mrityunjaymahanews
अन्य

दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता…

वझरे येथे दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता

वझरे ( ता. आजरा) येथून सौ. विजया एकनाथ गायकवाड (वय ३२ वर्षे ,राहणार अंबरनाथ, मुंबई) ही विवाहिता सात वर्षीय मुलगी आरवी व दहा महिन्यांचा मुलगा प्रांश यांच्यासह दिनांक दहा सप्टेंबर पासून बेपत्ता असल्याची वर्दी श्रीमती सोनाबाई गणपती शिंदे यांनी पोलिसात दिली आहे.

अंबरनाथ मुंबई येथे रहाणा-या सौ. विजया माहेरी आल्या होत्या. दहा सप्टेंबर रोजी त्या कोणालाही न सांगता दोन्ही मुलांना घेऊन घरातून निघून गेल्या असून त्या अद्याप परतल्या नसल्याचे या वर्दीमध्ये म्हटले आहे. पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.

भक्कम आर्थिक पायावर जनता बँकेची वाटचाल : अध्यक्ष मुकुंद देसाई

भक्कम आर्थिक पायावर उभ्या असलेल्या जनता सहकारी बैंकेने गेल्या काही वर्षात जिल्हा आणि राज्यस्तरावर बँकींग क्षेत्रात विविध रेकॉर्ड तयार केले आहेत. बँकेवर सभासदांच्या असलेल्या विश्वासामुळे बँकेने प्रगतीची वाटचाल कायम राखली असल्याचे प्रतिपादन चेअरमन मुकुंदराव देसाई यानी केले.

बँकेच्या ६१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बँकेच्या ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच बँकेची निवडणूक बिनविरोध झाली. बँकेच्या प्रगतीसाठी सभासदांना केलेल्या आवाहनाला सभासदांनी दिलेला प्रतिसाद, बैंक बिनविरोध व्हावी यासाठी अनेकांनी केलेले प्रयत्न यामुळे हे शक्य झाल्याचे सांगत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ज्यानी योगदान दिले त्या सर्वांचे ऋण चेअरमन देसाई यांनी व्यक्त केले.

ग्रामीण भागातील बँक असली तरी अत्याधुनिक तंत्रज्ञान बँकेने स्विकारले आहे. बॅकींग सेक्टरमधील सर्व डिजीटल सुविधा बँकेने ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. सभासद, ठेवीदार, हितचिंतक, कर्जदार यांचा बँकेवर असलेल्या विश्वासामुळेच बँकेकडे ठेवींचा ओघ वाढला आहे. बँकेने ठेबी बरोबरच  कर्ज वितरणही वाढविले असल्याचे त्यांनी सांगितले बैंकेने गतवर्षी सिध्दनेर्ली, बालिंगा व उ-तूर शाखा सुरू केल्या आहेत. मुंबई येथील ना.म. जोशी मार्ग, कल्याण तसेच पेठवडगाव, कळंबा, मुडशिंगी, नेसरी येथे शाखा सुरू करण्यासाठी रिजर्व बँकेकडे परवानगी मागितली असल्याचे चेअरमन देसाई यांनी सांगितले.

बँकेला गत सालात २ कोटी ६ लाख ९५ हजार रूपयांचा निवळ नफा झाला असून सभासदांना ८ टक्के लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाने केल्याचे त्यांनी सांगितले. बँकेकडे ३१६ कोटी ७ लाख ७५ हजारांच्या ठेवी असून २०९ कोटी २४ लाख ३२ हजारांचे कर्ज वाटप केले आहे. बँकेने १२७ कोटी ९९ लाख ५१ हजार रुपयांची गुंतवणूक केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. बी. पाटील यांनी नोटीस तसेच अहवाल वाचन केले. यावेळी सभासद तानाजी देसाई यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे चेअरमन देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील, असिस्टेंट मॅनेजर मिनीन फर्नांडिस यांनी दिली. यानंतर सभासद तसेच बँकेच्या कर्मचा-यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. शिवाय बँकांच्या सर्व शाखांमधून अहवाल सालात सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या महागांव, राजाराम रोड, कोल्हापूर व हुपरी या शाखांचाही गौरव करण्यात आला. अल्पावधीत नफ्यात आलेल्या सिध्दनेर्ली शाखेला उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.

या सभेस व्हा. चेअरमन महादेव टोपले, ज्येष्ठ संचालक जयवंतराव शिंपी, रणजित देसाई, बाबाजी नाईक, जयवंत कोडक, शशिकांत नाकर, अमित सावंत, शिवाजी पाटील, विक्रमसिंह देसाई,सौ. रेखा देसाई, सौ.नंदा केसरकर, पांडुरंग तोरगले, संतोष पाटील, तज्ञ संचालक के. जी. पटेकर, संभाजी अस्वले यासह माजी सभापती अल्बर्ट डिसोझा, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, तालुका संघाचे चेअरमन विठ्ठलराव देसाई,जयसिंगराव चव्हाण, कारखान्याचे संचालक दिगंबर देसाई, अनिल फडके, एम. के. देसाई, राजू होलम, नगरसेवक अभिषेक शिंपी, यांच्यासह बँकेचे सभासद, कारखान्याचे संचालक, तालुका संघाचे संचालक उपस्थित होते. एकनाथ गिलबिले यानी सूत्रसंचलन केले तर संचालक पांडूरंग तोरगले यांनी आभार मानले.


स्वामी विवेकानंद पतसंस्थेला २ कोटी ६ लाख निव्वळ नफा…

वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

सभासदांचा विश्वास, पदाधिकारी आणि कर्मचारी यांचे कष्ट या जोरावर संस्थेची यशस्वी घोडदौड कायम सुरू आहे असे संस्थेचे चेअरमन जनार्दन टोपले यांनी स्पष्ट केले. ते स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

सभेच्या सुरुवातीस ज्येष्ठ नेते बापू टोपले,अध्यक्ष जनार्दन टोपले, उपाध्यक्ष दयानंद भूसारी व उपस्थित संचालक, शाखा चेअरमन यांचे हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर श्रद्धांजलीचा ठराव सुधीर कुंभार यांनी मांडला.

२०२२-२३ हे वर्ष सुवर्णमहोत्सवी वर्ष असलेने त्यानिमित्त घेण्यात आलेले विविध कार्यक्रमामध्येही विविध कार्यक्रम सर्व शाखांमधून घेण्यात आले. विद्यार्थी, पालक व शिक्षकांकरिता मार्गदर्शनपर व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित केले.त्याचबरोबर आजरेकर नागरिकासाठी श्री लक्ष्मी देवी उद्यान विकसित करून लोकार्पण कार्यक्रम आज-याच्या मातीत जन्मलेल्या आणि आपल्या तालुक्यातील कला, गायन संगित क्षेत्रातील स्थानिक कलाकारांना एकत्र करून आजरेकरांसाठी संस्थेच्या सुवर्णानिमित्त ‘आपली माणस आपली गाणी ‘ हा मराठी गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.

संस्थेच्या ‘ अ ‘ वर्ग सभासदाना सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भेट म्हणून १५,५६७ सभासदाना रू.५५,८१,५९००/- इतकी बोनस शेअर्स रकम वितरण करणेत आली. इथून पुढेही अनेक कार्यक्रम घेणेचा मानस आहे. त्यामध्ये आजरा तालुक्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) व अन्य स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासाकरिता त्याना एक अभ्यासिका कक्ष उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.या अभ्यासिकेचा तालुक्यातील गोरगरिब विद्यार्थ्यांना याचा चांगला लाभ होवून समाजातील कर्तव्यचा अधिकारी तयार होतील अशी आम्हाला खात्री असे संस्थेचे चेअरमन जनार्दन टोपले यांनी सांगितले.

संस्थेचे ३ कोटी ६७ लाख वसूल भाग असून २७७ कोटीपेक्षा अधिक ठेवी आहेत. १३५ कोटींहून अधिक कर्ज वाटप केले असून ६२ कोटी केली आहे. संस्थेला ३१३ कोटीचा व्यवसाय केला असून २ कोटी ६ लाख इतका निव्वळ नफा झाल्याचे अध्यक्ष टोपले यांनी सांगितले.

वार्षिक सभेत इयत्ता १० वी १२ वीतील सभासदांचे गुणवंत पाल्यांचा आणि
अहवाल
सालात ७० वर्ष पूर्ण झालेल्या सभासदांचा उल्लेखनिय कामगिरी करणा-या व्यक्तींचा विशेष गौरव करण्यात आला.

सभेची नोटीस व आर्थिक पत्रकाचे वाचन जनरल मॅनेजर अर्जुन कुंभार यांनी केले.

संस्थेच्या सभासदांनी गडहिंग्लज व सिंधुदुर्ग येथे नविन शाखा काढणेस यावेळी मंजूरी देणेत आली.

सभा खेळीमेळीत व चांगल्या वातावरणात संपन्न झाली. संस्थेच्या यशस्वी संस्थेचे ज्येष्ठ सभासद बंडू पानी क मंदळाचा अभिनंदनाचा ठराव मांडला. सरथेच्या कामकाजाबाबत संस्थेच्या सभासदानी समाधान व्यक्त केले संचालक नारायण सावंत, महेश नार्वेकर, रवींद्र दामले, राजेंद्र चंदनवाले गुरुप्रसाद टोपले विश्वजीत मुंज सुधीर कुंभार सुनीता कुंभार रणजीत पाटील मुकुंद कांबळे सुरेश कुंभार रामचंद्र पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते उपाध्यक्ष दयानंद भुसारी यांनी आभार मानले.

स्वराज्य तालीम मंडळाच्या दहीहंडीवर संघर्ष ग्रुपचा शिक्का…

आजरा येथील स्वराज्य तालीम मंडळ ५५ हजार ५५५ यांची मानाची दहीहंडी गडहिंग्लज येथील संघर्ष ग्रुपने पाच थर लावत फोडली. हंडी फुटताच उपस्थित तरुणाइने एकच जल्लोष केला.

आजरा शहरात गेल्या पंधरा वर्षापासून स्वराज्य तालीम मंडळाच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष,नगरसेवक अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांच्या मार्फत दहीहंडी चे आयोजन केले जाते. यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर आजरा शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये केसरकर यांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. वाद्यांचा गजर आणि विद्युत रोषणाई यामुळे हा परिसर उजळून जाण्याबरोबरच दणाणून गेला. आजरा शहर आणि परिसरातील अबाल वृद्ध नागरिक दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते. क्रेनच्या साहाय्याने बांधण्यात आलेली ही दहीहंडी संघर्ष ग्रुपच्या गोविंदा पथकाने पाच मानवी मनोरे रचून फोडली.रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. दहीहंडी फुटताच संगीताच्या तालावर तरुणाइने ठेका धरला.

कार्यक्रमास भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, जिल्हा उपाध्यक्ष अशोकअण्णा चराटी, जनार्दन टोपले, संग्रामदादा कुपेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हरूगडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

संत सेना महाराजांची पुण्यतिथी उत्साहात

श्री संत सेना महाराज यांची आजरा येथे पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. संत सेना नाभिक संघटना आजरा यांच्या वतीने कार्यक्रम पार पडला. नाभिक संघटनेचे रामा शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संत सेना महाराज मंदिर, गांधीनगर,आजरा येथे सदर कार्यक्रम पार पडला.

अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, आजरा तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, नगरसेवक किरण कांबळे, अभिषेक शिंपी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला. उपस्थितांचे स्वागत समाजाचे तालुका उपाध्यक्ष गौतम भोसले यांनी केले.

संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन संत सेना पतसंस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाचवडेकर यांच्या हस्ते झाले. अनिरुद्ध केसरकर यांच्या हस्ते सेना मंदिराच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ झाला. यावेळी अशोकअण्णा चराटी यांनी या कामासाठी साडेतीन लाखांचा निधी दिला.नगरसेवक अभिषेक शिंपी आणि संत सेना महाराज यांच्या अध्यात्मिक कार्याची माहिती दिली. सेना महाराज यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमास रामा पाचवडेकर, आनंदा इंगळे, चंद्रकांत इंगळे, संजय पाचवडेकर, शामराव पाचवडेकर, अशोक पाचवडेकर दत्ता पवार, पांडुरंग पवार,संजय यादव, उत्तम भोसले यांच्यासह नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोहाळेसह बाची व सोहाळेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पालकांचे पाद्यपूजन


सोहाळे (ता.आजरा) येथील प्राथमिक शाळेत ग्रुप ग्रामपंचायत सोहाळे, बाची, दोरुगडेवाडी व सर्व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पाद्यपूजन कार्यक्रम व पालक मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी पाद्यपूजन करून गुरुजी व आईवडीलांच्या प्रती ऋण व्यक्त केले. यावेळी गुरुचे आपल्या आयुष्यात असलेले महत्व, आपली संस्कृतीचे पालन करणे व जतन करणे याचे महत्व समजून घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. भारती डेळेकर होत्या.
प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संजय बागडी यांनी केले. यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना सरपंच सौ. डेळेकर यांनी विद्यार्थी व गुरुंबद्दलचे महत्व स्पष्ट केले. यानिमित्त शिक्षक संजय मोहीते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सुभाष केसरकर, सूर्यकांत दोरुगडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ग्रा. पं. सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी कोंडूसकर, उपाध्यक्षा उर्मिला नेवरेकर, पांडूरंग दोरुगडे, शिवाजी दोरुगडे, उत्तम तुरंबेकर, रिजवाना नायकवडी, संगिता कोंडूसकर आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन शिक्षक नागेश सुतार यांनी करुन आभार मानले.

संबंधित पोस्ट

गद्दार हे गद्दारच…राजीनामे दया व निवडून या… युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा आजरा येथील सभेत घणाघात…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

उचंगी परिसरात हत्तीचा धुमाकूळ पावर ट्रीलर केले पलटी

mrityunjay mahanews
error: Content is protected !!