mrityunjaymahanews
अन्य

शिवाजीरावांनंतर मानसिंगरावांची भूमिका स्पष्ट


विधानसभा निवडणुकीला चंदगड मतदारसंघातून सामोरे जाणार : मानसिंग खोराटे

आजरा : ज्योतिप्रसाद सावंत

     साखर कारखानदारीला राजकारणाची जोड असणे गरजेचे आहे. कारखानदारी सक्षमपणे चालवण्यासाठी राजकीय पाठबळाशिवाय पर्याय नाही. निसर्गसंपन्न अशा चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यामध्ये प्रचंड मनुष्यबळ आहे परंतु रोजगाराची संधी उपलब्ध नसल्याने नवीन उद्योजक तयार करून शेतीपूरक व इतर उद्योग वाढवण्याचे गरज आहे. रस्ते व गटर्स बांधणे म्हणजेच विकास या संकल्पनेमधून बाहेर पडून विधायक व भरीव काम करण्यासाठी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असा निर्धार दौलत अथर्व चे चेअरमन मानसिंगराव खोराटे यांनी व्यक्त केला. हलकर्णी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

     खोराटे पुढे म्हणाले, दौलत कारखान्याला आपण नवसंजीवनी देण्याचे काम केले आहे. आपणाला दौलत मधून घालवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आणि अजूनही करत आहेत.राजकारण बदलत आहे. येणाऱ्या काळात पक्ष कोणता असेल माहित नाही पण निवडणूक रिंगणात समाजकारण करण्यासाठी उतरणार असल्याचे सांगितले.

     चंदगड मतदार संघातील चंदगड, आजरा गडहिंग्लज मतदार संघात शास्वत विकासासाठी खूप वाव आहे. तोच विकास आपल्याला साधायचा आहे. सुज्ञ तरुण व सामाजिक कार्यकर्त्यांची गरज आहे. त्यांच्या पाठिंब्यावरच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले.

     यावेळी ॲड. संतोष मळविकर म्हणाले मतदार संघात अनेक प्रश्न असतानाही केवळ रस्ते आणि नको त्या गोष्टींवर निधी खर्च होत आहे. खोराटे यांचे काम, कामाची पद्धत आम्ही जवळून पाहिली आहे. ते राजकारणात उतरत असाल तर सुशिक्षित तरुण व सामाजिक कार्यात असणाऱ्या लोकांची फळी त्यांच्या पाठीशी उभारू असा विश्वास दिला.
तर राजकारणाचा चिखल झाला आहे. स्वार्थासाठी युत्या आघाड्या होतं आहेत. कुठून उमेदवारी तुम्हाला मिळेल माहित नाही. पण वेळप्रसंगी आपल्या सोबत मनसेचे रेल्वे इंजिन जोडू असा विश्वास मनसेचे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगले यांनी दिला.

यावेळी बापूसाहेब शिरगांवकर,सुनील नाडगौडा, सुनील शिंदे, सतीश निर्मळकर, रामलिंग पाटील,वैजू उसणकर यांनी हि शुभेच्छा दिल्या. मतदार संघातील विविध विभागातून कार्यकर्ते उपस्थित होते.आभार सुनील नाडगौडा यांनी मानले.

शिवाजीराव पाटील यांच्यानंतर मानसिंग खोराटे यांची भूमिका स्पष्ट

      राज्य पातळीवर महायुतीसह महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये मोठा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. दोन्ही आघाड्यांच्या दृष्टीने चंदगड विधानसभा मतदारसंघ हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. ऐनवेळी भूमिका स्पष्ट करण्यापेक्षा भाजपाचे शिवाजीराव पाटील यांनी वाढदिवसाच्या औचित्य साधून कोणत्याही परिस्थितीत आपण चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जाणार असे स्पष्ट केले. दोनच दिवसात पत्रकार बैठक घेऊन मानसिंगराव खोराटे यांनी आपलीही भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले आहेत. संधी मिळाली तर अधिकृत पक्षातून अन्यथा अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याची दोघांनीही तयारी दर्शवल्याने या मतदारसंघात मोठी रंगात येणार असल्याचे दिसत आहे.

नवीन नळ पाणीपुरवठा योजना म्हणजे निव्वळ डोकेदुखी…
चिखलाचे साम्राज्य पसरल्याने शहरवासीयांतून संताप

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा शहरातील करोडो रुपये खर्चून मंजूर करून आणलेली नवीन पाणीपुरवठा योजना ही या योजनेचे एकंदर काम पाहता शहरवासीयाच्या दृष्टीने डोकेदुखी ठरु लागली आहे.

     गेले वर्षभर या योजनेचे काम सुरू आहे. पाईपलाईन टाकण्याच्या निमित्ताने संपूर्ण शहरभर ठीकठिकाणी खुदाई केली आहे. या खुदाईमुळे जुन्या पाणीपुरवठा योजनेला ठिकठिकाणी गळत्या तर लागल्या आहेतच परंतु केलेल्या खुदाईवर पुन्हा योग्य प्रकारे मलमपट्टी न झाल्याने शहरात सर्वत्र पाणी, चिखल याचे साम्राज्य दिसू लागले आहे. याचा प्रचंड त्रास नव्याने निर्माण झालेल्या वस्त्यांना प्राधान्याने होऊ लागला आहे. या वस्त्यांमधून ये – जा करणे देखील मुश्किल झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे आरोपही आता होत आहेत.शहरातील या चिखल व पाण्याच्या डबक्यांमुळे डेंग्यूसदृश्य आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे.

शहरवासीयांना मूर्ख बनवण्याची उद्योग

     या पाणीपुरवठा योजनेमध्ये मोठे ‘अर्थ’पूर्ण(?) व्यवहार झाले असल्याने ठेकेदाराकडून कांही कारभारी मंडळींच्या जीवावर शहरवासीयांना मुर्खात काढण्याचे प्रकार सुरू आहेत. एखादी बैठक लावली तर ठेकेदारांना पाठीशी घालण्याची उद्योग काही मंडळी करत असल्याने ठेकेदारही शहरवासीयांच्या या अडचणींकडे फारसे गांभीर्याने पहात नसल्याचे वारंवार जाणवते.

संकल्पना आधारित प्रशिक्षण कार्यक्रमाचे मास्टर ट्रेनर मानधनापासून वंचित


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     जिल्हा परिषदेमार्फत शासन राबवत असलेल्या शाश्वत विकास ध्येयाची स्थानिकीकरण अंतर्गत संकल्पना आधारित प्रशिक्षण कार्यक्रम चालू आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, बचत गट प्रतिनिधी इत्यादी प्रत्येक गावातील किमान सात ते आठ लोकांना प्रशिक्षण देऊन कार्यक्रम राबवला जात आहे. फेब्रुवारी मार्च २०२४ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. यातील काही तालुके प्रशिक्षण देण्याची जबाबदारी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रावर होती तर काही तालुके जिल्हा परिषद पंचायत समितीमार्फत देण्यात आले.

      प्रशिक्षण देण्यासाठी यशदा मार्फत ट्रेनिंग घेतलेले ट्रेनर यांनी ट्रेनिंग दिले तर काही शासकीय कर्मचारी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांनी ट्रेनिंग दिले. शासकीय कर्मचाऱ्यांचे मानधन लगेचच काढण्यात आले मात्र यशदाचे मास्टर ट्रेनर यांना अद्याप मानधन मिळाले नाही. चौकशी केली असता शासनाकडून कमी बजेट आल्याचे सांगण्यात आले आलेल्या बजेट मधून जे ट्रेनर या मानधनावर अवलंबून आहेत त्यांना देणे गरजेचे होते. मात्र जे शासकीय नोकरीत आहेत त्यांना प्राधान्याने मानधन दिले आहे.

     त्यामुळे बरेच मास्टर ट्रेनर आजतागायत मानधनापासून वंचितच राहिले आहेत. त्यांना लवकरात लवकर मानधन मिळावे अशी मागणी यापूर्वी डेप्युटी सी.ई.ओ साहेब यांचेकडे दिली आहे. तरी लवकरात लवकर मानधन मिळावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्रवीण प्रशिक्षक संघटना कोल्हापूर यांनी केली आहे.

निधन वार्ता
शेवंता कबुरे

       शिवाजी नगर, आजरा येथील शेवंता शंकर कबुरे (वय ७८ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले .

     त्यांच्या पश्चात एक विवाहीत मुलगा, दोन विवाहित मुली,दोन सूना, जावई ,नातवंडे असा परिवार आहे.

    शहरातील तांदूळ व्यापारी राजेंद्र कबुरे यांच्या त्या आई होत.

पाऊस पाणी…

साळगाव बंधारा पुन्हा पाण्याखाली गेला होता

       आजरा शहर व परिसरामध्ये गेल्या २४ तासात २९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. येथील साळगाव बंधाऱ्यावर काल पुन्हा पाणी आल्याने बंधा-यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. तालुक्यातील सर्वच पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

mrityunjay mahanews

‘ उचंगी ‘चे उद्या (शुक्रवारी) पाणीपूजन… माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील,हसनसो मुश्रीफ यांच्यासह मान्यवर उपस्थित रहाणार…

mrityunjay mahanews

गजरगाव येथे जुगार खेळताना आठ जण ताब्यात

mrityunjay mahanews
error: Content is protected !!