शनिवार १४ जून २०२५

पावसाने आठवडा बाजार उधळला…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
काल सलग दुसऱ्या दिवशी दुपारी आजरा शहरासह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे आठवडा बाजारात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने बाहेरगावच्या व्यापाऱ्यांसह स्थानिक विक्रेत्यांचे बाजारासाठी आलेल्या वयोवृद्धांसह महिलांचे मोठे हाल झाले.
दुपारी पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. चार वाजल्यानंतर मात्र पावसाचा जोर प्रचंड वाढला विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. आठवडा बाजारासाठी तालुकावासीय मोठ्या संख्येने आजरा शहरात आले होते. परंतु संपूर्ण बाजारपेठेत पाणी घुसल्याने भाजी विक्रेत्यांसह अन्य विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. कांही कालावधी करता विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

साळगाव येथे बारा हजार रुपयांच्या संसारोपयोगी साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
साळगाव, तालुका आजरा येथील सदाशिव दादू सुतार यांच्या राहत्या घराचा कडी- कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी १२ हजार रुपये किमतीचे तांब्या, पितळेचे संसारोपयोगी साहित्य चोरून नेले. याबाबतची फिर्याद सुतार यांनी आजरा पोलिसात दिली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

नळ योजनेचे ठेकेदार व नगरपंचायतीने आजरेकरांचा विमा काढावा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नगरपंचायत प्रशासन व नवीन पाणी पुरवठा योजनेचे ठेकेदार यांचे मुळे संपूर्ण आजरा शहर व उपनगरातील रस्त्यांची दुरवस्था झालेने यामुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करत
आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती तर्फे शहरवासीयांचा नळ पाणीपुरवठा योजनेचा ठेकेदार व नगरपंचायतीने विमा काढावा अशी मागणी केली आहे.
मुख्याधिकारी, नगरपंचायत आजरा यांना
नगरपंचायत मार्फत पुरवित असलेल्या सुविधा मधील त्रुटींबाबत निवेदन देण्यात आले.
आजरा नगरपंचायत हद्दीतील संपूर्ण रस्ते पाणी पुरवठा योजनेचे कामासाठी खोदले असलेने संपूर्ण आजरा शहर व उपनगरे चिखलमय झाले आहेत सदर रस्त्यावर प्रवास करताना पादचारी अथवा वाहनधारकाचा अपघात झाले याला जबाबदार म्हणून रहिवाशांचा विमा उतरावा किंवा यावर अपघात झालेस अपघातग्रस्ताला संपूर्ण वैद्यकिय खर्च द्यावा, बऱ्याच ठिकाणी नवीन अगर जुन्या नळ कनेक्शनला पाणी येत नाही अशी एकाच ठिकाणी १०, १२ कनेक्शन असतील तर ताबडतोब पहाणी करून पाणीपुरवठा चालू करावा अगर जो पर्यंत नळाला पाणी येत नाही तोपर्यंत टँकर द्वारे पाणी पुरवठा करावा, साई कॉलनी मधील तुंबलेली गटर्स त्वरीत साफ कराव्यात. बऱ्याच ठिकाणी नवीन नळ योजनेचे किंवा जुन्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी वाया जात आहे अशी ठिकाणे निदर्शनास आणून दिली या ठिकाणी पाण्याची आवश्यकता नसेल तर एन्ड कॅप बसवुन वाया जाणारे पाणी थांबवावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या. यावर मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांनी सकारात्मक चर्चा केली.
याप्रसंगी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, विजय थोरवत, संजय इंगळे, बंडोपंत चव्हाण, पांडुरंग सावरतकर, जोतिबा आजगेकर, गौरव देशपांडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

पोश्रातवाडी शिप्पूर फाट्यावर अपघातात महाविद्यालयीन तरुणी ठार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सत्तेवाडी ता.चंदगड येथील कु. कला जानबा शिंदे ही १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी आपले वडील जानबा शिंदे यांच्यासोबत दुचाकीहून गडहिंग्लज वरून येत असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिप्पूर – पोश्रातवाडी फाट्याजवळ काँक्रिट मिक्सर ट्रकने शिंदे यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील कला शिंदे हि ठार झाली तर वडील जखमी झाले असून त्यांचेवर गडहिंग्लज येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कला हिच्या पश्चात आई,वडील,भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे.

भूमिअभिलेख कार्यालयाचा कारभार सुधारणार कधी…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका भूमी अभिलेख कार्यलयाला जबाबदार अधिकारी नसल्याने नुसता सावळा गोंधळ सुरू आहे. छोट्या छोट्या कामासाठी लोकांना फेऱ्या माराव्या लागत आहे. कर्मचारी अधिकाऱ्यांकडे बोट दाखवतात तर अधिकारी नॉट रीचेबल लागतात. फोन लागलाच तर प्रतिसाद देत नाहीत, अशी परिस्थिती आहे. अतिरिक्त कार्यभार असलेले सुधाकर पाटील फोन उचलत नाहीत. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष तयार झाला आहे.
काल श्रमिक मुक्ती दलाचे कॉ. संपत देसाई, प्रकाश मोरुस्कर, दशरथ घुरे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्नाबाबत भेटायला गेले असता कार्यालयात कोणाचा पायपोस कोणाला दिसत नव्हता. शेवटी अतिरिक्त कार्यभार असलेल्या सुधाकर पाटील यांना संपर्क करायचा प्रयत्न केला असता त्यांनीही कांहीच प्रतिसाद दिला नाही. जिल्हा भूमी अधिकारी भोसले यांना संपर्क केला असता आठ-दहा दिवसात आजरा कार्यालयाचा कारभार नीटपणे मार्गी लावू असे त्यानी सांगितले. येत्या आठ दिवसात याबाबत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
♦ आजरा येथील भूमी अभिलेख कार्यालयाबाबत पालकमंत्री प्रकाश आबीटकर व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विशेष लक्ष घालणे आवश्यक आहे. अतिरिक्त कार्यभार असलेल्या सुधाकर पाटील यांनी किमान शुक्रवारी आजरा कार्यालयात हजर असणे गरजेचे आहे.♦

आजरा महाविद्यालयाच्या खेळाडूंची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाविद्यालयाच्या रिया गजानन जाधव व प्रतीक्षा उत्तम सुतार या खेळाडूंची बालेवाडी (पुणे) येथे होणाऱ्या अठरा वर्षाखालील गटात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात निवड झाली आहे. या स्पर्धा दिनांक १४ जून ते १८ जून रोजी होणार आहेत. या यशाबद्दल या खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या खेळाडूंना जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकआण्णा चराटी, उपाध्यक्ष विलास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे, सचिव रमेश यांना कुरुणकर सर्व संचालक मंडळ व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, उपप्राचार्य प्रा. डी.पी. संकपाळ पर्यवेक्षक प्रा. एम. एस. पाटील, कार्यालयीन अधीक्षक श्री योगेश पाटील यांचे प्रोत्साहन तर क्रीडा शिक्षक प्रा. अल्बर्ट फर्नांडिस व प्रा. धनंजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

आज शहरात…
कै. राजारामबापू देसाई फाउंडेशनच्या वतीने सकाळी नऊ वाजल्यापासून तालुका खरेदी-विक्री संघाच्या मुख्य इमारतीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.



