक्शन साठी सर्वत्र खुदाई सुरू असून विकास कामाचा धुरळा सुरू असला तरी धुळीच्या व खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरामध्ये अनेक ठिकाणी एकाच वेळी रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. बहुतांशी रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे असल्याने मोठ्या प्रमाणावर खुदाई केली जात आहे. पाईपलाईन टाकण्यासाठी केलेल्या खुदाईमुळे शहरवासीयांना गेले वर्ष दीड वर्ष चिखल व धुळीतच घालवावे लागले. पुन्हा एक वेळ रस्त्यांच्या निमित्याने शहरभर खुदाई सुरू आहे. या खुदाईमुळे अनेकांची नळ पाण्याची चावी कनेक्शन कट होत आहेत. पुन्हा- पुन्हा होणाऱ्या या खुदाईला शहरवासी आता कंटाळले आहेत. सर्वत्र धूळ आणि चिखल तर आहेच परंतु यामुळे नाहक कनेक्शन जोडणीचा आर्थिक भुर्दंड शहरवासीयांना सहन करावा लागत आहे.
आता एकदाच काय असेल ती खुदाई करून रस्ते करून घ्यावेत अशी मागणी होत आहे.
महिनाभरापूर्वी पेविंग ब्लॉक टाकले, पुन्हा खुदाई…
महिनाभरापूर्वी शहरात अनेक ठिकाणी पेविंग ब्लॉक टाकण्यात आले होते. नवीन नळ पाणीपुरवठा योजनेची कनेक्शन देण्याच्या कारणावरून पुन्हा एक वेळ ते ब्लॉक्स काढून खुदाई करण्यात आली आहे. पुन्हा काढणार होता तर मग ते घाई गडबडीने घातलेच का ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
तालुक्यात आढळले नवीन तीन कुष्ठरोगाचे रुग्ण…
आरोग्य विभागाकडून उपचार सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राज्यात सुरु असणारी कृष्ठरोग मोहिम आरोग्य विभाग पंचायत समिती आजरा मार्फत दि. १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात आली आहे. या मोहिमेत २९७१६ घरांना भेटी देण्यात आल्या. त्यामध्ये नविन ३ रुग्ण आढळून आले, यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर औषधोपचार सूरु करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार तालुक्यातील घरांना प्रत्यक्ष भेटी देवून घरातील सर्व सदस्यांची शारीरिक तपासणी करण्यात आली. ही मोहिम १४ दिवस चालली. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना मोहिम यशस्वी करण्याचेआवाहन केले होते.
तालुक्यातील ४ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच २७ उपकेंद्र यांच्या कार्यक्षेत्रात ही मोहिम राबविली. त्यानुसार या सर्वेक्षणामध्ये तालुक्यातील २९७१६ घरांना १०२ आरोग्य टिमने भेट देवून १३६६९३ या एकूण लोकसंख्येपैकी १०९२६३ लोकसंख्येची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ५८२ संशयीत कृष्ठरोग रुग्णांची तपासणी केली असता ३ नवीन कृष्ठरोग रुग्ण आढळून आले. त्या ३ रुग्णांना औषधोपचार सुरु करण्यात आले.

आय.के.सरांचा उद्या अमृत महोत्सव सोहळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिक्षण व नाट्य क्षेत्रातील आजरा तालुक्यातील परिचित व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या इराण्णा कलाप्पा तथा आय.के. पाटील यांचा उद्या रविवारी अमृत महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी दहा वाजता अण्णाभाऊ सांस्कृतिक सभागृहामध्ये सदर कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य श्री. म. नि. प्र. गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी, श्री सिद्धेश्वर श्री क्षेत्र वस्तीमठ हत्तरगी, यांच्या अध्यक्षतेखाली व नाम. प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य मंत्री महाराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ज्येष्ठ अभिनेते शरद भुताडिया, जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर, अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकण्णा चराटी यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आय.के. पाटील अमृत महोत्सव गौरव समिती व पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

निधन वार्ता
गोपिका राणे

लिंगवाडी ता. आजरा येथील गोपिका विश्राम राणे (वय ७५ वर्ष) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, विवाहित तीन मुली, जावई, नातवंडे.असा परिवार आहे.
व्यंकटराव’चे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील व्यंकटराव शिक्षण संकुलातील विद्यार्थी व शिक्षिकानी आदर्श हायस्कूल शिरसंगी येथे संपन्न झालेल्या 53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थी व शिक्षकांनी उपकरण निर्मिती व प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले.
माध्यमिक गट उपकरण निर्मितीमध्ये कु.आस्था सचिन गुरव व हाफिज महंमद इरफान सय्यद या विद्यार्थ्यांनी” पिझो इलेक्ट्रिसिटी” चा वापर करून चालणे /दाब देऊन निर्मिती हे उपकरण तयार केले. याला प्रथम क्रमांक मिळाला. लहान गटात हर्षद महादेव केसरकर व राम समीर शिप्पूरकर यांनी स्मार्ट हेल्मेट हे उपकरण तयार केले याला उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळाला.
प्रश्नमंजुषा स्पर्धा लहान गटात वेदांग विद्याधर शिंदे, मिताली धुरे,आर्णवी कामत यांनी सहभाग घेतला व त्यांना द्वितीय क्रमांक मिळाला तसेच शिक्षक उपकरण निर्मिती मध्ये माध्यमिक गटात सौ. आशा सचिन गुरव यांनी “चला शिकूया मनोरंजक विज्ञान” या विषयांतर्गत वेगवेगळी विज्ञानातील सोपी उपकरण तयार केली सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांना सौ. ए.एस गुरव,श्री के. बी. खोत ,सौ. व्ही.ए. वडवळेकर, श्री. आर.पी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
विज्ञान प्रदर्शनात आजरा हायस्कूलचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये घवघवीत यश मिळवले. माध्यमिक गट विभागात कु. धनश्री सुभाष लाड व कु. आदित्य सुनील नाईक या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये माध्यमिक गटात कु. अक्षरा सर्जेराव पाटील, कु. गतिमा हंबीरराव अडकुरकर, कु. आदिती अभिजीत भातकांडे या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या सर्व विद्यार्थ्यांना सौ.व्ही.एन. यादव यांचे मार्गदर्शन लाभले. प्रयोगशाळा सहाय्यक व परिचय निर्मिती शैक्षणिक साहित्य गटांमध्ये शाळेचे प्रयोगशाळा परिचर श्री पी. बी. ओतारी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

