mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार दिनांक १६ एप्रिल २०२५       

  आजरा आगाराचा ढिसाळ कारभार…

अनेक बसफेऱ्या होत आहेत रद्द…
प्रवाशांना क्रॉसिंगचाही फटका

.         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा एसटी आगाराचा कारभार अत्यंत ढिसाळ पद्धतीने सुरू असून पूर्वापार सुरू असणाऱ्या अनेक बसफेऱ्या कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याने क्रॉसिंग प्रवासाचा फटका आता प्रवासी वर्गाला बसू लागला आहे. यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

      आजरा बस स्थानकावरून केवळ कोल्हापूर, गडहिंग्लज, बेळगाव व कांही पुणे येथील बस फेऱ्या वगळल्यास अनेक ठिकाणी जाण्याकरता बस उपलब्ध नाहीत. इचलकरंजी, सांगली, पंढरपूर, आदमापूर सावंतवाडी, कोकण व गोव्याच्या दिशेने एकही थेट बस आगाराकडून सोडली जात नाही. यासाठी इतर आगाराच्या बस फेऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. या बसेस वेळेवर येतील याची खात्री नाही त्याचबरोबर त्यामध्ये जागा असेल याची कोणतीही हमी देता येत नाही. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्याने प्रवाशांना अक्षरशः तासनतास बस स्थानकावर बसची वाट बघत बसावे लागत आहे. आजरा आगाराचा कारभार सुधारणार तरी कधी ? असं संतप्त सवाल आता तालुकावासीय उपस्थित करत आहेत.

वेळापत्रक नावालाच…

      आगारामार्फत बस स्थानकावर लावण्यात आलेले वेळापत्रक हे नावालाच असल्याचे दिसत आहे. वेळापत्रकाप्रमाणे कोणतीही गाडी बस स्थानकावर येईल येईल याची खात्री नाही. तर कोणती बस फेरी अचानकपणे रद्द होईल याचाही ताळमेळ दिसत नाही.

कारणे किती वर्ष सांगणार…?

       आजरा आगार स्थापन झाल्यापासून आगार होण्यापूर्वी सुरू असणाऱ्या मुंबई ,पंढरपूर, सांगली, इचलकरंजी,सांगली, घटप्रभा, मुरगुड, संकेश्वर, उत्तूर मार्गे गारगोटी, यासह अनेक भागातील असलेल्या बसफेऱ्या आगार झाल्यानंतर बंद झाले आहेत. म्हणजे एस.टी. आगार तालुकावासीयांच्या सेवेसाठी की गैरसोयीसाठी सुरू करण्यात आले आहे ? अपुऱ्या बसेस, भारमान कमी अशी कारणे किती दिवस सांगणार ? हा प्रश्न आता तालुकावासियांना पडत आहे.

आजऱ्यातील पाणी योजनेच्या ना दर्जाची तपासणी ना कोणतीही माहिती…

अन्याय निवारण समिती आक्रमक…

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा शहर व उपनगरातील घरगुती पाणीपुरवठा योजनेस अंतर्गत चालू असलेल्या कामाबाबत तातडीच्या कामाचे दर्जा तपासणी व इतर चालु असलेल्या कामाचे गुण नियंत्रण तपासणी अहवाला बाबत‌ आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने मा.उपविभागिय अधिकारी आजरा भुदरगड उपविभाग गारगोटी यांच्याकडे दर्जा तपासणी व इतर माहितीची मागणी केली होती.

       आजरा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत २० मार्च अखेर सदर काम पूर्ण होईल असे लेखी सांगितले होते. परंतु सदर काम आजअखेर पुर्ण झालेले नाही. या चालु असलेल्या कामाबाबत फारच त्रुटी आढळून आल्या आहेत. तेंव्हा याबाबत अहवाल त्वरित सादर करावा अशी मागणी केली आहे.

       यावेळी समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, पांडुरंग सावरतकर, बंडोपंत चव्हाण, जावेद पठाण, जोतिबा आजगेकर, संतोष बांदिवडेकर, संतोष शेवाळे, निलेश घाटगे यांच्यासह अन्याय निवारण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने एकात्मिक बाल विकास समोर निदर्शने

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      महाराष्ट्र राज्य पुर्व प्राथमिक सेविका व अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली आजरा तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी एकात्मिक बालविकास कार्यालयासमोर विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर निदर्शने केली. एफ.आर.एस. प्रणाली वर बहिष्कार अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे मानधन तातडीने मिळावे, उन्हाळी सुट्टी एकाच वेळी एक महिन्यासाठी ताबडतोब जाहीर करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आले.

       सदर आंदोलनात छाया तिप्पट, वैशाली कांबळे, शशिकला रेडेकर,श्रद्धा पाटील, प्राजक्ता धूरी, कविता कांबळे,शोभा फगरे,मंगल पाटील,अंजना कांबळे,विजया पावले,नसीम जमादार यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

डॉ. अनिल देशपांडे यांचा आजरा अर्बन बँकेतर्फे सत्कार

  आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      सहकार भारती या समाजसेवी संस्थेच्या आजरा तालुका अध्यक्षपदी डॉ. अनिल देशपांडे यांची निवड झालेबद्दल आजरा अर्बन को-ऑप. बँकेच्या वतीने बँकेचे चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख श्री. अशोकअण्णा चराटी यांचे हस्ते करण्यात आला.

       यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन श्री. संजय चव्हाण, ज्येष्ठ संचालिका श्रीमती अन्नपूर्णा चराटी, श्री. सुरेश डांग, श्री. विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर, श्री. रमेश कुरुणकर, श्री. किशोर भुसारी, श्री. बसवराज महाळंक, श्री. मारुती मोरे, श्री. आनंदा फडके, सौ. प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, सौ. अस्मिता सबनिस, श्री. सुनिल मगदूम, श्री. सुर्यकांत भोईटे, श्री. किरण पाटील, अॅड. सचिन इंजल, श्री. मनोहर कावेरी, श्री. जयवंत खराडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत गंभीर उपस्थित होते.

मेढेवाडी येथील समाजमंदिराचे लोकार्पण

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मेढेवाडी ता. येथील समाजमंदिराचे लोकार्पण जिल्हा बँक संचालक श्री अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाले ,

      यावेळी बाळ केसरकर, सिध्देश नाईक, लहू पाटील, सरपंच, सौ. सुषमा केसरकर, उपसरपंच नानासो पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख मारुती डोंगरे, काकासो देसाई, विभागप्रमुख युवराज पाटील गवसे, खेडगे उपसरपंच प्रकाश कविटकर, शेळप उपसरपंच सुधाकर पाटील, साळगाव सरपंच धनंजय पाटील, सुनील दिवेकर गावातील सर्व दूध संस्था, सेवा संस्था , युवक मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

उर्दू हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

       अंजुमन इत्तेहादूल इस्लाम संस्थेचे अध्यक्ष आलम नाईकवाडे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

       यावेळी प्राचार्य सलीम शेख, अश्कर र लष्करे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

थोडक्यात पण महत्त्वाचे...
आजची बैठक पुढे ढकलली…

      आज बुधवारी उपवनसंरक्षक यांच्या सोबत जंगली प्राणी शेतकरी संघर्षाबाबत होणारी बैठक बुधवार दि २३ एप्रिल रोजी होणार आहे.

 

संबंधित पोस्ट

चालत्या चारचाकी वर गव्याची उडी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!