मंगळवार
दि.२७ ऑक्टोबर २०२६

भटकी कुत्री करत आहेत घात,
दुचाकीच्या आडवी येऊन होत आहेत अपघात

आजरा : प्रतिनिधी
आजरा शहरासह संपूर्ण तालुक्यात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ, शाळा परिसर आणि ग्रामीण भागातही कुत्र्यांचे टोळके दिसत आहेत. वाहन चालवताना अचानक कुत्रे आडवे येणे, दुचाकीस्वारांच्या पाठीमागे धावणे आणि चावा घेण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार वाढले आहेत. यामुळे दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून अनेकांना गंभीर जखमी होऊन रुग्णालय गाठावे लागत आहे.
या अपघातांमध्ये कोणी किरकोळ जखमी होत आहे, तर कोणाचा हात-पाय तुटणे, डोक्याला गंभीर मार लागणे असे प्रकारही घडत आहेत. काही ठिकाणी अपघातात जीव गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पहाटे रस्त्यावर झोपलेली कुत्री अचानक उठून वाहनांसमोर येत असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांनाही या भटक्या कुत्र्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे. नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नसबंदी मोहीम राबवावी आणि वाढत्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
(छायाचित्र -काल्पनिक)

चव्हाणवाडीच्या जंगल परिसरात बिबट्याची दहशत.करडू पळविले
उत्तूर : प्रतिनिधी
चव्हाणवाडी येथील बेलेवाडी–चव्हाणवाडी जंगल परिसरात बिबट्याने शेळ्यांच्या कळपावर हल्ला करून करडू पळवून नेल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संदीप शिंत्रे यांनी ही माहिती दिली.
चव्हाणवाडीसह परिसरातील अनेक कुटुंबे शेळीपालन व्यवसायावर अवलंबून आहेत. शेळ्या चारण्यासाठी जोमकाई मंदिर परिसर तसेच बेलेवाडी घाटातील डोंगराळ भागात जावे लागते. या भागात बिबट्याचा वावर असल्याने जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.बिबट्याच्या वावरामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, जनावरे चारण्यासाठी जंगल परिसरात जाताना विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. बिबट्याचा वावर आढळल्यास वनविभागाला तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पेरणोली समाज मंदिराचे निकृष्ट बांधकाम ; सरकारी निधीची उधळपट्टी थांबवा – डॉ. धम्मसंगिनी गोरख
पेरणोली : प्रतिनिधी
पेरणोली येथील समाज मंदिराच्या निकृष्ट बांधकामावर आंबेडकरवादी विचारवंत प्रा. डॉ. धम्मसंगिनी रमा गोरख यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रविवारी त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी त्या म्हणाल्या, २०१८ साली पुनरुज्जीवीत झालेले आणि सुस्थितीत असलेले दगडी पायाचे बांधकाम कोणतीही मागणी नसताना पाडण्यात आले. १९ लाख रुपयांच्या नवीन बांधकामात पायामध्ये भाजक्या मातीच्या विटा वापरल्या जात आहेत. जुने मजबूत दगड फेकून देऊन कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधी कमिशनसाठी सरकारी निधीची उधळपट्टी करत आहेत.
दलित वस्ती सुधार योजनेचा किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेचा निधी अशा अनावश्यक बांधकामांवर न उधळता रस्ते, गटारी, शाळा, शिक्षणावर खर्च करावा. भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून धार्मिक स्थळांवर सरकारी खर्च करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
याविरोधात स्थानिक कार्यकर्ते सतीश कांबळे आणि डॉ. त्रिरत्ने यांनी बीडीओ, सीईओ आणि शासकीय पोर्टलवर तक्रार व आरटीआयद्वारे लढा सुरू केला आहे. हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल आणि हा लढा शेवटपर्यंत लढला जाईल, असे डॉ. गोरख यांनी सांगितले.

‘व्यंकटराव’ मध्ये विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
आजरा : प्रतिनिधी
दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आजरा, तालुका विधी सेवा समिती आजरा, वकील बार असोसिएशन आजरा आणि व्यंकराव हायस्कूल व ज्युनि. कॉलेज आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम शनिवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी व्यंकराव हायस्कूल व ज्युनि. कॉलेज आजरा येथे होणार आहे.
यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी – माझे शरीर, माझी सुरक्षा, इयत्ता सहावी ते बारावीसाठी – कायदा जाणून घ्या, आपले भविष्य सुरक्षित करा आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी दिवाणी न्यायाधीश आर. पी. धोरे, आजरा बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय रा. पोवार, ॲड. सुनिता डी. पाटील आणि ॲड. आर. एस. चव्हाण हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या शिबिराचा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश आर. पी. धोरे यांनी केले आहे.
वाटंगी येथे तालुकास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा
वाटंगी : प्रतिनिधी
मोरया सेवा प्रतिष्ठान वाटंगी आयोजित भव्य आजरा तालुका मर्यादित ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ७,८ आणि ९ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे.
या स्पर्धेत फक्त १६ संघांना प्रवेश असून प्रवेश फी २५०१ रुपये आहे.
*बक्षिसे :*
प्रथम – ११,१११ रु. व चषक (मोरया सेवा प्रतिष्ठान)
द्वितीय – ७७७७ रु. व चषक (कार्तिक देवलकर)
तृतीय – ४४४४ रु. व चषक (संदीप सावंत)
चतुर्थ – २२२२ रु. व चषक (सुरेश शिंगटे फौंडेशन)
याशिवाय मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर, ऑरेंज व पर्पल कॅपसाठी आकर्षक चषके ठेवण्यात आली आहेत.
संपर्क : ९३२१८३७०७२,९३७२७७९४४२ ९७३०२९०९६०, ७७९८८५९८६८

निधन वार्ता
बायनाबाई कोंडुसकर

सोहाळे ता .आजरा येथील बायनाबाई भाऊ कोंडूसकर (वय ९९ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले
त्यांच्या पश्चात ३ मुले, २ मुली, जावई, नातवंडे, सूना यांच्यासह मोठा परिवार आहे.
आजचे पंचांग
दिनांक : २७ ऑक्टोबर २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : आश्विन
माह (पूर्णिमांत) : कार्तिक
ऋतु : हेमंत
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : प्रथम तिथी (सकाळी ०७.०१ पर्यंत) त्यानंतर द्वितीया तिथी
नक्षत्र : भरणी नक्षत्र (दुपारी ०३.३८ पर्यंत) त्यानंतर कृत्तिका नक्षत्र
योग : सिद्धि योग (सकाळी १०.५२ पर्यंत) त्यानंतर व्यातीपात योग
करण : कौलव करण (सकाळी ०७.०२ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : मेष राशी
सूर्य राशी : तूळ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.१४ ते सायंकाळी ०४.४० पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : सकाळी ११.५९ ते दुपारी १२.४५
सूर्योदय : सकाळी ०६.३८
सूर्यास्त : सायंकाळी ०६.०७
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
