mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मंगळवार दि.११ फेब्रुवारी २०२५

वादग्रस्त बिगर शेती प्रकरणी तहसील आवारात मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने करणार जन आंदोलन -संग्राम सावंत

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुक्यातील लॅंडमाफीयांना हाताशी धरून केलेल्या बिगरशेती (NA) प्रकरणांबाबतीत आणि तत्कालीन आजरा तलाठी शिवराज देसाई यांची सखोल चौकशीची दिरंगाई झाल्यामुळे तहसिलदार कार्यालय आजरा यांच्या आवारात “जन आंदोलन” मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने करणार असल्याचे निवेदन संग्राम सावंत व अन्य कार्यकर्त्यांनी आजरा तहसील विभागाला दिले आहे.

         तत्कालीन तलाठी शिवराज देसाई यांच्यासह सर्व तहसिलदार,मंडल अधिकारी,तलाठी,नायब तहसिलदार यांची चौकशी होणार किंवा नाही ? आणि आजरा तालुक्यातील नियमबाह्य व बेकायदेशीर बिगर शेती प्रकारांची सखोल चौकशी होणार आहे का नाही? की यासाठी नुसता पत्रव्यवहार चालला आहे असा सवाल करत याबाबत योग्य ती ठोस कारवाई आजपर्यंत झालेली नाही असा आरोप केला आहे.

      मागण्यांबाबत ठोस कारवाई झाली नाही.तर तहसिलदार कार्यालय आजरा यांच्या आवारात मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने ,२४ फेब्रुवारी २०२५ रोजी “जन आंदोलन ” करणार आहोत असे संग्राम सावंत राज्याध्यक्ष मुक्ती संघर्ष समिती यांनी सांगितले आहे.

       बुरुडे (ता. आजरा) येथील नविन वसलेल्या भावेश्वरी कॉलनीमधील सर्व बिगरशेती गट क्रमांक यामध्ये निवासी रहिवासाकरीता अकृषक (NA) प्लॉट तयार करून जागा मालकांनी विक्री केली. पण येथे पायाभुत सुविधा दिलेल्या नाहीत. त्या सुविधा द्याव्यात अशी मागणी येथील रहिवाशांनी या केलेली आहे व होती. याबाबतचे याअगोदर भावेश्वरी कॉलनी, बुरूडे आजरा जि.कोल्हापूर येथील रहिवाशांनी निवेदन आजरा तहसीलदार, आजरा यांना दिलेले आहे.मात्र यावर ठोस कार्यवाही केली नाही.

         संबंधित जागा मालकांनी प्लाट अकृषक(बिगरशेती-NA) करून राहण्यासाठी विकले. पण तेथे गटर्स, रस्ते, वीज पुरवठा या पायाभूत सुविधा दिलेल्या नाहीत. संबंधीत जागामालकांनी अशा कोणत्याही सेवासुविधा न देता या प्लॉटमधील रहिवाशांची फसवणूक केली आहे. सध्या आपल्या खरेदी प्लॉटमध्ये नागरिकांनी गरजेपोटी घरे बांधली आहेत. परंतु घरांचे सांडपाणी किंवा ये जा करण्यासाठी रस्ते किंवा लाईट्स याची कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा दिलेल्या नाहीत. जागेची प्रत्यक्ष पाहणी करुन मंडल अधिकारी गेले आहेत.पण न्याय मिळाला नाही.यासाठी विविध मागण्यांबाबत  बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहोत असे स्पष्ट करण्यात आले आहे.

      यावेळी मुक्ती संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष संग्राम सावंत यांच्यासह मेघाराणी भाईंगडे, दिंगबर विटेकरी, समीर खेडेकर, संजय कांबळे, मजीद मुल्ला, राहुल दास, लक्ष्मी कांबळे, अक्षय कांबळे,भारती पवार,जयश्री कांबळे,रामचंद्र कांबळे,मंगल कांबळे, सारिका चव्हाण,रामा कांबळे पदाधिकारी व कार्यकर्ते
उपस्थितीत होते.

अनिकेत चराटी यांचा वाढदिवस उत्साहात…
विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छा

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      अत्यंत हळव्या मनाचा युवा कार्यकर्ता अनिकेत चराटी याची समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे. काशिनाथण्णा चराटी, अशोकअण्णा चराटी यांचा समर्थ वारसा लाभलेल्या अनिकेत चराटी यांनी हा वारसा नवीन संकल्प हाती घेऊन समर्थपणे पुढे चालवावा असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांनी केले. अनिकेत चराटी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

      प्रा. आबिटकर म्हणाले, मंत्री प्रकाश आबिटकर यांना मिळालेल्या मंत्रीपदामुळे डोंगराळ अशी ओळख असणाऱ्या आजरा तालुक्याचा राजकीय वनवास संपुष्टात आलेला आहे. तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने घेतलेल्या विकास कामांना आपले सहकार्य राहील. विद्यमान सरकारच्या कालावधीत भरीव अशी कामे करून घ्यावीत असे आवाहनही त्यांनी केले.

       यावेळी अनिकेत चराटी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी डॉ. दीपक सातोसकर, जयवंत सुतार, रणजीत सरदेसाई, के.के. कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले.

      विजयकुमार पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. अशोक बाचुळकर यांनी केले तर दीक्षित यांनी आभार मानले.

      कार्यक्रमास अण्णाभाऊ सूतगिरणीचे अध्यक्षा श्रीमती अन्नपूर्णादेवी चराटी, उपाध्यक्ष डॉ.अनिल देशपांडे, ज्योत्स्ना चराटी, योगेश पाटील, जनार्दन टोपले,नौशाद बुड्डेखान, राजू होलम, दशरथ अमृते, सुरेश गड्डी, नंदकुमार देसाई, राजू पोतनीस, सचिन सटाळे, दीपक गवळी, युवराज पाटील, आय. के.पाटील, विजय थोरवत, अश्विन डोंगरे, संतोष भाटले, प्रकाश पाटील यांच्यासह अण्णाभाऊ संस्था समूहातील प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.

रोझरी चर्चची वार्षिक यात्रा संपन्न

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      रोझरी माऊली चर्चची ची वार्षिक यात्रा शनिवार दिनांक ०८ रोजी आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मिस्साबलिदान प्रार्थनेसाठी प्रमुख याजक म्हणून गोवा आणि दमण सर धर्म प्रांताचे सहाय्यक बिशप सिमॅव फर्नांडिस उपस्थित होते.

       त्याचबरोबर सिंधुदुर्ग, बेळगांव आणि पुणे धर्म प्रांतातील सुमारे २५ धर्मगुरू हजर होते. यावर्षीचे यात्रेचे प्रायोजक प्रा. डॉ. आग्नेलो फर्नांडिस, रुबीन फर्नांडिस यांच्या वतीने प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

      यावेळी यात्रेस विविध गावातील ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवारी दिनांक ०९ फेब्रुवारी रोजी संत सेबेस्टियन यांची तर सोमवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी संत ॲंथनी यांची यात्रा साजरी करण्यात आली.

      याप्रसंगी हाऊजी खेळ व मनोरंजनात्मक खेळ आयोजित करण्यात आले होते.

रिक्षा तळासाठी बसस्थानकावर तात्पुरती सोय
आगार प्रशासनाची ग्वाही…
आगारात बैठक

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       रिक्षा तळासाठी जोपर्यंत जागा मिळत नाही तोपर्यंत रिक्षा उभारण्यासाठी बसस्थानकावर तात्पुरती जागा उपलब्ध करून दिली जाईल. अशी ग्वाही आजरा आगार प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. शहरात कायमस्वरुपी तळासाठी जागा शोधावी असा सल्लाही बैठकीत दिला.

      येथील आजरा आगारामध्ये विभागीय नियंत्रक शिवराज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली रिक्षा संघटनेची बैठक झाली. आजरा अन्याय निवारण रहिवाशी संघटनेचे अध्यक्ष परशराम बामणे, नाथ देसाई, बंडोपंत चव्हाण,आगार प्रमुख प्रविण पाटील, वहातुक नियंत्रक अशोक मातले प्रमुख उपस्थित होते.

       श्री. बामणे म्हणाले, आजरा – आंबोली महामार्गाचे काम सुरु असल्याने आजरा
बसस्थानकावर आगार प्रशासनाने तात्पुरती सोय केली होती. आगार प्रशासनाने तळ हलवला असल्याने रिक्षा चालक रस्त्यावर आले आहे. रस्त्याच्या बाजूला तळ तयार करणे शक्य आहे पण गटर उंच असल्याने येथे रिक्षा उभा करणे अडचणीचे आहे. महामार्गावरील वाढलेली वहातुक व अडचणीची जागेमु‌ळे प्रवाशांना रिक्षात बसणे त्रासाचे ठरत आहे.

       आजरा बसस्थानकामधील रिक्षा स्टॉप हलवल्यामुळे रिक्षा चालक रस्त्यावर आले आहेत. रिक्षा चालकांनी बसस्थानक शेजारील आजरा – आंबोली महामार्गावर पुर्वीच्या ठिकाणी थांबा तयार केला आहे. महामार्गावरील वाढलेली वहातुक व अडचणीची जागेमुळे प्रवाशांना रिक्षात बसणे त्रासाचे ठरत आहे. याचा परिणाम व्यवसायावर होत असून रिक्षा चालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रिक्षा मित्र मंडळाच्या वतीने कायमस्वरुपी रिक्षा स्टॉपची मागणी करण्यात आली .

       यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रवी तेंडुलकर,उपाध्यक्ष समीर चौगले,खजिनदार समीर चौगले,इरफान शेख,सेक्रेटरी पुंडलिक कोले, नामदेव घेवडे, राहुल सुतार, तनवीर मकानदार ,अजित नाईक,समीर तळगुळे उपस्थित होते.

पूर्व भागातील नदीपात्र कोरडे
उचंगी’तून त्वरित पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       पूर्व भागातील नदीपात्र कोरडे पडले
असून ऐन ऊस लागणीच्या वेळीच नदीत पात्रातील पाणी संपल्यामुळे शेतकऱ्यातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. उचंगी धरण पूर्ण क्षमतेने भरले असतानाही पाटबंधारे विभाग पाणी सोडण्यास दिरंगाई करत असल्यामुळे शेतकऱ्यातून संताप व्यक्त होत आहे. त्यातच तार ओहोळवर बांधण्यात आलेल्या को.प. पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये अंतर जास्त असल्यामुळे पाणीसाठा कमी होत आहे. शेतकऱ्यांच्या पाणी उपसा मोटरी उघड्या पडत आहेत. येथील काही शेतकऱ्यांना तार ओहोळ मध्ये कठडे बांधून पाणी उपसा करावा लागत आहे. धरणातून पाणी सोडल्यानंतर दहा ते पंधरा दिवसातच नदीपात्र कोरडे राहत असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी पाण्याचा फेर बसणे अवघड झाले आहे.

      वाटंगी शिरसंगी किणे,कोळिंद्रे हंदेवाडीतुंन गडहिंग्लज तालुक्यातील बटकणंगले वाघराळी,शिप्पूर गावातून तारओहोळ आहे. या तार ओहळला बांधण्यात आलेले को.प. पद्धतीच्या बंधाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे पाणी साठा कमी होत आहे त्यामुळे उचंगी धरणातून पाणी सोडल्यानंतर फक्त आठ ते दहा दिवसातच बंधाऱ्यापासून ३००- ४०० मीटर वरील शेतकऱ्यांना पाणी उपसा करण्यास मिळत नाही. यामुळे पिकांना पाणी द्यायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. गेल्या दोन वर्षापासून येथील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे या तार ओहोळवर जागोजागी को.प.पद्धतीचे बंधारे बांधण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. पण पाटबंधारे विभागाकडून या निवेदनांना केराची टोपली दाखवण्यात आल्याचा आरोप हंदेवाडी व किणे येथील शेतकऱ्यांनी केला आहे.

आजपासून बारावीची परीक्षा

कोल्हापूर विभागांतर्गत १ लाख १६ हजार १२८ विद्यार्थी परीक्षा देणार

            कोल्हापूर: विशेष प्रतिनिधी

       महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीची लेखी परीक्षा आज (दि. ११) पासून सुरू होणार आहे. कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून बारावी परीक्षा १ लाख १६ हजार १२८ विद्यार्थी देणार आहेत. कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळ जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाच्या मदतीने परीक्षेचे कामकाज पूर्ण झाले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी अर्धा तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचे आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील बारावीची २३ परीक्षा केंद्र, सांगली जिल्ह्यातील ४ तर सातारा जिल्ह्यातील १२ परीक्षा केंद्रावरील सर्व कर्मचारी बदलले आहेत. तसेच परीक्षा घेणे, परीक्षा झाल्यानंतर पेपर तपासणीसाठी मॉडरेटर व विषय तज्ञांची नियुक्तीही करण्यात आली आहे. ही परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान होणार आहे. परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह शिक्षण विभागाने मोठा बंदोबस्त केला आहे. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची नजर असणार आहे.

बारावी बोर्ड परीक्षा आजरा केंद्राची तयारी पूर्ण

       बारावी बोर्ड लेखी परीक्षा दिनांक ११ फेब्रुवारी, २०२५ पासून सुरु होत आहे. आजरा तालुक्याच्या ठिकाणी एकमेव आजरा महाविद्यालय, आजरा (०५३१) हे परीक्षा केंद्र आहे. या परीक्षेसाठी आजरा ज्युनिअर कॉलेज, व्यंकटराव ज्युनिअर कॉलेज, पंडीत दिनदयाळ ज्युनिअर कॉलेज, ओम पॅरामेडिकल कॉलेज, व डॉ. झाकीर हुसेन उर्दु कॉलेज, आजरा इ. कॉलेजचे एकूण विद्यार्थी ८०० इतके प्रविष्ठ झाले आहेत. परीक्षेसाठी प्रविष्ठ होणारी मोठी विद्यार्थी संख्या लक्षात घेवून त्यांची बैठक व्यवस्था आजरा महाविद्यालय व आजरा हायस्कूल येथे करणेत आली आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी एस.टी. महामंडळ, पोलीस स्टेशन, दूरसंचार केंद्र व महावितरण विभागाला सहकार्य मिळणेकामी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे परीक्षार्थिना याचा लाभ मिळणार आहे. तसेच एच.एस.सी.बोर्डाच्या भयमुक्त व कॉपीमुक्त अभियान अंतर्गत कोणतेही गैरप्रकार होणार नाही आणि विद्यार्थ्याची अन्य कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता केंद्रसंचालक, अधिक्षक, उपप्राचार्य व प्राचार्यांनी घेतली आहे. बोर्डाकडून वेळोवेळी येणा-या सर्व सूचनांचे काटेकोर रित्या पालन करण्यात आले आहे.

       दररोजची बैठक व्यवस्था बदलती असणार असून बैठक व्यवस्था आदल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी बोर्डवर प्रसिध्द केली जाईल. परीक्षेसाठी सुपरवायझर, कर्मचारी वर्गाची व्यवस्था करुन संबंधितांना पर्यवेक्षणासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षार्थिनी आपापल्या विषयाच्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षेस वेळेत हजर राहून परीक्षा सुरळीत पार पाडणेसाठीचे आवाहन केंद्र प्रमुख श्री. मनोज पाटील यांनी केले आहे

हात्तीवडे येथे आरोग्य शिबिर उत्साहात

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      वंचित बहुजन युवा आघाडी शाखा हात्तिवडे व कृष्णा हॉस्पिटल यांच्या सहयोगातून हात्तिवडे या गावांमध्ये
आरोग्य शिबिर पार पडले. यावेळी (जिल्हा उपाध्यक्ष) दत्तात्रय कांबळे (तालुकाध्यक्ष) संतोष मासोळे यांनी वंचित बहुजन युवा आघाडी मार्फत राबवलेल्या शिबिराचे विशेष फायदे लोकांना कसे मिळतील याबद्दल माहिती दिली व कृष्णा हॉस्पिटलच्या सर्व स्टाफचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले.

      सूत्रसंचालन एकनाथ कांबळे यांनी केले.
शाखाध्यक्ष राहुल शिप्पुरकर, संघटक अभिजीत कांबळे,रवींद्र कांबळे, विष्णू कांबळे, अशोक कांबळे, बापू कांबळे, विजय कांबळे, मुकेश कांबळे ,डॉ प्रशांत कळंत्रे,बंडू कात्रे (प्रशासक),डॉ. दिनेश चव्हाण,डॉ. क्रांती चव्हाण,माजी सैनिक संदीप कांबळे,शंकर कांबळे,अश्विनी मांगले,आशा कांबळे,
सरिता सावंत सर्व हॉस्पिटल स्टाफ व ग्रामस्थ उपस्थित होते .

थोडे हटके…

मा. म्हणजे नेमके काय रे भाऊ…?

                ज्योतिप्रसाद सावंत

        अलीकडे बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध संस्थांतून पद सोडण्याची इच्छा नसतानाही पदमुक्ती मिळालेल्या नेत्यांनी आपल्या हुद्यामागे मा. असे लिहिण्यास सुरुवात केली आहे. आता या मा.चा नेमका अर्थ काय ? हा संभ्रमावस्था निर्माण करणारा प्रश्न आहे.

       भूतकाळात कधीतरी एखाद्या पदावर काम केल्यानंतर त्या पदावरून बाजूला झाल्यानंतरही मिरवण्याची हौस कायम असल्याने माजी असे स्पष्ट लिहिण्याऐवजी ‘मा.’ असे लिहिले जाते. या लिहिण्यातच खरी मेख आहे. ज्यांना विद्यमान पदाधिकाऱ्यांबाबत फारशी माहिती नाही ते माननीय हा अर्थ घेतात म्हणजेच तो विद्यमान पदाधिकारी आहे असे समजतात तर ज्यांना माहित आहे ते मा. या शब्दाचा अर्थ माजी असा घेतात.

     कांही का असेना पदमुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना  पदुमुक्तीनंतरही पदाचा रुबाब मिरवण्याचे समाधान या मा.मुळे लाभत असेल मग तुम्ही आम्ही हरकत कशाला घ्यायची…?

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

रामतीर्थ यात्रा अखेर रद्द

mrityunjay mahanews

आज-यात आज माजी सैनिक पतसंस्थेचा रौप्य महोत्सव …. आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह मान्यवर राहणार उपस्थित…भारतीय जनता पार्टी आजरा युवा मोर्चा  मार्फत  रक्तदान शिबिर उत्साहात

mrityunjay mahanews

बैलाच्या हल्ल्यात पारपोलीत शेतकऱ्याचा मृत्यू

mrityunjay mahanews

सुलगाव येथील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह रामतीर्थ परिसरात सापडला

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!