सोमवार दि.१० फेब्रुवारी २०२५


निवडणुकीचे दिवस आले… स्वयंघोषित नेते उदंड झाले…

ज्योतिप्रसाद सावंत
आजरा नगरपंचायतीसह पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे नगारे वाजू लागले असून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील इच्छुक मंडळींनी चांगलीच तयारी सुरू केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी स्वतःचेच मंच, प्रतिष्ठान, मित्रपरिवार आदी नावाने ग्रुप सुरू केले आहेत. हे ग्रुप सुरू करताना स्वतःच्या नावासमोर भाऊ,दादा, भावी नगरसेवक, भावी जि.प., पंचायत समिती सदस्य, नेते, आधारस्तंभ अशी उपाधी या स्वयंघोषित तरूण नेतेमंडळींनी लावण्यास सुरुवात केल्याने सध्या अशा स्वयंघोषित नेतेमंडळींची तालुक्यात जोरदार चर्चा आहे.
आजरा नगरपंचायतीसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत्या सहा महिन्यात लागण्याची शक्यता आहे. नगरपंचायत निवडणूकीकरीता तर अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. दिवसाढवळ्या अनेकांना नगरसेवक पदाची स्वप्ने पडू लागली आहेत. यामुळे स्वतःच पदरमोड करून स्वतःच्या वाढदिवस, निवडीसह कार्यकर्त्यांचे वाढदिवस, वरिष्ठ नेत्यांचे वाढदिवस, निवडी, जेवणावेळी आदीची संधी साधून शहरभर डिजिटल बॅनर लावण्याची प्रथा रूढ झाली आहे.
डिजिटल फलकांद्वारे वरिष्ठ नेत्यांशी आपण किती जवळचे आहोत हे दाखवण्याचा हा प्रयत्न असला तरी या स्वयंघोषित नेतेमंडळींचे हे फलक शहराचे विद्रूपीकरण करण्यास कारणीभूत ठरत आहेत. हीच अवस्था पंचायत समिती व जिल्हा परिषदेकरता इच्छुक उमेदवारांची आहे. केवळ डिजिटल फलकच नव्हे तर सोशल मीडियावरही अशा मंडळींचे चेहरे वारंवार झळकू लागले आहेत.
आता या उतावळ्या मंडळींना रोखणार कोण ? आणि मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कुणी ? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे.
अनेक प्रकरणात गुंतलेली मंडळी
अशा प्रकरणांमध्ये आघाडीवर असणारे कथित युवा नेते हे स्थानिक व्यावसायिकांच्या उधाऱ्या, उसनवारी, विविध शासकीय कामे करून देतो म्हणून अनेकांकडून पैशाची उचल करणे, वर्गणी गोळा करणे, आर्थिक व्यवहारात इतरांचे पैसे बुडवणे यासारख्या प्रकारात गुंतलेले दिसतात. फलकबाजी व सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचा मोठेपणा दाखवून या सर्व प्रकारांना बगल देण्याचे सोयीस्कर रित्या प्रयत्नही सुरू असल्याचे दिसतात.
याने आम्हाला पोहचवले…
अनेकांनी विविध निवडणुकांसह वाढदिवसाच्या माध्यमातून स्थानिक हॉटेल्स व इतर व्यावसायिकांना टोपी घातली आहे. अशा मंडळींकडून बिनधास्तपणे डिजिटल फलक लावले जात असल्याने हे फलक पाहून संबंधित व्यावसायिक मात्र याने स्वतःच्या मोठेपणासाठी आम्हाला चांगलेच पोहचवले… अशा संतप्त प्रतिक्रिया फलकांकडे पाहून येणे रकमांची यादी देताना दिसतात.

वाटमारीच्या उद्देशाने तरुणांना रोखले
आजरा – महागाव मार्गावरील प्रकार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
क्रिकेट स्पर्धेसाठी महागावच्या दिशेने जाणाऱ्या आजरा तालुक्यातील वेळवट्टी व हाळोली येथील खेळाडू तरुणांना वाटमारीच्या उद्देशाने शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पेद्रेवाडी फाट्यानजीक कांही अज्ञात तरुणांनी रोखले. परंतु एकापाठोपाठ एक दुचाकी घेऊन येणाऱ्या या तरुणांची संख्या जास्त असल्याने रोखणाऱ्या तरुणांनी तिथून तातडीने पळ काढल्याची घटना घडली आहे.
याबाबत सागर पोवार व अन्य तरुणांनी दिलेली माहिती अशी…
महागाव येथे क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये संबंधित तरुण सहभागी झाले होते. स्पर्धा रात्रीचे असल्याने हे सर्व तरुण दुचाकीने महागावच्या दिशेने रात्री आठच्या सुमारास दुचाकीवरून चालले असता पेद्रेवाडी फाट्यानजीक तोंडाला रुमाल बांधलेल्या व हातात काटया असलेल्या चौघांनी रस्त्यावर बांबू टाकून संबंधितांना अडवले. परंतु एकापाठोपाठ गाड्या तेथे दाखल झाल्याने व संबंधित तरुणांच्या हातामध्ये क्रिकेटच्या बॅट्स असल्याने तरुणांची संख्या व त्यांच्या जवळील साहित्य याचा विचार करून चौघांनीही तिथून पळ काढला.
संबंधित तरुणांची भाषा व पेहराव पहाता हे बाहेरगावचे असावेत असा अंदाज असल्याचेही त्यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी या भागातून प्रवास करताना दक्षता घेण्याची गरज या प्रकरणामुळे अधोरेखित झाली आहे.
वाटंगीत हत्तीचा उपद्रव सुरूच

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वाटंगी ता. आजरा येथे हत्तीचा उपद्रव सुरूच असून रविवारी पहाटे हत्तीने सुरेश देसाई यांच्या गट नंबर २५२ मधील शेतात धुमाकूळ घालत पाण्याच्या पाईप लाईन सह टाक्यांचे मोठे नुकसान केले.
रामलिंग येथे खुलेआम दर्शन देऊन गेलेल्या हत्तीने रविवारी पहाटे देसाई यांच्या शेतामध्ये प्रवेश केला. शेतातील पाण्याच्या पाईपलाईनचे पाईप फोडण्यासह येथील पाण्याच्या टाक्यांचा चेंदामेंदा करून त्या रस्त्यावर आणून टाकल्या.
दोन महिने झाले तरी हत्ती या भागातून हटण्यास तयार नाही. यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आजरा तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रामतीर्थ येथे अभिषेक घालत महाआरती केली. शिंदे यांच्या दीर्घायुष्यासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली. आजरा ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत,तालुका प्रमुख संजय पाटील, उपतालुकाप्रमुख काकासाहेब देसाई, साळगावचे सरपंच धनंजय पाटील, दाभिलचे सरपंच युवराज पाटील, संजय शिंदे, संतोष भाटले, विजय थोरवत, संदेश पाटील, अमर डोंगरे, अमर केंबळे, दयानंद नेऊंगरे,मानसिंग देसाई, सुशांत बुरुड, मंदार बिरजे, सार्थक कुंभार, तेजस मोहिते, अनिकेत बोलके, सुनील दिवेकर, संदीप खवरे, स्वप्निल कांबळे, सार्थक बुरुड, धनश्री देसाई, रणजीत सरदेसाई, उमा संकपाळ, आरती चव्हाण, उज्वला कांबळे, मारुती डोंगरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

शेळप रविवारी खुल्या हाफ पीच क्रिकेट स्पर्धा...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शेळप ता. आजरा येथे रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने भव्य खुल्या हाफ पीच क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रू.७००१/-,५००१/- व ३००१/- रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे.
स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी मनोज नार्वेकर,महेंद्र पाटील, परशुराम शेटगे, सुधाकर माडभगत, सुदेश कांबळे, गौरव पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रज्ञाशोध परीक्षेत यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कै. केदारी रेडेकर हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी जान्हवी सुनील चव्हाण हिने कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे घेण्यात आलेल्या कोल्हापूर जिल्हास्तरीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये ८४ गुणांसह घवघवीत यश संपादन केले.तिला संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अंजनाताई रेडेकर यांचे प्रोत्साहन व शाळेच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.


निधन वार्ता
हेमंत नेवरेकर

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर येथे पोलिस दलात कार्यरत असणारे हवालदार हेमंत महादेव नेवरेकर ( वय ५५ वर्षे) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी,मुलगा – मुलगी असा परिवार आहे . त्यांचे मूळगाव उत्तूर ता. आजरा असून त्यांचेवर उत्तूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले .

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

आज शहरात…
♦ आजरा तालुका अण्णाभाऊ सूतगिरणीचे संचालक अनिकेत चराटी यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णाभाऊ सांस्कृतिक हॉल,आजरा येथे सकाळी साडेदहा वाजता विशेष कार्यक्रम…



