बुधवार दि.२० नोव्हेंबर २०२४



आज निवडणूक नाटयाचा शेवटचा अंक…
मतदान प्रक्रियेकरिता यंत्रणा सज्ज…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आज बुधवार दिनांक २० रोजी विधानसभेकरिता मतदान होत असून अनेक ठिकाणी ‘ हाय व्होल्टेज ड्रामा ‘ पहावयास मिळणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा रंगतदार सामना होणार असून जिल्ह्यातील दहा मतदारसंघात कमालीची चुरस निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात एकूण ३४५२ मतदान केंद्रावर ३३ लाख ५ हजार ९८ मतदारांची मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह
दहा महिला व दहा दिव्यांग केंद्रे उभारण्यात आली आहेत. दहा मतदारसंघातून दोन प्रमुख आघाड्यांसह अपक्ष व इतर घटक पक्षांचे १२१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
कागल येथे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समरजीत घाटगे यांनी दंड थोपटले आहेत. महाविकास आघाडीच्या शरद पवार यांनी याच मतदारसंघातून प्रचाराचा शुभारंभ केल्याने जिल्ह्यातील या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. याचबरोबर कोल्हापूर दक्षिण मधून विद्यमान आमदार ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपाचे माजी आमदार अमल महाडिक यांच्यातील लढतही लक्षवेधी ठरणार आहे तर राधानगरी विधानसभा मतदारसंघातील के.पी. पाटील विरुद्ध विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांच्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा दिसत आहे.या मतदारसंघात सात उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत. शिवसेनेच्या (शिंदे गट) यांच्या दृष्टीने ही लढत प्रतिष्ठेची समजली जाते. चंदगड विधानसभा मतदारसंघात दोन्ही प्रमुख आघाड्यांच्या उमेदवारांना अपक्ष आणि बंडखोरांनी चांगलाच घाम फोडला आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे १७ उमेदवार या मतदारसंघात आहेत. जिल्ह्यात आठ महिला उमेदवार आपले नशीब आजमावत असून यापैकी दोन उमेदवारांना अधिकृत पक्षांनी उमेदवारी दिली आहे.
मतदान प्रक्रियेकरीता एकूण १६२३६ अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यामध्ये तैनात करण्यात आले आहेत.


नेम एकावर… गेम दुसऱ्याचा
बिद्रेवाडी येथील अजित गुरव यांची हत्या
संशयितात वाटंगी येथील एकजण

गडहिंग्लज : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पूर्व वैमानस्यातून एकाचा ‘ गेम ‘ करण्याच्या दृष्टीने केलेल्या हालचाली त्याच्या मित्राचा बळी घेण्यास जबाबदार ठरल्या. बिद्रेवाडी ता.गडहिंग्लज येथील अजित उर्फ गोपाळ मारुती गुरव ( वय ४५ वर्षे ) याला नाहक आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यामध्ये वाटंगी येथील एकाचा समावेश आहे.
अजित उर्फ गोपाळ मारुती गुरव व सचिन भीमराव नाईक हे मंगळवार दि.१९ रोजी दुचाकीवरून नेसरीकडे जात असताना करणेकर यांच्या घरासमोरील रस्त्यावर थोड्याशा अंतरावर दुपारी पावणे तीनच्या सुमारास आकाश नाईक (वय ३०) याने सचिन नाईक याला ठार मारण्याच्या उद्देशाने सचिनच्या दिशेने मोटर सायकलची बॅटरी फेकली.मात्र सचिन खाली वाकताच ती बॅटरी मागे बसलेल्या अजित गुरव यांच्या
डोक्याला लागून त्यात त्यांचा बळी गेला.
आकाशच्या वडिलांचा खून सचिन ने १० महिन्यांपूर्वी केला होता.त्याचा राग मनात धरून सचिनला संपविण्याचा डाव आकाशने केला होता.यातूनच टेहाळणी करून आकाश याने वाटंगी ता.आजरा येथील लखन परशराम नाईक ( वय ३८, रा. वाटंगी, ता. आजरा) याला सोबत घेवून सचिनला संपविण्याचा कट केला. मात्र हा डाव यशस्वी झाला नाही. अजित यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांनी तातडीने या प्रकरणी हालचाल करून आकाश व लखन याला अटक केली आहे.अजित यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,आई,भाऊ असा परिवार आहे.या घटनेने नेसरी पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.
७ जानेवारीची घटना जबाबदार
७ जानेवारी २०२४ रोजी सचिन नाईक यांनी त्याच्या पत्नीकडे सारख्या बघण्याच्या कारणावरून उत्तम भरमू नाईक याला लाकडी ओंडक्याने वार करून ठार मारले होते. त्यानंतर सचिन हा जामीनावर बाहेर होता. या प्रकरणात उत्तमचा मुलगा आकाश हा वडिलांच्या खूनाचा राग मनामध्ये धरून होता. यातूनच सचिन याचा काटा काढण्यासाठी झालेल्या या प्रकारात अजित याचा बळी गेला.

रब्बीसह उन्हाळी पिकांना फायदा : पाटबंधारेकडून नियोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात पाटबंधारे विभागामार्फत पाणी अडवण्यास सुरवात झाले आहे. बंधाऱ्यामध्ये बरगे घातले जात आहेत. येत्या दहा- पंधरा दिवसात तालुक्यातील सर्व बंधाऱ्यांना बरगे घातले जाणार आहेत. रब्बीसह, उन्हाळी पिकांना याचा फायदा होणार आहे.
यंदा पाऊसमान चांगले राहीले. परतीचा व अवकाळी पाऊस झाला. यामुळे हिरण्यकेशी व चित्री नदीपात्रात पाण्याची पातळी चांगली राहीली. त्यामुळे नोव्हेंबर अखेरीस पाणी अडवण्यास सुरवात झाली आहे. तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील घाटकरवाडी व सुळेरान. सर्फ नाला प्रकल्पावर शेळप, दाभिल, देवर्डे, पारेवाडी, साळगाव, सोहाळे, चांदेवाडी, हाजगोळी, भादवण, बंधारे आहेत. त्याचबरोबर चित्री नदीवर परोली बंधारा आहे. या बंधाऱ्यात पाणी अडवण्यात येणार असून अडवलेल्या पाण्याचा उपयोग रब्बी, उन्हाळी पिकांना होणार आहे.

निधन वार्ता
आप्पा घंटे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मडिलगे तालुका आजरा येथील
श्री.आप्पा शंकर घंटे (वय ८० वर्षे) यांचे आकस्मिक निधन झाले.मडीलगे गावच्या देवस्थान कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असायचा.
मनसेचे तालुकाध्यक्ष श्री आनंदा घंटे व ग्रामपंचायत सदस्या श्रीमती कविता घंटे यांचे ते वडिल होत. त्यांच्या पश्चात मुलगा आनंदा यांच्यासह पत्नी व सहा मुली आहेत.











