बुधवार दि. ३१ डिसेंबर २०२५


आजरा कारखान्याच्या कोवाडे सेंटर शेती कार्यालयाला शेतकऱ्यांनी लावले टाळे…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कोवाडे (ता. आजरा ) येथील शेती सेंटरला ऊस तोड वेळेवर होत नसल्याबद्दल शेतकरी यांनी एकत्र जमून कार्यालयाला टाळे ठोकले.
याबाबत अधिक माहिती अशी की,.. कोवाडे गावात ६ ते ७ जणांची स्थानिक ऊसतोडणी टोळी आहे, या टोळी व्यतिरिक्त अन्य कोणतीही ऊस तोडणी टोळी नसल्याने, गावातील केवळ २०% उसाची तोडणी झाली आहे, कारखान्याकडे व संचालक यांचेकडे वारंवार मागणी करून देखील, दखल घेतली जात न्हवती, त्यामुळे संतप्त झालेल्या २५ -३० शेतकरी वर्गाने थेट मोर्चा कार्यालयकडे सकाळी १०.३० वाजता नेला.यावेळी ऑफिसमध्ये कोणीही कर्मचारी उपस्थित न्हवते, फोनवरून संपर्क साधून कर्मचारी प्रमोद होडगे यांना बोलावून घेतले. यावेळी उपस्थित शेतकरी वर्गाने प्रश्नाचा भडीमार केला, यावेळी शेती अधिकारी यांच्याशी संपर्क साधून दोन दिवसात टोळी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी लावलेले टाळे काढले, दोन दिवसात टोळी आली नाही तर उग्र आंदोलन करणार असल्याचेज्ञ उपस्थित शेतकरी वर्गाने सांगितले.
यावेळी डी. वाय. देसाई, कुमार बाटे, संभाजी साठे, वसंत पताडे, वसंत जांभुटकर, अरुण पोवार, दिलीप यमाटे, केरबा जगदाळे, तुकाराम जगदाळे, कृष्णा पोवार, संजय शिवगंड यांच्यासह शेतकरी होते .

सदगुरु भर्तरीनाथ महाराज याची दहावी पुण्यतिथी उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खेडे ता. आजरा येथील ओम ब्रम्ह चैतन्य सिध्द सदगुरु भर्तरीनाथ महाराज याच्या दहाव्या पुण्यतिथी निमित्ताने वारकरी पंरपंराने दिप प्रज्वलन, विणा पुजन, अभिषेक हरिपाठ पालखी मिरवणूक व महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी रामकृष्ण हरी वारकरी संप्रदाय आजरा च्या वतीने व हभप अशोक तर्डेकर यांच्या संकल्पनेतून हरिपाठ छोट्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. या वेळी तर्डेकर यांनी वारकरी संप्रदाय हा मानवी कल्याण आणि आध्यात्मिक समाधानातून प्रगती कडे जाणारी वाटचाल असून नवीन वर्षीच्या स्वागतासाठी हरिपाठ छोटी पुस्तीका घराघरात वाटून वारकरी संप्रदायाची पताका नव्याने समाजात रुजवण्याची गरज असेलचे सांगितले.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे यांनी आषाढी निमित्ताने पंढरपूरात तीन दिवस राहिल्याने संताचा सहवास लाभला. हा प्रमेश्वारीचा संकेत समजून भागवत धर्माच्या सोबत जाणे आवश्यक असलेचे सांगितले. यावेळी एस. के.पाटील, राजाराम जाधव यानी मनोगत व्यक्त केले.
यावेळी खेडे मठाचे रमेश चौगुले, श्रीरंग सातूसे, रवी भाटले, राजू होलम, गोविंद पाटील,शांताराम पाटील, काशिनाथ मोरे, यूवराज पोवार रामकृष्ण हरी वारकरी संप्रदाय मंडळ तालुका अध्यक्ष गौरोजी सुतार, संतू कांबळे, पांडुरंग जोशिलकर, दिपाली गुरव, कल्पना जाधव,शांताबाई चौगुले, शिवाजी गावडे, पांडूरंग पाटील,बाबू धुरे, सुर्यकांत गुरव, सचिन तपकिरे, पांडूरंग होलम याच्या सह तालुक्यातील वारकरी भक्तगण उपस्थित होते.
सुत्रसंचालन व आभार संजय घाटगे यानी मानले.

तुळशीराम मुळीक यांचा रविवारी अमृत महोत्सव कार्यक्रम…
मान्यवर राहणार उपस्थित

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
माजी ग्राम विकास अधिकारी व कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. तुळशीराम भैरु मुळीक यांचा अमृत महोत्सव समारंभ आत्मचरित्र व गौरव अल्प प्रकाशन सोहळा रविवार दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी दहा वाजता उत्तूर – आजरा आंबोली मार्गावरील हॉटेल रविराज येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी, श्री सिद्धेश्वर श्री क्षेत्र कारीमठ, हत्तरगी, श्री. काशिनाथ महास्वामीजी, विरक्त मठ घोडगेरी ता. हुक्केरी, जिल्हा बेळगाव यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून आत्मचरित्राचे प्रकाशन महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ मुश्री यांच्या हस्ते तर गौरव अंक प्रकाशन राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
याचबरोबर या कार्यक्रमास माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी आमदार राजेश पाटील, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, आजऱ्याचे नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, आजारात साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंत्रे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, रामाप्पा करीगार, बाळ कुपेकर, वसंतराव धुरे,किसनराव कुराडे,एस.डी. पाटील, संग्राम कुपेकर, जे.बी. बारदेसकर, ए.आर. पाटील, के.आर. किरुळकर, लक्ष्मण इंगळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर हजर राहणार आहे अशी माहिती श्री. टी. बी. मुळीक अमृत महोत्सव गौरव समिती चे अध्यक्ष महादेव बाबू मुळीक व सदस्यांनी दिली आहे.

पं. दीनदयाळ विद्यालयात शालेय वार्षिक क्रीडा महोत्सव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मंगळवार दि.३० डिसेंबर २०२५ रोजी पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा मध्ये शालेय वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे नौशाद बुड्डेखान, संस्थेचे संचालक सुधीर कुंभार ,नाथ देसाई तसेच माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष हर्षवर्धन महागावकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धेचा हेतू सांगितला. मानवी जीवनातील खेळाचे महत्व सांगितले. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईल मध्ये व्यस्त राहण्यापेक्षा अभ्यास व मैदानी खेळांवर आपले लक्ष केंद्रित करावे .खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि मन आनंदी राहते. आरोग्यदायी जीवनासाठी खेळ अनिवार्य आहे. खेळ हे एक करिअर घडविण्याचे साधन आहे. प्रत्येकाने खेळाची आवड जोपासली पाहिजे .खेळातून मिळणारे आरोग्य ,आनंद आणि यश हे खरोखरच अमूल्य आहेत. आज अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करत आहेत .खेळाचे महत्त्व जाणून घेऊन चांगला खेळ करून राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करा. असा मोलाचा संदेश प्रमुख पाहुणे नौशाद बुड्डेखान यांनी आपल्या मनोगतातून देऊन खेळासाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संचालक सुधीर कुंभार यांनी विद्यार्थ्यांना खेळासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रकाश प्रभू यांनी विद्यार्थ्यांना वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धा का घेतल्या जातात या संदर्भात माहिती सांगितली. यानंतर सर्व खेळाडूंनी क्रीडा प्रतिज्ञा घेतली. माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष हर्षवर्धन महागावकर यांच्या हस्ते मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी निर्मळे व आभार सुनिता कुंभार यांनी मानले.

शुक्रवारी आजरा महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिकं वितरण समारंभ
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जनता एज्युकेशन सोसायटी संचलित आजरा महाविद्यालयाचे २०२५-२६ चे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध हास्य कवी प्रा. डॉ .विष्णु सुरासे हे प्रमुख पाहुणे म्हणून सदर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत .जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास संस्थेचे संचालक मंडळ, सल्लागार मंडळ शिक्षक वर्ग विद्यार्थी यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. बी. एम. मोहिते यांनी सांगितले.

उत्तूर येथे ८ ते १० जानेवारीला २२ वे बालवैज्ञानिक संमेलन
उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पार्वती-शंकर शैक्षणिक संस्था, उत्तूर यांच्या वतीने ८ ते १० जानेवारी २०२६ दरम्यान २२ वे तीन दिवसीय बालवैज्ञानिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन मराठी विज्ञान परिषद, गडहिंग्लज व आजरा यांच्या सहकार्याने होत आहे.
संमेलनाध्यक्ष एचबीसीएसई, मुंबई येथील सेवानिवृत्त वैज्ञानिक श्री विजय लाळे असून उद्घाटन शुक्रवार, ९ जानेवारी रोजी उद्योजक श्री बसवराज आजरी यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनात इयत्ता ५ वी ते १० वी विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प व पोस्टर स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
प्रकल्पस्पर्धा पाणी संवर्धन, समतोल आहार, तंत्रज्ञानातून खेळणी, गणिती मॉडेल, आपली पृथ्वी, आपले घर व नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन या विषयांवर, तर पोस्टरस्पर्धा घनकचरा, कृत्रिम बुद्धिमत्ता व सेंद्रिय शेती या थीमवर होणार आहेत. विजेत्यांना रोख बक्षिसे, ट्रॉफी व प्रशस्तिपत्रे दिली जातील.
८ जानेवारी रोजी सायबर गुन्हे विषयक विज्ञान दिंडी व पथनाट्य, सायंकाळी आकाशदर्शन कार्यक्रम होईल. ९ जानेवारी रोजी बीजभाषण, विज्ञान शिक्षक कार्यशाळा, प्रयोगशील शेतकरी पुरस्कार, ‘शिवस्वप्न’ अंक प्रकाशन व प्रकल्प सादरीकरण होणार आहे. १० जानेवारी रोजी वैज्ञानिक दालने, वनभटकंती व पारितोषिक वितरण समारंभ होईल.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी सर्व शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

आजऱ्यात डॉ. पुजा सामंत यांच्या पुस्तकाचे मंगळवारी प्रकाशन
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
द. ना. गव्हाणकर यांचे शाहिरी वाडःमय या डॉ. पूजा सामंत लिखीत पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार (ता.६) जानेवारी होत आहे. शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे प्रमुख पाहूणे आहेत. श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर कार्यक्रमाच्या अध्यक्ष वामन सामंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. स्नेहलता ठाकूर फाऊंडेशने सौजन्य आहे. उपाध्यक्षा विद्या हरेर, कार्यवाह कुंडलिक नावलकर, सहकार्यवाह रविंद्र हक्केरी यांच्यासह सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत.

विशेष सूचना…
मृत्युंजय महान्यूजच्या बातम्या बऱ्याच वेळा link ओपन होत नसल्याने पहावयास मिळत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. याकरिता कृपया आपल्याकडे 96 37 59 88 66 हा नंबर “मृत्युंजय महान्यूज’ या नावाने save असणे गरजेचे आहे. सदर नंबर आपल्याकडे save नसल्यास आपणाला बातम्या ओपन करताना अडचण येईल. नंबर save करूनही ज्यांना बातम्या मिळणार नाहीत त्यांच्याकरता या नंबरच्या व्हाट्सअप स्टेटस वर बातम्यांची लिंक टाकण्याची व्यवस्था केली आहे. याचबरोबर jyotiprasad savant या Facebook account वरही बातम्या link द्वारे पहावयास मिळतील. बरेच मोबाईल नंबर मृत्युंजय महान्यूजकडे सेव आहेत परंतु संबंधितांकडे मृत्युंजय महान्यूज चा नंबर save नसल्याने अशा वाचकांना लिंक पाठवल्यास व्हाट्सअप अकाउंट बंद होत आहे. असा व्हाट्सअप ने नवीन नियम केला आहे.
यापुढे हळूहळू ग्रुप वर बातम्या लिंक पाठवणे बंद/कमी केले जाणार आहे. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी.
…मुख्य संपादक



