शुक्रवार दिनांक १८ एप्रिल २०२५


तालुक्याला बाजार समिती धोरण अंमलात…
आजरा तालुक्याचा समावेश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शासनाच्या प्रत्येक तालुक्याला बाजार
समिती या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार असून ‘मुख्यमंत्री बाजार समिती योजना’मधून जिल्ह्यातील आठ तालुक्यांना नवीन बाजार समित्या मंजूर झाल्या आहेत. यामध्ये आजरा तालुक्यासह पन्हाळा, शाहूवाडी, कागल, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड व चंदगड तालुक्याचा समावेश आहे.
सहकार, पणन विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन आदेश काढला आहे.शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व कृषि मालाच्या वितरणाकरिता एकाच ठिकाणी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सदर बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
अस्तित्वात असणाऱ्या बाजार समित्यांना घरघर लागली असताना शासनाचे प्रत्येक तालुक्याला नवीन बाजार समितीचे धोरण कितपत यशस्वी होणार याबाबत उलटसुलट चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

आजरा तालुक्यातील ५२ पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात ५२ पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले. ७३ किलोमीटर इतकी लांबीचे सदर रस्ते शेतकरी व प्रशासनाच्या समन्वयातून अतिक्रमण मुक्त झाले आहेत.
शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने हे काम शक्य झाले आहे. शेती कामासाठी वहिवाटीकरता हे रस्ते उपयोगी ठरणार आहेत . या रस्त्याने वाहतूक करणे सुलभ होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ये रस्ते अतिक्रमांनी वेढले होते. रस्त्यावर झाडे झुडपे वाढली होती. शेतकऱ्यांना शेती कामासाठी ये-जा करण्याची मोठी अडचण होत होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार हे रस्ते खुले कर करण्याची मोहीम राबवण्यात आली.
तहसीलदार समीर माने यांच्या पुढाकाराने निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, महसूल नायब तशिलदार विकास कोलते, मंडल अधिकारी व तलाठी यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले

उद्योगपती बापूसाहेब सरदेसाई यांचा उद्या अमृत महोत्सव सोहळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बापूसाहेब सरदेसाई एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व देसाई ॲटोकॉम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड पुणे चे मॅनेजिंग डायरेक्टर उद्योगपती बापूसाहेब सरदेसाई यांचा अमृत महोत्सव सोहळा शनिवार दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता बापूसाहेब सरदेसाई औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, गवसे ता. आजरा येथे आयोजित करण्यात आला आहे.
उद्योग क्षेत्रासह शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये बापूसाहेबांचे योगदान महत्त्वपूर्ण असून निंगुडगे येथील बापूसाहेबांनी उद्योग क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत सदर सोहळा होणार आहे.

वरिष्ठ महाविद्यालयाबरोबर वसतिगृह सुरु करण्याचा मानस : आलम नाईकवाडे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अंजुमन इत्तेहादुल इस्लामचे अध्यक्ष आलम नाईकवाडे यांनी अंजुमन संचलित डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कुलच्या इमारतीची दुरुस्ती सुरू केले असून लवकरच वरिष्ठ महाविद्यालयाबरोबरच वसतिगृह सुरु करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
अध्यक्ष नाईकवाडे यांनी गळत्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन शाळेचे जुन्या इमारतीचे छप्पर काढून त्या ठिकाणी स्लॅब टाकण्याचे काम सुरू केले आहे. नाईकवाडे म्हणाले , पाचवी ते बारावी पर्यंत शंभर टक्के अनुदानावर शाळा कॉलेज सुरु आहे. परंतु पुढील शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. यासाठी शासनाकडे पाच एकर जमिनीचा प्रस्ताव पाठवून याठिकाणी आय. टी., सायन्स विभाग, वसतिगृह, तसेच वरिष्ठ विद्यालय सुरु करण्याचा मानस आहे. युवा पिढी शिकली तरच खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होणार आहे. त्यासाठी चांगल्या दर्जाचे शिक्षण देणार. यासाठी समाजाची साथ हवी. पालक मंत्री ना. प्रकाश आबिटकर आणि शिक्षण मंत्री ना. दादा भुसे यांची भेट घेणार आणि त्यांचे सहकार्य घेणार आहे. नुकतीच शाळेत पाण्यासाठी कुपनलिका खोदली आहे. परिसराचे शोभिवंत झाडे लावण्यासह फरशी पॉलिश, शाळेची रंगरंगोटी, प्रसाधनगृहे दुरुस्ती अशी आवश्यक व सुशोभीकरणाची कामे करून घेतली आहेत.
महिला सशक्तिकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी शाळेत शिवण क्लासेस सुरु करून महिलांना आत्मनिर्भर करणार. त्याचपद्धतीने शाळेत तक्रार पेटीसुद्धा लावली आहे. एकंदरीत शाळेत आदर्शवत कामे सुरु केली आहेत. पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, बूट,सॉक्स त्याचप्रमाणे बाहेर गावच्या विद्यार्थ्यांना मोफत वाहनाची सोय सुरु केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार संभाजी सावंत यांच्याकडे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे नुतन कार्यकारी संचालक संभाजी सावंत व मुख्य शेती अधिकारी विक्रम देसाई यांना आज समारंभपूर्वक नेमणूक आदेश कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे, उपाध्यक्ष सुभाष देसाई , जिल्हा बॅंक प्रतिनिधी सुधीर देसाई , संचालक मुकुंद दादा देसाई यांचे हस्ते देण्यात आले.
यावेळी माजी व्हा.चेअरमन मधुकर देसाई , संचालक अनिल फडके , शिवाजी नांदवडेकर , रणजीत देसाई , राजेंद्र मुरूकटे, व अधिकारी उपस्थित होते.

ह भ प लक्ष्मण बळवंत चोरगे माध्यमिक विद्यालय बेलेवाडी हु .शाळेचे एन.एम.एम. एस.परीक्षेत यश…

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ह.भ.प. लक्ष्मण बळवंत चोरगे माध्यमिक विद्यालय बेलेवाडी हु ll शाळेचे एन.एम.एम. एस.परीक्षेत यश मिळवले असून उत्तुर केंद्रात दुसरा तर तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला.
या परीक्षेमध्ये एकूण २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.६ विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्तीस तर १२ विद्यार्थी सारथी शिष्यवृत्ती पात्र झाले इतर प्रवर्गातील ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
मानवी पाटील(केंद्रात दुसरी) सानवी नादवडेकर(केंद्रात तिसरी) सानवी मुदाळकर(EWS मध्ये केंद्रात प्रथम )अपूर्वा लोखंडे, स्नेहल गिजवणे, बबन मोरे राष्ट्रीय शिष्यवृत्ती पात्र ठरले.
सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष जगदीश पाटील, उपाध्यक्ष, सचिव, सर्व संचालक, मुख्याध्यापक सोळांकुरे व्ही.जी., सौ. जयश्री पुंडपळ, बाळकृष्ण भोसले,सौ. प्रतीक्षा गुंडकल्ली, सौ. रेश्मा सुतार,लिपिक श्री उत्तम पाटील, तसेच सर्व शिक्षकेतर स्टाफ व पालक यांचे मार्गदर्शन लाभले.



