mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


 

महाराष्ट्रामध्ये आक्टोंबरच्या तिसऱ्या आठवड्यात विधानसभेकरीता होणार मतदान…?
दिवाळीपूर्वी मतदारांची होणार दिवाळी…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत असून तत्पूर्वी नवीन विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने निवडणूक विभाग सक्रिय झाला असून ऑक्टोबर महिन्याच्या १५ ते २४ तारखेच्या दरम्यान मतदान होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दिवाळीपूर्वी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याने मतदारांची दिवाळी दणक्यात होणार हे स्पष्ट होत आहे.

     मिळालेल्या माहितीनुसार २० सप्टेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल त्यानंतर २७ सप्टेंबर पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. साधारणपणे १५ ऑक्टोबर रोजी मतदान व १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी असा कार्यक्रम तयार झाला असल्याचे समजते. कोणत्याही परिस्थितीमध्ये १५ ते २४ ऑक्टोबर दरम्यान मतदान व मतमोजणी घेण्याचे दृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

     ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिवाळी सुरू होत असल्याने तत्पूर्वी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने प्रशासन प्रयत्नशील आहे. याबाबत कांही राजकीय मंडळींना अंदाज असल्यामुळे आतापासूनच ही मंडळी कामाला लागली आहेत.महायुती व महाविकास आघाडी यांच्यामध्ये कॉंटेकी टक्कर होणार हे सांगण्याची गरज नाही.तिसऱ्या आघाडीचीही तयारी काही मंडळींनी चालवली आहे. लोकसभेला दणका बसल्यानंतर महायुती सावध झाली असून महायुतीने वेगवेगळ्या घोषणांचा पाऊस पाडला आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ यासह शक्य असेल तितक्या घोषणा करण्याचे काम महायुतीने केले आहे यामुळे तातडीने निवडणूक कार्यक्रम घेतल्यास याचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता असून यामुळेच निवडणूक लांबवण्याऐवजी ती दिवाळीपूर्वी घेण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

कार्यकर्त्यांना सूचना….

      ऑक्टोबर महिन्यात १५ ते २४ दरम्यान मतदान व मतमोजणी होण्याची शक्यता गृहीत धरून नेते मंडळींनी कार्यकर्त्यांना तशा खाजगी सूचना दिल्या असून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

बंडखोरीचीही तयारी…

      सत्ताधारी महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्र आले असून तीनही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड आहे जागा वाटपाचा तिढा न सुटल्यास अनेकांनी बंडखोरी करून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारीही चालवली आहे. हीच अवस्था महाविकास आघाडीची असली तरीही मुळातच या आघाडीचे सध्याच्या विधानसभेत पक्षीय बल कमी असल्याने अनेकांना या आघाडीतून संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र काही जागावर बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

आजऱ्याचे  बस स्थानक कचऱ्याच्या विळख्यात…


       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा बसस्थानक हे आजऱ्याचे मुख्य बस स्थानक आहे. या ठिकाणी नेहमीच लोकांची वर्दळ असते. विद्यार्थी, शेतकरी, कामगार वर्ग या बस स्थानकावर आपल्या एसटी बसची वाट पाहत उभे असतात. गेल्या काही दिवसांपासून आजरा बसस्थानकामध्ये कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती पार्टी ने आगर प्रमुखांची भेट घेऊन तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.

      यंदाच्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर पावसामुळे हा कचरा भिजून तेथे खूपच दुर्गंधी सुटलेली आहे. शाळेतील लहान मुले, विद्यार्थी या दुर्गंधीतच एसटीची वाट पाहत उभे असतात. आजऱ्यामध्ये सरकारी दवाखाना असल्यामुळे सरकारी दवाखान्यात येणारे रुग्ण देखील या दुर्गंधी मध्येच एसटी साठी वाट पाहत थांबलेले असतात. “माझा आजरा, स्वच्छ आजरा” असा नारा असताना देखील आजरा एसटी स्थानकावर इतक्या मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी व कचरा पसरलेला आहे हे निश्चितच आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.

     बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने आजरा बस स्थानकावरील हा कचरा लवकरात लवकर हटवावा व एस टी महामंडळाने लोकांच्या आरोग्याशी खेळू नये यासाठी निवेदनही देण्यात आले. कचऱ्याचा प्रश्न सोडवला नाही तर बहुजन मुक्ती पार्टी या विषयाच्या विरोधात उग्र आंदोलन छेडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

     यावेळी शेखर देशमुख, नितीन राऊत, सूर्यकांत कांबळे, दीपक कांबळे, शुभम कांबळे ,दशरथ सोनुले, द्वारका कांबळे, राहुल मोरे, गौरव सुतार उपस्थित होते.

संकेश्वर-बांदा महामार्ग टोल मुक्तीसाठी तातडीने बैठक लावा…
टोलमुक्ती संघर्ष समितीची खा. शाहू छत्रपतींकडे मागणी


           आजरा :मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     संकेश्वर – बांदा महामार्गावर आजरा शहरालगत उभा राहत असलेला टोल नाक्याचा प्रश्न, या रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीचा मोबदला, रस्त्याचा दर्जा, ज्या गावातून रस्ता जातो त्या गावातील पाण्याचा निचरा यासह इतर सुविधाबाबत खासदारांच्या उपस्थितीत आणि जिल्हाधिकारी कोल्हापूर व संबंधित विभागाचे सर्व अधिकारी यांच्यासह संयुक्त बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी टोल मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने खासदार शाहू छत्रपती यांच्याकडे करण्यात आली आहे.

       या बैठकीनंतर त्याचा अहवाल केंद्रीय दळणवळण मंत्रालयाला पाठवून ना. नितीन गडकरी यांचे सोबत आजरा येथील संकेश्वर बांदा महामार्गावरील टोल नाक्याबाबत चर्चा करून बैठक लावणेत यावी अशीही मागणी केली आहे.

      आम. प्रकाश आबिटकर यांचे अध्यक्षतेखाली कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग, कोल्हापूर (NH PWD), प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, कोल्हापूर (NHAI), उपविभागीय अधिकारी भुदरगड, टोल मुक्ती संघर्ष समितीचे प्रतिनिधी आणि तालुकावासीय यांची दिनांक २०/०६/२०२४ आजरा तहसील कार्यलयात बैठक झाली.त्यानंतर मोर्चा धरणे आंदोलन यासारखी आंदोलनेही करण्यात आली. मंत्रालय स्तरावर धोरण म्हणून या रस्त्यावर आकारल्या जाणाऱ्या टोलचा निर्णय झाला पाहिजे अशी आजरेकर जनतेची भूमिका आहे. टूर्बाबत जनतेमध्ये असंतोष असून मुळातच हा राष्ट्रीय महामार्ग आहे का ? असा प्रश्न उपस्थित होण्याजोगी परिस्थिती आहे हे पटवून देण्यात आले.

      यावेळी टोल मुक्ती संघर्ष समितीचे कॉ. संपत देसाई श्री परशुराम बामणे श्री मुकुंददादा देसाई प्रभाकर कोरवी यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

पाऊस-पाणी...

     आजरा मंडल व परिसरात पावसाचे जोर कोसळला असून गेल्या २४ तासात ४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. साळगाव बंधाऱ्यावरील पाणी कमी झाल्याने मंगळवारी सकाळपासून वाहतूक सुरू करण्यात आली असल्याचे समजते.

      तालुका कृषी विभागाच्या सर्वेनुसार तालुक्यातील उसाचे २४९ हेक्टर भाताचे १५९ एकर नागरिकचे २० हेक्टर सोयाबीनचे ३ हेक्टर भुईमुगाची २६ हेक्टर व भाजीपाल्याचे १५ हेक्टर असे एकूण ४७२ हेक्टर पीक क्षेत्र अति पावसामुळे बाधित झाले असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातील २५० घरे व गोठ्यांची आजतागायत पडझड झाली आहे.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गवसे येथे अपघातात एक ठार…

mrityunjay mahanews

चराटी विरुध्द देसाई… की चराटी विरुध्द ना. मुश्रीफ…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!